Maharashtra News Live Update : घुले खुन प्रकरणात SIT गठीत

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 24 June 2026: राज्यातील पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून राजकीय घडामोडींबरोबरच प्रशासकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

प्रस्तावित अपर तहसिलदार कार्यालय चाकणच्या हरकती सादर करण्याचे आवाहन

महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार प्रस्तावित अपर तहसिलदार कार्यालय चाकणबाबत नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर), पाण्याच्या टाकीजवळ, वाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड यांच्या कार्यालयाकडे 8 जुलै 2026 पर्यंत सादर करावे, असे आवाहन खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी केले आहे.

प्रस्तावित अपर तहसिलदार कार्यालय चाकणच्या कार्यक्षेत्रात चाकण,आळंदी, पिंपळगाव ता. खेड, करंजविहीरे, तसेच तहसिलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राजगुरुनगर, वेताळे, कन्हेरसर पाईंट, वाडा आणि कडे बु. अशी महसूल मंडळे आहेत. प्रस्तावित अपर तहसीलदार कार्यालय आणि तहसील कार्यालय खेडमधील दोन्ही महसूल मंडळे मिळून 11 महसूल मंडळे आहेत. तसेच प्रस्तावित तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय चाकण, तालुका खेड आणि जिल्हा पुणे असणार आहे, अशी माहिती श्री. दौंडे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजी

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी विशेष पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ५३ हजार ५१० बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी दिली.

महाविकास आघाडीची बैठक सुरू

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक मुंबईत सुरू आहे. पुढील रणनीती या बैठकीत ठरवली जाणार असल्याची माहिती आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित आहेत. तर, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील उपस्थित आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंसोबत भास्कर जाधव देखील उपस्थित आहेत.

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही ःCM फडणवीस

आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणारं नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पालखी सोहळा प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

घुले खुन प्रकरणात SIT गठीत

विलास घुले खुन प्रकरणात IPS वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठीत करण्यात आली आहे. आता पर्यंत या प्रकरणात 9 आरोपी अटकेत असून पुरवणी जबाबामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राचे नाव घेण्यात आले आहे. यामुळे बीडसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विलास घुले हत्या प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही : सौरभ सोनवणे

विलास घुले हत्या प्रकरण दुर्दैवी घटना आहे. चुकीची घटना आहे या प्रकरणात दोषीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. या घटनेच्या दिवशी मी माझ्या येडेश्वरी कारखान्यावर होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी व सकाळी मी माझ्या घरीच होतो. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून माझी गाडी घराजवळच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सभापतींचा अजब फतवा

महासभेच्या वार्तांकनासाठी केवळ दैनिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश, तर इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांना बाहेरच थांबवण्यात आले. सभा संपल्यानं तरच माहिती देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ पत्रकारांनी महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे, अधिकृत मान्यता व पत्रव्यवहार असूनही स्थायी समितीच्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला. आज स्थायी समितीसमोर तीन महत्त्वाचे विषय चर्चेसाठी होते. हे विषय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणूनच इलेक्ट्रॉनिक माध्यमांना रोखण्यात आल्याची चर्चा पत्रकार वर्तुळात रंगली आहे.

आईने दोघा आपल्या मुलांसह आत्महत्या केल्याने ताथवडे परिसरात हळहळ

पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ताथवडे येथील जीजी इंटरनॅशनल स्कूल मागे एकाच घरात एक महिला आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. महिलेने जेवनात विष कालवत स्वतःचा मुलांचा खून केला आणि स्वतः आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. आर्थिक विवंचनेतून महिलेने स्वतःच्या मुलांचा खून करून आत्महत्या करण्यासारखा टोकाचा पाऊल उचलला असावा असा संशय पोलिसांना आहे

Bacchu kadu : पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत शेतकरी कर्जमाफीवर सविस्तर चर्चा

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत शेतकरी कर्जमाफीवर सविस्तर चर्चा झाली. आमदार बच्चू कडू यांनी या कर्जमाफी योजनेवर अनेक आक्षेप नोंदवले. त्यासोबतच सरकारने योग्य ते बदल करून घ्यावेत, अशी मागणी केली. राज्यातील 2017 सालच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, महात्मा ज्योतिबा फुला कर्जमाफी योजना तसेच या योजनांत प्रोत्साहनपर दिली जाणारी रक्कम काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कर्जमाफीत नाव आलेले आहे पण बँकेत मात्र सरकारने पैसेच दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवे कर्ज भेटत नाही. कर्जमाफीची वाट पाहावी लागत आहे. उच्च न्यायालयानेही याबाबत सरकारला पैसे द्यापे लागतील, असे सांगितले. शेतकरी पात्र असतील तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणत बच्चू कडू यांनी कर्जमाफी योजनेवर आक्षेप नोंदावला आहे.

खडकवासला धरण क्षेत्रात सर्वाधिक ७५ मिमी पाऊस! चार धरणांतील साठा केवळ १३.१० टक्क्यांवर; पिण्याच्या पाणीसाठ्याबाबत चिंता कायम

खडकवासला : खडकवासला धरण साखळीत १ जूनपासून बुधवारी (दि. २४) सकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीत खडकवासला धरण क्षेत्र आघाडीवर आहे. खडकवासला येथे सर्वाधिक ७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, टेमघर येथे ६१ मिलीमीटर, पानशेत येथे ५७ मिलीमीटर आणि वरसगाव येथे ५५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

सोयगावच्या जरंडी परिसरात दीड तास ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी- नाल्यांना पूर

सोयगावातील जरंडी परिसरात आज दीडतास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने परिसरातील सर्व नदी नाल्यांना पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती. जरंडी जवळील ग्रामपंचायतीची घंटा गाडी पुराच्या पाण्यात वाहून जातांना ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी वाचवली तर एका इसमाची बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली सुदैवाने ग्रामस्थांनी मोटरसायकलस्वाराचे प्राण वाचविले.

पुण्यात पावसामुळे वाहतूक मंदावली; मध्यवस्तीसह उपनगरांत पाच तासांपासून कोंडी

पुणे : शहरात बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य वस्तीसह उपनगरांतील रस्त्यावर सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने; तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर काही महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.

गणेशखिंड रस्ता, पुणे स्टेशन, डेक्कन, आरटीओ चौक आणि शनिवार वाडा परिसरात मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे या भागात जाणाऱ्यांनी पर्यायी मार्गांचा वापर केला. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता यांसह विविध भागात सकाळपासूनच वाहतूक कोंडी आहे. सकाळी आठ ते १२ दरम्यान वाहतूक मंदावली होती. त्यानंतर पावसाचा जोर आणि रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली होती. प्रमुख रस्त्यावर कोंडी झाल्याने वाहनचालकांनी गल्ली बोळातील रस्त्याने इच्छित स्थळी जाण्यास सुरवात केली. त्यामुळे छोट्या रस्त्यांवर वर्दळ वाढून त्यावर देखील टप्प्या-टप्प्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

Navi Mumbai : भाजप आमदार महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांचे नवी मुंबई विमानतळावर लक्षवेधी आंदोलन

लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज नवी मुंबई विमानतळावर भाजपने लक्षवेधी आंदोलन केले. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, म्हणून हे लक्षवेधी आंदोलन असल्याचे सांगण्यात आले. या वेळी आम्हाला आमच्या नेत्यांवर विश्वास आहे. त्यांनी दिलेला शब्द मोडला जाणार नाही. कोणत्याही स्थितीत आमचा आग्रह कायम आहे आणि राहील. मात्र आपल्याच सरकार विरोधात आपल्याला आंदोलन करण्याची वेळ का आली याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना आम्ही लक्ष वेधत आहोत.

Jalna Shivsena UBT Politics : जालन्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक; फुटलेल्या सहा खासदारांविरोधात भीक मांगो आंदोलन...

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या विरोधात आज जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. जालना शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या प्रवाशांकडून आणि सामान्य नागरिकांकडून जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुखांनी एक-एक रुपयांची भीक मागत हे अनोख आंदोलन करण्यात आलं. शिवाय या सहाही खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेधही नोंदवला. दरम्यान संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन तुडवा आम्ही राबवणार असल्यासही पदाधिकाऱ्यांनी म्हटले.

Ahilyanagar News : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; जामखेड इथल्या 100 खाटांच्या रूग्णालयासाठी 26.84 कोटींचा निधी मंजूर

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याने जामखेड (जि. अहिल्यानगर) येथील 30 खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणी वर्धन करुन ते आता 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय झाले असून रूग्णालय संलग्न कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकामासाठी पुरवणी मागणीद्वारे 26.84 कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये ही तरतूद करण्यात आल्याने जामखेड आणि परिसरातील रहिवाशांसाठी 100 खाटांच्या सुसज्ज उपजिल्हा रूग्णालय उभारणीच्या कामास गती मिळाली आहे.

Teacher Recruitment Update : गडचिरोलीत शिक्षकांची 1100 पदं रिक्त

गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांवर तब्बल 1100 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. येत्या 30 जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. अशा स्थितीत लालफितशाहीत अडकलेल्या या भरती प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या 400 कंत्राटी शिक्षकांमार्फत काम भागविले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी दिली.

Hingoli News : आम्ही विरोधात असताना आम्ही जे भोगल ते आता दुसऱ्या विरोधकांनी भोगू नये; खासदार आष्टीकरांच्या विधानानं राजकारण बदलल्याची चर्चा

आम्ही विरोधात असताना आम्ही जे भोगल ते आता दुसऱ्या विरोधकांनी भोगू नये, ही वेळ येऊ नये, यासाठी आम्ही नक्की बोलू, आवाज उठवू, असे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वक्तव्याने महायुती सरकार विरोधकांना पक्षात घेण्यासाठी चोही बाजूने कोंडी करत असल्याचे पुढे आले आहे. आता राजकारण पूर्णपणे बदलून गेले आहे. राजकारणाची व्याख्या बदलून गेली आहे. जैसा देश वैसा भेस, असेच चालावे लागणार आहे, असेही खासदार आष्टीकर यांनी म्हटले आहे.

India Slams Pakistan : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानला खडेबोल सुनावले

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. तसेच पर्शियन आखातातील भारतीय जहाजांच्या सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) परिस्थितीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या टिप्पणीचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "शेजारी देशाची अशी टिप्पणी म्हणजे त्यांचे स्वतःचे अपयश लपवण्याची आणि त्यांच्या देशातील मानवाधिकारांच्या पायमल्लीवरून जगाचे लक्ष हटवण्याची धडपड आहे," अशा कडक शब्दांत रणधीर जैस्वाल यांनी पाकिस्तानला सुनावले.

Strait of Hormuz Reopens : 'होर्मुझ स्ट्रेट' अखेर जहाजांच्या वाहतुकीसाठी खुला; 10 भारतीय जहाजांचा सुरक्षितपणे प्रवास

अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळल्यानंतर जागतिक व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला 'होर्मुझ स्ट्रेट' अखेर जहाजांच्या वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या भागात सध्या 10 भारतीय जहाजे सुरक्षितपणे प्रवास करत असून, भारताकडे येणारी 11 जहाजे हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून पुढे मार्गस्थ झाली आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.

AAP MLA Chaitar Vasava Jail : गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला; आमदार चैतर वसावा या सात वर्षांची शिक्षा

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नर्मदा जिल्ह्यातील राजपिप्ला येथील सेशन्स कोर्टाने 'आप'चे आमदार चैतर वसावा आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 9 जणांना वन अधिकाऱ्यांवर हल्ला आणि खंडणी वसूल केल्याप्रकरणी दोषी ठरवत 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेमुळे आता चैतर वसावा यांची आमदारकी धोक्यात आली आहे. हे प्रकरण ऑक्टोबर 2023 मधील आहे. आमदार वसावा यांनी शस्त्रातून हवेत गोळीबार (फायरिंग) केल्याचाही आरोप होता. यानंतर वन अधिकाऱ्यांकडून 60 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती.

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा जोर वाढला; रस्त्यालगतची धोकादायक झाडे कोसळली, वाहतूक कोंडी

मुंबईत मुसळधार पावसाने जोर पकडल्याचे दिसत आहे. वसई विरार शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतची धोकादायक झाडे कोसळली आहेत. आगाशी, राजोड़ी, उमराला, दिवानमान या ठिकाणच्या रस्त्यावर झाडे पडल्यामुळे त्याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वसई विरार महापालिकेने ही धोकादायक झाडे तशीच ठेवल्यामुळे ती झाडे कोलमडून पडू लागली आहेत.

Mumbai Rain Update : मुंबई अन् पालघरला पावसाचा 'रेड अलर्ट'; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

मान्सून मंगळवारी मुंबईत दाखल होताच पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. नेहमीच्या वेळेपेक्षा 12 ते 13 दिवस उशिराने आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. मान्सून दाखल होताच हवामान विभागाने मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 3 तासांत मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. विष्णू चाटे चा मुक्काम जिल्हा कारागृहात वाढ

Maharashtra Rain Update: पावसामुळे चाकरमान्यांचे हाल, रस्त्यावर वाहनांचा लांबच लांब रांगा

पावसामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहे. वाहतूक कोंडीमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आरे कॉलनी परिसरात एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर वाहनांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे

Mumbai Local : ठाणे ते पनवेल लोकल सेवा सुरू

पावसामुळे अनेक ठिकाणी लोकल सेवा ठप्प झाली आहे. ठाणे ते पनवेल लोकल सेवा तब्बल १ तासाने सुरु झाली आहे. पहिली गाडी ठाण्याला रवाना झाली आहे.

Maharashtra Rain Update : पुढील काही तास पावसाचा जोर असेल,

राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. आज सकाळ पासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com