Maharashtra Day Celebrations 2025: नेते मंडळींना चोख मार्गावर ठेवणारा हाच महाराष्ट्र धर्म!

Maharashtra Day 2025 Warm Wishes And Images To Celebrate The Spirit Of The State: महाराष्ट्र धर्म शोधायला जाता संघर्ष पदोपदी दिसत राहतो. संघर्ष ज्ञानोबा माऊलींचा आहे. जगत्गुरू संत तुकोबारायांचा आहे. स्वराज्याचे स्फुल्लिंग भरतवर्षात चेतविणाऱ्या छत्रपती शिवरायांचा संघर्ष आहे.
Maharashtra Day Celebrations 2025
Maharashtra Day Celebrations 2025Sarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमके काय, याविषयीचे मंथन महाराष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्ताने करणे अधिक औचित्याचे आहे. तसे महाराष्ट्राच्या साऱ्या नेतेमंडळींनी नित्यनेमाने महाराष्ट्र धर्माचे चिंतन-मनन केले पाहिजे. तथापि, आपल्या भोवताली राजकीय बजबजपुरी इतकी साचली आहे, की त्यातील उखाळ्या-पाखाळ्यांतून सवड काढून हे कार्य हाती घेण्याची अपेक्षा नेतेमंडळींकडून करणे आता उपयोगाचे नाही. त्यामुळे होऊ घातलेल्या, उगवत्या नेतेमंडळींवर आणि त्याहून अधिक या विशाल भूप्रदेशात राहणाऱ्या आणि प्रदेशाबाहेर राहून भले चिंतणाऱ्या तुम्हा-आम्हा नागरिकांवर ही जबाबदारी येऊन पडते.

या चिंतन-मनन-मंथनाची प्राथमिक अट अशी, की धर्म या शब्दाची संकुचित व्याख्या नको. रोजच्या जगण्यातील आचार-विचार, नीती-नियम, कर्तव्ये, नैतिकता म्हणजे धर्म अशी साधी सोपी मांडणी घेऊन महाराष्ट्र धर्माचा विचार करायला हवा. गेल्या सात-आठशे वर्षांचा इतिहास सूत्रबद्ध मांडणीत सापडतो, म्हणून त्या काळापासूनचा महाराष्ट्र धर्म शोधायला हवा. हा महाराष्ट्र धर्म काय आहे? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? त्याची रचना कशी? हे प्रश्न पडायला हवेत. त्या प्रश्नांचे उत्तर फक्त आणि फक्त मलाच सापडणार आहे, हा फुकाचा गर्व धारण न करता शोधले पाहिजे.

Maharashtra Day Celebrations 2025
Harshavardhan Sapkal : कार्यकर्ता प्रशिक्षणातूनच संघटनेला बळकटी; काँग्रेससाठी सत्ता परिवर्तन नव्हे तर व्यवस्था परिवर्तन महत्त्वाचे...

महाराष्ट्र धर्म शोधायला जाता संघर्ष पदोपदी दिसत राहतो. संघर्ष ज्ञानोबा माऊलींचा आहे. जगत्गुरू संत तुकोबारायांचा आहे. स्वराज्याचे स्फुल्लिंग भरतवर्षात चेतविणाऱ्या छत्रपती शिवरायांचा संघर्ष आहे. छत्रपती शिवरायांच्या माघारी छत्रपती संभाजीराजांनी संघर्ष केला. मराठ्यांचे सारे साम्राज्य मुघल सत्तेशी संघर्ष करून उभे राहिले. इंग्रजांच्या वसाहतवादात अवघे जग पिळून निघाले, तेव्हाही महाराष्ट्राने सामाजिक पातळीवर संघर्षाची धग जागती ठेवली. महात्मा ज्योतिराव फुले-सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष जातीव्यवस्थेविरोधात राहिला.

संघर्षयोद्धे

महाराष्ट्राच्या या माय-माऊलीने इथल्या मुला-बाळांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला. शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला. न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वि. दा. सावरकर अशी संघर्षयोद्ध्यांची यादीच यादी महाराष्ट्रात सापडते. भारतीय उपखंडावरच नव्हे, तर जगावर अमीट ठसा उमटवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्षाचेच वारसदार. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातील संघर्षाची धग कायम ठेवण्यात अण्णाभाऊ साठेंपासून ते यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय नेतृत्वापर्यंत अनेकांचे योगदान दिसते. राजा ढाले, नामदेव ढसाळ अशी धगधगती नावे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. ही सारी नावे केवळ उदाहरणादाखल.

Maharashtra Day Celebrations 2025
Maharashtra Politics: ‘सोड दादा ‘तुतारी-पंजा’ला, विझवी ते ‘मशाली’ला... येतो एकदा ‘मातोश्री’ला, बोलवू नकोस ‘भोंग्या’ला’

देशासाठी लढणारा तो महाराष्ट्र धर्म

कित्येकांचे परिश्रम महाराष्ट्राच्या जडणघडणीत, मानसिकतेत, बौद्धिकतेत आणि सामाजिकतेत आहे. या साऱ्यांचा एक बिंदू जोडायचा झाल्यास, तो संघर्ष या शब्दाभोवती येतो. म्हणजे महाराष्ट्राचा धर्म केवळ संघर्ष असा मानावा का? तर केवळ इतक्यातच तसे मानता येत नाही. जे जे अन्याय्य, मानवतेच्या विरोधी, मायभूमीला विघातक ते ते प्राणपणाने रोखणारा तो महाराष्ट्र, हे या साऱ्या महामानवांच्या चरित्रांतून दिसते. मग, देशासाठी लढणारा तो महाराष्ट्र धर्म असे मानावे का? मग ''विश्वात्मके देवे'' असे पसायदान ज्ञानोबा माऊली कशाला लिहितात? अवघ्या विश्वाचे चिंतन त्यांच्या पसायदानात कशासाठी येते? स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व महाराष्ट्राने केले. त्यासाठी वैचारिक बैठक दिली.

Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama

विश्वाचे कल्याण चिंतणेही महाराष्ट्र धर्म

एका उद्दिष्टासाठी समाज जोडण्याचे तंत्र दिले. महाराष्ट्र धर्म म्हणजे अशी देशासाठीची वैचारिक बैठक का? अगदी सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे महाराष्ट्र धर्माची व्याख्या करायची तर असे अनेक प्रश्न पडतात. ते पडले पाहिजेत. प्रश्न पडले, तर मंथन होते आणि त्यातून महाराष्ट्र धर्माकडे अधिक सजगपणे पाहायला जमते. संघर्ष हा महाराष्ट्र धर्म आहे. अन्यायाला विरोधाचा महाराष्ट्र धर्म आहे. मायभूमीचे प्राणपणाने रक्षण महाराष्ट्र धर्म आहे. स्वातंत्र्य महाराष्ट्र धर्म आहे. वैचारिकता महाराष्ट्र धर्म आहे आणि विश्वाचे कल्याण चिंतणेही महाराष्ट्र धर्म आहे. अन्यायाविरूद्ध, मग तो कोणावरही होत असो संघर्ष करून प्राणपणाने त्याला विरोध करणारा तो महाराष्ट्र धर्म म्हणता येतो. या संघर्षाला वैचारिकता आहे आणि या धर्मामध्ये विश्वात्मक भाव आहे.

... हीच खरी मऱ्हाटीपणाची कसोटी

इतकी उदात्त, महान परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे नेतृत्व ज्या नेते मंडळींच्या गळ्यात टाकून उर्वरित साडे तेरा कोटी लोकसंख्या आणि बाहेर पसरलेली किमान कोटीभर मऱ्हाटमोळी माणसं सुटका झाल्यासारखी वागतात, त्याला तोड नाही. दोन-चारशे नेते मंडळींवर महाराष्ट्र सोडावा आणि आपण मोकाट राहावे, असा महाराष्ट्र धर्म नाही. नेते मंडळींना चोख मार्गावर ठेवणारा महाराष्ट्र धर्म आहे. तो वारंवार सांगत राहणे तुमचे-आमचे काम आहे. ते काम न करणे अधर्म आहे. ती महाराष्ट्राची रीत नाही. मुघलांना, इंग्रजांना आणि स्वकियांच्या सत्तेलाही वठणीवर आणणाऱ्या महाराष्ट्र धर्माचे रक्षण हीच खरी मऱ्हाटीपणाची कसोटी आहे. त्या कसोटीत संघर्ष, वैचारिकता, विश्वात्मक भाव आहे. जातीभेद नाहीत. अशा या महाराष्ट्र धर्माचे मंथन अहोरात्र होईल, त्या दिवशीचा सूर्य हा अधिक उजळलेला असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com