

Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme 2026 : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमुक्ती निश्चित करण्यात आली.
याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ, तसेच दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्यांसाठी एकवेळ समझोता सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना मानली जात असून सुमारे 56 लाख शेतकरी या योजनेच्या कक्षेत येणार आहेत.
विशेष म्हणजे, या योजनेत (Yojana) केवळ नियमित पीककर्जच नव्हे, तर पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांचाही समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने राबवली जाणार असून लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पात्रतेची प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि गैरव्यवहारमुक्त राहणार असल्याचा सरकारचा दावा आहे.
गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अनियमित मान्सून, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि शेती उत्पादन खर्चातील सातत्याने वाढ यामुळे राज्यातील शेतकरी (Farmer) गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर केवळ कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या व्यापक उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे.
कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, सूक्ष्म सिंचन प्रकल्प, शेती यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण आणि मूल्यवर्धित शेती उद्योग यासाठी नव्याने आर्थिक संधी उपलब्ध होतील. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांनाही या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ऊस, कांदा, डाळिंब, द्राक्षे, कापूस, ज्वारी, हरभरा, सोयाबीन, गहू आणि विविध फळपिकांवर आधारित आहे. कर्जमुक्तीनंतर या शेतकऱ्यांची पत पुन्हा निर्माण होऊन त्यांना नव्याने कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या योजनेला आणखी एक ऐतिहासिक आणि भावनिक संदर्भ जोडला गेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत विहिरी, तलाव, बंधारे आणि जलसंधारणाची कामे करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली होती. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात त्यांच्या नावाने जाहीर झालेली ही योजना त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला वाहिलेली खरी आदरांजली मानली जात आहे.
राज्य सरकारचा स्पष्ट संदेश आहे, शेतकरी सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर झाला तरच ग्रामीण महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. त्यामुळे ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून राज्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारा मोठा निर्णय मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.