मनोज जरांगे पाटील मुंबई आंदोलन करत असून मराठवाड्यासह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात त्यांच्या आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या या आंदोलनास आता आमदार खासदारही पाठिंबा देताना दिसत आहेत. अशात जालना जिल्ह्यातील शिरजगाव वाघाळ गावात भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांना फटकारलं आहे. त्यांनी दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावत जोरदार घोषणाबाजी केलीय. तसेच खासदार असताना जी आश्वासनं दिली ती आता पूर्ण करा. तुमचा मुलगा ही आता आमदार असून कामं करा, असे गावकऱ्यांनी ठणकावून सांगितलं. शिवाय गावातील तरुण आरक्षणासाठी मुंबईत उपोषण करत असून तुम्ही इकडं उद्घाटन करत फिरताय, कशाचं उदघाटन करताय म्हणत मुंबईला जा असे म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम असून त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज सायंकाळी या आंदोलनाची मुदत संपली होती. मात्र मुंबई पोलिसांनी आणखी एका दिवसासाठी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे सोमवारी (ता.1 सप्टेंबर) देखील मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन सुरु राहणार आहे.
सांगली जिल्ह्यात सध्या मत चोरीवरून वातावरण तंग झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी यावरून जोरदार टीका केलीय. तसेच त्यांनी भाजप आमदार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही आरोप केला होता. तसेच ते कसे निवडून आले असा सवाल केला होता. त्यावर पडळकर यांनी जयंत पाटील यांनी राजीनामा देवून पुन्हा निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचे म्हणत आव्हान दिले होते. त्यावर मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. त्यावर पडळकर यांना जयंत पाटलांवर बोचरी टीका केली. त्यांनी, मी एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलो आहे म्हणत पलटवार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेश शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी बाहेर निघताना त्यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांना घेरत त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. ही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांचा पाठलागही केली. यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, असं करण योग्य नाही. कुठलेही नेते तिथे गेल्यानंतर त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे. घोषणाबाजी करणं, बाटल्या फेकणं योग्य नाही, असे म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा भर पावसाळ्यात तापला असतानाच भाजपचे मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण शकत नाही, असे वक्तव्य केलं होतं. त्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. यानंतर आता त्यांनी आपल्या विधानावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी, मनोज जरांगे पाटील आणि आपण चांगले मित्र आहोत. माझ्यात आणि त्यांच्यात भांडण लावू नका, असे म्हटलं आहे.
शरद पवारांनी मराठा आरक्षणावर भाष्य करत तामिळनाडूत 72% पर्यंत आरक्षण मर्यादा वाढवल्याचे म्हटले. तसंच आपल्या राज्यात सुद्धा ते शक्य आहे असेही सांगितलं. त्यावर, प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार हे खूप सीनियर लीडर आहेत, ते परिपक्व नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्रिपद भोगलं आहे. केंद्रामध्ये सुद्धा केंद्रीयमंत्री म्हणून काम केलेलं आहे. मग असं असताना इतक्या वर्षात त्यांनी हा विचार का केला नाही, असा प्रश्न शिंदेंनी शरद पवारांना केला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठा दावा केला आहे. नीराकडून लोणंदच्या दिशेला जात असताना माझ्यावर हल्ला झाला, असा मोठा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. नीरा गावाजवळ हा हल्ला झाल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. आपण चहा पिण्यासाठी थांबलेलो असताना आपल्यावर हल्ला झाला, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबईत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावर तोडगा काढण्यासाीठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली. मागण्यांवर निर्णय घेतल्यानंतर कायदेशीर पेच निर्माण होऊ नये, यासाठी राज्याचे अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेण्याचे या बैठकीत ठरले आहे.
मनोज जरांगे पाटील हे जेव्हा मुंबईच्या दिशेने निघाले होते, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांची वाशी येथे जाऊन भेट घेतली होती. त्या भेटीत एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. तेव्हा काय ठरले होते? मग ते पुन्हा मुंबईत कसे आल? हे एकनाथ शिंदे यांना विचारायला हवे, असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांनी माहिती घेऊन बोलायला हवे होते, अशी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात का टिकवता आले नाही? हे राज ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि तेव्हाच्या सरकारला विचारायला हवे, असेही शिंदे म्हणाले..
मनोज जरांगे पाटील आणि मी चांगले मित्र आहोत. माझ्यात आणि त्यांच्यात भांडण लावू नका, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकणारं आरक्षण दिलं होतं. आता मात्र पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. कायदेशीर मार्गाने मराठा आरक्षणाचा मार्ग निघायला हवा. मी स्वत: कायदाविषयक तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. यातून काहीतरी मार्ग काढा असं मी या तज्ज्ञांना सांगितलेले आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा अशी आमची भूमिका असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सायंकाळी या आंदोलनाची मुदत संपली होती, मात्र मुंबई पोलिसांनी आणखी एका दिवसासाठी या आंदोलनाला परवानगी दिली आहे. आता उद्याही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु राहणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे पथक, क्यूआरटी, आरएएफ तसेच विशेष दल सोमवारीही मुंबईत तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर एकनाथ शिंदे संतापले. मी सगळं खुलेआम करतो. लपून छपून, बंद दाराआड काही करत नाही. राज्य सरकार योग्य निर्णय घेण्यास समर्थ असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आत एक बाहेर एक भूमिका नको, आम्ही स्पष्ट भूमिका घेतो असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आमचा सुप्रिया सुळे यांना सवाल आहे ते जरांगेच्या स्टेजवर गेल्याच कशाला? त्यांच्या वडिलांनी देशात पहिल्यांदा ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण दिलं आणि त्याच आज जरांगेना पाठिंबा द्यायला स्टेजवर जातात? याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? हा शरद पवारांना आमचा सवाल आहे, असे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या करत आहेत त्याच्याकडे आम्ही सकारात्मकने पाहात आहोत. ते मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी करत आहेत. पण न्यायालयाचे काही निर्णय आलेले आहेत. या निर्णयांचा आपल्याला अवमान करता येणार नाही. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन, अशी मागणी केली जात असेल आणि लोकांना खुश करण्यासाठी तसा निर्णय सरकराने घेतलाच तर तो एकही दिवस टिकणार नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच कायद्याच्या बाहेर निर्णय झालाच तर मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना तयार होईल, असेही ते म्हणाले.
पुण्यातील बहुचर्चित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सोमवारी (1 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी हा उड्डाणपूल महत्त्वाचा आहे.
हा उड्डाणपूल सुरू करावा यासाठी अनेक आंदोलनं झाली होती. अखेर या पुलाचं उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, खाते प्रमुख व पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत पुलाची पाहणी केली.
मराठा आरक्षण मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. मनोज जरांगे पाटीलांना उपोषणामुळे प्रचंड कमजोरी जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या भोवती आंंदोलकांनी घेराव घातला होता.
मराठा आरक्षण मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीने मराठा समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचा आज मुंबई येथील आझाद मैदान मधील तिसरा दिवस आहे. महाराष्ट्र भरातून अनेक मराठा आंदोलक काही दिवसांचा प्रवास करून मुंबईत दाखल झालेला आहे. मुंबईतील रस्त्यांवरती आपल्या गाड्या लावून मराठा आंदोलक आझाद मैदान परिसरामध्ये ठिय्या मांडून आहेत. मुंबई येथील आंदोलनादरम्यान आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी आंदोलकांना मोबाईलची आवश्यकता आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी अनेकांनी आपल्या गाडीतच व्यवस्था केली आहे. मात्र अनेकांना मोबाईल चार्जिंग करण्याची व्यवस्था नाही त्यामुळे काही मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकांमधील सेल्फ टीकिटिंग मशीन आहेत. त्या मशीनच्या क्लब मध्ये एक्सटेंशन बोर्ड लावून आपल्या चार्जिंग ची व्यवस्था केली आहे. अनेक मराठा बांधव या जुगाडाच्या माध्यमातून आपले मोबाईल चार्जिंग करत असताना पाहायला मिळत आहेत.
बीड जिल्ह्यातील पन्नास गावांनी मुंबईत मराठा आंदोलकांसाठी भाकरी पाठवल्या. भाकरी, ठेचा शिदोरी मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.
पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस विभागाने गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार गणेशोत्सवाच्या शेवटच्या 7 दिवसांत पुणे शहरातील ४ प्रमुख रस्ते संध्याकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. तर 12 रस्त्यांवर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
रोज सायंकाळी 5 नंतर बंद ठेवण्यात येणाऱ्या रस्त्यांमध्ये
लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक), शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते मंडई परिसर), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), टिळक रस्ता (हिराबाग चौक ते नेहरू स्टेडिअम) या रस्त्यांचा समावेश आहे.
तर शिवाजी रोड,कर्वे रोड,एफसी कॉलेज रोड,जंगली महाराज रोड,सिंहगड रोड,गणेश रोड, शास्त्री रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड हे रस्ते बंद राहणार आहेत.
दहावी बारावी परीक्षेच्या खाजगी 17 नंबर परीक्षा अर्जासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 ऑगस्टपर्यंत असलेली मुदत आज संपत असल्यामुळे आणखी 15 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून उपमख्यमंत्री अजित पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन ग्रामपंचायत नवीन ग्रामसचिवालयाचे उद्घाटन प्रसंगी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर येणार होते. मात्र, आता अजित पवार सगळे कार्यक्रम सोडून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर बोते. यावेळी त्यांनी लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. तसंच प्रदेश भाजपच्या नेत्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषत: मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे. मुंबईतील मीरारोड परिसरातील निवासस्थानी तिचे निधन झाले. तिने अवघ्या 38 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. मध्यंतरी तीची तब्येत बरी होत होती. मात्र, पुन्हा तिच्या शरीरात कर्करोग पसरला, याच आजारामुळे तिचं अखेर निधन झालं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गरजू मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलं आहे. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत. शिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकणार नाही, असे काही लोक म्हणत होते. त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले. मात्र, फडणवीसांचे सरकार गेल्यानंतर काही लोक मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात न्यायालयात गेले. न्यायालयाने हे आरक्षण रद्द केल्याने या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळू शकला नाही.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होऊ शकत नाही. मराठा समाजाला दलितांसारखं अपृश्यतेचा समाना करवा लागला नाही. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण शक्य नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज बीड बंदची हाक देण्यात आली. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र, सरकारडून अजुनही मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे जरांगे पाटलांना पाठींब्यासाठी मराठा संघटनांकडून बीड बंदची हाक देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची शिंदे समितीने शनिवारी भेट घेतली. मात्र, मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आज पुन्हा मराठा उपसमितीची बैठक होणार आहेत. या बैठकीला समितीमधील सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील यांना शनिवारी शिंदे समिती भेटली. मात्र, या भेटीनंतर देखील जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यातच शनिवारी रात्री मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास्थानी गेले होते. तिन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (रविवार) तिसरा दिवस आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत मुंबईमधून जाणार नसल्याचे मराठा आंदोलक सांगत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.