
कुंडमळा येथे कोसळेल्या लोखंडी पुलामध्ये काही पर्यटक अडकडून पडले आहेत. पण नदीतील पाण्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी बचाव पथकांना अडचणी येत आहेत. सध्या घटनास्थळी अजस्त्र क्रेन आणण्यात आली असून त्याद्वारे लोखंडी पुलाचा कोसळलेला भाग बाजूला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कुंडमळा येथील जीर्ण झालेला पूल कोसळल्यानंतर याबाबत महत्वाची माहिती पुढे आली आहे. या पूल धोकादायक असल्याचे मागील काही वर्षांपासून सांगितले जात होते. त्याच्या दुरूस्तीची कामेही सुरू होती. तसेच हा पूल प्रवासासाठी बंद करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही महत्वाची माहिती दिली आहे. या पुलालगत नव्याने ८ फुटी पूल बांधण्याचे प्रस्तावित आहेत. त्याला मंजुरीही मिळाली आहे. याबाबत अजितदादांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडून सर्व माहिती मागवली असल्याचे त्यांनी सांगितले.
इंद्रायणी नदीवरील पूल खूप जुना झाला होता, असे आता सांगितले जात आहे. पूल धोकादायक बनलेला असताना त्यावर पर्यटकांना का जाऊ दिले जात होते, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. कुंडमळा याठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी होते, असे असताना प्रशासनाकडून तिथे सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या, अशी माहिती आता समोर आली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत ट्विट केले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.
कुंडमळा येथीळ घटनास्थळी १८ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नदीच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने मदतकार्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक प्रशासन, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार सुनीळ शेळके यांनी दिली. आणखी दोन जण पुलाखाली अडकल्याचे सांगितले जात आहे. जवळपास २०० जणांच्या टीमकडून बचावकार्य सुरू असल्याचेही शेळके यांनी सांगितले. शेळके हे स्वत: घटनास्थळी उपस्थित आहेत.
पुलावर दुचाकी नेण्यात आल्याने हा पूल कोसळल्याचे काही प्रथमदर्शींकडून सांगितले जात आहे. पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने ओव्हरलोड होऊन पूल कोसळला. त्यामुळे पुलावरील सर्व पर्यटक नदीत पडले. यावेळी पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने अनेक जण वाहून गेल्याची भीती आहे. हा पूल खूप जुना होता. हा पादचारी पूल होता. पण त्यानंतरही त्यावरून दुचाकी नेण्यात आल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
मावळमधील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी पूल कोसळला आहे. त्यावेळी पुलावर ३० ते ३५ पर्यटक होते. ते नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांच्याकडून दिली जात आहे. आज सुटीचा दिवस असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. पुलावरही मोठी गर्दी झाल्याने तो कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. पुरात वाहून गेलेल्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले जात आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच नव्याने हा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे कामाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. किल्ल्यावरील पुतळा व चबुतरा सुरक्षित आहे. मात्र, चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचल्याने चबुतऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एका उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रश्मी ठाकरे पडद्यामागून हस्तक्षेप करायच्या, असा दावा गोगावले यांनी केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही, असे सांगत गोगावले यांनी रश्मी ठाकरे आणि लता शिंदे यांची तुलना केली आहे. बाळासाहेब ठाकरे असताना पक्षातील निर्णय तेच घ्यायचे, असेही गोगावले म्हणाले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यांनी रविवारी शाखा प्रमुखांची शिवसेना भवनात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. तसेच आपल्या भागातील मतदारयादीतील किमान ३०० जणांशी संपर्क साधण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
अहमदाबाद येथील विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. पण आगीमुळे अनेकांचे मृतदेहांची ओळख पटविणे कठीण झाले होते. रविवारी रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख अखेर पटली आहे. ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. त्यामध्ये डीएनए मॅच झाला आहे. आता त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. आतापर्यंत २१ मृतदेहांची ओळख पटली असून १२ जणांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.