Maharashtra News Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Political Breaking Live Marathi Headlines Updates : भोंदू अशोक खरात प्रकरण, बारामती-राहुरी पोटनिवडणूक अपडेट, सुनेत्रा पवार, अक्षय कर्डिले, राज्यातील राजकीय, राज्यासह देश-विदेशातल्या ताज्या घडामोडी जाणून घ्या....
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

जुहूमध्ये बोगस BMC अधिकारी अटकेत! १५ हजारांची खंडणी मागण्याचा प्रकार उघड

जुहू परिसरात बनावट BMC अधिकारी बनून १५ हजार रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी केवन किरण जोशी (वय ३६) हा जोगेश्वरी पश्चिम येथील रहिवासी आहे. त्यानं जुहूतील ७१ वर्षीय संगीत क्षेत्रातील व्यक्तीच्या घरातील दुरुस्ती कामाच्या मलब्याचा मुद्दा करून कारवाईची धमकी दिली होती.

१.५ लाख रुपयांचा दंड होईल अशी भीती दाखवत प्रकरण मिटवण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी त्यानं या व्यक्तीकडं केली होती. आरोपीने BMC चे ओळखपत्र दाखवले, मात्र चौकशीत तो सध्या BMC कर्मचारी नसल्याचे उघड झालं आहे. पूर्वी तो BMC मध्ये क्लीन-अप मार्शल म्हणून काम करत होता.

संशय आल्याने तक्रारदाराने पोलिसांना माहिती दिल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास जुहू पोलिसांकडून सुरू आहे.

हजारो आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात! ९ महिन्यांपासून पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण बंद

पुणे : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) मार्फत राबवण्यात येणारे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण तब्बल ९ महिन्यांपासून पूर्णपणे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आदिवासी समाजातील हजारो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. TRTI मधील प्रशासकीय अनागोंदी व निष्क्रियतेमुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलिस भरतीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे पूर्व प्रशिक्षण पूर्णपणे ठप्प झाले आहे. परीक्षा साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये पार पडूनही आजपर्यंत निकाल जाहीर करण्यात आलेला नाही, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे.

अशोक खरातच्या कार्यालयात एसआयटी पथकाची पुन्हा हजेरी

अशोक खरात याच्या नाशिकमधील कार्यालयात एसआयटीच्या पथकाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. कार्यालयास लावण्यात आलेले सील उघडल्याचे दिसून येत आहे. गेली अर्धा तासापासून पथक हे खरातच्या कार्यालयात पाहणी करत आहेत.

इराण-अमेरिका हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला दीक्षित सोलंकीच्या अवशेषाची डीएनए टेस्ट करावी : हायकोर्ट

इराण-अमेरिका हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला दीक्षित सोलंकीच्या अवशेषाची डीएनए टेस्ट करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये दीक्षितचे अवशेष सोपविण्याची सूचना न्यायालयाने कुटुंबांना दिली आहे. त्याचे पार्थिव मुंबईत आणले असून त्याची ओळख पटविणे अशक्य आहे. दिक्षित सोलंकीच्या आईवडिलांनी केलेल्या याचिकेत डीएनए चाचणीची मागणी केली होती.

स्थलांतरित कामगारासाठी केंद्राचा मोठा निर्णय; पाच किलोंचा सिलिंडर दुप्पट पुरवठा

स्थलांतरित कामगाराच्या दृष्टीने एलपीजी सिलिंडरच्या संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाच किलो वजनाचे गॅस पुरवठा आता दुप्पट करण्यात येणार आहे. या पाच किलो वजनाच्या सिलिंडरचे वाटप दुप्पट करण्यात यावे, अशी सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला केंद्राकडून हे सिलिंडर केवळ कामगारांसाठी दिले जाणार आहेत.

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 128 कोटींची मदत जाहीर

जानेवारी ते मार्चपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. एक लाख 80 हजार 574 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून तक्रार

वादग्रस्त वक्तव्य करणारे जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक राम जाधव यांनी ही तक्रार दिली आहे.

नाशिकमधील वृक्षतोडीस २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

नाशिकमधील सर्वच वृक्षतोडीस हरित लवादाकडून स्थगिती देण्यात आली आहे. शहरातील वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ही वृक्षतोड करण्यात आली होती.

शेतकऱ्यांना 'अवकाळी' दिलासा; १२८ कोटींची मदत; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पिके जमीनदोस्त झाली होती. शेतकरी पुरता कोलमडला होता. पण शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभं करण्यासाठी राज्य सरकारकडून नुकसानीची मदत करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत सरकारकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.

माटुंगा रेल्वे कारशेड मध्ये रेल्वे डब्याला भिषण आग

माटुंगा रेल्वे कारशेड मध्ये रेल्वे डब्याला भिषण आग लागली आहे. रेल्वे कारशेड मध्ये रेल्वे डब्याला आग लागली की, लावली गेली ? हा मोठा प्रश्न मनसे कामगार सेना चिटणीस अनिश खंडागळे यांचा आरोप.

ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पाला वेग, आधुनिक मशीनचा शुभारंभ

ठाण्यातील मानपाडा येथे ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी नवीन टनेल बोरिंग मशीन सुरू करण्यात आली. या मशीनमुळे कामाला गती मिळणार आहे. सुमारे ३२० मीटर खोलीतील हा देशातील सर्वात लांब शहरी बोगदा ठरणार असून प्रवास जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. वेळ व इंधनाचीही बचत होईल.

Congress Vs Parth Pawar : पार्थ पवारांच्या टिकेची काँग्रेसने उडवली खिल्ली

बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्याने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उतरवणे म्हणजे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे, असे त्यांनी म्हटले. पार्थ पवारांच्या टीकेचा समाचार घेताना काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “धड भाषणही देता न येणाऱ्या आणि केवळ कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलवर बोलणे म्हणजे अतिशयोक्ती आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने पार्थ पवारांची खिल्ली उडवली आहे.

Nashik Update : डेरेदार वटवृक्षांच्या कत्तलीविरोधात नाशिककर रस्त्यावर

नाशिक इथल्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधातील जनआंदोलनानंतर राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देवूनही नाशिक शहरात महापालिकेकडून झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. गंगापूर रस्त्यावरील दीडशे वर्षांहून अधिक जुन्या दोन वटवृक्षांवर कुर्‍हाड चालवली जात आहे, याविरोधात आज संतप्त नाशिककर रस्त्यावर उतरले. त्यांना न जुमानता प्रशासनाने ही वृक्षतोड सुरूच ठेवली, तसेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न झाला. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरणारी ही झाडे हटवा, अशी मागणी करीत स्थानिक नागरिक पर्यावरणप्रेमींविरोधात उभे ठाकले होते.

Nagpur Crime : नागपूरमध्ये 58 डिटोनेटर, 15 जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने खळबळ

नागपूरमधील गणेशपेठ पोलिस स्टेशन हद्दीत वर्दळीच्या दोसर भवन चौक परिसरात लांजेवार यांच्या इमारतीच्या ओपन स्पेसमध्ये आज एक संशयास्पद वस्तू आढळून आल्याने बॉम्ब शोधक, नाशक टीम आणि मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एका पिशवीत 58 डिटोनेटर, 15 जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्याने घटनास्थळी खळबळ उडाली. घर मालकानेही आपल्याला ही पिशवी असल्याची बाब आजच समजल्याचे सांगितल्याने आता हा साठा आला कुठून याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे आहे.

अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी; शिवसेना ठाकरे गटाचे खेवरेही रिंगणात

अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर शरद पवारांनी पक्षाचा एबी फॉर्म शिवसेना ठाकरे गटाच्या गोविंद मोकाटे यांना देत भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात लढत उतरवले आहे. पण आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून मी मातोश्रीचा नेहमीचा आदर करतो मात्र काँग्रेसने स्वतंत्र एबी फॉर्म दिला, मलाही एबी फॉर्म मिळत होता मात्र मी कडवड हिंदू आहे. तालुक्याच्या प्रश्नांसाठी मी निवडणूक लढवत आहे असं खेवरे यांनी म्हटले आहे.

Statue Controversy : राज्यभरात विनापरवाने पुतळे बसवण्यामागील मास्टरमाईंड पोलिसांना सापडला

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीतून महापुरुषांचे पुतळे बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामागील मास्टरमाईंडचा छडा पोलिसांनी लावला आहे. जालना जिल्ह्यातील बाळराजे आवारे याचा या प्रकरणात सहभाग समोर आला असून, त्याच्याविरोधात विना परवाना पुतळा बसवणे, जातीय तेढ निर्माण करणे, पोलीस वाहनांचे नुकसान, जीवघेणा हल्ला आणि भडकाऊ भाषण करणे अशा तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, करमाळा तालुक्यातील पुनावर येथे बसवण्यात आलेल्या पुतळा प्रकरणातही त्याचाच सहभाग असल्याचे समोर आले असून त्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी ही बाळराजे आवारे विरोधात विविध प्रकारणात जवळपास अकरा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

LPG Distribution : स्थलांतरीत मजुरांसाठी पाच किलो सिलिंडर्सचं दुप्पट करण्यात येणार

स्थलांतरीत मजुरांसाठी देण्यात येत असलेल्या पाच किलो सिलिंडर्सचं रोजचं वितरण आता प्रत्येक राज्यात मागणीच्या आधारावर दुप्पट करण्यात येईल, अशी घोषणा पेट्रोलियम सचिवांनी केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबत एक अधिकृत पत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार, राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात तेल विपणन कंपन्यांच्या मदतीने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून वाढीव सिलिंडरचे वितरण सुनिश्चित करावे.

Cabinet Meeting : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी– महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार. शासन हमी असलेल्या 32679 कोटी कर्जासाठी भांडवली बाजरात सरकारी रोखे आणणार आहे. तसंच याशिवाय कृषी वितरण व्यवसायाचे विभाजन करण्यात येणार आहे. महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली.

Cabinet Meeting Update : माहिती तंत्रज्ञान संचालनायाचे रुपांतर इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता आयुक्तालयात होणार

महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभागाने, विकसित भारत 2024 मधील विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाच्या पुर्तीसाठी महत्वाचे पाऊल उचललं आहे. माहिती तंत्रज्ञान संचालनायाचे रुपांतर इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता आयुक्तालयात होणार आहे. मंत्रालयीन विभाग, आयुक्त कार्यालय व सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरुपी पदांचा समावेश असलेले नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग (IT Cadre) निर्माण होणार असून, राज्यातील माहिती तंत्रज्ञान, एआय, डिजिटल गव्हर्नन्सला गती लाभणार आहे.

Maharashtra Cabinet Meeting Decision : महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अ‍ॅप्लिकेशन सेंटर कंपनी स्थापन करणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भू-स्थानिक तंत्रज्ञानचा वापर करुन प्रशासनात गतिमानता आणण्याकरिता महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अ‍ॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, भूस्थानिक नवोप्रक्रम व उद्योजकता विभागामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, संशोधकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविता येणार आहे.

Rahuri Bypoll 2026 : राहुरी पोटनिवडणुकीसाठी पहिली सभा प्रकाश आंबेडकर घेणार

राहुरी पोटनिवडणुकीच्या मैदानात वंचित बहुजन आघाडी उतरली असून, प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ९ एप्रिलला राहुरी तालुक्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या सभेमुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघेल, असा अंदाज आहे.

ठाणे ते बोरिवलीदरम्यानच्या बोगद्याच्या खोदकामाला सुरूवात

ठाणे ते बोरिवलीदरम्यानच्या बोगद्याच्या खोदकामाला आजपासून सुरूवात झाली. हा मार्ग १०.२५ किलोमीटर लांबीचा आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील अंतर केवळ १५ मिनिटांत पार करता येणे शक्य होणार आहे.

Rohit Pawar News : पार्थ पवार घाईगडबडीत बोलले

पार्थ पवार यांनी जमिनीवर राहणं महत्वाचं आहे. सत्ते असो किंवा नसो जमिनीवर राहिलं पाहिजे. पार्थ पवार काल घाईगडबडीने बोलले, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेसने पार्थ यांच्यावर केलेली टीका चुकीची असल्याचेही रोहित पवार म्हणाले.

CM Fadnavis News : दिल्लापेक्षा मुंबईत मेट्रोचे जाळे अधिक करणार

मुंबईतील मेट्रो मार्गिका ९ च्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली. पुढील काही वर्षांत दिल्लीपेक्षा अधिक मेट्रो जाळे मुंबईत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Mumbai Metro : मेट्रोच्या मार्गिका ९ चे लोकार्पण

मुंबईतील मेट्रो मार्गिका ९ चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. दहिसर ते काशीगाव या मार्गावर आजपासून मेट्रो धावणार आहे.

Teachers Protest : शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई आझाद मैदान परिसरात समग्र शिक्षा अभियानातील सुमार तीन हजार कंत्राटी शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. आक्रमक झालेल्या शिक्षकांनी परिसरातील रस्ता अडविल्याने पोलिसांनी काही शिक्षकांना ताब्यात घेतले आहे.

महापौर मंजुषा नागपुरे यांना विमानतळावर नो एन्ट्री...

महापौर मंजुषा नागपुरे यांना विमानतळ प्रवेश पास नसल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी सोमवारी पुणे विमानतळावर उपस्थित राहता आले नाही. यामुळे महापौरांनी प्रभारी जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित केल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे.

बारामतीची पोटनिवडणूक ही आमच्यासाठी भावनिक गोष्ट - सुप्रिया सुळे

बारामतीची पोटनिवडणूक ही आमच्यासाठी भावनिक गोष्ट आहे, आमचा उमेदवार नाही इतरांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, दादा नाहीत याचं दु:ख आयुष्यभर राहिलं असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन

सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन.

माझ्यापेक्षा कमी मते मिळाली ते आता खासदारकीची स्वप्ने पाहत असतील - विशाल पाटील

सांगलीचा पुढचा खासदार कोण होईल हे माहिती नाही, पण ज्यांच्यामुळे जतचे अध्यक्षपद गेलंय, त्यांचा कार्यक्रम नक्कीच होणार. विशाल पाटील पुढे खासदार म्हणून दिसणार नाहीत. त्यासाठी मी जीवाचं रान करेन असं वक्तव्य पडळकर यांनी केलं आहे. तर पडळकरकरांच्या याच वक्तव्यावर आता खासदार विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "ज्यांनी माझ्याविरुद्ध एक लोकसभा निवडणूक लढवली आणि माझ्यापेक्षा कमी मते मिळाली ते आता खासदारकीची स्वप्ने पाहत असतील", असा टोला पाटील यांनी पडळकरांना लगावला आहे.

वेळ सांगेल, कोणाचा डाऊनफॉल होईल ते - नाना पटोले

पार्थ पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, पार्थ पवार आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचा काही कारण नाही. पण कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल, असं पटोले यांनी म्हटलं.

रायगड जिल्हा परिषदेत सभापती पद  खाते वाटपाची निवडणूक

रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद भाजप तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीला गेलं आहे. तर उर्वरित सभापती पदांची खाते वाटपाची निवडणूक आज पार पडणार आहे.

मुंबई मेट्रो लाईन 2 बी चा पहिला टप्पा उद्यापासून सुरु होणार

मुंबई मेट्रो लाईन 2 बी चा पहिला टप्पा उद्यापासून सुरु होणार आहे.

महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या कृतघ्न मुलाने काँग्रेसबद्दल न बोललेलंच बरं

काल पार्थ पवार यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त करताना "आम्ही कोणाला फोन करणार नाही. जे काय नशिबात लिहिलंय ते बघू. फक्त मला वाईट वाटतंय की, महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल आहे', असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता महाराष्ट्र काँग्रेसने पार्थ यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेसने म्हटल की, 'धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणार्‍या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील, अशा शब्दात काँग्रेसने पार्थ यांच्यावर टीका केली आहे.

असा हल्ला करू की इऱाण थेट पाषाण युगात जाईल - ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलताना, इराणसाठी ही शेवटची संधी असून होमुर्झची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. शिवाय आता जर इराणने होमुर्झची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणला खूप मोठ्या विनाशाला सामोरे जावे लागेल. इराणवर असा हल्ला करू की तो थेट पाषाण युगात जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ माथेफिरूने १० ते १२ गाड्या फोडल्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ मोठा राडा झाला असून नितीन सिंगल येथील ग्रीन रोड येथे एका माथेफिरूने १० ते १२ गाड्या फोडल्याची माहिती समोर येत आहे. माथेफिरूने हल्ला केल्याने रस्त्यावर एकच खळबळ उडाली. माथेफिरूने अचानक हल्ला केल्याने रस्त्यावर उभ्या लोकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आज  दुपारी 12.30 वाजता माध्यमांशी संवाद साधणार

भोंदू अशोक खरातच्या मुलगी  तृप्ताबालाची आज SIT चौकशी होणार आहे. तृप्ताबालाच्या नावावर अशोक खरातने कोट्यावधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात समोर आले आहे. 

मावळ बाजार समितीच्या 9 संचालकांचे राजीनामे

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभापती निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या घडामोडींनी राजकीय भूकंप झाला आहे. 18 पैकी 9 संचालकांनी आपले राजीनामे सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर केल्याने बाजार समिती बरखास्त होणार की उर्वरित 9 सदस्यांवर संस्था तरणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून खरातने महिलांचे लैंगिक शोषण,आर्थिक गैर व्यवहार तसेच इतर काळे कारणामे केल्याप्रकरणी एसआयटीकडून तपास सुरू आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात दाखल गुन्हासंदर्भात सुरू असलेल्या तपासाची एसआयटीकडून महत्वाची माहिती देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com