

कोकणातील आंबा, काजू बागायतदारांनी पहिल्यांदाच शासनाकडे आंब्याला हेक्टरी पाच लाख, तर काजूला तीन लाख रुपयांची मागणी केली होती; परंतु शासनाने कोकणातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे, अशी टीका आंदोलनाचे नेतृत्व करणारे राजू शेट्टी यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘‘ही तुटपुंजी मदत आम्हाला मान्य नाही. आमच्या मागणीनुसार सरकारने भरपाई दिली असती, तर सहा हजार कोटींची गरज होती; परंतु सरकारकडे शेतकऱ्यांसाठी सहा कोटी नाहीत.
आपल्या भागाच्या विकास कामासाठी निधी हवा असेल तर पत्रावर औरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजीनगर असाच उल्लेख हवा, अशी आग्रही भूमिका महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी धरला. यावर एमआयएमचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद बिल्डर यांनी नावावरून राजकारण नको. निवडणुका संपल्या आहेत, तुम्ही आमच्या भावनांचा आदर करा,आम्हीही तुमच्या भावनांचा आदर करू. शहराच्या विकासात अडसर नको, अशी भूमिका घेत निधी मागणीच्या पत्रावर छत्रपती संभाजीनगरसह कंसामध्ये औरंगाबादचा ही उल्लेख करणार असल्याचे स्पष्ट केले.
आज देशभरामध्ये राम जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना अमरावतीच्या मोझरीमध्ये काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून रामगढिवर राम मंदिराचा जिर्णोद्धार करत राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गॅसच्या तुटवड्यामुळे संपूर्ण स्वयंपाक चुलीवर करावा लागला. यावरूनच त्यांनी भाजपावर तोफ डागली. गॅसवर होणारा स्वयंपाक आता चुलीवर होत असल्याची टीका त्यांनी केलीय.
कथा सांगत असताना धुळे शहरातील रहिवाशी असलेले कथाकार राजीव झा यांनी भारतीय संविधानाबद्दल वादग्रस्त विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला असून याचे पडसाद धुळ्यात उमटले आहेत, धुळे शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकासमोर आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केले.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत होर्डिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मुद्दा आज महासभेत चर्चेत आला. शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे यांनी होर्डिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. होर्डिंगमधून मिळणारे उत्पन्न हे वर्षासाठी अवघे पाच कोटी आहे तरी या होर्डिंगमधून ठेकेदार शंभर कोटी कमवतो असा दावा त्यांनी केला. तर गेला पाच वर्षात प्रशासनाने यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला असून याचे ऑडिट आणि उच्चस्तरीय चौकशी करायला हवी अशी मागणी केली. तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सचिन पोटे यांनी सभागृहात केली.
समाजमाध्यमांवर पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींचा आधार घेत काढण्यात आलेले हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. या नव्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात उघड्यावर म्हणजे कॅन, बाटली किंवा डब्यात पेट्रोल आणि डिझेल देण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
मागील काही दिवसापासून तळकोकणात उष्मा वाढला असून हवामान विभागानेही यल्लो अलर्ट जारी केला होता. यानंतर आज दुपारच्या सत्रात विजेच्या कडकडाटा सह अवकाळी पावसाचे आगमन झाले. या अवकाळी पावसामुळे उष्म्याने हैरान झालेल्या नागरीकांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही प्रमाणात गारपीट झाल्याने आंबा व काजू पीक धोक्यात आले आहे.
आज रामनवमीनिमित्त परळी शहरातील काळाराम मंदिरात राम जन्म निमित्त कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी त्यांनी, 'परळीमध्ये ही रामराज्य याव' असे मोठे वक्तव्य केले. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे.
अशोक खरात याच्याशी अनेक मोठमोठ्या पुढाऱ्यांचा संबंध आहे. अनेक बुवा, महाराज लोकांच्या पाठीमागं पुढारीचे आहेत. तेच याला खतपाणी घालतात, असा आरोप सत्यपाल महाराज यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अनेक कुरबुरी असल्याची आम्हाला माहिती आहे. ठाकरे गटाचे काही खासदार फुटून लवकरच कोणत्या तरी एका पक्षात किंवा गटात विलिन होतील, असा गौप्यस्फोट राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने नैतिकता आणि आपले चरित्र गमावले आहे. अशोक खरातचे प्रकरण चालू असताना एक मंत्री त्यांच्या बंगल्यात एका तृतीयपंथियासोबत अश्लिल चाळे करताना सापडला आहे. तुमचं मंत्रिमंडळ अश्लिल, अनैतिक प्रकारात सापडत असताना त्यांच्या चरित्राबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना तुम्ही कोणत्याच मंत्र्यांवर कारवाई का करत नाही, असा सवाल काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
आयआरएस विभागाचे अधिकारी सचिन मोटे यांनी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात सीडको, जीएसटी, गृहनिर्माण विभागातील अधिकारी सामील आहेत, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमीडिया कंपनी जबाबदार आहे. या अमीडिया कंपनीत पार्थ पवार यांचे ९९ टक्के शेअर्स आहेत, त्यामुळे पुण्यातील जमीन गैरव्यवहारप्रकरणी पार्थ पवार दोषी आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या प्रकरणी कारवाईची अपेक्षा आहे, अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.
राण-इस्त्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शिधापत्रिकाधारकांना आता केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने ३७ लाख ४४ हजार लिटर कोरोसीन वाटपास मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रतिकुटुंब अथवा एका शिधापत्रिकाधारकास तीन लिटर कोरोसीन मिळणार आहे.
अशोक खरात याचे नाशिकमधील कार्यालय एसआयटीकडून सील करण्यात आले आहे. याच कार्यालयातून तो महिलांचे लैगिंक शोषण करायचा, तसेच जमिनीचे वादग्रस्त व्यवहारही करायचा. तपासादरम्यान काही महत्वाचे धागेदोरेही एसआयटी पथकाच्या हाती लागल्याची माहिती आहे.
अमरावती पोलिस आयुक्तालयातील एका कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. आयुक्त कार्यालयात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ‘लाडकी बहीण’ योजनेचा विस्तार जाहीर केला. या निर्णयामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य अधिक सोप्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे.
अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ माजली आहे. अनेक महिलांच्या शोषणाचे प्रकार उघड झाले असून त्यांच्या संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी नगरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तपासाला वेग दिला असून संबंधितांची चौकशी सुरू आहे.
देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद मार्गावर लवकरच धावणार आहे. यासोबतच सात नवीन बुलेट ट्रेन मार्गांची योजना आखली जात असून महाराष्ट्रातील मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या दोन मार्गांना प्राधान्य दिले आहे. या प्रकल्पामुळे प्रवास अधिक वेगवान होणार असून पुणे आणि मुंबईकरांना मोठा लाभ मिळणार आहे.
आखाती देशांतील संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आयात कमी झाल्याने एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे नागरिक पेट्रोल पंपांवर रांगा लावत आहेत. दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी आज महाराष्ट्रात दर स्थिर आहेत. जळगाव आणि परभणी येथे सर्वाधिक दर नोंदवले गेले आहेत.
अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडिओनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. 2 महिन्यापूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होतं. यावेळी विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता पुन्हा एकदा आक्षेपार्ह व्हिडीओमुळे झिरवाळ अडचणीत आलेत.
रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकमत झाले आहे. देवगिरीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत राजीनाम्यावर चर्चा झाली. चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आमदारांनी बैठकीत केली. आता चाकरणकर यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या हातात आहे.
नाशिकच्या नांदगावमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेने मोठी खळबळ उडाली आहे. रात्रीपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांसह नागरिकांनी हांडे, टाक्या आणि कॅन घेऊन मोठी गर्दी केली. शेतीकामासाठी आणि भविष्यातील टंचाईच्या भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. समाज माध्यमांवरील अफवांमुळे निर्माण झालेल्या या गोंधळात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी आपल्या पदाचा त़डकाफडकी राजीनामा दिला आहे. होमी भाभा सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनिश कामत यांच्याकडे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
पाथरी नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे व त्यांच्या पक्षाचे इतर सदस्य सातत्याने आरोप करत असतात. यावर सत्ताधारी पक्षाने आता पारदर्शक कारभार म्हणत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी, विरोधकांकडून होणारे आरोप खोडून काढण्यासाठी येथील पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (ता. 27) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. असा उपक्रम राबविण्याची पाथरीतील ही पहिलीच वेळ असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
शिवसेना उबाठा मध्ये नाराजीनाट्य उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची सुत्रांची माहिती. खासदार फुटणार चर्चेमुळे उद्धव ठाकरे खासदारांवर नाराज शरद पवारांना राज्यसभा दिली म्हणून प्रियांका चतुर्वेदी संजय राऊतांवर नाराज. प्रियांका चतुर्वेदी बैठकीतून उठून गेल्या. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरावं अशी विनंती खासदारांनी केली त्यामुळे आदित्य ठाकरे खासदारांवर नाराज असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून (ता. २७) सुरू होत आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली आहे.
पुणे शहरातील मुख्य रस्ते बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील रस्ता दुपारी चार ते रात्री 10 या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. दरम्यान, या रस्त्यावर बंद वाहतुकीमुळे पर्याय रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बाजीराव रोड परिसर पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद आहे. या मार्गावरील वाहतूक टिळक रोड–अलका टॉकीज चौक – खंडोजी बाबा चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
लष्कर परिसरातील वाय जंक्शन येथे वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. एम.जी.रोडवरील वाहतूक 15 ऑगस्ट चौकातून उजवी/डावी वळविण्यात येईल.
महंमद रफी चौकानंतरची वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे वळविण्यात येईल.
कोहिनूर हॉटेल परिसरातून जाणारी वाहतूक भोपळे चौक व इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. मनोहर सानप यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं गुरूवारी (ता.२६) पहाटेच्या सुमारास निधन झालं आहे. ते 85 वर्षाचे होते. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मागील काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. मात्र, याच उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योती मालवली आहे. शिवकालीन इतिहासाचा जयसिंगराव पवार यांचा मोठा अभ्यास होता. नव्या पिढीला इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणाऱ्या इतिहास संशोधकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.