छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज जिल्हाधिकारीदिलीप स्वामी यांना खालील मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पक्षाच्या वतीने प्रमुख पाच मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये औरंगजेबाच्या कबरीजवळ जर सजावट असेल तर ती त्वरित काढली जावी, अशी पहिली बातमी आहे.
वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत ! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात लाखावर मतं घेणारे पराभूत उमेदवार राजू शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. भाजपमधून पक्षप्रवेश केलेल्या शिंदे यांच्याविरोधात पक्षात नाराजी होती. शिंदेसेनेच्या संजय शिरसाट यांनी राजू शिंदे यांचा पराभव केला होता. आज राजीनामा पत्रात राजू शिंदे यांनी शिवेसना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराज असल्याचा उल्लेख केला आहे.
अंबाजोगाईतील पोखरी रोडवर एका तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. राजकुमार करडेवर याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
शेतात शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन लावण्यासाठी या मुलाचा मोबाईल घेतला होता .मात्र तो पाण्यात पाडून खराब केल्याचा रागातून 13 वर्षाच्या मुलाने गावातील महिलेला डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. हादरवणारी ही घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याच्या अंतरवाली टेंभी गावात घडली.
दिशाचे वडील सतिश सालियन यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन उद्या सुनावणीत काही होण्याची शक्यता कमी आहे. कारण, ज्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे, त्यांच्याविरोधातच आमची तक्रार आहे, असे वकील निलेश ओझा यांनी म्हटले. न्यायमूर्तींची सख्खी बहीण वंदना चव्हाण सक्रिय राजकारणी असून त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आहेत, असा आक्षेप त्यांनी घेतला.
भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील लिंकींग प्रकाराबाबत खळबळजनक आरोप केले. राज्यात तीस अधिकारी आहेत ज्यांच्या 43 कंपन्या आहेत. काही अधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने कंपन्या तयार केल्या आहेत. त्या कंपन्यांनी निर्माण केलेला माल, बियाणे लिंकींग करून शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने झटका दिला आहे. कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. कोर्टाने नुकतीच कोरटकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्यामुळे त्याने नियमित जामीनासाठी अर्ज केला होता.
अंजली दमानिया यांनी राजेंद्र घनवट यांच्यावर शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या एका डिबेटमध्ये आपण राजेंद्र घनवट यांचे नाव घेतले तर काही शेतकरी माझ्या घरी आले. त्यांचा राजेंद्र घनवट यांनी छळ केल्याचा आरोप त्यांनी माझ्याशी बोलताना केला आहे. घनवट यांनी ११ शेतकऱ्याची फसवणूक केली आहे.
गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवण्याऱ्या उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला बुलडोझर कारवाई करुन घरं पाडलेल्या प्रयागराजमधील संबंधित लोकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 2021 साली प्रयागराजमध्ये योगी सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात हा आदेश देण्यात आला.
आमच्या घरी आढळलेलं मांस हरणाचं नव्हतं तर देवीच्या कार्यक्रमासाठी आणलेलं रानडुकराचं ते मांस होतं. असा दावा सतीश भोसले उर्फ खोक्या च्या बायकोने केला आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याच्या सुनावीस कोल्हापुरात सुरुवात झाली आहे. मागील वेळी एका वकिलाने कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येत आहे. कोरटकर याचा जामीन नामंजूर करण्यात यावा, अशी लेखी मागणी पेालिसांनी कोर्टापुढे केली आहे. वकिल सौरभ घागही व्हीसीद्वारे उपस्थित राहिले आहेत, तर सरकारी वकिल, जुना राजवाडा पोलिस आणि तपास अधिकारी न्यायालयात हजर झाले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर नक्कीच भार पडत आहे. मात्र, ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना बंद केली जाणार नाही, असे राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय असलेले राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांना त्रास देऊन कमी दरात त्यांच्या जमिनी लाटल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी माझ्याकडे सर्व माहिती दिली असून सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. पोलिसांनी मात्र, घनवटच्या विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत, त्या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
कोट्यवधींच्या कर्जामुळे बंद असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही माघार घेतली आहे. कारखान्याच्या हिताचा विचार करून खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील यांच्याशी चर्चा करून आम्ही आदिनाथच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे जगताप यांनी स्पष्ट केले. बागल, जगताप यांच्या माघारीनंतर ‘आदिनाथ’च्या रिंगणात आता आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे.
जामनेर तालुक्यातील (जि.जळगाव) नवीदाभाडी गावातील जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकांची बदली करू नये, यासाठी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत साकडं घातले. शाळेतील गजानन मंडवे व ऋषिकेश शिंदे या दोन शिक्षक बदली पात्र आहेत. या दोन्ही शिक्षकांची बदली करु नका, अशी विनंती विद्यार्थ्यांसह पालक, ग्रामस्थांनी महाजन यांच्याकडे केली.
Pune news: वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्यांमुळे मनसे आक्रमक झाली आहे. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्याबाबत मनसैनिकांनी पोलिसांना जाब विचारला आहे. "भारतात आहोत की इंग्लंडमध्ये"? असा प्रश्न वाहतूक पोलिसांना मनसेकडून विचारण्यात येत आहे. इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 12 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या 9 विद्यमान नगरसेवकांसह महाविकास आघाडीच्या 12 नगरसेवकांचा यात सहभाग आहे. कुही नगरपंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाचे विद्यमान नगरसेवक भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ग्रामीण काँग्रेसचा पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला.
Thane: बँकामधील सर्व व्यवहार मराठीतून होत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी ठाण्यातील मनसैनिकांनी पुढाकार घेतला आहे. मनसे नेते अविनाश जाधव हे मनसैनिकांसह बँकेत पोहचले आहेत. बँकांमध्ये जाऊन कर्मचारी हे मराठी कारभार होत आहे की याची तपासणी ते करीत आहेत.
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल समारंभ सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. एनसीपीए, नरिमन पॉईंट, मुंबई, येथे हा सोहळा होणार आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभूराजे जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या अक्षय शिंदे, गणेश गायकवाड यांच्यावर महसूल विभागाचे पथकाने कारवाई करताना वाळू चोरी करणाऱ्यांना वाहनासह पळवून लावल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणाने पोलिसांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस स्टेशनमध्ये शंभूराजे जगताप,अक्षय शिंदे गणेश गायकवाड इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयवंतराव जगताप हे करमाळ्याचे माजी आमदार आहेत.
वाल्मिक कराडला मुंबई मध्यवर्ती कारागृहात अर्थात आर्थर रोड जेलमध्ये टाकावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. कराडला कारागृहात झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर दमानिया यांनी ही मागणी केली आहे.
आजपासून कांद्यावरील निर्यात शुल्क शुन्यावर आले आहे. 1 एप्रिलपासून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य झाल्यानंतर आज नाशिकच्या बाजारसमित्यांमध्ये कांद्याला किती दर मिळणार? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे. आवक वाढल्याने मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मात्र आजपासून कांदा निर्यात शुल्क शून्यावर आल्यानं कांदा निर्यात वाढण्याची शक्यता आहे. कांदा निर्यातीला चालना मिळाल्यास कांद्याचे भाव देखील वाढण्याची शक्यता
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. बचाव पक्षाच्या वतीने कोरटकरच्या जामिनासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात अपिल केले आहे.
नागपूर हिंसाचार घटनेतील कथित सूत्रधार फहिम खान यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. फहिम खानला 11 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण पोलिसांना कधीही पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार राखीव ठेवण्यात आली आहेत.
फहिम खान याच्यावर गणेशपेठ, तहसील आणि सायबर या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या गुन्ह्यांमध्येही त्याला अटक होऊ शकते. कोर्टाच्या आदेशावरून इतर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस कोठडी घेऊ शकतात.
महाराष्ट्रात घर आणि मालमत्ता खरेदी करणे आणखी महागणार आहे. राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सुमारे साडे चार टक्के वाढ केली आहे. आज म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून नवीन दर लागू होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.