

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या वर्षभरात कोणावरही कारवाई केली जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. यावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आणखी दहा पंधरा वर्षे मराठी भाषा शिकण्याची मुदत द्या. आगामी काळात उत्तर प्रदेशात निवडणूक होणार आहे. हीच निवडणूक लक्षात घेऊन फडणवीस सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी नागपुरात बोलताना केली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांच्या पीएचा भीषण अपघात, जागीच मृत्यू
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांचे पीए सतीश पाटील यांचा बामनोळी झील स्कूलजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात ते जागीच ठार झाले आहे. पाटील यांची दुचाकी ट्रॅक्टर खाली गेल्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून कठोर भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. त्यांनी पेपरफुटी प्रकरणात कोणताही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसून सर्व परीक्षा प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडली जाईल असं नमूद केलं आहे.तसेच पुढील एमपीएससी परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने होतील, यासाठी आवश्यक व्यवस्था लवकरच उभारणार असल्याचंही सांगितलं आहे.
मनोज जरांगे हे येत्या २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठवाड्याचे विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत मराठवाड्यातील मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा घेणार आहेत.
मराठी भाषा व्यवहारात प्रत्येकाला आली पाहिजे, अशी भूमिका परिवहन विभागाने घेतली. प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषा शिकविण्याचे अभियान सुरू केले होते. त्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिले आहे. मराठा भाषेचे संवर्धन इतर भाषिकांमध्येही होतो आहे, याचं समाधान आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी शिवसेनेची टीम घटनास्थळी जाणार आहे. शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल यांच्यासोबत शिवसेनेची टीम नेपाळला रवाना झाली आहे. नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलंयकारी महापुरात २८८ भारतीय बेपत्ता झाला आहेत. त्या पैकी २१ जणांची सुटका करण्यात आली आहे. नेपाळमधील बेपत्ता भारतीयांच्या बचावासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईचा महापौर पुढच्या सव्वा वर्षांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा महापौर होणार असल्याची माहिती साम टीव्हीने दिली आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे मुंबईत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हे शिवसेना आणि भाजपकडे राहील, असे सूत्र ठरल्याची माहिती आहे.
राज्यात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये आणि बाजारातील दर नियंत्रणात राहावेत, यासाठी राज्य सरकारने साखरेच्या साठवणूक, विक्री आणि वाहतुकीवर देखरेख वाढवली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार साखर कारखाने, व्यापारी, वितरक तसेच मोठ्या प्रमाणावर साखर वापरणाऱ्या ग्राहकांच्या साठ्याची तपासणी केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील अमराठी व्यावसायिक वाहन चालकांना मराठी शिकणं बंधनकारक करण्याचा निर्णय परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला होता. त्यासाठी संपूर्ण रचनात्मक कार्यक्रम आखून या वाहनचालकांना मराठीचे धडेही दिले जात होते. तसंच ज्यांनी हे शिकवणी वर्ग पूर्ण केले त्यांना मराठी शिकल्याबद्दलचे प्रमाणपत्रही शिवसेनेकडून प्रदान केले जात होते. पण अचानक मुख्यंमत्र्यांनी याला एक वर्षांची मुदतवाढ जाहीर केली. पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय आम्हाला बंधनकारक असल्याची प्रतिक्रिया परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणात दाखल झालेल्या तक्रारीवरून वर्धा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात सीझेरियनदरम्यान पोटात कापूस राहिल्याने वडवणीच्या संध्या गायकवाड यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी ससून रुग्णालयात जाऊन संध्या गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सोनवणेंनी संबंधित डॉक्टरांशी चर्चा करून पीडित महिलांवर तातडीने योग्य उपचार आणि विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात काल दुपारी दोन अज्ञात भोंदूंनी एका महिलेची कथितरीत्या फसवणूक करत सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या एका गिफ्ट शोमध्ये घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत कोपरगाव रेल्वे स्थानकावरून संबंधित दोन्ही भोंदूंसह त्यांच्या इतर दोन साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून एक नवा चेहरा उघड झाला आहे. कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील आणि ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांच्यात पेपर फुटी प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या मयूर आबाजी ठाकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मयूर ठाकरे हा नंदुरबारच्या एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या संपूर्ण प्रकारात मयूर ठाकरे याने संचालक प्रवीण पाटील आणि अमृत पाटील यांच्यात भेट घडवून आणली होती. आता या प्रकरणात मयूर ठाकरे कायद्याच्या कचाट्यात सापडला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचे धागेदोरे नंदुरबार जिल्ह्यापर्यंत गेले आहेत. या प्रकरणात कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना अटक करण्यात आली असून ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील त्यांच्यासोबतच पाच जणांना मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. तर ऋतुजा पाटील आणि तिचा प्रियकर दोघेही फरार आहेत. दरम्यान ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि आई नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असल्याचे समोर आले असून पाटील दांपत्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचेही आता समोर आले आहे.
नेपाळमध्ये भीषण पूरस्थिती मुळे खळबळ उडाली असताना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील १० पर्यटक नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेले असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे. तसेच हे सर्व पर्यटक पोखरा शहरात सुरक्षित असून जिल्हा आणि राज्य नियंत्रण कक्ष त्यांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत सातत्याने तक्रारी समोर येत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पेपरफुटीच्या आरोपांपासून ते वर्ग-१ आणि वर्ग-२च्या भरतीतील कथित सत्ताधारी हस्तक्षेपापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लाखो तरुणांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या एमपीएससी सारख्या संस्थेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाऊ शकत नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खताचा सुरळीत पुरवठा मिळावा, यासाठी महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाच्या कोल्हापूर येथील खत कारखान्यात कृषि उद्योग १८:१८:१० मिश्र खताचे द्वितीय उत्पादन सत्र सुरू करण्यात आले आहे. कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली.
नेपाळमध्ये रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमधील भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांना अचानक आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अद्याप १७८ भारतीय पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्रीय पर्यटन मंडळाने दिली आहे. विविध देशांमधील एकूण ६४४ पर्यटकांचा ठावठिकाणा नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गुहागर-विजापूर मार्गावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. तालुक्यातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या OBC संदर्भातील वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेसने माझं OBC प्रमाणपत्र दाखवावं,” असं म्हणत त्यांनी वडेट्टीवारांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला. या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील OBC मुद्द्यावरचा राजकीय वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
MPSC पेपरफुटीप्रकरणी तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर परीक्षा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी MPSCच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे. परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी ऑफलाईन परीक्षा घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
कुंभमेळ्याच्या रिंग रोड साठी शासनाकडून जमीन संपादन वादात सापडले आहे. रिंग रोडच्या जमिनींना शेतकऱ्यांवर अन्याय करून ताब्यात घेतले जात आहे. रिंग रोडचा नकाशा बदलून अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस सातत्याने आंदोलन सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांनी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अडून बसले आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची शेतकऱ्यांची चर्चा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आंदोलकांशी चर्चा करणार का? हा उत्सुकतेचा विषय आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली असून यापैकी ३ जण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मॅन होम क्लीन करत असताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल शिंदे (वय 20) आणि मनोज शिंदे (वय 26) असे मृत्यू झालेल्या कामगारांचे नावजवळपास एक वर्षांपूर्वी याच मॅन हॉलमध्ये देखील बीएसएनएलच्या तीन कामगारांचा मॅन होल क्लीन करत असताना देखील झाला होता दुर्दैवी मृत्यू
गोकुळ दूध संघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आले असून ऐन गणेशोत्सवातच या निवडणुकीचे वातावरण तापणार असल्याचे चित्र आहे. येत्या 4 सप्टेंबर रोजी गोकुळ दूध संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने दहा सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गावरील नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील बोगदा १ तासांसाठी बंद राहणार आहे. दुपारी १२ ते १ या वेळेत बोगदा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.