

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंगळवारी (ता.28) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. ते पोस्टमध्ये म्हणाले की, पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरूच राहिला, तर कॉक्रोच जनता पार्टी लवकरच देशभरात मोठ्या प्रमाणावर शांततापूर्ण आंदोलन सुरू करेल. सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे आणि त्यांच्याविरोधातील कारवाई तात्काळ थांबवावी असंही दीपके यांनी त्यांच्या पोस्टमधून म्हटलं आहे.
बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला तर आम्ही सहन करून घेऊ. पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, असे विधान करणाऱ्या गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. निवडणुकीत जय जवान आणि जय किसानचा नारा देऊन शेतकऱ्यांची मतं घेतली आणि सत्तेत आल्यानंतर जय उद्योजक म्हणणारे तुम्ही. हे महायुतीमधील एका मंत्र्यांचे विधान नाही तर महायुती सरकारचं शेतकऱ्यांप्रती असलेली असंवेदनशीलता दर्शविते. गुलाबराव पाटील यांचे हे विधान शेतकरीविरोधी आहे, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे.
एमएचटी-सेट परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, तसेच पर्सेटेंज आणि पर्सेंटाईलमध्ये फरक असतो, असे स्पष्टीकरण सीईटी सेलकडून देण्यात आलेले आहे. बारावीच्या परीक्षेतील सर्व विषयांतील अंतिम गुणांची टक्केवारी म्हणजे पर्सेटेंज. पण एमएच-सीईटी परीक्षेत बसलेल्या वेगवेगळ्या बॅच केलेल्या असतात. बॅचमध्ये जो टॉपर असतो. त्यांना १०० पर्सेंटाईल दिले जातात. बॅचमध्ये ७० टक्केवाला विद्यार्थी सर्वाधिक गुण घेणारा असला तरी त्याला १०० पर्सेंटाईल मिळतात. सीईटी परीक्षेत ९९ ते १०० पर्सेंटाईल मिळवलेल्या १३६ विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पीसीएम गटात केवळ ४० ते ६० टक्के गुण मिळाल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून झाला होता. मात्र या आरोपाचे सीईटी सेलने खंडन केले आहे.
नागपूरपाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांनाही बुधवारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधगिरी म्हणून प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे.
नागपूरमध्ये मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. केवळ तीन तासांतच १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, कामठी आणि हिंगणा या भागातील अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांना बुधवारी (ता. २९) सुटी जाहीर केली आहे.
संसदेत पेपरफुटीच्या सुधारित विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन, एके ४७ चालविण्याचे आदेश कुणी दिले? असा सवाल करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
लातूर तुळजापूर महामार्गावरील पेठ जवळ, लातूरकडून औसाकडे निघालेल्या बसची स्टेरिंग एका प्रवासाने अचानकपणे ओढल्याने, किड्स इनको पार्क या शाळेच्या स्कूल बसवर जाऊन आदळली. या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रिकाम्या स्कूल बसवर अपघात झाल्याने मोठी दुर्घटना टळली. हा प्रवासी मनोरूग्ण असल्याची माहिती समोर येते आहे. अपघातात स्कूल बसचे आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह कोकण, पुणे सातारा या भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील काळा कडा परिसरात मुसळधार पावसामुळे महाकाय दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
उजनी धरण 98 टक्के भरले आहे. पुणे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरण 98 टक्के भरले आहे. उजनी धरणातून सध्या भीमा नदीत 30 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
देशभरात आणि विशेषतः भाजप-समर्थित राज्यांत आंदोलक किंवा आयोजकांविरुद्ध कोणतेही FIR दाखल केले जाणार नाहीत, असे आम्हाला आश्वासन दिले होते. आधीचे दाखल झालेले FIR देखील मागे घेतले जातील, असाही एक करार झाला होता. पण आता वेगळेच चित्र दिसते. सरकारने दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने आम्हाला तीव्र धक्का बसला आहे. सर्व आंदोलकांना सोडले नाही आणि FIR मागे घेतले नाहीत, तर आम्हाला पुन्हा दिल्लीत आंदोलन करावे लागेल, असे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले.
भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान होणाऱ्या सोन्याच्या आयातीसंदर्भातील नव्या कोट्याची घोषणा अद्याप न झाल्याने सराफा आणि आयातदार व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करारानुसार यूएईकडून आयात होणाऱ्या ठराविक सोन्यावर आयात शुल्कात 1 टक्क्यांची सवलत दिली जाते. मात्र कोटा वाटपाबाबत सुरू असलेल्या कायदेशीर वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2026 साठीच्या कोट्याची वैधता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही दिरंगाई केवळ कायदेशीर वादामुळे नसून देशातील सोन्याची आयात नियंत्रित ठेवण्याच्या सरकारच्या व्यापक धोरणाचाही एक भाग असू शकते. सरकारने या विलंबामागे हेच कारण असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भद्रावतीच्या वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय कर्मचाऱ्यांवर धाड टाकण्यात आली होती. अवैध रेती वाहतूक कारवाईतील वाहन सोडवण्याकामी येथील कर्मचाऱ्यांनी 20 हजार रुपयांच्या लालेची मागणी केली होती. वनपाल-वनरक्षक आणि एक खासगी इसम अशा तिघांना एसीबीने लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करत ताब्यात घेतले. या प्रकरणात तक्रारदार घराच्या कामासाठी अवैधरित्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक करत होता.
सीजेपीचं आंदोलन संपताच दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर E20 जनता पार्टी स्थापन करण्यात आली आहे. इथेनॉल मिश्रीत पेट्रोलचा विरोध वाढू लागला आहे. सध्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळले जाते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आक्रमक भूमिका घेत E20 ला विरोध करणे म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, E20 ला विरोध करण्यामागे फारमोठे षडयंत्र आहे, असं पाशा पटेल म्हणाले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी रमेश म्हात्रेसह इतर सर्व आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जामीन मिळवण्यासाठी रमेश म्हात्रेचे प्रयत्न सुरु आहेत. वादाच्या भोवऱ्यात सापडलेले नगरसेवक रमेश म्हात्रेला तत्काळ जमीन देण्यास उच्च न्यायालयाने पुन्हा नकार दिला आहे. रमेश म्हात्रेला शुक्रवारपर्यंत जामीन मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सोमवारी सायंकाळी भेट घेतली. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. या दोन नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकले नाही.
पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला. बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांनी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत एका तरुणीने भरसभेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तरुणीला रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
ठाकरे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा, बेगानी शादीमें अब्दुला दिवाना आहेत. बॅंड वाजला कि हे नाचत जातात. लग्न कोणाचं आहे, हे माहिती नाही. पण चालेले नाचायला, अशी परिस्थिती ठाकरेंची झालेली आहे. त्यांना काहीही देणं घेणं नाही. त्यांच्या काळात टीईटीचा एवढा मोठा घोटाळा झाला आहे. तेव्हा यांनी मोर्चा काढला नाही. आपल्या मागे जनाधार राहिलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना हाताशी धरून, त्यांच्या भडकविण्याचे काम केले जात आहे, असा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
नीट पेपर फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही राज्यात कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत ८६ जणांना तब्यात घेण्यात आले आहे. तसेच आंदोलनातील मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे. कॉक्रोच जनता पार्टी आंदोलक विद्यार्थ्यांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करत आहे. याच मुद्यावर ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांच्याकडे मार्गदर्शनाची मागणी केली होती, त्यानुसार आम्ही त्यांना भेटलोय, असे काक्रोच जनता पार्टीचे सचिव सौरव दास यांनी सांगितले.
नीट पेपर फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांवर कारवाई होऊ नये, अशी मागणी आहे. पण, विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या टार्गेट केले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी एक कोटी रुपयांची मदत करणार आहे. देशातील वकिलांनीही या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केले आहे.
दुबईहून मुंबईला येत असलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे गुजरातच्या राजकोटमधील हिरासर या विमानतळावर इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आले आहे. सामान कक्षातून धूर येताना दिसल्यामुळे हे इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आले आहे. विमानातील सर्व १९४ प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.
नीट पेपर फुटीप्रकरणी आंदोलन करणारी आणि मुंबई पोलिसांची गाडी अडविणाऱ्या रिया अहिर हिने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिचे फोटो मॉर्फ करून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याची सायबर सेलच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिया अहिर हिने केली आहे.
औषध निरीक्षक या पदासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून २२ मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली आहे. त्याचा निकालही १२ जून रोजी जाहीर झाला आहे. मात्र, औषध निरीक्षकपदाचा पेपर फुटल्याची तक्रार २१ जुलै रोजी आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानंतर आयोगाच्या सूचनेनंतर तक्रारदाराने अधिकचे पुरावेही आयोगाला सादर केले आहेत. त्याची राज्य लोकसेवा आयोगाने गंभीर दखल घेतली असून पुरावे आणि निवेदनांची तपासणी करून पोलिसां तक्रार करण्यात येणार आहे, असे आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय... E20 इथेनॉल कार्यक्रमातून गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट्स आणि कथित ‘डीपफेक’विरोधात गडकरींनी याचिका दाखल केलीय... सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी केलीय... आरोप पूर्णपणे खोटे, दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक असल्याचा गडकरींचा दावा. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचा असून आपल्या मंत्रालयाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय..
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात सोलापुरात मोर्चा काढलाजातोय. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात विराट मोर्चाला सुरुवात झालीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेत.
सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राजघाटावर पोहोचले...राजघाटवर गांधींच्या स्मृतीस्थळी त्यांनी अभिवादन केलं...NEET पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर 26 दिवस उपोषण केलं होतं...आता उपोषण सोडल्यानंतर त्यांनी गांधींच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलंय...
माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आलीये. करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलय...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेयत...आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे...उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचलेयत...त्यांनी तिथे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात.
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करताना हसन मुश्रीफ यांनी, "शेतकऱ्यांच्या विरोधात कुटकारस्थान चाललयं," असा गंभीर आरोप केला आहे. शेतीमालाचे दर, कृषी धोरणे आणि शेतकऱ्यांसमोरील वाढत्या अडचणींवर त्यांनी सरकारचे लक्ष वेधत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
संसदेच्या मान्सून अधिवेशनात विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी घातलेल्या जोरदार गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले. राज्यसभेचे कामकाज दुपारी ३:०० वाजेपर्यंत, तर लोकसभेचे कामकाज सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका मद्यधुंद तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेप्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावर दबाव आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी त्याचे बोलणे झाले होते.मात्र, आता त्याचा फोन बंद आहे. त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
लाठीचार्जच्या घटनेवरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली. सरकारकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याची मागणी करत दोन्ही सभागृहांत घोषणाबाजी करण्यात आली. गोंधळामुळे संसदेचे कामकाज काही काळासाठी वारंवार स्थगित करावे लागले. सरकार आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावर तीव्र शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली.
बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार झाल्याचा आणि मोठ्या प्रमाणावर अटक व गुन्हे दाखल झाल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
पावसाळी अधिवेशनादरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळाचे वातावरण कायम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेतील नियमित कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
नाशिकच्या पूर्व भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणे भरून वाहतायत... यामुळे नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात विसर्ग वाढवण्यात आलाय... सध्या 46 हजार 227 क्युसेक वेगाने पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने सोडले जातंय... धरणात पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने विसर्ग टप्प्याटप्प्याने आणखी वाढवला जाईल, असे प्रशासनाने जाहीर केलंय...
विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेची जबाबदारी निश्चित करून विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश नेमके कोणी दिले, असा थेट प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा आरोप समोर आला आहे. परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा तसेच गुणांमध्ये विसंगती असल्याचा दावा करत दोन उमेदवारांनी तक्रार केली आहे. मात्र, आयोगाने हे आरोप फेटाळून लावत प्रकरणाची पडताळणी सुरू असून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत २ उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मखमलाबाद विद्यालयात दिवगंत अजित पवार जयंतीचा कार्यक्रम वादात सापडला आहे. सत्ताधारी गटाचे बाळासाहेब पिंगळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या विषयी आपत्तीजनक विधान केले. हा वाद आता चांगलाच चिघळला आहे. मविप्र संस्थेच्या मखमलाबाद विद्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार जयंती कार्यक्रम झाला. यावेळी बाळासाहेब पिंगळे यांनी अजित पवार यांच्या विषयी अवमानजनक विधाने केले. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर बाळासाहेब पिंगळे यांच्यावर चांगलीच टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पिंगळे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पिंगळे यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्या वतीने काल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. सरकारच्या विरोधातील लोकशाही लढ्यासाठी उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि संघर्षासाठी अखंड बळ लाभावे, अशी प्रार्थना यावेळी गणरायाच्या चरणी करण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठा चे कार्यकर्ते आरतीसाठी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुद्धा केली...
महिला सुरक्षेसाठी १० कलमी कृती आराखडा लागू होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘कॅटॅलिस्ट्स फॉर चेंज’ कार्यक्रमात माहिती देण्यात आली आहे. महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि समानता अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा लागू करण्यात येणार आहे. २४ ते २६ या तारखेदरम्यान या प्रशिक्षण शिबिरात देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील वरिष्ट प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी महिलांच्या प्रश्नांकडे संवेदनशील, उत्तरदायी आणि सक्रिय दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
राज्यात एसआयआर मोहीम सुरू असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे. एसआयआर मोहिमेनंतर प्रसिद्ध होणारी विधानसभा मतदारसंघनिहाय यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगास विनंती केली आहे. जिल्ह्यातील सुमारे ७५४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी वापरण्यात येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मतदार यादीतील मयत, दुबार, स्थलांतरीत, तसेच बोगस मतदारांची नावे वगळून अद्ययावत होणारी मतदार यादीचा वापर होणार आहे.
ज्या पेपरफुटी प्रकरणावरून देशाचं राजकारण ढवळून निघालं त्या पेपरफुटी प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आज संसदेत सुधारित 'अँटी-पेपर लीक' विधेयक मांडणार आहे. या प्रस्तावित कायद्याअंतर्गत परीक्षांचे पेपर लीक करणे किंवा संघटित कॉपी संस्था चालवणाऱ्या दोषींना ५ ते १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि ५० लाख रुपयांपासून ते १० कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या दंडाची कठोर तरतूद करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकरणांची जलद चौकशी करण्यासाठी विशेष कृती दल (STF) आणि विशेष जलद गती न्यायालये (Fast-Track Courts) स्थापन करून ३ महिन्यांत खटला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले आहे, जेणेकरून स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता टिकून राहील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.