पुणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामे मार्गी लागत नसतील, तर नेमकी सत्ता कोणाची? असा सवाल आता खुद्द भाजपच्याच नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेतील अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नाहीत, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दहा-दहा दिवस लागतात, सर्वसाधारण सभेत बोलण्याची संधी मिळत नाही, माईक बंद केला जातो आणि ठेकेदारांची मक्तेदारी कायम आहे, अशा तक्रारींचा पाढाच नगरसेवकांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यासमोर वाचला असल्याचे सांगितले जात आहे.