

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला. महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू होते. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा स्लॅब कोसळला.स्लॅबखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार, माजी आमदार ऋतुराज पाटील दाखल झाले आहेत.
भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून यावर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मात्र,सध्या निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हा दसरा मेळावा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे मेळाव्याची वाट पाहणाऱ्या आमदार धस यांच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतिश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ सहा आठवड्यांची असणार आहे. मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. वडील सतिश सालियन यांनी दिशाचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर मृत्यूपूर्वी बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत ही याचिका दाखल केली आहे.
अहिल्यानगर शहरातील कोटला भागात सोमवारी झालेल्या दगडफेक, तोडफोड व रास्तारोको प्रकरणी पोलिसांनी एकूण 200 जणांपैकी 30 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयानं 3 दिवस, 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
बडी सी बडी हस्तीं मीट गई मुझे मींटाने मे! 'तेरी उम्र जायेगी मुझे मिटाने मे असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जयंत पाटील यांच्यावर देखील जहरी टीका पडळकरांनी केली आहे. मला मंगळसूत्र चोर म्हणतात, जयंत पाटील यांनी सांगावं त्याच्या कितव्या बायकोचे मी मंगळसूत्र चोरले. मंगळसूत्र चोरीच्या आरोपावरून गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत. पण त्यांनी आता घाबरून न जाता राजीनामा द्यावा आणि जेलमध्ये जाऊन ते शहीद झाले पाहिजे, आम्ही त्यांचा पुतळा उभारू, इतर महापुरुषांपर्यंत त्यांचे फोटो लावू," असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे. नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना हरिभाऊ राठोड यांनी हे वादग्रस्त विधान केले. मराठा आरक्षण जीआरमुळे मुख्यमंत्र्याची खुर्ची धोक्यात आल्याचंही यावेळी राठोड म्हणाले.
आतापर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते. पण नियमांमध्ये कुठेही ओला दुष्काळ नाही.तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती यालाही ओला दुष्काळ म्हणजे आपण त्याला टंचाई म्हणतो. तशीच टंचाई पडली असे समजून सगळ्या सवलीती लागू करण्याचा निर्णय राज्यमंत्रीमंडळाने घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले.
यंदाचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला यासह मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन दहा रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन पाच रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
दिवाळी पूर्वीच सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढीचा बाँम्ब फोडला आहे. एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ लागू असणार आहे. दिवाळी सणासाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.
पूरग्रस्तांसाठी दिलेले 5 हजार रुपये फार कमी आहेत. 10 ते 15 हजार रुपये देणे गरजेचे होते, सरकारने तातडीने ती मदत द्यावी, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. एका एकर साठी 50 हजार रुपये मदत द्यावी. कर्जमाफी देण्याची ही योग्य वेळ आहे. मराठवाड्यात अनेकांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आता कर्जमाफी द्यावी. केंद्राकडून मदत येईल याची वाट न पाहता राज्य सरकारने आता आपली तिजोरी रिकामी करावी असेही ते म्हणाले.
बिहारमधील वादग्रस्त SIR प्रक्रियेनंतर भारतीय निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदारयादी आज प्रसिध्द करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ही यादी पाहता येईल. या प्रक्रियेवरून विरोधकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. तामिळनाडू राज्यातील करुर येथे टीव्हीके पक्षाच्या रॅली दरम्यान ज्या ठिकाणी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली त्या ठिकाणी आज त्यांनी भेट दिली. यावेळी दुर्घटनास्थळाबाबत, रॅलीचा रुट, गर्दीचे नियोजन याबाबत माहिती घेतली. तसेच या दरम्यान प्रत्यक्षदर्शींकडून ही घटनेची माहिती घेतली. या पाहणीनंतर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. केंद्र सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास यावेळी पीडित कुटुंबियांशी संवाद साधून दिला. यावेळी एनडीएच्या शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.
कृषी विभागातील अधिकारी आपला एक दिवसाचे वेतन पुरग्रस्तांना मदतनिधी म्हणून देणार आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज ही घोषणा केली.
लस निर्मितीच्या क्षेत्रात हाफकिन संस्थेचं मोलाचं योगदान असून देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये हाफकिनचा मोठा वाटा आहे. भारत सरकारकडून पोलिओच्या २६८ दशलक्ष मौखिक लसींची मागणी आहे. या लसींची निर्मिती करण्यासाठी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला हाफकिन खरेदी कक्षाच्या दोन टक्के उपकरातून २५ कोटी रुपयांचा निधी देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली.
150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणा व सेवाकर्मी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा, विभाग व मंत्रालय स्तरावरील अधिकारी यांना आपले काम दिनांक 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करणे अपेक्षित होते. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पूरस्थिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी यामध्ये अधिकारी महत्वाच्या व तातडीच्या कामकाजात व्यस्त असल्याने राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमास 100 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिली.
पूरग्रस्तांसाठी कोल्हापूरच्या महाडिक परिवाराने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून भाजप आणि महाडिक परिवाराकडून पाच हजार कुटुंबाना पन्नास लाखांचा सहाय्यता निधी, दोन ते तीन महिने पुरेल एवढे घरगुती साहित्य, संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहेत. संसारोपयोगी साहित्याचा एक ट्रक रवाना झाला असून आणखी दोन दिवसांनी एक ट्रक पाठविण्यात येणार आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगामध्ये निष्पाप २६ हिंदुंना गोळ्या घातल्या. पण ते भारतात आले कसे, हे कोणीही विचारत नाही. हे अतिरेकी भारतात आले, त्याला कोण जबाबदार आहे. ते अतिरेकी पहलगामध्ये आले आणि निष्पाप नागरिकांना गोळ्या मारून निघून गेले. भारताने पाकिस्तानचे पाणी रोखले. व्यापार बंद केला. वाघा बोर्डर बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी रुग्ण भारतात उपचारासाठी येऊ शकत नाहीत. पण पाकिस्तानसोबत भारत क्रिकेट मॅच का खेळत आहे, असा सवाल असुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सहकारी बॅंकेने पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सहकारी बॅंकेने आपल्या नफ्यातील दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सहकारी बॅंकेने मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे राज्य सहकारी बॅंकेने ही मदत सोपवली आहे.
अहिल्यानगरमध्ये आज एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांची सभा रद्द करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर ओवैसी यांनी आजच्या ऐवजी येत्या ९ ऑक्टोबर रोजी सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जवळपास राज्यात ६० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. पुढच्या आठवड्यात मदत जाहीर करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी आधी पैसे जमा होणार आहेत. दुष्काळात लागू करण्यात येणाऱ्या सर्व सवलती अतिवृष्टीमध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यास बगल दिल्याचे दिसून येत आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीचे पैसे वाटप सुरु करण्यात आले आहे. सप्टेंबरमधील नुकसानीसाठी ॲग्रिस्टॅक नियमांप्रमाणेच मदत देण्यात येणार आहे.
आदिवासी संशोधन परिषद पुणे यांनी 2017 चा अहवाल दिलाय त्या अहवालानुसार बंजारा समाजाचा कुठल्याही निकष आदिवासी मधले पूर्ण करता येत नाही त्यामुळे बंजारा समाजाचा आणि धनगर समाजाचा समावेश आदिवासी होऊ शकत नाही हे सर्व अभ्यास संस्थांनी सांगितलं असल्यामुळे त्यांची मागणी चुकीची आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकार बंजारा समाजाच्या मागणीला पाठबळ देण्याचे काम करून विनाकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप माजी आमदार सुनिल भुसारा यांनी केला आहे.
राज्यातील अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार संजय गायकवाड यांनी मोठा निर्णय घेत स्वतःचे दोन प्लॉट विकले आहेत. त्या विकलेल्या प्लॉटची रक्कम (25 लाख) त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी फंडात जमा केली आहे.
राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार घातला असून मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यासह सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीसाठी आवाहन केल्यानंतर आता राज्यातील प्रमुख मंदिरांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे करत भरीव मदत दिली आहे. आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून देखील मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 50 लाखांचा निधी जमा केला आहे. महापालिकेच्या चार हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जमत आपला एक दिवसाचा पगार एकत्रित करून हा निधी जमवला.
धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांना बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा आल्या होत्या. गेल्या आठवड्यात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केल्यानंतर सर्व बँकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, अतिवृष्टीच्या या संकटकाळात कुठलीही कर्जवसुली करण्यात येऊ नये तसेच शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करू नयेत. सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान त्यांच्यापर्यंत पोहोचावे, यासाठी बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तरीसुद्धा शेतकरी बांधवांना अडचण निर्माण केल्या जात आहेत. जर नोटीस आली तर त्यांनी संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापकांशी त्वरित संपर्क साधावा. आवश्यक असल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून आपली समस्या मांडावी. अशा बँक मॅनेजर वर सक्त कारवाई केली जाणार जाईल, अशी माहिती भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यात यावर्षी दोन दसरा मेळावे होत असून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर सुरू केलेला दसरा मेळावा आणि नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा यावर्षी होत आहे. बीडच्या सावरगाव घाट येथे मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असून मेळाव्याला अमळनेर पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील कोळी, आदिवासी समाजाचा आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला आहे. राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. या मागणीला विरोध करण्यासाठी आज अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळावा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे. यावेळी त्यांचे भाषण होणार आहे. संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. दिल्लीतील कार्यक्रमात मोदी उपस्थित राहणार आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करू अशी धमकी भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी एका टीव्ही वाहिनीवरील चर्चेत दिली. या प्रकरणी केरळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. प्रिंटू महादेवन यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केली.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जमीनच वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत न करता किमान 50 हजार रुपये हेक्टरी मदत करावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ज्या मंत्र्यांनी बँकांना लुटले आहे, बँकांमध्ये घोटाळे केले आहेत, त्यांच्याकडून तो पैसा वसूल करून तो शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.
शिंदेसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदान येथे होणार आहे. मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून सुमारे 5000 शिवसैनिक जाणार आहेत. तर जिल्हाभरातूनही शिवसैनिक उस्फूर्त पणे दसरा मेळाव्यासाठी रवाना होतील असा दावा शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला आहे.
'गुंड निलेश घायवळ फरार आणि सोनम वांगचुक यांना अटक', ही अराजकता आहे, असं म्हणत केंद्र आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येत आहे. गुन्हेगारांना मोकळे रान, देशाची सेवा करणाऱ्यांना मात्र तुरुंगवास, असं म्हणत बालगंधर्व चौकात हे आंदोलन सुरू आहे. एकीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री खंडणी, दरोडा, अपहरण, खून, गोळीबार असे गुन्हे असलेल्या निलेश घायवळला लंडनला पळवून लावण्यासाठी कार्यरत आहेत आणि दुसरीकडे देशाचे गृहमंत्री सत्तेच्या बळावर सोनम वांगचुक यांच्यासारख्या मॅगसेसे पुरस्काराने देशाचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात डांबतात. याच अराजकतेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करत असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.
सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती, सूचना जाहीर घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. निवडणुकीसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
असदुद्दीन ओवेसींची आज अहिल्यानगरमध्ये सभा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ही सभा होणार आहे. तसंच या सभेनंतर वक्फ बोर्डाची बैठक देखील होणार आहे. मात्र काल अहिल्यानगर शहरात झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत या सभेसाठी परवानगी द्यायची की नाही याबाबत संभ्रमावस्था होती.
आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यभरात पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्याची शक्यता आहे. शिवाय पंचनाम्यासंदर्भातील निकष शिथिल केले जाऊ शकतात. त्यामुळे आजच्या बैठकीकडे राज्यभरातील शेकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं घोर दुर्दैव आहे की सध्या महाराष्ट्रात निवडणुका नाहीत. अन्यथा केंद्र आणि राज्यातलं भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाटी मोठमोठे आकडे जाहीर करण्यात अग्रेसर असतं आणि मदतीपेक्षा मोठ्या जाहिराती करण्यासाठी धडपडत असतं, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राला अतीवृष्टीचा जबरदस्त फटका बसलाय. मराठवाडा, विदर्भातला काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्र संकटात सापडला आहे. पण केंद्राच्या तिजोरीत सर्वात जास्त वाटा उचलणारा महाराष्ट्र मात्र आजही दुर्लक्षित राहिलाय. या सरकारने बिनशर्त कर्जमाफीचं वचन दिलंय. आता मात्र योग्य वेळेची वाट बघा, असं म्हणत आहेत. कर्जमाफी आत्ता नाही तर मग कधी? निवडणुका जवळ आल्यावर असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.