Maharashtra Politics live : अजित पवारांच्या राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा ? रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या...

Maharashtra Politics Breaking News Today DECEMBER 01:महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडी पाहा एका क्लिकवर. आज नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटचा दिवस आहे.
Rupali Patil
Rupali PatilSarkarnama
Published on
Updated on

अजित पवारांच्या राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा ? रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या... 

रुपाली पाटील ठोंबरे या सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पण त्यांनी राजीनाम्याविषयीच्या चर्चांवरह भाष्य केलं. त्या म्हणाल्या, ‘मी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. पण या काळात तक्रारी मी अजित पवारांकडे दिलेल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा जर प्रांतांध्यक्षांकडून माझ्यावरती गुन्हा करायला लावत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. ही बाब मी अजित पवार यांच्या कानावरती घातली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

हिंजवडी येथे एक भीषण अपघात, सख्या भावा-बहिणीचा मृत्यू

हिंजवडी येथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे.आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ही बसचा टायर फुटल्यामुळे ही बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना चिरडत रस्त्याच्या कडेला थांबली. या अपघातात दोन सख्या भावा बहिणीचा मृत्यू झाला आहे. 

राज्य निवडणूक आयोगाचे संकेत; शिवसेना आमदार निलेश राणेंच्या अडचणी वाढणार 

सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकारीच्या घरावरील टाकलेल्या छाप्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतला वाद आणखी चिघळला होता. या प्रकरणात राणेंवर गुन्हाही दाखल झाला आहे. या प्रकरणात आता निवडणूक आयोगानं निलेश राणेंना धक्का देत कुणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं, नियमात बसत नसल्याचं म्हटलं आहे. आयोगाच्या या भूमिकेनंतर निलेश राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

रायगडमध्ये महायुतीत बिघाडी? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिवसेनेशी युती नाही? तटकरेंकडून स्वबळाचे संकेत

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुती म्हणून लढणार नाही, असे स्पष्ट संकेत खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आम्ही लढणार नाहीत', अशी भूमिका घेतल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्यांचा समाचार घेत, तटकरेंनी भाजपसोबत युतीचे दरवाजे उघडे असल्याचे म्हटले आहे. काही ठिकाणी स्वतंत्रपणे तर काही ठिकाणी भाजपसोबत लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस-शिंदे यांच्यात दरावा कायम? एकाच पंचतारांकित हाॅटेलात मुक्काम करूनही भेट टाळली

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी काल रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. विशेष म्हणजे या दोघांचाही मुक्काम एकाच पंचतारांकित हाॅटेलात होता. पण दोघांची ना भेट झाली, ना चर्चा! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर फडणवीस-शिंदे यांच्यात काहीसा दरावा आल्याचे चित्र होते.

नितेश राणे डरपोक आमदार त्यांच्यात हिंमत असेल तर..., संदेश पारकर यांचा थेट आरोप...

नितेश राणे डरपोक आमदार त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मी तीस कोटी मागितल्याचा पुरावा द्यावा. मी माझा अर्ज मागे घेतो अन्यथा त्यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनाम द्यावा असे म्हणत शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आरोप करणाऱ्या नितेश रानेंवर पलटवार केला आहे. नितेश राणे यांनी पारकर यांनी, माझ्याकडे तीस कोटी रुपये आणि नगराध्यक्ष पद मागितल्याचा आरोप केला होता. त्यावर पारकर यांनी थेट आव्हान दिले आहे.

निलंगा नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलल्याने राजकीय पक्षांमध्ये संताप, सर्वपक्षीय उमेदवारांकडून जोरदार घोषणाबाजी...

लातूरच्या निलंगा नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया अचानक पुढे ढकलल्याने, निलंगा येथे राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयीन अपील असल्याने निलंगा नगर परिषदेची निवडणूक ही पुढे ढकलली आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाबाबत निलंगा नगर परिषदेमध्ये देखील आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर निलंगा नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. यावरून आता राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली आहे.

साहेबांमुळेच खेडमध्ये युती होऊ शकली,  त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय..., शिंदेंच्या मंत्र्यांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती व्हावी यासाठी आम्ही सर्वानी प्रयत्न केले होते, मात्र ते काही शक्य होऊ शकले नाही. निलेश राणे यांनी ज्या काही गोष्टी उघडकीस आणल्या त्या गंभीर आहेत. त्याची शहानिशा निवडणूक आयोग करेल, चौकशी करेल, चौकशी अंती जे काही सत्य आहे ते समोर येईल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. तसेच त्यांनी युती जरी झाली नसली तरी भाजप-शिवसेनेत कुठेही वाद होऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त करताना भाजप आणि आम्ही एकत्र सत्तेमध्ये आहोत, असे म्हणत रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय. त्यांच्यामुळेच खेडमध्ये युती होऊ शकली असे मत त्यांनी मांडले आहे.

धाराशिवमध्ये निवडणुकीच्या प्रचारात अंधश्रद्धेचा भयंकर खेळ

निवडणुकीच्या प्रचारातही अंधश्रद्धेचा भयंकर खेळ सुरु असल्याचा प्रकार धाराशिवमधून समोर आलाय.. परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत जनशक्ती नगरविकास आघाडीच्या उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुया, दाभण टोचूण तो काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवल्याने खळबळ उडाली आहे. कितीही सुया टोचल्या तरी फरक पडणार नाही. जनता तुमच्या त्रासाला कंटाळली असल्याची टीका ठाकरेसेनेने केलीये.. तर चौकशी करण्याची मागणी शिंदेसेनेनी केलीये..

Nagar Parishad Election : डहाणूमध्ये भाजपच्या विरोधात शेवटच्या दिवशी सर्वपक्षीय एकवटले; दोन्ही राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा

डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. कारण या निवडणुकीत भाजपच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले आहे. शेवटच्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीत डहाणूमध्ये एकत्र आल्या आहेत.

Nilesh Rane : कुणाच्याही घरात तपासणी करून कारवाईची मागणी करणं चुकीचं : नीलेश राणे प्रकरणावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

आमदार नीलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात छापा टाकून पैशाची बॅग माध्यमांसमोर दाखवली होती. त्यानंतर सिंधुदुर्गात राजकारण पेटले होते. त्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. कुणाच्याही घरात जाऊन तपासणी करून कारवाईची मागणी करणं चुकीचं आहे. सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असतील तर आयोगाकडून तत्काळ कारवाई करण्यात येईल. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Election commission : नगरपरिषदा निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच राज्यातील २४ नगरपरिषदा आणि १५० नगरसेवकांच्या निवडणुका पुढे ढकलेल्या आहेत. एखादा उमेदवार कोर्टात अपील करत असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो. त्यानुसार ह्या निवडणुका पुढे ढकलेल्या आहेत. तसेच, हा वेळ दिला नसता तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अडचणीत आली असती, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

Kagal Politic's : कागलच्या राजकारणात पुन्हा खळबळ; ठाकरेंच्या उमेदवाराचा शिंदेसेनेला पाठिंबा

कागल नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शारदा गुनाजी नागराळे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. नागराळे यांनी निवडणुकीतून माघार घेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कागलच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.

Akola Politics : बटेंगे तो कटेंगेचा नारा चला नही; आमदार साजीद पठाण यांचा भाजपवर हल्लाबोल

वाशिमच्या मालेगाव नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश अहिर यांच्या प्रचारार्थ मालेगाव इथं सभा पार पडली. या सभेत अकोल्याचे आमदार साजीद खान पठाण यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. माझ्या मतदार संघात बटेंगे तो कटेंगेचा नारा चलला नही, असे म्हणत मालेगावातील धार्मिक एकता, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुना संस्कृतीचे कौतुक केले.

Eknath Shinde Shivsena : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिंदे शिवसेनेचा संताप; जोरदार घोषणाबाजी

अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी निवडणूक आयोगाचा निषेध केला. इतकंच नाही तर कुणाच्यातरी दबावाखाली निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक निवडणूक पुढे ढकलण्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.

Solapur Politics Update : अनगर नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली; उमेश पाटील यांची टोलेबाजी

अनगरमधील स्वतःला सर्वेसर्वा म्हणून घेणाऱ्यांचा पापाचा घडा आता भरला. हा नियतीचा फेरा आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली म्हणून दोन वेळा फुगड्या खेळून झाल्या आहेत. कदाचित वयोमानाने तिसऱ्यांदा खेळताना पाय घसरू शकतो. त्यामुळे न झालेल्या लढाईमध्ये विजयाचा आनंदोत्सव साजरा केला आहे. कदाचित नियतीला आवडला नाही. राज्याच्या निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. आमचं अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आम्ही हायकोर्टात अपील करणार आहोत, असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश पाटील यांनी म्हटले.

Mahayuti Politics : फडणवीस अन् शिंदेंना अजितदादांचा निधी वाटपावरून सूचक टोला

महायुतीमधील सत्ताधारी मित्रपक्षातील प्रमुखांमध्ये नगरपालिका निवडणुकींमध्ये निधी वाटपावरून कुरघोडीचं राजकारण रंगलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड इथं सभेत, कुणी ठाण्याचा, तर कुणी नागपूरचा निधी देताना विचार करणार, मग माझ्याकडे फाईल आली, तर मीही माझ्याच जिल्ह्याचा प्राधान्याने विचार करणार ना, असा सूचक टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

Sangali Politics : जत नगरपरिषद निवडणुकीला हिंसक वळण

जत नगरपरिषद निवडणुकीला हिंसक वळण लागलं आहे. जतमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला झाला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालं. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विलासराव जगतापांनी केला आहे.

BJP Nitesh Rane : शिंदेसह केसरकर यांना मंत्री नीतेश राणे यांचा टोला

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर किती बोलले तरी, त्यांचा आशीर्वाद आमच्या उमेदवाराबरोबर आहे. ते तीन तारीखचा गुलाल उधळण्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून असतील. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे शेवटची सही मुख्यमंत्र्यांचीच असते हे त्यांना माहित आहे. कोणाला निधी द्यायचा, कोणाची यादी नक्की करायची, हे सगळे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सहीने होतात, असा टोला भाजप मंत्री नीतेश राणे यांनी लगावला.

BJP Vs ShivsenaUBT : आशिष शेलार यांची शिवसेनायुबीटीवर जोरदार टीका

सामना हे काही वर्तमानपत्र आहे? त्यात अग्रलेख असतो? ही तर मला नवीनच बातमी आहे. त्यामुळे कात्राने भाद्रविण्यापेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष हा घाबरलेला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या वाक्याचा विपर्यास करणं भारतीय जनता पार्टीची भीती सामनाच्या अग्रलेखातून दिसते, असा टोला सिंधुदुर्ग इथं मंत्री आशिष शेलार यांनी लगावला.

Wardha Poltics : निवडणूक आयोगाच्या विरोधात अपक्ष उमेदवाराचं ठिय्या आंदोलन

वर्ध्याच्या देवळी इथं नगर परिषदेची निवडणूक लांबनीवर टाकण्यात आली. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर इथला प्रचार थांबला. पण जे उमेदवार रिंगणात होते, त्यांचा हिरमोड झाला. देवळी इथं जनशक्ती आघाडीचे उमेदवार किरण ठाकरे यांनी निवडणूक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून लक्ष वेधलं. कोणत्याही एका राजकीय पक्षाला मदत करण्यासाठी व अपक्ष उमेदवारांना आर्थिक कमकुवत करण्यासाठी निवडणूक आयोगाचा डाव असल्याचे सांगत किरण ठाकरे यांनी आयोगाचा निषेध केला.

Akola Crime : प्रेम प्रकरणातून युवकाची भर रस्त्यावर चाकू सपासप वार करत हत्या

अकोला जिल्ह्यातील शेगाव अकोट रस्त्यावर प्रेम प्रकरणातून एका युवकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. गौरव बायस्कार असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. प्रेम प्रकरणातून गौरवची 4 जणांनी चाकू भोकसून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलं आहे. मारेकरी हे लोहाऱ्यातील एकाच कुटुंबातीलच असल्याचे समोर आले. तर इतर आणखी दोन जणांचा हत्येमध्ये समावेश असल्याचा समजते.

ShivsenaUBT : मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकां करिता ठाकरे शिवसेनेकडून मुलाखती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने अहिल्यानगर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार, शिवसैनिकांच्या मुलाखती येत्या गुरुवार (ता. 4) अहिल्यानगर शहरात उत्साहात पार पडणार आहेत. यावेळी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.

'पंतप्रधानांनी केली 'ड्रॅमेबाजी'ची डिलिव्हरी' - खर्गे यांचा हल्लाबोल

राज्यसभेतील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी जोरदार टीका केली आहे. खडगे म्हणाले की, देशासमोर असलेल्या खऱ्या आव्हानांवर बोलण्याऐवजी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा “ड्रामेबाजीची डिलीवरी” दिली. त्यांच्या मते, गेल्या 11 वर्षांत सरकारने संसदीय परंपरा, चर्चा संस्कृती आणि लोकशाही प्रक्रियेचा सातत्याने अवमान केला आहे. महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून केवळ राजकीय संदेश देण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. खडगे यांनी सोशल मीडियावरून सरकारला लक्षित करत संसदेचे महत्त्व पुनर्स्थापित करण्याची मागणीही केली.

अंबरनाथमध्ये शिवसैनिकांचा गोंधळ

अंबरनाथमध्ये निवडणुका पुढे ढकलल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी उसळली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयाविरोधात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याच्या दालनाबाहेर मोठ्या आवाजात घोषणाबाजी केली.

रणमैदान सज्ज! महिनाभराच्या विश्रांतीनंतर शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत पुन्हा सक्रीय

महिनाभराच्या विश्रांतीनंतर संजय राऊत पुन्हा आक्रमक झाले असून पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. उपचारांमुळे काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर असलेले राऊत आता परतल्यावर पुन्हा एकदा ‘मराठी बाणा’ दाखवत राजकीय वातावरण तापवल्याचे दिसत आहे.

राणे कुटुंबातील वाद योग्य नाही - रोहित पवार

राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच आहे, परंतु आम्ही विरोधक असलो तरी राणे साहेबांबद्दल एक सन्मान आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळं राणे कुटुंबात सुरु असलेला वाद योग्य वाटत नाही, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, भावकी-भावकीत वाद लागल्यानंतर काय होतं, वाद लावणाऱ्यांचा हेतू काय असतो? हे आम्ही अगदी जवळून बघितलंय. राणे बंधूनी कुटुंबात, भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा ओळखून तसंच दुसऱ्याचं महत्व कमी करणं ही भाजपची रणनीती समजून त्या जाळ्यात न अडकता आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकाला पाहिजे!

सांगोल्यात शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावर धाड

शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर गुन्हे शाखा आणि निवडणूक आयोगाने धाड टाकली. सांगोला नगरपरिषद निवडणुकीपूर्वी झालेल्या कारवाईने खळबळ उडाली. भाजप आणि शेकाप कार्यालयांचीही देखील झडती घेण्यात आली आहे.

मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

बाहेरून येणाऱ्यांना जागा नाही - देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरपूरमध्ये बोलताना बाहेरून येणाऱ्यांना पक्षात सध्या जागा नाही, असे सांगत जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

21 माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार 

पुणे महापालिका निवडणुकीच्याआधी भाजपने विरोधी पक्षांना मोठा दणका दिला आहे. विरोधी पक्षातील तब्बल 21 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून 11 जणांना प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल भाजप वरिष्ठांनी दिल्याची माहिती आहे.

Sanjay Raut: मी डिसेंबरपर्यंत पूर्ण बरा होईन:राऊत

खासदार संजय राऊत आजपासून पुन्हा राजकारणात सक्रीय झाले. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. मी मी डिसेंबरपर्यंत पूर्ण बरा होईन, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

Angar Election: सुधारित कार्यक्रमानुसार  पुढील कार्यवाही होणार

अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याच्या विरोधात राज्यभर येथील दहशतीची मोठी चर्चा झाली होती. आता या निवडीला स्थगिती देण्यात आली असून सुधारित कार्यक्रमानुसार येथे पुढील कार्यवाही होणार आहे.

Parliament winter session 2025: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून (सोमवार 1 डिसेंबर) सुरू होत आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर होत असलेले हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विविध मुद्द्यावरून सरकार आणि विरोधी पक्षांमधील वातावरण तापले आहे. हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

Sanjay Raut : ठाकरेसेनेची तोफ आजपासून पुन्हा धडाडणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुख मैदानी तोफ खासदार संजय राऊत आजपासून पुन्हा राजकारणात सक्रीय होत आहेत. आज ते माध्यमांशी बोलणार आहेत. तब्येत ठीक नसल्यामुळे राऊत काही दिवसापासून माध्यमांपासून दूर होते.

Maharashtra Politics live: मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आज पुणे जिल्ह्यात सभा

नगरपालिका, नगरपंचायतींसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या सभा होणार आहे. फडणवीस यांची भोरमध्ये सभा तर एकनाथ शिंदे यांची चाकण आणि जुन्नर येथे सभा घेणार अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर,चाकण,आळंदी येथे सभा होणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी होणार चुरशीच्या लढती होत आहेत.

Maharashtra Politics: नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या आज शेवटचा दिवस असून रात्री 10 वाजता प्रचाराची मुदत संपणार आहे.आज नेत्यांच्या प्रचार रॅली आणि जाहीर सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. उद्या मतदान असून बुधवारी निकाल लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com