Maharashtra Politics Live Update : मोठी बातमी: बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांनी येवल्यात प्रांत कार्यालयावर फेकले कांदे

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 23 March 2026 : अशोक खरात प्रकरणी आम्ही आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार असं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे. यासह सोमवार 23 मार्च रोजीच्या दिवसभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Bachchu Kadu latest news
Bachchu Kadu latest newsSarkarnama
Published on
Updated on

मोठी बातमी: बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांनी येवल्यात प्रांत कार्यालयावर फेकले कांदे

माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आक्रोश मोर्चा सोमवारी(ता.23) येवला प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. या आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येनं शेतकरी बांधव सहभागी झाले होते. यावेळी कडू यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर कांदेफेक केली.त्यांच्यासोबतच शेतकऱ्यांनीही प्रांत कार्यालयावर कांदे फेकून मारल्याची माहिती समोर येत आहे.

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शहांविषयी मोठा दावा;म्हणाले, '2026 वर्ष संपण्यापूर्वी...'

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी मोठा दावा केला आहे. त्यांनी 2026 वर्ष संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पदावर नसतील, असे सर्वत्र बोलले जात आहे. आणि अमित शाह यांच्या भवितव्याबाबतही अनिश्चितता असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. सध्याचे सत्ताधारी केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग यांचा गैरवापर करून सत्ता टिकवून ठेवत असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी यावेळी केला आहे.

BJP want women commission from NCP : महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर भाजपचा डोळा, राष्ट्रवादीसमोर प्रस्ताव ठेवण्याची तयारी?

राज्य महिला आयोग पदावरुन रुपाली चाकणकर पायउतार झाल्या असून आता राष्ट्रवादीकडून महिला आयोगाचे अध्यक्षपदी काढून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याची माहिती आहे. भाजपने महिला आयोगाचे अध्यक्षपद आता आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रह धरला असून बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला महामंडळ देण्यात येणार असल्याचे समजते. महिला आयोग पदावरून राष्ट्रवादी आणि भाजपात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. महिला आयोग पद महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. तर, राष्ट्रवादीच्या वाट्याला असणारे महिला आयोग पद स्वतःकडे घेऊन त्या बदल्यात महिला आर्थिक विकास महामंडळ देऊ असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार की भाजपला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

Ashok Kharat Case : शेतकऱ्याची जमिनीसाठी हत्या, अशोक खरातवर गंभीर आरोप

नाशिक इथल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहेत. आता एका शेतकऱ्याची जमिनीसाठी हत्या केल्याचा आरोप गवळणे इथला एका शेतकऱ्याने केला. आपल्या भावाची हत्या या खरातने केल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला. कैलास जाधव यांनी केलेल्या आरोपानुसार, खरात याने फसवणूक करून जमीन बळकावली होती. या वादावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. पण न्यायालयाचा अंतिम निकाल अवघ्या दोन दिवसात येणार होता, तेवढ्यात जाधव यांच्या भावाचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला.

Jal Jeevan Mission : जल जीवन मिशन अंतर्गत देशातील 16 कोटींहून अधिक घरांना नळ; केंद्रीय जलशक्ती मंत्री यांची माहिती

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी माहिती दिली की, जल जीवन मिशन अंतर्गत देशातील 16 कोटींहून अधिक घरांना नळाच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवी दिल्लीत आयोजित जागतिक जल दिन संमेलन 2026 मध्ये बोलताना त्यांनी सांगितलं, सरकार लवकरच राष्ट्रीय जल माहिती धोरण आणत आहे. यामुळे पुराव्यावर आधारित निर्णय घेणं सोपं होईल आणि शाश्वत जल व्यवस्थापनाला चालना मिळेल. तसंच, नमामि गंगे अभियान सारख्या उपक्रमांचं कौतुक करत नदी स्वच्छतेबाबत सरकारची वचनबद्धता त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. नागरिकांनी पाणी वाचवणं आणि साठवणूक करण्याच्या सवयी अंगीकाराव्यात, असं आवाहनही त्यांनी केलं.

Devendra Fadnavis On Ashok Kharat : 'पीडिता पुढे येऊ लागल्या आहेत, कोणालाही सोडणार नाही'; मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात माहिती

स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कडक भूमिका घेतली आहे. अशोक खरात प्रकरणात दुरान्वयेही संबंध असणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. हा प्रकार अत्यंत गंभीर असून महिलांची दिशाभूल करून फसवणूक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हा राजकारणाचा विषय नसून महिलांच्या सन्मानाचा मुद्दा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, काही पीडित महिला आता पुढे येत आहेत. 10 मार्चला दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली होती. विधानसभेत विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी स्थगन प्रस्ताव मांडत चर्चेची मागणी केली.

Food Safety : दुधात भेसळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत, MCOCA अंतर्गत कारवाई होणार

मुंबईत वर्सोवा आणि अंधेरी परिसरात धाडी टाकून दुधात भेसळ करणाऱ्या 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर MCOCA अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत केली. याबाबत मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Satyajeet Tambe : महाराष्ट्र शासनाने हर्षवर्धन सदगीरला तातडीने सरकारी नोकरीत घ्यावे; आमदार सत्यजीत तांबे

विधिमंडळातील सभागृहात पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार सत्यजीत तांबे यांनी डबल महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर याच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधले. सदगीर याने दोन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावत राज्याचा गौरव वाढवला असून त्याचे आमदार तांबेंनी सभागृहात अभिनंदन देखील केले. सध्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धांचे स्वरूप बदलत असून एकाच वेळी दोन-दोन स्पर्धा घेतल्या जात आहेत. यामुळे कुस्तीला वेगळी दिशा मिळत असली तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच मागील महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर हर्षवर्धन सदगीरला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तो आता ‘डबल महाराष्ट्र केसरी’ झाल्यानंतरही अद्याप त्याला नोकरी मिळालेली नाही ही बाब अत्यंत चुकीची आहे, याकडे आमदार तांबे यांनी लक्ष वेधलं.

TMC Update : ठाणे मनपाचा 6,221 कोटींचा अर्थसंकल्प सादर; नागरिकांवर नवीन कर नाही

ठाणे महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सादर केला. सुमारे 6,221 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुपारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. आयुक्त सौरभ राव यांनी, हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी महासभेत ठेवण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे, असा दावा केला आहे.

Buldhana Update : “माझं 35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांसाठी सोडून दिलं”; आमदार संजय गायकवाड यांचा दावा

कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरणा सठी आपण मोठा त्याग केल्याचा दावा करत एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार यांनी केला आहे. जवळपास ३५ कोटी रुपयांचे कमिशन मी कार्यकर्त्यांसाठी सोडून दिले. कार्यकर्ते मजबूत असतील तरच मी मजबूत राहीन. दरम्यान, या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Kolhapur Jyotiba Temple : मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा मंदिर परिसरात काल परिते गावातील दर्शनासाठी गेलेल्या नागरिकांनाबरोबर पुजारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाला. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. ज्योतिबा मंदिरात 15 ते 20 पुजाऱ्यांनी मिळून दोन भाविकांवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आता पुजारी आणि भाविकांसह 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Officers supported Ashok Kharat बड्या अधिकाऱ्यांनी भोंदू अशोक खरातला कशी दिली साथ?

खरातला बड्या अधिकाऱ्यांची साथ असल्याची धक्कादायक माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिलीय.. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित असलेल्या अनेक प्रकल्पातील एक असलेल्या रिंगरोड परिसरातील जमीन खरातनं खरेदी केली... या जमिनींच्या व्यवहारात बड्या शासकीय अधिकाऱ्यांनीच खरातला साथ दिलीय... त्यामुळे या इन्सायडर ट्रेडिंगमुळे नाशिक महसूल विभागात खळबळ माजलीय..

Ashok Kharat Case खरात प्रकरणात पीडित महिलेची बदनामी करणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल

भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडित महिलेची बदनामी करणाऱ्यांवर सायबर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जाणार आहेत... आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर नाशिक सायबर पोलिसांकडून करडी नजर असणार आहे... खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो मॉर्फ आणि AI च्या माध्यमातून व्हायरल होत असल्याने पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे... पीडीत आणि तक्रारदारांची माहिती गोपनीय रहावी आणि सोशल मीडियावरील अफवांना चाप बसावा, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जातेय...

नशीब हा खरात आहे, खान असता तर गोंधळ उडाला असता : आमदार जितेंद्र आव्हाड

आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिलांचे अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरातचे अने कारनामे उघड झाले आहेत. यादरम्यान राज्यातील दिग्गज नेते, मंत्री, आणि सनदी अधिकारीही या बाबाच्या जाळ्यात आणि भोंदूगिरीत फसल्याचे उघड झाले असून काहींचे फोटोही समोर आले आहेत. यावरून राज्यात खळबळ उडाली असतानाच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी, अशोक खरात आपल्याला सुद्धा सारखा-सारखा बोलवत होता. मी शहापूरपर्यंत गेलो ही होतो. पण, माझ नशीब चांगलं, मंत्रालयातून फोन आला आणि माघारी फिरलो. मात्र मला लोकं खूप कौतुक करणाऱ्या खरातला पाहायचे होते, असे म्हटले आहे. तर नशीब हा खरात आहे, खान असता तर गोंधळ उडाला असता असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासनाची जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जनतेसाठी महत्वपूर्ण ठरणारा मात्र काही वर्षा पासून रखडलेल्या मनमाड -इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळण्यास सुरुवात झाली असून रेल्वे प्रशासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया केली सुरु केली या अंतर्गत आज मनमाडच्या गर्डरशॉप भागात रेल्वे लाईन जवळ असलेल्या वसाहतीच्या घरांच्या भूमीची मोजमाप करण्यात आली.

तलावात पाणी… तरी शेतात दुष्काळ; संतप्त शेतकऱ्यांचे जलसंपदा कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

बीडच्या साक्षाळ पिंपरी गावालगत असलेला नारायणगड साठवण तलाव पाण्याने भरलेला आहे.. पण तरीही शेतकऱ्यांच्या शेतात मात्र पाण्याचा थेंबही पोहोचत नाही.. या घटनेने संतप्त असलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पाटबंधारे विभागाच्या दारातच अर्ध नग्न आंदोलन सुरू केल आहे.

होर्मुज सामुद्रधुनीत कोणताही अडथळा भारताला मान्य नाही : PM मोदी

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करत भारताची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी, होर्मुज सामुद्रधुनीत कोणताही अडथळा भारताला मान्य नाही असे सांगत या मार्गावर परिणाम झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकतो. यामुळे भारत सरकार विविध देशांशी सतत संपर्कात असून, पर्यायी पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आधी २७ देशांकडून होणारी आयात आता ४१ देशांपर्यंत वाढवण्यात आल्याचे मोदींनी म्हटले आहे.

अखेर सिंधुदुर्गातील आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांचे आंदोलन मागे, तब्बल तीन तास मुंबई गोवा महामार्ग ठप्प

अखेर सिंधुदुर्गातील आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी व वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन करत तब्बल तीन तास मुंबई गोवा महामार्गावर ठप्प केला. यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महामार्गावर येऊन राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली. तसेच येत्या दोन दिवसात नुकसान भरपाईबाबत निर्णय होईल असे आश्वासन दिले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. पण दोन दिवसांत मागणी मान्य न झाल्यास मुंबईत वर्षावर धडक देऊ असा राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे.

मसाजोगच्या सरपंच पदासाठी अश्विनी संतोष देशमुख यांना गावकरी गळ घालणार!

मसाजोग ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातच नाही तर देश पातळीवर मस्साजोग गावाची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यातच ग्रामपंचायतची निवडणूक लागल्याने या गावचा सरपंच कोण होणार? याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान गावकऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी माजी सरपंच अश्विनी देशमुख यांना निवडणुकीसाठी पुन्हा गळ घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अश्विनी देशमुख यांना सरपंच म्हणून गावचा कारभार हाताळण्याचा अनुभव आहे. 2017 ते 2022 दरम्यान त्या मस्साजोगच्या सरपंच होत्या तर त्याआधी त्यांनी उपसरपंच पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे.

नितेश राणे, महेश लांडगे आता कुठे गेले? अंबादास दानवेंनी सुनावले!

अशोक खरात याचे कारनामे आणि त्यात गुंतलेल्यांची नावे जसजशी समोर येत आहे, तशी नाचक्की होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजकीय नेते आणि समाजधुरिणांना आवाहन करणारे खरमरीत पत्र लिहले आहे. तसेच त्यांनी भाजपचे सो कॉल्ड मोर्चा फेम नितेश राणे, महेश लांडगे यांसारखे नेते जे दरवेळी हिंदुत्वाचा आव आणून गळे काढत असतात, त्यांना आज माझा एक सवाल आहे— आता तुमचे 'आक्रोश मोर्चे' कुठे गेले? अशोक खरातच्या या भोंदूपणामुळे ज्या शेकडो महिलांची फसवणूक झाली, ज्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, त्या पीडित महिलाही हिंदूच आहेत ना? मग आज तुमचा हिंदुत्वाचा कैवार कुठे हरवला आहे? असेही म्हटले आहे

महासभेत 'स्वीकृत' नगरसेवकांच्या अधिकारावरून खडाजंगी...

नवी मुंबई महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत आज स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकारांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि चंद्रकांत आंगोडे यांनी यावर तीव्र आक्षेप घेत विचारणा केली की, "निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात स्वीकृत नगरसेवकांना हस्तक्षेप करून इतके प्रस्ताव मांडण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? या मुद्द्यावरून सभेच्या सुरुवातीलाच सभागृहात मोठा गदारोळ झाला.

रुपाली चाकणकरांवर मोक्का लावा: सुनील माने

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यासह सर्वांना मकोका अंतर्गत तातडीने अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस  प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे

तुळजाभवानी मंदीर 3 दिवस भाविकांना दर्शनासाठी राहणार खुले

साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी मातेचा चैञ पोर्णिमा उत्सव 30 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत साजरा होत आहे. या कालावधीत मंदीर तीन दिवस 22 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे, असे मंदीर प्रशासनाने कळविले आहे.

साताऱ्याचे  एसपी तुषार दोषींसह 100 पोलिसांचे निंलबन

LPG गॅस सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय;  कंपन्यांना आदेश, आता  कमी वजनाचा सिलिंडर मिळणार

पुणे डीपीसीवरून महायुतीत राजकीय वादंग

पुणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निधी वाटपावरून सध्या जोरदार वादंग निर्माण झाला आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आलं असल्याचं समोर आला आहे.तर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना मात्र या वाटपात फारसा हिस्सा मिळालेला नाही, अशी तक्रार जिल्ह्यातील नेत्यांकडून उघडपणे होत आहे.

इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी घेतला देशातील इंधन आणि इतर क्षेत्रांचा आढावा

इराण-इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरीटीची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत भारताची सद्यस्थिती, भारतात उपलब्ध असलेलं इंधन, सरकारची तयारी या सगळ्यावर व्यापक चर्चा झाली.

जेव्हा शासकीय नोकरीची गरज होती पण मिळाली नाही - हर्षवर्धन सदगीर

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या 68 व्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. मात्र, दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्यानंतर लगेचच हर्षवर्धनने एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला. त्याने थेट आपण कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. मी 2019-2020 मध्ये महाराष्ट्र केसरी झालो. तेव्हा मला शासकीय नोकरीची गरज होती. पण मला ती नोकरी शासनानं दिली नाही. त्यावेळी मी एक दीड वर्ष दादा भुसे आणि एकनाथ शिंदेंना सगळ्यांना भेटलो. पण मला नोकरी दिली नाही. आज मी आनंदानं मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती घेतली, असं म्हणत त्याने निवृत्ती स्विकारली.

वंचित-काँग्रेसच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

वंचित बहुजन आघाडी-काँग्रेसकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालेल्या हर्षवर्धन सदगीरची कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती

दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालेल्या हर्षवर्धन सदगीरने सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे.

अशोक खरात प्रकरणी आम्ही आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार - नाना पटोले

अशोक खरात प्रकरणी आम्ही विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार आहोत अशी माहिती काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. खरात प्रकरणी राज्य सरकारनं खुलासा केला पाहिजे, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com