

पुणे : गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ५२९ झाडे तोडली जाणार आहेत. याविरोधात पर्यावरणप्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत. यात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वृक्षतोड न करता पर्यायी आराखड्याची अंमलबजावणी करा. तसेच या संदर्भात पुढील आठ दिवसांत बैठक बोलावण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. आता इतर मागासवर्गीय (OBC) समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार, ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण योजना नेमक्या कोणत्या आहेत,
दौंड तालुक्यातील पाटस येथे भर दुपारी गोळीबार झाला आहे. तीन ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोचलेले असून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांची पथके चौकशी करत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातून काही तरुण या ठिकाणी आले होते त्यांचा पाटसमधील तरुणांची शुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता गोळीबार झाला. यवतमधील गरदडे कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ वादातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील एसटी प्रवाशांसाठी पुढील काळात प्रवास खर्च वाढण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाढत्या इंधन, देखभाल आणि परिचालन खर्चाचा दाखला देत भाडेवाढीची शक्यता व्यक्त केली. याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला तरी लवकरच आढावा घेऊन शासनाकडून यासंदर्भात घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
काही दिवसांपूर्वी विकासनिधीच्या मुद्द्यावरून आमदार संजय शिरसाट आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात मतभेद उघड झाले होते. मात्र आता दोघांतील वाद मिटल्याचे संकेत मिळाले आहेत. जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या उमेदवारी अर्जासाठी दोघांनी एकाच वाहनातून प्रवास केला. यावेळी शिरसाट आणि सत्तार यांनी आमच्यात कोणताही वाद नसून सर्व गैरसमज दूर झाल्याचे स्पष्ट केले.
कॉक्रोज जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके उद्या भारतात परतणार असून त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केंद्र सरकारशी समन्वय साधत दिपके यांना तातडीने सुरक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
नीट (NEET) परीक्षा घोटाळा प्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. त्यांनी गेल्या आठ वर्षांत एनटीए परीक्षांमध्ये पेपरफुटी किंवा अनियमिततेच्या घटनांबद्दल त्यांनी सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याचे भारतीय हवामान विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे. देशात उष्णतेचा कहर वाढलेला असताना पावसाच्या आगमनाच्या वृत्ताने सोशल मीडियावरही आनंद व्यक्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत केरळ आणि कर्नाटकात तुरळक ठिकाणी 7 ते 20 सेमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच तामिळनाडूत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील 5-6 दिवसांत ईशान्य भारतात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवलीत सातत्याने विजेच्या लपंडावून सुरू आहे. राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट असताना या भागातील नागरिकांना वारंवार वीज खंडितीचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक वेळा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणांचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. महावितरणने तक्रारींसाठी प्रसारित केलेले दूरध्वनी क्रमांक अनेकदा प्रतिसाद देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. अधिकाऱ्यांची सहकार्याची भूमिका नसेल तर त्यांना मार खावा लागेल एवढेच नाही तर महावितरण कडून सुधारणा झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील सातोना इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. या कर्जमाफीच्या शासन निर्णया मधील जाचक अटीमुळे फक्त 5 टक्के शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरणार आहेत. उर्वरित 95 टक्के शेतकरी कर्जमाफीला मुकणार आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी योजना नसून ही कर्ज वसुली योजना असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.
सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेतून भारतासाठी रवाना झाले आहेत. दिल्लीत शनिवार 6 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या विरोध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ते भारतात येत आहेत. भारतासाठी निघण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली असून, "मी भारतासाठी निघालो आहे. मी माझे भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, जय भीम!" असे त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर, आता खात्यांचे वाटप होताच काँग्रेसमध्ये उघडपणे असंतोष पसरला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आठ वेळा आमदार राहिलेले रामलिंगा रेड्डी हे त्यांना मिळालेल्या खात्यामुळे प्रचंड नाराज असल्याचे वृत्त आहे. नव्या कॅबिनेटमध्ये रेड्डी यांच्याकडे 'बृहद आणि मध्यम जलसंधारण' विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
भारतातील इस्रायलचे राजदूत रियुवेन अझार यांनी पाकिस्तानवर अत्यंत गंभीर आणि थेट शब्दांत निशाणा साधला आहे. पाकिस्तान हा एक अत्यंत समस्याग्रस्त देश असून प्रादेशिक वादांमध्ये मध्यस्थ म्हणून त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असे अझार यांनी म्हटले आहे. राजदूत रियुवेन अझार यांनी मुलाखतीदरम्यान "गेल्या काही महिन्यांत दहशतवादी संघटना 'हमास'च्या नेत्यांचे पाकिस्तान आणि बांगलादेशमधील दौरे कमालीचे वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात जर एखादा मध्यस्थ देश कोणत्याही एका बाजूच्या अतिशय जवळचा असेल, तर तिथे शांततेची चर्चा होणे अशक्य असते. इस्रायल सध्या ज्या सुरक्षा आव्हानांचा आणि संकटांचा सामना करत आहे, ते भविष्यात इतर देशांसमोरही उभे राहू शकतात, त्यामुळे जगाने यातून धडा घेण्याची गरज आहे.
गडचिरोली तालुक्यात प्रस्तावित विमानतळ आणि चामोर्शी तालुक्यात एमआयडीसीसाठी शेकडो हेक्टर सुपीक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भूमी अधिग्रहणामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या 20 हून अधिक गावातील हजारो शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत आज कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक दिली आणि बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे. या शेतकऱ्यांचा रात्रीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून शेकडो महिला आणि पुरुष शेतकरी रस्त्यावर झोपून घेतलं आहे. शासनाने काढलेला भूमि अधिग्रहणाचा जीआर रद्द करावा अन्यथा जीव गेला तरी चालेल, मात्र आम्ही ठिय्या आंदोलनातून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महापालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला आहे. तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काल त्यांनी उमेदवारी माघार घेतली, यानंतर आज त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला.
मोदींची सत्ता येताच पेट्रोल ३० रुपये लिटर होणार अशी घोषणा काही वर्षांपूर्वी एका भोंदू बाबाने केली होती. पेट्रोल तर काही स्वस्त झालं नाही, पण या भोंदू बाबाची कंपनी सामान्य नागरिकांची दिशाभूल करून बनावट औषधे विकताना पकडली गेली. अर्थातच, या बाबाच्या डोक्यावर मोदींचा आशीर्वाद असल्याने या कारवाईतून त्याला वाचवण्यासाठी आता गल्ली ते दिल्ली यंत्रणा कामाला लागेल. पण मोदींच्या आशीर्वादाने देशभरात असे अनेक भोंदू फसवे दावे करत नागरिकांना लुबाडत आहेत. या सर्व लूटारांना जनतेनेच ओळखावे व जनजागृतीतून अशा भोंदूंना समाजातून हद्दपार करावे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी बाबा रामदेव यांचे नाव न घेता केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. विधान परिषद निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली. त्यावेळी मंत्री नितेश राणे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होईल, अशा चर्चा सुरू आहेत.
संजय राऊत याी ट्विट करत म्हटले आहे की, विधान परिषद निवडणूक: काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान १५० कोटी रुपये खर्च झाले! विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे, कोकण छ.संभाजी नगर पुणे येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत
वाढती महागाई, जागतिक आर्थिक संकट या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवला आहे. सलग तीन वेळा दर कायम ठेवले आहेत. क्रूड ऑईलचे वाढलेले दर या पार्श्वभूमीवर आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवत मोठा दिलासा दिला आहे.
कोकण विधान परिषदेतून माघार घेतलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेतून निलंबीत केलेले बाळ माने यांनी विनायक राऊतांवर गंभीर आरोप केले. राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून सुपारी घेतली आहे. उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही, असे ते म्हणाले.
देशात २१ जून रोजी नीट परीक्षा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पार पडणाऱ्या नीट परीक्षा पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत.
कोकण विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षाने हकालपट्टी केलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळ माने भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे यंदाचा 40 वा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर घोषित करण्यात आला आहे. 26 जून रोजी शाहू स्मारक भवनात होणार या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे आणि त्यांचे वडील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीची माहिती सुनेत्रा पवारांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.
हरियाणातील फरिदाबादला जोडणाऱ्या जेवर एक्सप्रेसवेवरील उड्डाणपुलाच्या बांधकामा दरम्यान क्रेन कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी घडली आहे. यामध्ये अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.