

छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाने शनिवारी(ता.5 सप्टेंबर) विमान प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी शहरासह विमानतळाच्या 15 किलोमीटरच्या परिसरात लेझर लाईट्स आणि बीम लाईट्स वापरण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मी खूप मानते असं विधान नृत्यांगना गौतमी पाटील यांनी केलं आहे. त्यांनी मराठी सण, संस्कृती टिकली पाहिजे असं आवाहन केलं होतं. मी त्यांच्या आवाहनाला अनुसरुनच काम करत असल्याचं गौतमीनं म्हटलं आहे.
मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या घाटकोपरमध्ये दहीहंडीला ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यावेळी पोलिसांनी दहीहंडीच्या स्टेजमुळे आपत्कालीन मार्ग बंद होण्याची शक्यता असल्याचा अहवाल दिला होता. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली तरी, दहीहंडी होणार असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला होता. तसेच जेन-झी दहीहंडी आयोजक गणेश चुक्कल यांनी पोलिसांच्या परवानगी नाकारण्याच्या निर्णयापाठीमागे भाजप असल्याचा आरोप केला होता.
Pune News : लोणावळ्यातील लोहगडावरून केतन अग्रवाल या तरुणाला दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यानंतर आता त्यांचा वर्गमित्र रितेश हांगे याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रकरणात तिसरी अटक झाली असून, हत्येचा कट माहिती असतानाही तो पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा आरोप रितेशवर आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला सिनेअभिनेता संजय दत्त याने हजेरी लावली. कार्यक्रमाला आलेल्या संजय दत्तला सरनाईक यांनी मराठीत बोलण्याची विनंती केली. त्यावेळी त्याने तुम्हा सर्वांना नमस्कर म्हणत सुरुवात मराठीत केली. मात्र, प्रतापभाई, मी सहा वर्षे पुण्यातील येरवडा कारागृहात होतो, त्यावेळीही मी मराठी शिकू शकलो नाही, असे विधान अभिनेता संजय दत्त याने केले आहे.
ठाण्यातील भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थिती लावली. या दहीहंडीच्या माध्यमातून आमदार पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून प्रोजेक्ट केले आहे. त्याबाबत नार्वेकर म्हणाले, फडणवीस यांना इन्फ्रा मॅन दिलेली उपाधी अत्यंत योग्य आहे. समृद्धी आणि नियोजित शक्तीपीठ महामार्ग, मेट्रोचे जाळे, एमटीएचएल किंवा कोस्टल रोड, शेतकऱ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्याचे काम केलेले आहे, त्यामुळे फडणवीसांना ‘इन्फ्रा मॅन’ उपाधी एकदम बरोबर आहे.
मुंबईतील मालाडमध्ये दहीहंडी फोडताना सात वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. दहीहंडी फोडताना बाजूचा कॉलम पडून ही दुर्दैवी घटना घडली आहे. डोक्याला मार लागल्यामुळे सात वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत दहीहंडी उत्सवात 32 गोविंदा जखमी झाले आहेत.
काही दहिहंडी मंडळांना सरकारकडून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी भीती वाटते, त्या ठिकाणी सरकार असे वागते आहे. ‘झेन झी’ची तरी त्यांना विशेष भीती वाटते. तिथं सरकार अशा नोटिसा पाठवल्या जात आहेत. त्यांनी कितीही नोटिसा पाठवू राहू दे. आम्ही आमचे सण साजरा करत राहणार, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
यंदाही दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी गोविंदा नागेश भोईर थरावरुन कोसळून जखमी झाला होता. 2009 साली घडलेल्या या दुर्घटनेमुळे गोविंदा नागेश भोईर हा गंभीर जखमी झाला. तेव्हापासून नागेश हा अंथरुणात खितपत पडला आहे. या गोविंदा नागेशच्या उपचाराचा खर्च उचलण्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
MPSCच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या एका अधिकाऱ्याचा आरोपीशी संबंध असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याकडून करण्यात आला आहे. झिरवळांचे OSD गणेश देवरे हे या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव पाटीलच्या नंदुरबारमधील घरात भाडेकरू म्हणून राहत होते, असा आरोप केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोविंदाचा उत्सवाला प्रारंभ झाला असून पारंपरिक वाद्य असणाऱ्या खालू बाजाच्या तलावावर खासदार सुनील तटकरे यांनी फेर धरून गोविंदा खेळण्याचा आनंद लुटला.
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली असून केवळ चार महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली आहे. त्यांनी जिल्ह्यातील चारा टंचाईच्या संदर्भात बैठक घेतली. यानंतर ही बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, आणि अक्कलकोटमध्ये तीन महिने पुरेल इतका तर अन्य तालुक्यांमध्ये चार महिने पुरेल इतका चारा शिल्लक असल्याचे उघड झाले आहे. यामुळे चारा टंचाई होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी केले आहे. तसेच त्यांनी चारा टंचाई रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती देखील दिली आहे.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त होणारा संपूर्ण नियतव्यय १०० टक्के वेळेत खर्च करा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शासकीय नियमांनुसार जिल्ह्यातील १२९ नोंदणीकृत मजूर संस्थांना एकूण कामांपैकी ३३ टक्के कामे वाटप झालीच पाहिजेत. सर्व तालुक्यांमध्ये या नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत पालकमंत्र्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले.
पुण्याच्या जुन्या सांगवीत दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा सलाउद्दीन पठाण असं मृत महिलेचं नाव असून रात्री विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं. यावेळी अचानक लोखंडी भाग सलमा यांच्या डोक्यावर पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, मृत महिलेचा मुलगा मंडळात असल्याने कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे. इतर मुलं अडचणीत येऊ नयेत, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली असून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करू नये, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या खात्यांवरून विविध पोस्ट आणि मजकूर प्रसारित केला जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, बापट यांनी स्वतः या प्रकाराचा खुलासा करत त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेली सोशल मीडिया खाती बनावट असल्याचे स्पष्ट केले. “माझ्या नावाने सर्व खाते बनवत आहेत. सध्या एआयचा जमाना आहे, त्यामुळे कोणी काहीही करत आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या नावाने सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या पोस्टबाबत नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
घाटकोपरमध्ये मनसेच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या जेन-झी दहीहंडीला नोटीस बजावण्यात आली आहे. अमित ठाकरे या दहीहंडीला हजेरी लावणार आहेत, मात्र पोलिसांनी तातडीने स्टेज हटवण्याचे आदेश दिलेत. स्टेज नियमबाह्य असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर सर्व परवानग्या घेतल्या असतानाही नोटीस कशी, असा सवाल मनसेने केला आहे. मात्र हा दहीहंडी उत्सव होणारच अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. टीव्ही सेंटर परिसरातील प्यासा वाईन शॉपच्या खाली सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर सिडको पोलिसांनी छापा टाकत अड्डा उद्ध्वस्त केला.
खेळाडूंच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या पाच टक्के क्रीडा आरक्षणाचा गैरफायदा घेत पुणे शहर पोलिस दलात काही उमेदवारांची भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुराश आणि इजांगबोईट या खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे पुणे पोलिस दलात तब्बल १९ उमेदवारांची भरती झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनात भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम आहेत. मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत आदिवासी मंत्री आणि मुख्य सचिव आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. अन्यथा शांतपणे सुरू असलेले आंदोलन जनआंदोलनात रूपांतरित करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून, जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. 11 सप्टेंबरपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा मुंबईच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
संगमनेरमध्ये अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संगमनेर बसस्थानक परिसरात छापा मारून पोलिसांनी 1 लाख 17 हजार रुपये किमतीचा 'एमडी' ( मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा आणि दुचाकी असा एकूण 2 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कासिफ कुरेशी नामक 25 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांनी संगमनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर हा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. कुडाळ नगरपंचायतीमध्ये व्यवसायासाठी ना हरकत दाखला मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे 1200 रुपये किमतीची खड्यासह चांदीची अंगठी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नाटेकर याने तक्रारदाराकडून अंगठी स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कारवाईपूर्वी संशय आल्याने त्याने अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे लाचलुचपत विभागाने सांगितले.
एमपीएससीच्या MPSC परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावरून आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या वक्तव्याविरोधात आता किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदारांचा पेपरफुटीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र हे आरोप निराधार असल्याचा दावा करत संबंधित व्यक्तीविरोधात किल्लारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रेशन दुकानदारांना येणाऱ्या विविध अडचणी व प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यभर रेशन दुकानदारांच्या राज्य संघटनेच्या वतीने येत्या सोमवारी (ता. सात) ‘पॉज मशिन बंद - धान्य वाटप बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. सर्व दुकानदारांनी या लाक्षणिक आंदोलनात सहभागी होऊन राज्य, केंद्र शासनास संघटनेची एकजूट दाखवावी, असे आवाहन संघटनेने केले आहे.
समुद्रातील धोकादायक स्थिती कायम असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव प्रसिद्ध गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा गुरुवारपासून जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या आदेशानंतर पुन्हा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. दहा दिवसांपूर्वीच ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार, हा किनारा खुला करण्यात आला होता.
जळगावच्या मोहाडी येथे मागील महिन्यात राधेशाम हरचंद राठोड (वय 26 याने दोरीच्या साहाय्याने आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, तपासात ही आत्महत्या नसून आईवडील आणि भावानेच संगनमत करून मद्यपी तरुणाचा खून केल्याचे उघड झाले. राधेशामच्या दारूचे व्यसनाला व त्रासाला कुटुंब पूर्णपणे कंटाळले होते.
अमरावती शहरात रवीनगर चौकात अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीची हत्या केल्यानंतर पसार झालेल्या संशयित युवकाने कुटुंबीयांना दूरध्वनी करून मुलीला चाकू मारल्याची माहिती दिल्याची बाब उघड झाली आहे. संशयित युवकास राजापेठ पोलिसांनी गोंदिया येथून अटक करून अमरावतीत आणले. आनंद नंदकिशोर भड (वय 22) असे संशयिताचे नाव आहे.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एमएनएलयू) नागपूरच्या प्रभारी कुलगुरुपदाची जबाबदारी प्रा. डॉ. विजयप्रताप तिवारी यांनी सोमवारी स्वीकारली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजेंदर कुमार यांच्यानंतर तिवारी यांनी पदभार स्वीकारला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने आज राज्यात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. मुंबईतील दादर (शिवाजी पार्क), वरळी, लालबाग, परळ, घाटकोपर, अंधेरी आणि बोरिवली येथे, तर ठाणे जिल्ह्यात टेंभी नाका, जांभळी नाका, वर्तक नगर आणि हिरानंदानी मिडोज येथे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. पुण्यातही कात्रज-कोंढवा रोड, वानवडी (संविधान चौक) व इतर भागांत विविध मंडळांतर्फे दहीहंडी आयोजन करण्यात आला आहे. अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांना राजकीय वलय असून, अभिनेता-अभिनेत्रींना प्रमुख आकर्षण म्हणून हजेरी असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.