

मंत्री गिरीश महाजन यांनी बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींसोबत स्वतःचे फोटो समोर आल्यानंतर मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी “आरोपींचे माझ्यासोबतचे फोटो असले म्हणजे मी गुन्हेगार होत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणातील एक आरोपी माझा दूरचा नातेवाईक आहे हे खरे आहे. एखादा-दुसरा फोटो असेल, हे खरे आहे म्हणजे वर्षानुवर्षे भेट नसते. त्याचा अर्थ फोटो काढणारी व्यक्ती गुन्हेगार ठरते असे नाही हेही त्यांनी सांगितलं.
धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या घरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर त्यांच्याच घरासमोर जोरदार शिवसेनेच्याच दोन गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या दोन्ही गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं. अखेर ओम राजेनिंबाळकरांचे बंधू डॉ. जय राजे यांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटवण्यात आला. वादाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात गेल्या दहा दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या कुटुंबाच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी सायंकाळी घुले कुटुंबीयांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेत निवेदन सादर केले होते. यावेळी सुनेत्रा पवार यांनी सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली होती.यानंतर आता सीआयडी ऍक्टिव्ह मोडवर आले असून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी यशवंत काळे यांनी आज उपोषणस्थळी दाखल होत घुले कुटुंबीयांशी चर्चा केली.
स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण केल्यानंतर पालकमंत्री पद आपल्यालाच मिळेल, याचा पुनरुच्चार मंत्री भरत गोगावले यांनी केला. जसा ध्वजारोहणाचा मान मिळाला तसाच पालकमंत्री पदाचाही लवकर मिळेल, असे भरत गोगावले म्हणाले. पालकमंत्री पद मिळण्यात कुठलाही अडथळा राहिलेला नाही, म्हणूनच आम्ही हे ठामपणे बोलत आहोत.
महाराष्ट्र शासन येत्या काळात राज्यातील भूमिहीन असलेल्या शेतमजूर महिलांना ही महिला शेतकरी म्हणून दाखला देणार आहेत. ज्यातून शेतकरी महिलांना ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे. तोच लाभ या महिलांना मिळणार असल्याची महत्वपूर्ण माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी परभणीत दिली आहे.
चाकण MIDC मधील 20 उद्योग धंदे बाहेर जाण्याच्या बतयारीत आहेत. चाकण MIDCमध्ये उद्योग धंद्याचा वास यायला हवा. मात्र येथे आता कचऱ्याचा वास येत आहे. रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा आणि विजेचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे. एमआयडीसी आणि पीएमआरडीएने केलेला नियोजनामुळे चाकणमधून बाहेर पडणे कठीण झाले आहे. उद्योग मंत्री उद्या रविवार असल्याने चाकण येथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मात्र मी उद्योग मंत्रांना आवाहन करतो की त्यांनी रविवारऐवजी 'वर्किंग-डे'ला या भागाची पाहणी करावी. कोणताही ताफा न घेता त्यांनी या ठिकाणी प्रवास करावा आणि समस्या समजून घ्यावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री सामंत यांना केला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. खासदार निंबाळकर यांच्या उपस्थितीत प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक हे निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आले असता, कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला. दोन कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि रूपांतर थेट हाणामारीत झाले. पण यामागील कारण समोर आलेले नाही. ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांनी तत्काळ मध्यस्थी करत वाद मिटवला.
आपण युतीत असो किंवा नसो, राजकारणात असो किंवा नसो, मात्र कायम तुमच्यासोबत आम्ही आहोत, असा शब्द मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमातून मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये या विधानाची चर्चा होऊ लागली आहे. मंत्री पंकजा मुंडे या पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना त्यांनी मोठे विधान केले आहे.
राज्यातील सर्वात मोठी एमआयडीसी पैकी एक असलेल्या चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांतील खड्डे आणि वाहतूक कोंडीची आज युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपला ताफा थांबवून पी एम पी एम एल च्या बस ड्रायव्हरची रस्त्यातील खड्डे आणि वाहतूक कोंडी विषयी संवाद साधला आहे. बस ड्रायव्हरने देखील चाकण एमआयडीसीची रस्त्यांची खड्डे आणि वाहतूक कोंडीची व्यथा आदित्य ठाकरे यांच्या पुढे मांडून हा प्रश्न सोडविण्ची मागणी केली आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे बीड जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान अंबाजोगाई शहरात आगमन होताच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अभूतपूर्व आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या प्रथमच अंबाजोगाई शहरात आल्याने कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत परिसर दुमदुमून टाकला. परळी येथील नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरातून परळीकडे मार्गस्थ होत असताना आमदार धनंजय मुंडे यांनी स्वतः उपस्थित राहून पालकमंत्र्यांचे स्वागत केले.
15 ऑगस्टसह विकेंडमुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्यावतीने वाहतूक नियमात बदल करण्यात आले आहे. भंडारदरा धरण येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा, शेंडी गाव अशी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊन कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूनच पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आवाहन पोलिस प्रशासनावतीने करण्यात आले आहे.
‘तुळजाभवानीच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर टिंगल-टवाळी योग्य नाही’, असे शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदे शिवसेनचे नेते पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ वक्तव्यावर पलटवार केला. तुळजापूर CCTV प्रकरणाचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी ऑपरेशन टायगरच्या गोष्टी केल्या जात असल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला. ‘माझ्यावर पाळत ठेवायची असेल, तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी माझ्या मागे लावा’, असा टोला देखील आमदार पाटील यांनी लगावला.
आमदार आदित्य ठाकरे यांनी चाकणमधील रस्त्यांची, खड्ड्यांची पाहणी केली, रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे येथी कंपन्यांनी चाकण एमआयडीसी सोडून जाण्याचा इशारा दिला होता.त्यानंतर सरकारने तातडीने येथील अतिक्रमण हटवत, खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत शनिवारी देशप्रेम आणि सामाजिक एकतेचा उत्साहपूर्ण प्रत्यय आला. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि डोंबिवलीतील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत सुमारे ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हजारो नागरिकांनी हातात घेऊन मार्गक्रमण केले. सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया , आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या माध्यमातून अधिकृत नोंद प्रक्रिया करण्यात आली.
नीट पेपर लीक प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत काँग्रेस "छात्रों की गुंज" अभियान सुरू केले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी या अभियानातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील त्यांच्या या संवादाला मोठा प्रतिसाद मिळाला. आता राहुल गांधीचा आवाज पुण्यात घुमणार आहे.
येत्या शनिवारी (ता.22) पुणे शहरात "छात्रों की गुंज" चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेते मैदानात उतरले आहेत. राहुल गांधींचे विश्वासू केंद्रीय निरीक्षक के. बी. बैजू यांनी काँग्रेस नेत्यांसोबत ज्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे त्या पाहणी केली.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या समस्या आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सरकारने 14 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पोलीस आयुक्तांसह प्रमुख अधिकारी आहेत. समस्या सोडवणे, नियोजन, मंजुरी आणि अंमलबजावणीची जबाबदारी समितीवर असून, 10 महिन्यांत काम पूर्ण करायचे आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावली. अशक्तपणा, चक्कर, ताप आणि मळमळ असा त्रास जाणवू लागल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवले जात आहे.
देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यभरात उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्राची पुढील पिढी दुष्काळमुक्त पाहण्याचा संकल्प व्यक्त केला.
अमेरिका अन् इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीला अमेरिका लवकरच स्वतःचे क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. न्यूयॉर्क स्टेटमधील एका पोलिस अकादमीत आयोजित रॅलीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली असून आखातात याचे तीव्र पडसात उमटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला. पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुके असतील या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी राज्याला संबोधित केले. महाराष्ट्र देशाचे स्टार्टअप कॅपिटल झाले आहे.
हिंगोलीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शक्तिपीठ महामार्गाविरोधात कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्याचा प्रकार झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहाचा शेतकऱ्यांनी ताबा घेतला. आक्रमक शेतकऱ्यांसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेटमध्ये चर्चा करतो, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र चर्चा न केल्याने शेतकरी संतप्त झाले होते.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उत्तराखंड येथील सभेनंतर त्या मंचाचे शुद्धीकरण करण्याची संतापजनक घटना घडली होती, यावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. भाजप आणि संघाची अतिशय नीच मानसिक दृष्टी आहे. दलित आणि आदिवासी बांधवा बद्दलची भाजप आणि संघाची ही मानसिकता गेलेली नाही. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेची विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांचा सर्वात मोठा काळ राजकीय क्षेत्रात गेला आहे. त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो, असा घणाघात खासदार वानखडे यांनी केला.
जळगावच्या मुक्ताईनगरमधील बेलसवाडी येथे एका 18 वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. अबुजर रफिक शेख असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र चाटे हे त्यांच्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरून चाकू, लाकडी दांडा आणि चप्पल जप्त करण्यात आली असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
मेळघाटमधील डोमा गावच्या आश्रमशाळेतील भूतबाधेच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. भूतबाधेच्या खोट्या अफवा ज्यांनी कोणी पसरवल्या असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी शिक्षण विभागाला सोबत घेऊन त्या ठिकाणी काम केलं जाईल, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.
देशभरात आज 80 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त अहिल्यानगर येथील पोलिस परेड मैदानात ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन कार्यक्रम झाला. पोलिस दलाच्या विशेष पथकाने पालकमंत्री यांना मानवंदना दिली. ध्वजवंदनच्या या कार्यक्रमासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी पंकज आशिया, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
लातूरच्या उदगीरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी आंदोलकाने केली. भुयारी गटाराच्या कामाची गुणवत्ता, झालेला खर्च आणि कामाच्या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आत्मदहनाचा प्रयत्न होताच पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, आमदार मनोज कायंदे, संजय गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा देशभक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.
मानव विकास मिशन अंतर्गत भ्रष्टाचाराची चौकशी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांनी आत्मदानाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. उमेद प्रकल्पामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. गेल्या सहा दिवसांपासून बिराड आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल प्रशासनातर्फे घेतली जात नसल्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत अमित कांबळे या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्या कागदपत्रांचा वापर करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप कांबळे याने केला आहे.
नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर पदक प्राप्त पुरस्कर्त्याना पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. कुंभेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष मोबाईल टॉवर पोलीस व्हॅनच लोकार्पण केलं जाणार आहे.
"पर्यायी ऊर्जा स्रोतांकडे आपली संपूर्ण ऊर्जा वळवण्यासाठी 'ऊर्जा सुरक्षा' अत्यंत महत्त्वाची आहे, यावर मी भर दिला आहे; परिणामी, ऊर्जेचा वापर अधिक कार्यक्षम करत भारत आज या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. २०१४ पूर्वी — म्हणजेच १२ वर्षांपूर्वी — देशभरात केवळ ७० शहरांमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध होता. या १२ वर्षांत आम्ही ही व्याप्ती ७० शहरांवरून ७०० शहरांपर्यंत वाढवली आहे. हीच प्रगतीची गती आहे; हाच विस्ताराचा आवाका आहे..." असे मोदी म्हणाले.
140 कोटींची लोकसंख्या असलेला देश विकसित होण्याचा संकल्प करतो तेव्हा तेव्हा जगात हे त्या देशाच्या साहसाचे प्रतिक ठरते. जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. हे मी असंच बोलत नाही. गेल्या 12 वर्षात देशातील कोट्यवधी नागरिकांनी गरीब-श्रीमंत, शहरी असो ग्रामीण असो, प्रत्येकाने गेल्या 12 वर्षात समर्पणाच्या भावनेने देशाला उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
80th Independence Day Live Updates: भारत आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, अभिमानाने आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला संबोधित करणार आहेत. यंदाचा सोहळा अनेक अर्थांनी खास आहे. पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन सोहळ्यादरम्यान लाल किल्ल्यावर ‘वंदे मातरम्’चे गायन होणार आहे. हा कार्यक्रम ‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच ‘युवा शक्ती’च्या योगदानाला अधोरेखित करणारा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.