Maharashtra Budget 2026 Live Update : ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका, म्हणाले,'चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना....'

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, यासह आज सोमवार 23 फेब्रुवारी रोजीच्या दिवसभरातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Updates
Maharashtra Live Updatessarkarnama
Published on
Updated on

ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका, म्हणाले,'चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना....' 

ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या राड्यावर बोलताना वाघमारे म्हणाले, संजीवनी वाघ जरांगे पाटलांच्या जुन्या समर्थक आहेत, त्यामुळे जरांगे हेच असे कट रचू शकतात. चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना वारंवार टार्गेट करणे आणि ब्लॅकमेल करण्याचा धंदा सुरू आहे, असा आरोपही वाघमारेंनी केला आहे.

किरीट सोमय्यांच्या मालेगाव दौऱ्याला महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांचाही तीव्र विरोध 

मालेगाव महापालिकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला होता. उपमहापौरांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. यावरुन हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच खवळल्याचं दिसून आलं होतं. तसेच आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण ढवळून निघालं होतं. याचदरम्यान,भाजप नेते किरीट सोमय्या हे मंगळवारी(ता.24) मालेगाव दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याला मालेगावमधलं राजकारण तापलं आहे. सोमय्या यांच्या दौऱ्याला मालेगावच्या महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनी जोरदार विरोध केला आहे.

कल्याण डोंबिवलीत बांगलादेशी व परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी,कोळी समाज आक्रमक

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत बांगलादेशी व परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांमुळे स्थानिक भूमिपुत्र मच्छी विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा येत असल्याचा आरोप करत कोळी समाज आक्रमक झाला आहे. या संदर्भात कोळी समाजाच्या शिष्टमंडळाने केडीएमसी महापौरांना निवेदन देत संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

परभणीत शक्तिपीठ महामार्ग जमीन मोजणी तात्पुरती स्थगित

परभणीत शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेली जमीन मोजणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला आहे. मात्र मोजणी थांबवली असली तरी शेतकरी व विविध पक्ष-संघटनांनी आंदोलन होणारच असा ठाम निर्णय घेतला आहे.

जालना जिल्ह्यातील 475 गावात विद्यमान सरपंच होणार प्रशासक

जालना जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 475 ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषद सीईओना दिले आहे.

महामार्ग बाधित शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयवर बैलगाडी घेऊन भव्य मोर्चा

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर महामार्ग शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सांगलीच्या पुष्पराग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकरी त्यांच्यासह कुटुंबासह बैलगाडी घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

डिपॉझिट जप्तीचा विक्रम! निवडणुकीत तब्बल 750 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 165 जागांसाठी 1153 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी तब्बल 750 उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या असल्याचा समोर आला आहे.

दिल्लीतील शाळांना एका महिन्यात धमकीची तिसरी घटना

देशाची राजधानी दिल्ली येथील शांळाना बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी देण्यात आली असून एका महिन्यात ही तिसरी घटना आहे. याआधी १३ फेब्रुवारी रोजी सरदार पटेल विद्यालय आणि केंद्रीय विद्यालयासह अनेक शाळांनाही लक्ष्य करण्यात आले होते. तर यापूर्वी, ९ फेब्रुवारी रोजी, अंदाजे १२ शाळांना अशाच प्रकारच्या खोट्या धमक्या मिळाल्या होत्या.

लव जिहाद कायदा झालाच पाहिजे : आमदार संग्राम जगताप

आज धर्मांतर प्रकार पहायला मिळतो एवढेच नव्हे तर आज लव्ह जिहाद पाहायला मिळाला आज भिगवण मध्ये देखील तोच प्रकार घडला असून त्या प्रकरणात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. एवढंचं नाही तर नाशिक मध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला असून लव जिहाद कायदा झाला पाहिजे या करिता मागील सात आठ वर्षांपासून आम्ही संघर्ष करून मागणी करत आहोत आता या अधिवेशनातं देखील लव जिहाद कायदा होईल अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे

अजित दादांचा घातपात झाला आहे - भास्कर जाधव

विधानसभेचं अर्थसंकल्पीयअधिवेशन सुरु झालं आहे. आज पहिल्यादिवशी दिवंगत अजित पवार यांच्या श्रद्धांजली वाहिली जाते आहे. यावेळी बोलताना, अजित दादांचा घातपात झाला आहे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.

Jitendra Awahad : जळालेल्या ब्लॅक बॉक्सवर उपस्थित केले प्रश्न

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळाजवळील धावपट्टीवर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात अजित पवारांसह चार इतर सहकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या शंका व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, ब्लॅक बॉक्स जळून गेला ही सर्वात मोठी शंका आहे. ब्लॅक बॉक्स टायटेनियमचा बनलेला असल्याने उष्णतेपासून सुरक्षित असतो आणि साधारणपणे तो जळत नाही. तसेच या विमानाला भारतात उडण्याची परवानगी नव्हती आणि 5000 तासापेक्षा जास्त उडू नये असे नियम असूनही, हे विमान 8 हजार तासापर्यंत उडले होते, असेही आव्हाड म्हणाले.

Eknath Shinde : संकटातही अजितदादा कधीच निराश झाले नाहीत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात अजितदादांच्या आठवणीना उजाळा दिला. संकटातही अजितदादा कधीच निराश झाले नाहीत. दादांनी राजकारणात खिलाडूपणा कायम जपला, सभागृहात अनेक प्रश्नांना तेच उत्तर देत होते. दुदैवाने दादांना मुख्यमंत्री होता आले नाही, अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray : अजितदादांच्या आठवणीना दिला उजाळा

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत उपस्थित होते. यावेळी सभागृहात त्यांनी अजितदादांच्या आठवणीना उजाळा दिला. त्यांच्या निधनाने राज्यात पोकळी निर्माण झाली असून चांगला मित्र गमावला असल्याची भावना यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

Dehli Police : दिल्ली पोलिसांची शोध मोहीम सुरू, परिसरात सुरक्षा वाढवली

आर्मी पब्लिक स्कूल घटनेच्या दिवशीच, दिल्लीतील महाराष्ट्र सदनालाही ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. या धमकीनंतर दिल्ली पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि परिसरात सुरक्षा वाढवली आहे. महाराष्ट्र सदन हे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी दिल्ली भेटीदरम्यान अधिकृत निवासस्थान म्हणून काम करते.

Devendra Fadnavis : असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल अशी कल्पना केली नव्हती

विधानसभेत सोमवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रत्येक पक्षाचे गटनेते आणि तीन सदस्य अजित पवार यांच्या शोकप्रस्तावर भाषण करणार आहेत. प्रत्येक वेळी शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जातो आणि त्यांच्याकडूनच शोकप्रस्ताव वाचून दाखवला जातो. मात्र, काही सदस्यांकडून सभागृहात अजित पवार यांचा शोकप्रस्तावावर मत मांडण्याचा आग्रह होता. त्यानुसार सीएम फडणवीस यांनी यावेळी अजितदादांच्या आठवणीना उजाळा दिला. सभागृहात असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल, अशी कल्पना कधीच केली नव्हती. वेदना कधीच कमी होत नाहीत, अशी ही वेदना असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Rohit Pawar : सगळे पुरावे तपास यंत्रणा योग्य पद्धतीने गोळा करत आहेत का?

अजित पवार यांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. पायलट वर का शंका घेतली पाहिजे? यासंदर्भातील सगळे पुरावे मी माझ्या पत्रकार परिषदेत मी दिले आहेत” असं आमदार रोहित पवार म्हणाले. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी शोक प्रस्ताव सभागृहात मांडला जाईल. त्याआधी सभागृहाबाहेर रोहित पवार मीडियाशी बोलले. “सगळे पुरावे तपास यंत्रणा योग्य पद्धतीने गोळा करत आहेत का?. दादांच्या अपघाताची सखोल चौकशी ही झाली पाहिजे” या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आमचे कोणीच येणार नव्हते, कारण काही कामं होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना यासंदर्भात कळवलं होतं.

BMC मध्ये ठाकरेंचा नगरसेवक शिंदे सेनेच्या कार्यालयात

उद्धव ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक अंकीत प्रभू यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांची भेट घेतली. ही भेट शिंदे सेनेच्या महापालिकेतील पक्ष कार्यालयात झाली. मुंबई महानगर पालिकेत आज स्वीकृत नगरसेवकपदा साठी शिंदेंच्या सेनेकडून आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांना संधी दिली जाणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक वाद सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून सीमावासियांचे हित सरकार जपेल :  राज्यपाल

झारखंडमध्ये भाजपच्या आमदारासह 100 जणांवर गुन्हा दाखल

भाजपचे आमदार तथा विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह 100 भाजपच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रखंडातील मंगरोडीह ग्रामपंचायतीचे पंचायत सचिव तसेच एफएसटी अधिकारी मो. मन्सूर यांच्या तक्रारीवरून नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिवेशनात 15 विधेयके मांडणार, असल्याचे समजते. अधिवेशनात अजित पवार यांच्या शोकसंदेशावर चर्चा होणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्तपदी आता अश्विनी भिडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विद्यमान पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या जागी अश्विनी भिडे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. भूषण गगराणी 31 मार्च रोजी आयुक्तपदावरून निवृत्त होत आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार  विधानभवनात दाखल. 

माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांचे निधन

 माजी रेल्वेमंत्री आणि एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे नंबर दोनचे नेते मुकुल रॉय यांचे आज पहाटे निधन झाले.

अजित पवारांच्या विमान अपघाताची CBI चौकशी करणार, CM फडणवीसांची घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच अजितदादांच्या अपघाती मृत्यूमागचे सत्य समोर आलेच पाहिजे, मात्र त्यांचा अपमान होईल, कुटुंबाला त्रास होईल असे कोणीही वागू नये, असंही फडणीवस म्हणाले आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात काहीच होणार नाही - ठाकरेसेना

'महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात काय होणार? हा प्रश्न आता निरर्थक आहे. कारण ‘उत्तर’ स्पष्ट आहे ते म्हणजे, ‘काहीच होणार नाही.’ लोकसभा, विधानसभा, न्यायालये, निवडणूक आयोग अशा घटनात्मक संस्था टिकवण्याऐवजी मोडीत काढण्यावर ज्या सरकारचा अधिक विश्वास आहे, त्यांच्याकडून संसदीय कार्य चांगल्या प्रकारे चालवले जाईल हे कसे मानायचे?' असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून महायुती सरकारवर टीका करण्यात आली आहे.

शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी दोन जणांना संधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी माजी नगरसेवक बालकृष्ण ब्रीद तसेच प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज प्रकाश सुर्वे यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सादर करणार

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. तर ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सादर करणार आहेत.

आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

आज सोमवार २३ फेब्रुवारी पासून राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com