
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करणार असल्याचा सरकारला इशारा दिला. त्यानंतर ओबीसीसाठी लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर टीका करत 1 सप्टेंबर रोजी चलो मुंबईचा नारा दिला आहे. जरांगे आणि हाके हे दोन्ही नेते एकाचवेळी मुंबईत आंदोलनाला येणार असल्याने राज्य सरकार अडचणीत आले आहे.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात, या सगळ्या त्रासाला कंटाळून 20 लघुउद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. याच मुद्यावरुन रविवारी उद्योगमंत्री उदय सामंत चाकणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. येत्या 31 ऑगस्टपर्यंत सगळे खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली.
बॉंबे हायकोर्ट लिपीक पदाच्या टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ उडाला आहे. रविवारी संपूर्ण राज्यात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आयोजनासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. छत्रपती संभाजीनगरात तर विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. परीक्षेच्या ठिकाणी जाऊन दीपके हेदेखील आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे या परीक्षेतील कथित गोंधळाची राज्यभरात चर्चा होत आहे. दरम्यान, अभिजीत दीपके यांनी आता हेच जंतर-मंतर असल्याचे सांगून आपल्या नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीमधील समस्यांच्या संदर्भात पुण्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑनलाईन उपस्थित आहेत. तसेच, खेडचे आमदार बाबाजी काळे आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांची उपस्थिती आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदाच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. संभाजीनगरमधील सुराणानगर केंद्रावरील परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार घडला आहे. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके धावून गेले आहेत. त्यांनी परीक्षेची फेरतारीख जाहीर होईपर्यंत ठिय्या आंदोलनातून उठणार नाही, असे दीपके यांनी स्पष्ट केले.
चाकणमधील उद्योजकांच्या समस्या सरकारपर्यंत पोचल्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण एमआयडीसीची पाहणी केली. मात्र, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आमचे खासदार कुठे आहेत. आदित्य ठाकरे, उदय सामंत येतात आणि आमचे खासदार कुठे गायब आहेत, याचा तपास नाही. पण त्यांनी आलं पाहिजे आणि समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.
मुंबईतील नालासोपरा येथे वाढदिवसाचा केक खाल्यानंतर तब्बल ११ जणांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्या केकमध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात येत आहे.
दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही केंद्रीय गृहमंत्र्यांची आहे. त्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला, पॅलेट गनचा वापर करण्याचे आदेश कोणी दिले. लाठीहल्ल्याचा आदेश खालच्या अधिकाऱ्यांनी दिला असेल तर गृहमंत्रिपद कोण चावलतंय. ते कार्यक्षम नाहीत का, असा सवाल उपस्थित होत आहे. लाठीहल्ला केला किंवा लाठीहल्ल्याचे आदेश दिले म्हणून राजीनामा दिला पाहिजे किंवा तसे आदेश दिले नसतील तर तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात म्हणून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
उद्योजकांना न्याय दिल्याशिवाय इथून जाणार नाही. त्यांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अधिकाऱ्यांना सुनावून जाणार आहे. आवश्यक असेल तर कारवाई केली जाईल, असे चाकण दौऱ्यावर असलेल्या उदय सामंत यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले.
उदय सामंत चाकण एमआयडीसीमध्ये दाखल झाले असून ते सुविधांची पाहणी करत आहेत. थोड्याच वेळेत ते उद्योगकांसोबत संवाद साधणार आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकण दौऱ्यावर असून ते उद्योजकांशी संवाद साधणार आहे. दुपारी चार वाजता ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. उद्योजकांची रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर सामंत चाकणमध्ये येणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि सोनिया गांधींवर सडकून टीका केली. ते म्हणाले, स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात पाप झाले. वंदे मातरम् चा अपमान करण्यात आला. काँग्रेसमध्ये थोडीतरी लाज शिल्लक असेल तर माफी मागावी.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. “सरकारने मराठा समाजाला उद्ध्वस्त करण्याचा डाव आखलाय,” असा आरोप त्यांनी केलाय. अंतरवालीत निर्णायक लढा देणार असून एकही मागणी मागे घेणार नाही, असे जरांगे म्हणाले. शिंदे-फडणवीस यांनाही त्यांनी कठोर इशारा देत राजकीय संघर्ष तीव्र करण्याचे संकेत दिलेत
पुण्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचाही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रमोद निमन, मनसेचे प्रमोद गवळी, वैष्णवी किराड भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
अमोल बालवडकर प्रतिस्पर्धी म्हणून प्रमोद निमन यांची ओळख आहे. बाणेर बालेवाडी परिसरातच अमोल बालवडकर ला रोखण्यासाठी हा चंद्रकांत दादांचा मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे.
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. संजय राऊतांनी हा खळबळजनक दावा केला आहे. गोपीनाथ मुंडेंना शरद पवरांनीही हाच सल्ला दिला होता, ही जुनी बातमी आहे. कारण, भाजपमध्ये त्यांचा छळ होत होता, मानसिकदृष्ट्या आघात केले जात होते असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुरतहून नागपूरकडे येत असताना रस्त्यांची दुरवस्था पाहून आपल्याला लाज वाटल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुजरात सीमा ओलांडल्यानंतर महाराष्ट्रातील रस्ते अत्यंत खराब असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही राज्यांच्या रस्त्यांची तुलना केली. लोकप्रतिनिधींनी रस्त्यांच्या दर्जेदार कामांकडे लक्ष दिले नाही, तर जिल्ह्याचा विकास होणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना रस्ते विकास कामे अधिक दर्जेदार करण्याचे निर्देश दिले आहेत.
चाकण औद्योगिक परिसरातील उद्योजक आधीच वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांनी त्रस्त असताना आता माथाडीच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गुंडगिरीने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी चाकणमधील ओम लॉजिस्टिक्सच्या कर्मचाऱ्याला माथाडीच्या मुद्द्यावरून बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. माथाडीच्या नावाखाली उद्योजक आणि कामगारांवर दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या नावाचा वापर करून ही दहशत सुरू असल्याचा आरोप उद्योजकांकडून केला जात आहे.
उल्हासनगर गुन्हे शाखेने 57 कोटींचा सायबर फ्रॉड उघड केला. या कारवाईत 57 कोटी 25 लाख रुपयांच्या रकमेसह सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. सायबर गुन्हेगारांना बनावट बँक खाते पुरवून लाखो नागरिकांना फसविणाऱ्या आणि बेकायदा ऑनलाइन बॅटिंग गेमिंग चालवणारी आंतरराष्ट्रीय टोळी उल्हासनगर गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केली.
महाड MIDC तील इंडो आमाईन्स कंपनीत शनिवारी सायंकाळी गॅस गळती झाली. हॅड्रोक्लोराईड ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची ही गळती असून यामुळे कंपनीतील कामगार आणि मुख्य रस्त्यावरून जाणारे, अशा आठ जणांना गॅसची बाधा झाली. यामध्ये एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अमितकुमार (वय 28, मूळ रा. बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. महाडच्या MMA रुग्णालयात प्रथमोपचार करून काही रुग्णांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
वैभववाडी-कोल्हापूरला जोडणाऱ्या भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने भुईबावडा घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला आहे. काल रात्री घाटात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ-मोठे दगड कोसळून हा घाटमार्ग पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून कोल्हापूर ला जाणारी वाहतूक उंबर्डे वैभववाडी करूळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे. जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला हठविल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नांदुरा येथील ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्ट करून तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा बुलढाणा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अहिल्यानगर आणि मुंबईत कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. शुभम नांगल याला अहिल्यानगर येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या माहितीवरून धनराज उर्फ रॉबिन विश्नोई आणि मुनाफ शेख अन्वर शेख यांना मुंबईत पाठलाग करून पकडण्यात आले. आरोपींकडून 52 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बँक खाती व पोर्टलवरील रक्कम होल्ड करण्यात आली आहे.
मंत्री नितेश राणे मुंब्रा देवीच्या मंदिरात दाखल झाले असून या मंदिरातून ते कावड यात्रा काढणार आहेत.
काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीच्या प्रशिक्षण शाखेतर्फे हा कार्यक्रम नियोजित आहे. या सृजन अभियानात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दहा दिवसाचे निवासी प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे या कार्यक्रमाकडे काँग्रेस पेक्षाही भाजपच्या नेत्यांचे बारीक लक्ष असेल. या शिबिरात युवक आणि विद्यार्थी अर्थात नव्या जनरेशनवर भर असेल. काँग्रेसने आगामी राजकीय नियोजन म्हणून देशभरात युवकांवर अर्थात जेन झी यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यासाठी विविध राज्यांमध्ये कार्यक्रम केले आहेत.
दुचाकीला शासकीय विभागांचे लोगो लावून फिरणारा "बुलेट राजा" अखेर पोलिसांना सापडला असून या अट्टल चोरट्यांकडून ३० लाखांच्या तब्बल १९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीकडून १३ रॉयल एनफिल्ड बुलेट जप्त केल्या. या कारवाईमुळे १९ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. समाधान बाळू काळे (वय २३) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली गुणवत्ता यादी दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर होणार आहे. वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत असलेल्या वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेशाच्या नोंदणीस शनिवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
मीडिया काय करतो? ‘पंकजा मुंडे नाराज आहेत’ असे म्हणतात. पण मी काही नाराज नाही, मस्त आहे. माझ्या बापानेही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवा केली आहे. आमच्या पक्षाची शिकवण आहे. हा आदर्शात्मक पक्ष आहे, असं म्हणत पंकजा यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या.
नंदुरबार शहरासह शहादा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्याच्याकडून जिल्ह्यातील घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
आज भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी आहे. याच निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी PM नरेंद्र मोजी अटल स्मारकावर दाखल झाले असून त्यांनी अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकणमधील रस्त्यांची दुरावस्था आणि उद्योगजक यांच्या बैठक घेणार आहेत. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत देखील उपस्थित राहणार आहेत. ही बैठक दुपारी ४ वाजता चाकण येथे पार पडणार आहे.
मुळशी धरणग्रस्तांच्या प्रश्नावरून मुळशीत आंदोलनाचा वणवा पेटला आहे. मुळशी धरणातून तालुक्याला दोन टीएमसी पाणी द्यावे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे आणि गावठाणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागण्यांसाठी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमित कंधारे यांनी ९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केलंय.मात्र, आज स्वातंत्र्यदिनी आंदोलन आणखी आक्रमक झालं. मागण्या मान्य न झाल्याच्या निषेधार्थ मुळशी धरणग्रस्तांनी मुळशी खुर्द येथील टाटा पॉवरच्या सौरऊर्जा प्रकल्पाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी माले येथेच आंदोलकांना अडवलं. त्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको केला. पोलिसांनी माजी आमदार शरद ढमाले यांच्यासह २८ आंदोलकांना ताब्यात घेतलं.
नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबारमधील रस्त्यांवरुन नाराजी व्यक्त केली आहे. इथले रस्ते खूप खराब असल्याचं जाहीर वक्तव्य त्यांनी नंदुरबारमध्ये केलेलं आहे.
जयकुमार गोरे हे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत. संस्कार असतील की नाही याबद्दल तर शंकाच आहे. पत्रकार परिषद घेताना थोडी कमी पीत चला, असा टोला सुषमा अंधारे यांनी जयकुमार गोरे यांना लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.