Maharashtra Political Update : देश-विदेशात दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Political Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात अश्लील शेरेबाजी करणाऱ्या संतोष पंडितला अटक, यासह आज दिवसभरातील विविध राजकीय, सामाजिक घडामोडी जाणून घेऊया.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

शिष्टमंडळाशी चर्चेनंतरही जरांगे उपोषणावर ठाम; केवळ पाणी घेणार

शिष्टमंडळाशी चर्चेनंतरही मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. आपण केवळ पाणी आणि सलाईन घेणार पण उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तसंच सर्व मागण्यांची अंमलबजावणी करुन टाका त्यानंतर उपोषण मागे घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

ठाकरेंच्या माजी जिल्हा प्रमुखाकडून महिलेला पतीला जीवे मारण्याची धमकी

पक्षाच्या कार्यालयात बोलवून ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी एका महिलेला धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या पतीने जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे धाव घेऊन तक्रार दिली आहे. तुझ्या नवऱ्याला मारण्यासाठी मीच लोकांना पाठवले होते. तुझा नवरा माझ्या तावडीतून आता वाचला असला तरी जामीनावरून बाहेर आल्यावर त्याला जिवंत ठेवत नाही. भरपूर लोकांना वर पाठवले आहे अशी धमकी संबंधित महिलेला दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अमित ठाकरे यांचं वागणं बालबुद्धीचं अन्‌ मुर्खासारखं : देवेंद्र फडणवीस यांचे प्रथमच भाष्य

पुण्यातील तंत्रनिकेतन विद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविण्याच्या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच भाष्य केले आहे. अमित ठाकरे यांचं वागणं अत्यंत बालबुद्धीचं होतं. त्यांनी ते प्रसिद्धीसाठीचे केले होते, त्यामुळे त्याला किती महत्व द्यायचे. अतिशय मूर्खासारखं हे वागणं आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

मराठा आरक्षण अभ्यासकांची मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा

सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मराठा आरक्षण अभ्यासक हे चर्चेसाठी उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. यांच्यातील चर्चेत एकमत झाले तर सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येण्याची शक्यता आहे.

सरकारच्या शिष्टमंडळाची मराठा आरक्षण अभ्यासकांशी चर्चा

उदय सामंत, प्रसाद लाड यांचा समावेश असलेले सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. ते सध्या मराठा आरक्षण अभ्यासक यांच्याशी अंतरवलीत चर्चा करत आहे. त्यांच्यात एकमत झालं आणि अभ्यासकांनी संमती दिली तरच सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत.

शक्तीपीठ महामार्गाची अलायमेंट बदलावी लागली तरी आम्ही ती बदलू : एकनाथ शिंदे

शक्तीपीठ महामार्ग विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांना जोडणारा आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये या महामार्गाला विरोध आहे. मात्र, आम्ही या लोकांशी बोलतोय. महामार्गाचे महत्व पटवून देतोय. आम्ही कोणताही प्रकल्प रेटून नेत नाही, लोकांशी बोलूनच आम्ही पुढे जातोय. शक्तीपीठ महामार्गाची अलायमेंट बदलावी लागली तरी आम्ही ती बदलू. शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील दुष्काळी जिल्हे दुष्काळमुक्त हेातील. एखादा रस्ता अर्थकारण बदलू शकतो, याचे उदाहरण आपल्यापुढे समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रुपाने आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी, शिवसेनेकडून एकमेकांविरोधात निदर्शने

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक घातला. शक्तिपीठ महामार्गावरून आमदार राजेश क्षीरसागर यांनी उलट टांगण्याची भाषा केली होती. क्षीरसागर यांच्या वक्तव्यानंतर स्वाभिमानी आणि शिवसेनेकडून एकमेकांविरोधात निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन झाले. आंदोलनस्थळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांकडून घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी आमदार क्षीरसागर यांच्या समर्थकांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला.

Ganesh Festival : गणेशोत्सवासोबतच सणासुदीच्या काळात डीजेबंद राहणार

सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. हा उत्सव उत्साहवर्धक आणि चांगला ठरावा यासाठी मुंबई, पुणे तसेच राज्यभरातील सर्वच गणेश मंडळं कामाला लागली आहेत. पुणे आणि मुंबईचा गणोशोत्सव तर देशभरात चर्चेचा विषय असतो. दरम्यान, गणेशोत्सवासोतबच सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने आता डीजेबंदी, लाऊडस्पीकरवरील बंदीची चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात लाऊडस्पीकर तसेच डीजे, ढोल-ताशांवरील बंदीची मागणी जोर धरू लागली आहे. असे असतानाच आता नागपूरमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये डीजेवर बंदी घालण्यात आली आहे.

Dhule Solapur Road : धुळे-सोलापूर मार्ग मराठा बांधवांनी रोखला

धुळे-सोलापूर मार्गावर मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे धुळे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

Aditya Thackeray नाशिकमध्ये आदित्य ठाकरे आदिवासी आंदोलकांच्या भेटीला

नाशिकमध्ये आदिवासी आंदोलकांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे पोहोचले. आदिवासी आंदोलकांच्या मागण्या आणि त्यांच्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली. काल राहुल गांधी यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली होती.

Beed Maratha Protest बीडमध्ये मराठा आंदोलकांची बाईक रॅली

बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांकडून बाईक रॅली काढण्यात आली. मोठ्या संख्येने आंदोलक या रॅलीत सहभागी झाले असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ractor Morcha | जरांगेंच्या समर्थनार्थ कुरुंद्यात ट्रॅक्टर मोर्चा

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कुरुंदा येथे मराठा समाजाकडून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाले. कुरुंद्यातील या मोर्चाला मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

Mumbai-Sawantwadi Train Starts मुंबई-सावंतवाडी ट्रेन सुरू; मुंबई-पुणे 48 मिनिटांत! एकनाथ शिंदेंची मोठी माहिती

मुंबई-सावंतवाडी ट्रेन सुरू झाली असून याचा सर्वांना फायदा होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच मुंबई ते पुणे अवघ्या 48 मिनिटांत पोहोचणारी बुलेट ट्रेन सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईत रेल्वेकडून 18 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जात असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली. विद्यानंद बापट यांच्यावरील मारहाणीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना, सणाला गालबोट लागू नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

Manoj Jarange मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक

अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालल्याने राज्यभरात मराठा समाज अत्यंत आक्रमक झालाय तर दुसरीकडे सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे.

'मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने द्यायचं असतं गुद्याने नाही' : विद्यानंद बापट

गणेशोत्सवात डीजे वाजवण्याला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट यांना एका तरूणाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, मी प्रतिक्रिया देत होतो, तितक्यात एक वेडा आला आणि माझ्यावर हल्ला केला. कारण मी निशस्र होतो. त्याला फक्त सवंग प्रसिद्धी हवी होती. मी जसं म्हणतो, 'घटम् भिन्द्यात् पटम् छिन्द्यात्' अगदी तसंच. आता पोलिसांकडे सगळे फुटेज आहेत, पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावं आणि तुडवून काढावं, म्हणजे त्याला कळेल. मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने द्यायचं असतं गुद्याने नाही.

एसीबीची महिनाभरातील दुसरी कारवाई

जमिनीच्या खरेदी खताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावर्डे (ता. चिपळूण) येथील मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव (वर्ग ३, महसूल विभाग) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ आॕगस्ट रोजी रंगेहाथ पकडले होते. महिनाभरातील आजची दुसरी कारवाई आहे.

संतोष पंडित यांना बाहेर काढा अन्यथा असंतोष बाहेर पडेल काँग्रेसचा सरकारला इशारा

कोथरूडमधील विकासकामांवरून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला प्रश्न विचारणारे युट्युबर संतोष पंडित यांना गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले. या अटकेवरून आता पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, या अटकेवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेस गप्प बसणार नाही. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आवाज दाबण्याचा जेवढा प्रयत्न कराल, तेवढा जनअसंतोष बाहेर पडेल, असा थेट इशारा जगताप यांनी दिला आहे.

बीडमधील आष्टीच्या धामणगावात कडकडीत बंद; मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक..!

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. सरकारने या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी धामणगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. या आंदोलनात शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते.

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 लाखांचा घोटाळा

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 38 लाखांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारानंतर आता कृषी विद्यापीठातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता आणि सध्याचे संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने यांच्यासह सहाय्यक कुलसचिव हंसराज राठोड, सौरभ मोरे, विलास गुल्हाने, कंत्राटदार संतोष म्हातारमारे यांच्यासोबत दिवंगत पंकज पाल आणि मदन लांजेवार यांच्याविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात विद्यानंद बापट यांना बेदम मारहाण

पुणे- गणेश उत्सवात डीजे वादान विरोधात भूमिका घेणाऱ्या आणि अल्पावधीतच प्रसिद्धीत आलेल्या विद्यानंद बापट यांना टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली आहे.

मराठा आरक्षणासाठी पुणे-सोलापूर महामार्ग रोखला; वाहतूक ठप्प

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी महामार्ग अडवून धरल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आंदोलन स्थळापासून दोन्ही बाजूंना ५०० मीटर अंतरावर बॅरिगेटिंग करून रस्ता आधीच वाहतुकीसाठी बंद केला होता. महामार्ग रोखल्यामुळे या मार्नावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

कोकणवासियांना रेल्वेचं गिफ्ट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेस आजपासून

मुंबई आणि कोकणदरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवणारी CSMT-सावंतवाडी रोड दैनिक एक्स्प्रेस आजपासून सुरू होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ होणार आहे.मुंबई ते सावंतवाडी रोडदरम्यान सुमारे ५१० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या एक्स्प्रेसला २३ थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांत वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांना दक्षिण कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेसेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या सेवेचा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिवेंद्रराजे भोसले घेणार मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा

गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्वतः मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. रत्नागिरीपर्यंतच्या या दौऱ्यात ते संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेणार आहेत.

जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवण्यासाठी धुळे-सोलापूर महामार्गावर चक्काजाम!

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.

भाजप नेत्यांच्या घरांवर हल्ला गाड्यांची तोडफोड

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून तोडफोड केली आहे. रात्री ८ ते ९ च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घराच्या परिसरात प्रवेश केला. हल्लेखोरांनी दगड आणि बांबूच्या साहाय्याने कांबळे यांच्या दोन चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी, लातूरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज नांदेड, जालना, बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. आज संपूर्ण मराठवाड्यात बंद पाळला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर परभणी आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक विभागातील चार तलाठी निलंबित 

महसूल आयुक्तांनी म्हाडा सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक येथील तलाठी अनिल रोकडे, मनीषा पाटील, नितीन चितळकर आणि सागर शेलार या चार तलाठ्यांना निलंबित केले. तलाठ्यांनी नियमबाह्य पद्धतीने जमिनीची तुकडे बंदी करून रेकॉर्डमध्ये फेरफार केला होता. याद्वारे बांधकाम व्यवसायिकांना लाभ पोहोचविला. त्यांना आता घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक दशरथ रायकर यांचे निधन

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दशरथ रायकर असे मृत आंदोलकाचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील संगम येथील रहिवासी होते. या घटनेने आंदोलनस्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे.रायकर यांचा झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीड, नांदेडमध्ये कडकडीत बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि हिमायतनगर तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. हदगाव आणि हिमायतनगर बंदला सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद.आज जिल्ह्यातील अनेक महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तर, पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com