ज्येष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
लोकसभेत प्रचार केला त्याला भाजपवाले फेक नेरेटिव्ह म्हणतात. पण संविधान अजून पूर्ण वाचवे नाही. महाराष्ट्राची निवडणूक त्यासाठीच महत्त्वाची आहे. त्यांना फेक नेरेटिव्ह वाटत असेल तर धारावी, मुंबई अदाणीच्या घशात घातले जातायेत. चुकीच्या निविदा काढल्या जातायेत. विषय फक्त धारवीचा नाही तर, मालवण, दहिसर, कांजुरची जमीन दिली गेली आहे. सगळंच त्यांना द्यायचं. आमचं सरकार आल्यानंतर चुकीच्या निवेदा काढल्या आहेत त्या आम्ही रद्द करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बीकेसीमध्ये महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात महिलांना हे काही पैसे देत आहेत. मात्र, गॅस सिलेंडर, जीएसटी आणि इतर माध्यमातून प्रत्येक कुटुंबाकडून 90 हजार रुपये काढून घेत आहेत. आणि हे पैसे अडानी अंबानींना देत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेतून प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदीर उभारण्याचे आश्वासन दिले आहे.तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही मुंब्रा येथे शिवाजी महाराजांचे मंदीर उभारू असे म्हटले आहे. यामध्ये आता संभाजी ब्रिगेडने उडी घेतली आहे. शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्याला संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे. शिवाजी महाराज काल्पनिक नव्हते तर त्यांचे मंदिर कशासाठी, असा सवाल संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई केली आहे. निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात 280 कोटी रुपयांचा मुद्देमाल आयोगाकडून जप्त करण्यात आली आहे. यात 78 कोटी रुपयांची कॅश जप्त तर, झारखंडमध्ये 158 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जप्त केलेली रक्कम ही तिप्पट आहे. निवडणूक आयोगाकडून आजपर्यंत जप्त केलेल्या मुद्देमालाची आकडेवारी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रचाराचा नारळ आज (बुधवारी) बीकेसी येथे फूटणार आहे. राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बीकेसीत महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र स्वाभिमान सभा' होणार आहे. या सभेसाठी राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. या सभेत महिलांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढील 36 तासाच्या आत राज्यातील सगळ्या मोठ्या मराठी वर्तमानपत्रात घड्याळ चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असा मजकूर असलेल्या जाहिराती द्या, असा सुचना सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना दिला आहेत. तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत घड्याळ चिन्ह आम्हाला दिले आहे हा मुद्दा जाहिरातीमध्ये लिहा, असे देखील न्यायालयाने सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 नोव्हेंबरला होणार आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कार्यकाळात निकाल येण्याच्या, आशा मावळल्या आहेत. 8 नोव्हेंबर हा विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामाचा शेवटचा दिवस आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीची संभाव्य तारीख 18 नोव्हेंबर आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त होत असल्याने आता नव्या पीठाकडे हे प्रकरण वर्ग केलं जाणार आहे.
नागपूरमध्ये संविधान कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जातनिहाय जनणगणना होणारच आणि ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडणार असल्याचं बोलून दाखवलं.
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा 277 जागांवर विजय झाला आहे. तर कमला हॅरीस यांना 226 मते मिळाली आहेत. त्यामुळे आता अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार येणार हे निश्चित झालं आहे.
दलित आणि मुस्लिम संघटनांनी यादी दिली नाही म्हणून आम्ही निवडणूक लढू शकत नाही हे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं कारण चुकीचं असल्याचा दावा राजरत्न आंबेडकर यांनी केला आहे. दलित आणि मुस्लिम संघटनांनी आधीच आपली यादी जरांगे यांच्याकडे दिली होती. निवडणूक न लढण्याच्या जरांगे यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र, आम्ही यादी दिली नाही म्हणून निवडणूक लढू शकलो नाही हे जरांगे यांनी दिलेल्या कारणामुळे समाजामध्ये गैरसमज पसरू शकतो. त्यामुळे आम्ही त्यांना यादी दिली होती ही भूमिका स्पष्ट केली. शिवाय आपण मराठा समाजाच्या पाठीशी कायम उभे राहणार असल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून आज विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी त्यांनी बारामतीला प्रगत तालुका बनवण्याचं ध्येय असल्याचं सांगितलं. कर्करोग उपचारासाठी बारामतीत रुग्णालय उभारणार असल्याचंही अजितदादांनी यावेळी सांगितल.
राज्यात आमचे सरकार आले तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारू, ही आमची भूमिका आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पनेची चेष्टा केली. तुम्ही शिवरायांचा गैरवापर करत आहात. देवेंद्र फडणवीस तुमचे पूर्वज मोगलांची चाकरी करत होते आणि महाराष्ट्राशी गद्दारी करत होते. त्यामुळे ही फडणवीसी महाराष्ट्रात दाखवू नका, अशी बोचरी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. उद्यापासून शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यानंतर त्यांच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात सभा होणार आहेत. शरद पवारांच्या पाठोपाठ जयंत पाटील सुद्धा राज्यातील बहुतांश मतदारसंघात सभा घेणार आहेत. पाटील यांच्या 55 पेक्षा जास्त सभा होणार असल्याची माहिती आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालांत मोठ्या घडामोडी होत आहेत. सुरूवातीला पिछाडीवर असणाऱ्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांची मोठी घोडदौड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि हॅरिस यांच्यात केवळ 20 जागांचा फरक आहे. कमला हॅरिस यांनी 210 जागांवर आघाडी घेतली आहेत तर ट्रम्प 230 जागांवर आहेत.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आत्ता त्यांच्या निकटवर्तीयांनी धमकीचे फोन येत आहेत. सलमान खानला आतापर्यंत तीन ते चार वेळा धमकीचे फोन आले आहेत. अशातच आचा एकाला थेट पाकिस्तानच्या नंबरवरून धमकीचा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 'बाबा सिद्दिकी गेले आता तू पण जाणार आणि तुझी मुलं पण जाणार', अशी धमकी या निकटवर्तीयाला देण्यात आली आहे. तर दुसऱ्या एकातडून पाच कोटी रुपयांच्या खंडणी मागितल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील 12 दिवसात 48 सभा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसाला 4 सभा मु्ख्यमंत्री घेणार आहेत. त्यामुळे पुढील 12 दिवसांत महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ते विदर्भ, मराठवाडा, कोकण,पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशात सभा घेणार आहेत.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालांची आकडेवारीत वेगाने बदल होत आहेत. काही वेळापूर्वी मतमोजणीदरम्यान पिछाडीवर असलेल्या कमला हॅरिस (Kamala Harris) दमदार पुनरागमन केलं आहे. त्या सध्या 179 जागांवर आघाडीवर घेतली आहे. तर डोनाल्ड ट्रम्प हे 214 जागांवर पुढे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पक्षाला नवं चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्या पक्षाकडून केली गेली होती. मात्र कोर्टाने ती मागणी मान्य केली नव्हती. त्यानंतर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत कोर्ट काही वेगळे निर्देश देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रॉयटर्सच्या दिलेल्या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 162 मतांची आघाडी दिसून येत आहे. तर कमला हॅरीस 81 मतांसह पिछाडीवर आहेत.
भाजपने बंडखोर पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. पक्षादेश न पाळणाऱ्या जवळपास चाळीस बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचा देखील समावेश आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते वाशिम, अमरावती, अकोला जिल्ह्यात त्यांच्या सभा होणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.