
अजित पवार आणि बीड मधील महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, पवार एका स्थानिक कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून अवैध उत्खननावरील कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले. यावरूनच आता वाद सुरू झाला आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्राचे माजी डीजीपी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी अंजना कृष्णा यांची उघडपणे बाजू घेतली आहे. तर अजित पवार यांच्यावर संताप व्यक्त करताना, महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसोबत असा व्यवहार कधीच होत नव्हता. चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांनी अशी कृती केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
गणेश विसर्जनानिमित्त राज्यभर गणेश भक्त बाहेर पडले आहे. राज्यभर गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू आहे. अशातच चाकण परिसरावर शोककळा पसरली आहे. येथे वेगवेगळ्या घटनात गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जणांना बुडून मृत्यू झाला आहे. वाकी खुर्द येथील भीमा नदीत दोघे तर बिरदवडी ता. खेड येथील विहिरीत एक जण बुडाला. शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत एक जण बुडाला.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सहारा इंडिया ग्रुप आणि त्याचे संस्थापक सुब्रतो रॉय यांच्या कुटुंब आणि अधिकाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून कोलकात्याच्या पीएमएलए न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
नागपूरमध्ये ओबीसी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसींच्या अधिकारांवर गदा येऊ शकते, अशी भावना विविध पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी, सरसकट दाखल्यांमुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप केला असून ओबीसी आता न्यायालयीन आणि रस्त्यावर उतरून लढाई करणार असल्याचा निर्धार केल्याचे सांगितले आहे.
अनंत चतुर्थीनिमित्त शनिवारी मुंबईसह राज्यभरातील गणरायांचे विसर्जन होत आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि गुललाची उधळण करत बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरच्या बाप्पाला निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय वर्षा या निवासस्थानी आपल्या बाप्पाचं विसर्जन केलं. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते त्यांनी आपल्या बाप्पाचं विसर्जन केलं. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करत निरोप दिल्याचे पाहायला मिळाले.
कर्नाटक सरकारने राज्य निवडणूक आयोगाला शिफारस पाठवली आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावात असे म्हटले आहे की ईव्हीएमवर जनतेचा विश्वास आणि विश्वासार्हतेचा अभाव आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विनंती केली आहे.
पुण्यातील मानाचा पहिला कसबा आणि मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक ठरलेल्या वेळे आधी अलका चौकात पोहचल्याबद्दल पोलीस आणि प्रशासनाकडून त्यांच अभिनंदन करण्यात आलं. यावेळी पुण्यात विसर्जन मिरवणूकीच्या वेळेवरुन बरीच चर्चा पहायला मिळत होती. मात्र ग्रामदैवत कसबा आणि ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी यांनी वेळ पाळल्याबद्दल त्यांच कौतुक होतय. तर दुसरीकडे दगडूशेठची मिरवणूक सुरु झाली आहे.
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. लाखो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.
पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात मानाचा पहिला गणपती कसबा १०.१५ वाजता बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थ झाला. पारंपरिक पालखीतून लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ. दरवर्षी पेक्षा यंदा एक तास अधिच मिरवणुकीला सुरुवात
मुळशी धरण ९८ % भरले आहे व पाऊस कमी / अधिक प्रमाणात होत आहे आणि पाणी पातळीत वाढ घट होत आहे. त्यामुळे मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 1300 ने सुरू असणारा विसर्ग सकाळी ११:०० वाजता 2946 Cusecs करण्यात येईल, तसेच पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट करण्याचा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर आला होता. 14 पाकिस्तानी अतिरेकी मुंबईत पोहोचले असून, 34 गाड्यांमध्ये 400 किलो RDX लपवण्यात आलं आहे, असा धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याला पोलिसांनी नोएडामधून अटक केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मुरूमाच्या बेकायदेशीर उत्खननावरून अजित पवार यांच्या आघाडीतील भागीदारांनी जाणूनबुजून त्यांच्या आणि आयपीएस अधिकाऱ्यातील संभाषणाला वेगळा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर चौफेर टीका होत असताना रोहित पवारांनी केलं समर्थन केलं आहे. रोहित पवार म्हणाले, राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे, त्यामुळं आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधत राहू.
राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 5, 2025
मुंबईत 6500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आणि जवळपास पावणेदोन लाख घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आल्याचं सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितलं. तसंच या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी एआयच्या मदतीने सर्व घडामोडी टिपण्यासाठी लालबाग तसेच महत्त्वाच्या मंडळाच्या ट्रक, तसेच वाहनांना चीप बसवली आहे. यामुळे गर्दीत हे वाहन जिथे जाईल त्याची स्थिती पोलिसांना कळेल आणि तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास मदत होईल. सीसीटीव्हीद्वारे संशयास्पद हालचाली, व्यक्तींबाबतही पोलिसांना अलर्ट मिळेल.
भिवंडी शहरातील नारपोली परिसरात बालाजी डाईंग या दोन मजली इमारतीला अचानक भीषण आग लागली आहे. डाईंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कपड्यांचा साठा असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आज सकाळी 10 पासून ते मिरवणूक संपेपर्यंत गणेश रस्ता, दारूवाला पूल ते जिजामाता चौक, केळकर रस्ता : बुधवार चौक ते टिळक चौक बंद असणार आहे.
हे रस्ते दुपारी 12 पासून बंद राहणार
6 सप्टेंबर शनिवारी दुपारी 12 पासून ते 7 सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत
बाजीराव रस्ता : सावरकर रस्ता ते फुटका बुरूज चौक, कुमठेकर रस्ता : टिळक चौक ते विश्रामबाग चौक, शास्त्री रस्ता : सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक हे रस्ते बंद राहणार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.