Maharashtra Politics Update: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : भोंदू अशोक खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल, यासह आज मंगळवार दिनांक २६ मे रोजीच्या दिवसभरातील विविध राजकीय आणि प्रशासकी घडामोडी जाणून घेऊया.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

खतासाठी रांगा टाळणार! आता ॲपवरून निवडा खत, आता QR कोडद्वारे थेट विक्रेत्याकडून करा खरेदी 

शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून खत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने नवे ॲप विकसित केले असून, त्याचा पायलट प्रोजेक्ट छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत राबवण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी याबाबत माहिती दिली. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या परिसरातील खत विक्रेत्यांकडील उपलब्ध साठा मोबाईलवर पाहू शकणार आहे. आवश्यक खत ऑनलाईन बुक केल्यानंतर ते पुढील तीन दिवसांसाठी संबंधित शेतकऱ्याच्या नावावर राखीव ठेवले जाणार आहे. त्यामुळे खतासाठी होणारी धावपळ, रांगा आणि उपलब्धतेबाबतचा संभ्रम कमी होण्यास मदत होणार आहे.

बीडमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणी, दोन गटांनी भररस्त्यात तलवारी काढल्या

बीडच्या परळी तालुक्यात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धर्मापुरीत रस्त्यावर दोन गट आमनेसामने भिडल्याने परिसरात एकच तणाव निर्माण झाला. वाद इतका टोकाला गेला की भररस्त्यात तलवारी काढून दहशत माजवण्यात आली. हातात तलवारी घेऊन शिवीगाळ आणि दमदाटी करतानाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, दोन्ही गटांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

वर्ध्याच्या सेवाग्राम रोडवरील एसटी डेपो परिसरात आग

वर्धा शहरातील सेवाग्राम रोडवरील एसटी डेपोमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. डेपो परिसरातील स्पेअर पार्ट ठेवलेल्या ठिकाणी ही आग लागली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे आगीच्या ठिकाणालगतच ई-बसचे चार्जिंग स्टेशन असल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. संभाव्य धोका लक्षात घेता तातडीने ई-बस बाहेर काढण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप समोर आलेला नाही.

हिंगोली जिल्ह्यात कोणताही डिझेलचा तुटवडा नाही

हिंगोली जिल्ह्यात कोणताही डिझेलचा तुटवडा नसल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे, जिल्ह्यातील 82 पैकी केवळ दोन पेट्रोल पंप बंद असल्याने डिझेल उपलब्ध नाही मात्र 80 पेट्रोल पंपावर इंधन साठा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे दरम्यान अनेक जण कॅनमध्ये डिझेलची साठवणूक करत असल्याने डिझेलचा तुटवडा निर्माण निर्माण झाल्याचे सांगत कुणाकडेही डिझेलचा साठा आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर अडचण निर्माण झाले अस त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कांदा प्रश्नावरून विरोधक आक्रमक 

कांदा प्रश्नावर आज विरोधकांनी भाजपला घेरले. राज्य आणि केंद्र सरकार विरोधात चांदवड येथे रास्ता रोको केला. यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते. कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र केंद्र आणि राज्यातले डबल इंजिन सरकार राजकारण करण्यात व्यस्त आहे, अशी टीका शेतकऱ्यांनी केली.

परभणी-हिंगोली विधान परिषद जागेसाठी भाजपचा दावा

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद जागेसाठी भारतीय जनता पक्षाने दावा केला असून, ही जागा भाजपलाच सोडण्यात यावी अशी मागणी मुंबईमध्ये जाऊन भाजप शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे.

एचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ

शासनाकडून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी परिवहन आयुक्त कार्यालयाने 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. 1 जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी नसलेल्या जुन्या व नवीन वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, ज्यांनी 30 जून 2026 पर्यंत रीतसर ॲपाइंटमेंट घेतली आहे. त्यांना यातून सवलत मिळेल.

निधीवाटपाचा वाद मिटविण्यासाठी महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक; पालकमंत्र्यांनाही निमंत्रण

महायुतीत निधी वाटपावरून वाद असून ते मिटविण्यासाठी आज मेघदू या शासकीय बंगल्यावर समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे हे शिवसेनेकडून, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ सहभागी होणार आहेत. महायुतीच्या सर्व पालमंत्र्यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले आहे.

कॉकरोच जनता पार्टीचा अधिकृत पक्षनोंदणीसाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल

कॉकरोच जनता पार्टीचा अधिकृत नोंदणीसाठी एका वकिलाच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. पण या नावावरून सध्या वाद सुरू झाला आहे.

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत इंद्रजीत मोहितेंचा भोसले गटाला पाठिंबा

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष इंद्रजीत मोहिते यांनी सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. माजी अध्यक्ष मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे भोसले गटाचे पारडं जड झाल्याचं मानलं जात आहे.

इंधन दरवाढीचा एसटीला फटका

इंधन दरवाढीचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. एकट्या नांदेड परिवहन विभागाला महिन्याला सुमारे ५० लाखांचा वाढीव इंधन खर्च वाढला आहे. नांदेडच्या ९ आगारातून एसटीच्या दररोज २ हजार ८२ फेऱ्या होतात.

मोदींवर टीका करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांची काय औकात आहे : एकनाथ शिंदे

सलग १२ वर्षे एकही दिवस सुटी न घेता देशसेवा करणारे, तसेच १३ वर्षे मुख्यमंत्री म्हणून गुजरातची सेवा केली आहे. तब्बल २५ वर्षे समर्पित भावनाने देशासाठी काम करणारे नरेंद्र मोदी यांच्यावर कोण टीका करतंय. जे दीड वर्षे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले ते हर्षवर्धन सपकाळ. त्यांची काय औकात आणि लायकी आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेसला खड्डयात घातले आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

कांदाप्रश्नी सहकार मंत्री अमित शाह सकारात्मक निर्णय घेतील : एकनाथ शिंदे

विरोधी पक्षाचे आंदोलन म्हणजे स्टंट आहे. युपीए सरकारच्या काळातही कांद्याने शेतकऱ्यांना रडवले होते. पण त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला नव्हता. आता केंद्र आणि राज्य सरकारने १५ रुपये ८० पैसे दराने कांदा खरेदी केली जात आहे. याशिवाय सहकार मंत्री अमित शाह यांनी उद्या कांद्याच्या प्रश्नावर बैठक आयोजित केली आहे, त्या बैठकीतही सकारात्मक निर्णय अमित शाह घेतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

CM Thalapathy Vijay : तमिळनाडूत मुख्यमंत्री जोसेफ विजय स्वबळाच्या दिशेन, काँग्रेसची चिंता वाढली

तामिळनाडू येथे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी मित्रपक्षाच्या पाठिंब्यावर राज्यात आघाडी सरकार स्थापन केले. परंतु आता त्यांचे हेतू वेगळाच असल्याचे संकेत मिळत आहेत. विजय यांना स्वबळावर सरकार चालवण्याची इच्छा आहे आणि ही त्यांचे सहकारी पक्ष विशेषत: काँग्रेससाठी चिंतेची बाब असू शकते. मुख्यमंत्री विजय यांनी विरोधी पक्ष कमकुवत करण्याचे कामही सुरू केले आहे. विजय यांच्या सल्लागारांची टीम देशभरातील नेत्यांकडून शिकून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका रणनीतीवर काम करत आहे.

Sangli crime news : मागच्या जन्मी नागीन होतीस, असे सांगून भोंदूबाबाकडून अल्पवीयन मुलीवर वारंवार अत्याचार

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात सारख्या प्रकरणाचा जणू पुढचा अध्यायच पार पडत असल्याचे उघडकीस आले आहे. तू मागच्या जन्मी नागीन होतीस, हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे, असे म्हणून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणे, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे आणि पूजा हवनाच्या नावाखाली तब्बल साडे चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विट्यातील महेश मोहन बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत संदीप निकम (रा. घोगाव, ता. पलूस, जि. सांगली) आणि सूरज उपाध्ये या तिघांविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Praniti Shinde : शेतकरी संकटात, अन् मेलोडी-मेलोडी करतं बसलेत; खासदार शिंदेंची मोदींवर जोरदार टीका

नरेंद्र मोदींच्या पॉलिसीमुळेच भारत युद्धात सहभागी नसतानाही आपल्या लोकांना सगळं भोगावं लागतंय. सध्या डोनाल्ड ट्रम्प बोले, मोदी डोले अशी अवस्था झाली आहे. शेतकरी संकटात सापडलेला आहे, आणि हे मेलोडी-मेलोडी करतं बसलेत. आज सोयाबीन, तुरीला पीक विमा मिळतं नाही. पण, अदानींचे कर्ज माफ करण्याचे काम मोदी सरकार करत आहेत. ये तो शुरुवात है, आंदोलन अभी बाकी है, आम्ही या सरकारचा धिक्कार करतोय, असे म्हणत प्रणिती शिंदेंनी केंद्रातील मोदी सरकावर टीका केली.

Thane BJP Politics : अंबरनाथमध्ये अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून भाजप नगरसेवकांचा संताप!

अंबरनाथ नगरपालिकेतील अनागोंदी कारभाराविरोधात भाजप नगरसेवकांनी अनोखं आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरलं. मुख्याधिकारी आणि शहर अभियंता कधीच भेटत नसल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी थेट त्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. अधिकारी कार्यालयात नसतील तर नागरिकांच्या समस्या सुटणार कशा? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

Konkan Politics : कोकण विधान परिषदेसाठी शिवसेना आक्रमक, तटकरेंविरोधात गोगावले अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत...

कोकण विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीसाठी एकनाथ शिंदे शिवसेना आक्रमक झाली आहे. महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा संघर्ष होण्याची चिन्ह यावरून निर्माण झाली आहेत. महाडमध्ये शिवसेना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात विकास गोगावले यांना युतीकडून उमेवारी देण्याची मागणी केली. अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसेनेने विरोध केला असून, महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही, तर अपक्ष अर्ज भरण्याच्या निर्णयावर शिवसैनिक आग्रही आहेत.

Gadciroli Update : गडचिरोली जिल्ह्यात डिझेल टंचाई तीव्र; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

गडचिरोली जिल्ह्यात डिझेल टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून अनेक पेट्रोल पंपांवर “डिझेल नाही”चे फलक झळकत आहेत. तर ज्या पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी दोन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. आष्टी–चामोर्शी–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

बकऱ्यांच्या वादातून मीरा रोडमध्ये बजरंग दलाचं ठिय्या आंदोलन

मीरा रोडमधील बालाजी सर्कल परिसरातील पूनम इस्टेट क्लस्टर-1 सोसायटीमध्ये बकरे ठेवण्याच्या कारणावरून काल दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या हिंसक घटनेत बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते. या घटनेचे तीव्र पडसाद आज उमटले असून, सकाळपासूनच बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे... जोपर्यंत सोसायटी परिसरातील सर्व बकरे बाहेर काढले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

MLC Election : विधान परिषदेला 'बविआ'चे 71 मत मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेने मोर्चेबांधणी

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बविआचे 71 मत मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ⁠शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी हितेंद्र ठाकूर यांची काल भेट घेवून चर्चा केल्याची माहिती जिल्हाप्रमुख नीलेश तेंडूलकर यांनी दिली. ⁠सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी सुरू असून, उमेदवार कोण याचा निर्णय पक्षाचे नेते एकनाथ शिंदे घेतील असे शिवसेना पालघर जिल्हाध्यक्ष नीलेश तेंडुलकर यांनी सागितले आहे.

Bachchu Kadu : कांदा खरेदीचा निर्णय परिपूर्ण नाही, प्रोत्साहन निधी दिला पाहिजे; बच्चू कडू

"विरोधकांनी कांदा दरावर आंदोलन केलं, त्याचे स्वागत आहे. मात्र काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हेच हाल झाले. सत्तेच्या बाहेर असल्यावर शेतकरी आठवायचा आणि सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना दूर करायचं असं होता कामा नये. मंत्री गिरीश महाजन जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी कापसाला सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मागितला होता. त्याला दहा वर्ष झाले. मात्र सत्तेत आल्यावर ते शांत बसले," असा घणाघात एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी केला.

Nashik Farmer Protest नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी 'मेलोडी' वाटत व्यक्त केला आक्रोश

नाशिकच्या चांदवड इथल्या मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विराट क्रांती महामोर्चा काढलाय. कांद्याला प्रति क्विंटल किमान 2 हजार रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. त्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखलाय. या मोर्चामध्ये ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सहभागी झालेत. मेलोडी चॉकलेट वाटत शेतकऱ्यांनी निषेध केला.

चांदवडमध्ये आंदोलनादरम्यान गोंधळ, उद्या दिल्लीत बैठक

चांदवडमध्ये आंदोलनादरम्यान गोंधळ झाला आहे. यामुळे चांदवड चौफुलीवर मुंबई-आग्रा महामार्ग ठप्प झाला आहे, शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतला असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे आहे. उद्या याबाबत दिल्ली येथे बैठक होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

चांदवडमध्ये कांदा आंदोलकांनी नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राज्यात अनेक ठिकाणी इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन तीव्र केले आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेते अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गळाभेटीच्या बहाण्याने झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातही उष्णतेची लाट तीव्र झाली आहे.  सिरोंच्या तालुक्यातील वटवाघळांच्या वसाहतीत ५००हून अधिक वटवाघळांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या 2 नेत्यांवर जबाबदारी

विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली, या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंवर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

टॅक्सी-कॅबची भाडेवाढ  होण्याची शक्यता

सीएनजीच्या दरवाढीमुळे टॅक्सी आणि कॅब चालकांककडून भाडेवाढ केली जाण्याची दाट शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीसह सीएनजीचे दर वाढल्याने विविध शहरांतील टॅक्सी, ऑटो चालकांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे.

सीएनजी प्रति किलो दोन रुपयांनी महागला; 10 दिवसांत चार वेळा दरवाढ

सीएनजी मंगळवारपासून (ता.२६) गॅस दोन रुपयांनी महागला आहे. सध्या राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 81.09 रुपयांवरून 83.09 रुपये इतके झाले आहेत.

पुण्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू

पुण्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केली आहे.

खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल

भोंदू अशोक खरातनंतर आता नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अघोरी पूजेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप भोंदू कमलेश अधिकारीवर आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com