Maharashtra Political Live Update : 'कुंभमेळ्यावर 30 हजार कोटी खर्च होतात; त्यातून किती शाळा किंवा IIT उभारता आल्या असत्या..?';इम्तियाज जलील

Marathi Breaking Live Headlines Updates : राहुल गांधी आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मांजरी येथे जाण्याची शक्यता, काँग्रेसचे नाशिकमध्ये शिबिरी, महामंडळ वाटपाचे महायुतीचे सुत्रे ठरले, यासह आज दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

'कुंभमेळ्यावर 30 हजार कोटी खर्च होतात; त्यातून किती शाळा किंवा IIT उभारता आल्या असत्या..?';इम्तियाज जलील 

इम्तियाज जलील म्हणाले, ग्रामीण भागातील शाळांची अवस्था गंभीर आहे. माझ्या मतदारसंघातील 306 शाळांना छत नाही. मंत्र्यांची मुलं परदेशात शिकतात, पण कामगारांच्या मुलांना शाळाही नाही. कुंभमेळ्यावर 30 हजार कोटी खर्च होतात; त्यातून किती शाळा किंवा IIT उभारता आल्या असत्या? सरकारची जबाबदारी शाळा आणि शिक्षणाची असल्याचा हल्लाबोलही त्यांनी सोलापुरातून केला.

नांदेडमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी हायकोर्टात, त्याचा परिणाम सोलापूर, धुळ्यावरही होणार: इम्तियाज जलील 

एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सोलापूरमध्ये मोठं विधान केलं आहे. सोलापुरात AIMIM चे 8 नगरसेवक आहेत. वर्षभरात त्यांना जम बसवून विकासाच्या मुद्द्यांवर काम करावे लागेल. तसेच नांदेडमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी हायकोर्टात गेलो असून, निकालाचा परिणाम सोलापूर आणि धुळ्यावरही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

aniket Tatkare : पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी दळवींनी दिल्लीला फेऱ्या मारल्या : तटकरे

राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेतील शाब्दिक वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीला आणि खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य केल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. दळवी यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असा टोला तटकरे यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीनंतर पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी दळवींनी दिल्लीपासून फेऱ्या मारल्या, याची आठवण करून देत त्यांनी उगाच आणाभाका घेऊ नयेत, असा सल्लाही दिला.

Tukaram mundhe : शालेय आहार व्यवस्थेच्या तपासणीचे दिले आदेश

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची मोहीम सुरूच आहे. आता अंगणवाड्या त्यांच्या रडारवर आल्या आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील अंगणवाड्यांमधील पोषण आहार, शालेय पोषण आहार, मिड-डे मिलकडे मोर्चा वळवला आहे. महाराष्ट्रभर अंगणवाडी आणि शालेय आहार व्यवस्थेच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना निकृष्टदर्जाचे जेवण देण्यात येत असल्याचे समोर आले होते. भूंगे लागलेले कडधान्य, खिचडीत आळ्या आणि अस्वच्छतेच्या घटना समोर आल्या होत्या. या नवीन आदेशामुळे शालेय पोषण आहारात मापात पाप करणाऱ्यांचे धाबे दणाणार आहे.

महाजेनकोमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. याचं कारणही त्यांनी सांगितलं असून देशात सर्वात जास्त महाग वीज महाराष्ट्रात आहे. त्याची अनेक कारणे आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

महाजेनकोमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. यामागे असणारे कंत्राटदार महामीनरल. गुप्ता, रुक्मिणी, महावीर कोल अशी मोठी लोक या पडद्यामागे आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याचा महाजेनकोने वारंवार सांगितले आहे. त्यांना वीजनिर्मितीसाठी दिला जाणारा कच्चा कोळसा वॉशरीमध्ये दिला जातो. या पाच वर्षात दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा मी नाव सांगितलेल्या कंपनीने केला असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

सामान्य माणसांकडून अधिक पैसे घेऊन हे राज्य लुटण्यासाठी बसले आहेत असा आरोप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ऊर्जा खात असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

तीस वर्षांपूर्वी भाजप सरकारच्या काळाच MPSCचा पेपर फुटला होता अन् आताही...; रोहित पवारांचा हल्लाबोल

नेपाळमध्ये दोन टुरिझम कंपन्यांद्वारे गेलेले १०५ भारतीय पर्यटक महापुरात बेपत्ता

नेपाळमध्ये सध्या महाप्रयल आला असून या भीषण महापुरात जगभरातील एकूण ४०० पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यांपैकी १०५ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ टुरिझम बोर्डानं ही माहिती दिली आहे.

MPSC पेपरफुटीप्रकरणी तीन अधिकाऱ्यांना अटक; आरोपींची संख्या सहावर

MPSCच्या औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. MPSCच्या तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील एकूण अटक सहावर पोहोचली आहे. यामध्ये क्लास चालक आणि विद्यार्थ्याच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. पेपरफुटीचा कट कसा रचला, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

खारघर स्थानकात मोठा गोंधळ! ओव्हरहेड वायरमध्ये भीषण शॉर्टसर्किट; लोकल सेवा ठप्प

खारघर रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या दृष्टीने खारघरहून CSMT आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या तात्पुरत्या थांबवण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.

विरोधी पक्षांच्या खासदारांची मुख्यमंत्री फडणवीसांशी भेट; विकासकामांवर महत्त्वाची चर्चा

विरोधी पक्षांच्या खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील विविध विकासकामांवर चर्चा केली. राज्यस्तरीय दिशा कमिटीची बैठक लवकरच घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईतील मनोरा येथे खासदारांसाठी निवासाची व्यवस्था, पीएला ओळखपत्र आणि CRF निधीत खासदारांचे प्रस्ताव समाविष्ट करण्याबाबतही महत्त्वाचे निर्णय झाले.

अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला मारहाण

जालन्यातील अंबड तालुक्यातल्या गोंदी येथे गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज (ता.२६) सकाळी अंबडचे तहसीलदार सोमेश मोहिते हे अवैध वाळू उपसा होत असल्याच्या माहितीवरून महसूल पथकासह कारवाईसाठी गोंदी येथे गोदावरी नदीपात्रात दाखल झाले होते. मात्र, कारवाई सुरू असतानाच काही वाळू वाहतूकदारांनी पथकाशी हुज्जत घालत तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणी गोंदी पोलिसांकडून पंचनामा केला जात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86 हजार कोटी थकबाकी, आंदोलन करण्याचा कंत्राटदार महासंघाचा इशारा

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86 हजार कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे थकवली असून यामुळेच आता कंत्राटदार टोकाचा पाऊल उचलत आहेत, असा आरोप होताना दिसत आहे. तर महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे आतापर्यंत सात कंत्राटदारांना आपला जीव गमावला आहे. यानंतर आता येत्या आठ दिवसांत शासनाने देयक वेळेवर दिली नाहीत रस्त्यावर उतरून आंदोलन करू इशारा असा इशारा कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी सरकारला दिला आहे.

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; वाद चव्हाट्यावर

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण व लोकप्रतिनिधी यांच्यात कोणताही समन्वय नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. आता भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याने प्राधिकरण व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा असलेला अभाव उघड उघड चव्हाट्यावर आला आहे.

५०० रुपयांच्या लाचेसाठी उल्हासनगरच्या सहाय्यक सरकारी अभियोक्त्याला अटक, २ दिवसांची पोलीस कोठडी

सायबर फ्रॉड केसमध्ये गोठवलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी न्यायालयातील अर्जांवर अभिप्राय देण्याकरिता प्रत्येकी ५०० रुपये लाच मागितल्याप्रकरणी उल्हासनगरच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुषमा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला अधिवक्त्याच्या अर्जांवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सुषमा पाटील यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

MPSC कडून औषध निरीक्षक भरती रद्द, दोषींवर कारवाईची उमेदवारांची मागणी

MPSC कडून अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब भरती परीक्षा रद्द करण्यात आली असून गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालात परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघड झाले आहे. यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान दोषींवर कारवाईची मागणी उमेदवारांनी केली असून लवकरच या पदासाठी फेरपरीक्षा घेतली जाणार असून त्याचे वेळापत्रक MPSCच्या संकेतस्थळावर जाहीर केलं जाणार आहे.

निघोजे ग्रामसभेत महिला सरपंच विरुद्ध महिला सदस्य; वाद थेट पोलीस ठाण्यात, गुन्हा दाखल

निघोजे ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरू असतानाच महिला सरपंच सुनीता येळवंडे आणि ग्रामपंचायत सदस्य छाया येळवंडे यांच्यात काही विषयांवरून वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर महिला सदस्याने सरपंचांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ग्रामसभा सुरू असताना घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही तैनात होता. या प्रकारानंतर सरपंच सुनीता येळवंडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्य छाया येळवंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रकृती ठीक नाही - संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रकृती सध्या बिघडली असून ते अस्वस्थ आणि थकलेले दिसत आहेत. चालताना आणि बोलतानाही त्याचा परिणाम जाणवत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. थकलेल्या व्यक्तीने देशाचे नेतृत्व करू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Aditya Thackeray  : आदित्य ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर

आमदार आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत, महामार्गावरील वडखळ जवळील डोलवी येथून ते आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार असून नागोठणे , इंदापूर माणगाव येथील सुरू असलेल्या बायपास कामांची देखील ते पाहणी करणार आहेत.

पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाची सर्वेक्षण मोहीम सुरु

सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डासांची संख्या वाढून किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (NCVBDC) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. किटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.

सत्ताधारी भाजपने ओव्हरहेड केबलचे वादग्रस्त धोरण गुंडाळले

पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि वरिष्ठ स्तरावरून झालेल्या थेट हस्तक्षेपामुळे ओव्हरहेड केबलचे वादग्रस्त धोरण गुंडाळण्याची नामुष्की आली असल्याचं बोलले जात आहे. स्थायी समितीने घाईघाईने मंजूर केलेला हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आला असता, तीव्र विरोध आणि वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आदेशानंतर थेट मागे घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेशिवाय माघार नाही

मांजरी येथील आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गेल्या 14 दिवसांपासून वसतिगृहासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत आदिवासी विकास प्रकल्प आयुक्त, उपायुक्त, प्रकल्प अधिकारी आणि आंदोलक विद्यार्थी यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून मार्ग निघाला नसल्याने एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली.आदिवासी समन्वय समिती आणि आदिवासी विकास मंत्री यांच्यात बैठक झाली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नाही. आदिवासी मंत्री आणि आदिवासी आमदार यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. त्यामध्ये केवळ २०२६ च्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी हा निर्णय धुडकावून लावला असून आता थेट मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून अधिकाधिक सकारात्मक निर्णय झाला तरच आंदोलन स्थगित करण्यात येईल अन्यथा, हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करणार असल्याचा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे.

एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशासन सज्ज,मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) पहिल्या टप्प्यातील हाऊस-टू-हाऊस सर्व्हेचे काम मुदतवाढीसह निर्धारित कालावधीत पूर्ण केल्याबद्दल पुणे विभागातील जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करत, एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणी व पुढील कार्यवाहीसाठी नियोजन करा असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com