

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वसामान्य गरीब मराठा, कुणबी, धनगर, ओबीसी यांच्यासह असा कोणताही समाज सध्या सुखी नाही. मुलांना नोकरी आणि शिक्षण मिळाले तरच खरे सुख मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मराठा समाज आता जागृत झाला असून, त्यांची फसवणूक दीर्घकाळ चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी देशातील सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे सध्या देशातील तसेच राज्यांतील सरकारी शाळांमधील पुरवल्या जात असलेल्या शिक्षणासह सर्व सोयी-सुविधांविषयीची माहिती मागितली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक महिला आरक्षण विरोधी आहेत. त्यांना 2029मध्ये महिलांना आरक्षण द्यायचं नाहीये. 2034 पर्यंत त्यांना महिला आरक्षण रेटून न्यायचं आहे, असा खळबजनक आरोप केला आहे.
एफडीएने खुल्या तेलविक्रीवर बंदी घातली आहे. त्याचे परिणाम राज्यभरात जाणवू लागले आहेत. नाशिकमधील खाद्यतेल व्यापाऱ्यांची बैठक झाली. त्यात बंदीला विरोध दर्शविला असून १५ दिवसांत निर्णय मागे घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली असून एफडीएची कारवाई योग्यच आहे. मात्र पारंपारिक तेल व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि गरिबातील गरीब लोक जे एक आणि अर्धा किलोच्या आतमध्ये तेल घेतात, त्यांच्यावरही अन्याय होऊ नये, यादृष्टीने मार्ग काढण्यासाठी आम्ही एफडीएला सांगणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही शेंगा खाल्या नाहीत, आम्ही टरफलं उचलणार नाही. आम्ही कोणतीही अश्लिल पोस्ट केलेली नाही. आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला आहे, त्याला कोणाचं पाठबळ आहे. आम्ही दहावेळा जेलला जाऊ. पण, या असंवेदशील महिलेमुळे राज्यातील अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार झाले. मग तिच्यावर का गुन्हा दाखल केला नाही, असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांना केला.
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. या प्रकरणी शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेतली असून रिक्षा आणि टॅक्सी चालकाचे परवाने रद्द करू नका, त्यांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ द्या, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ गाडीचा समावेश करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची ही नवी गाडी सध्या चर्चेत आलेली आहे.
मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील हे आक्रमक आहेत. सातारा गॅझेट लागू केल्याशिवाय मागे हटणार नाही. तसेच आपले सर्व विषय मार्गी लावल्याशिवाय आपण २९ ऑगस्टचे आंदोलन मागे घेणार नाही. आंदोलन थांबणार नाही. हे आंदोलन निर्णायक असणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या, सर्व ५८ लाख नोंदींची दखल घेण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिले आहे. सरकारकडून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अंमलबजावणी काही कमतरता राहिल्या हे मान्य आहे. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, याची सरकार काळजी घेईल. काही अधिकारी सरकारला बदनाम करण्याची भूमिका घेत आहेत. दाखले देण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असेल तर कारवाई केली जाईल. याबाबत २ ते ३ दिवसांत उपाययोजना करत असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या करारानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यातील विविध भागांतील ९ रुग्णांना ८९ लाख ६० हजार ३०१ रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या मदतीतून यकृत प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार, मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या अत्यंत खर्चिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वितरीत करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे ६ लाख ३६ हजार शेतकरी लाभार्थी ठरले आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेने महसूल वाढीसाठी आता कंबर कसली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १५० कोटी रुपयांची अतिरिक्त वसुली करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे. यासाठी शहरातील तब्बल दोन लाख करदात्यांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. थकबाकी न भरल्यास जप्ती, सील आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
चर्चेदरम्यान मनोज जरांगे यांनी ५८ हजार कुणबी नोंदी कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप केला. त्यावर आता मंत्र्यांकडून त्यांना सरकारकडून केल्या जात असल्याची माहिती दिली जात आहे.
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळात चर्चा सुरू झाली आहे. शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांचा समावेश आहे.
‘आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे’, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. पक्षाचं काम करताना पूर्वी समोसा खाऊन झोपायचो, कुठलीही शिस्त नव्हती, अशी आठवणही गडकरींनी सांगितली.
मात्र, कोरोना काळानंतर जीवनशैलीत बदल केला असून दररोज योगा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘तब्येत चांगली असेल तरच आयुष्याचा आनंद घेता येतो... तब्येत चांगली नसेल तर सत्ता काही कामाची नाही,’ असंही गडकरी म्हणाले.
काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथे आयोजित एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात गडकरी बोलत होते...
कोल्हापुरमधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून निवडणुकीसाठी अंतिम यादी करण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. अशातच आवसायनातील संस्थांची सुनावणी देखील सुरू आहे. दरम्यान थेट निवडणूक अधिकाऱ्याचीच तडकाफडकी बदली करण्यात आल्याने गोकुळच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नारायण परजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मिसाळ यांनी वैद्यकीय कारण देत बदली घेतल्याचे कारण पुढे आले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात जुन्या पिढीतील नेत्यांनी हळूहळू निवृत्त होऊन नवीन पिढीकडे जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी जुन्या लोकांनी मार्गदर्शकाच्या भूमिका स्वीकाराव्यात आणि नवीन पिढीला कारभार चालवण्याची द्यावी असेही म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून गडकरी यांनी निवृत्तीचे संकेत दिले तर नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी राज्यातील महिलांना दिलासा देणारी घोषणा केली असून आता वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सोमवारी विधानसभेत ही मोठी घोषणा केली.
पुणे महापालिकेत भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वाद विकोपाला गेलाय. भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकरांनी सुनेत्रा पवारांकडे तक्रार केल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतलीय. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा विकासनिधी शून्य केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सुनील टिंगरेंनी केलीय.
परभणीत एका 7 वर्षीय मुलाला शिक्षकांनी अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडला असून, शिक्षकाने विद्यार्थाला उलटे लटकवून मारहाण करत चटके दिल्याचा गंभीर आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. नांदेड येथील हा 7 वर्षीय विद्यार्थी परभणी शहरातील एका गुरुकुल संस्थेत शिकत होता. त्याच ठिकाणी त्याला मारहाणा झाल्याच पालकांनी आरोप केला आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच मुलाची वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय अभिप्राय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
पहिल्यांदा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार असून या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रि करणावर चर्चा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली असून या दोघांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी विलनीकरणावर चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यानंतर आज महायुती समन्वय समितीची बैठक होणार असून या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
अमरावती जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत माहिती दिली. आगीचे नेमके कारण काय, तसेच रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, याची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रथमच या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काल शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
अमरावतीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
अमरावतील रुग्णालयातील दुर्घटनेनंतर आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, 'इन्फ्रामॅन' वगैरे ऐकायला तुम्हाला ठीक वाटत असेल; पण अमरावतीत व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन बालके होरपळून दगावली आहेत, साहेब! यात तातडीने कडक कारवाई अपेक्षित आहे, तीही बड्या माशांवर. तुमच्या आरोग्यमंत्र्यांनाही तिकडे पाठवा; महाराष्ट्राला कळू द्या की राज्यात या खात्याला कोणी मंत्री आहेत!
अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत आपल्या निष्पाप बालकांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचं बळ मिळो. जखमी बालकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, हीच प्रार्थना, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमरावतीच्या दुर्घटनेनंतर ट्विट करत म्हटले आहे.
शिक्षक पदवीधर विभाग निवडणुकीसाठी सचिन सानप यांनी दिली मुलाखत टीडीएफच्या वतीने पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ओएसडी सचिन सानप यांनी मुलाखत दिली. कौस्तुभ गावडे कोल्हापूर,आर. एस.पाटील सांगली. इत्यादी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्याचप्रमाणे विभागातील पाचही जिल्ह्यातून अनेक इच्छुकांनी संघटनेकडे अर्ज करून उमेदवारी बाबत विचारणा केलेली.
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) अचानक आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
महायुती समन्वय समितीची उद्या बैठक पार पडणार आहे..पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे...उद्या संध्याकाळी सात वाजता 'वर्षा' बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं...मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला महायुतीचे सर्व मंत्री, आमदार उपस्थित राहणार असून, त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलाय..मुख्यमंत्री बैठक घेऊन नेत्यांना काय कानमंत्र देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.