

पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे माजी पुणे शहर चिटणीस प्रवीण ऊर्फ विनोद कृष्णराव वस्ते (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वस्ते यांनी २००२ ते २००७ या कालावधीत पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून लक्ष्मीनगर (पर्वती) भागाचे प्रतिनिधित्व केले. पुणे शहर भाजपचे चिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये 'ज्ञानेश कुमार हे भारताचे शत्रू असल्याचं म्हटलं आहे. तसेच मतदारयादीतून 12 कोटीहून अधिक नावे वगळण्यात आली असल्याचा मुद्दा छेडत दिपके यांनी हे प्रमाण 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील अधिकृत 97 कोटी मतदारांपैकी सुमारे साडे बारा टक्का असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
नामांकित वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं तातडीनं निलंबित करण्यात यावं अशी मागणी केली आहे. जर देश असाच सुरू राहिला, तर निवडणुकीचा काय उपयोग?” असा गंभीर सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या सध्याच्या सर्व प्रक्रिया त्वरित थांबवाव्यात आणि जुन्या निवडणुकाही रद्द करण्याचं मत व्यक्त केलं आहे.
मराठवाड्यातील लातूर, धाराशीव जिल्ह्यात पावसाअभावी करपलेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकट मदत देण्याचे आश्वासन दिले. कुठल्याही प्रकारे आढेवेढे घेतले जाणार नाही, शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल, असा शब्दच मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यामळे संकटात सापडलेल्या बळीराजाला धीर आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते, माजी आमदार धीरज देशमुख यांनी त्यांची भेट घेतली. देशमुख यांनी निवेदनाद्वारे बाधित तालुके व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, पीक विम्याचा लाभ आणि विशेष दुष्काळ निवारण पॅकेज देण्याची मागणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुष्काळात होरपळलेल्या काही शेतकऱ्यांशीही संवाद साधला.
संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांना एकटे सोडणार नसून, पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथे दिली. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात केवळ ५० टक्के पाऊस झाला असून, नदी-नाले व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी पिकांचे सरसकट नुकसान झाल्याचे दिसून येत असून, शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली. आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत लातूर-तुळजापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे.
भाजपने राज्यनिहाय प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा यांची नियुक्ती करण्यात आली असून अमित मालवीय, सदानंद तनवाडे आणि कमलजीत सहरावत यांच्यावर सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाने भारती पवार यांच्यावर गोव्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्षपदानंतर आता त्यांची गोवा भाजपच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करणे, नेत्यांमध्ये समन्वय साधणे आणि निवडणुकीची रणनीती आखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबिन यांनी विविध राज्यांसाठी खालील राज्य प्रभारी आणि सह-प्रभारी यांची नियुक्ती केली आहे.
संजय राऊत आणि पार्लमेन्ट बाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी समाचार घेतला असून हा माणूस डोक्यावर पडलेला आहे, अशी टीका केली. त्याच्या बुद्धीची कीव करावी असे वाटते, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे मंत्री गिरीश महाजन यांनी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या तावशी येथे शेतकऱ्यांची भेट घेतली नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे. थेट रस्त्यावर उतरले आहेत. लातूर तुळजापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको सुरू केला आहे. पाण्याअभावी सुककेलेल्या सोयाबीन महामार्गावर आणून शेतकऱ्यांनी जाळल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे.
बीडच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात भीषण आग लागून तब्बल सहा दुकाने जळून खाक झाली आहेत. अमिरोद्दीन मणियार यांच्या वडापाव दुकानाचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेजारील दुकानातील शेळ्याही आगीत भाजल्या. दोन कापड दुकानांसह अन्य दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. धक्कादायक बाब म्हणजे अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल दीड तासाचा विलंब झाला.
तब्बल 3 वर्षांपासून एकट्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रोहयो अंतर्गत उभारण्यात आलेल्या विहिरीच्या बांधकामाचे तब्बल 3 कोटी सरकारकडे थकीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विहिरीच्या बांधकामाचे पैसे निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या कॅबिनपुढे अडीच तास ठिय्या आंदोलन केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान लातूरच्या खरोसा येथे चोरांचा वावर पाहायला मिळाला. मुख्यमंत्री पिकांची पाहणी करण्यासाठी शेतात आले असताना मोठ्या संख्येने शेतकरी आणि नागरिकांची गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरांनी शेतकऱ्यांच्या खिशाला हात घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी चोरट्याला पकडून चांगलाच चोप दिला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच चोरीचा प्रयत्न झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुष्काळी पाहणी साठी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तर मागच्या चार दिवसापासून कोरडा दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे बेमुदत उपोषण करत आहेत. दरम्यान दुष्काळी प्रश्नावर छावा संघटनेकडून जाब विचारणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
17 वर्षांपासून गाजणाऱ्या वसंत डावखरे मानहानी खटल्याचा आज कल्याण सत्र न्यायालयात अंतिम निकाल येणार आहे. 2009 च्या कथित CD प्रकरणातील खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे , आनंद परांजपे यांच्यासह 2 अन्य आरोपी आहेत. या खटल्यात 20 पेक्षा अधिक साक्षीदार आणि दोन तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी 313 प्रमाणे VCद्वारे जबाब नोंदवत कथित CD, एडिटिंग आणि फॉरेन्सिक अहवालातील मुद्द्यांसह या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा ठोस पुरावा नसल्याचा दावा केला. अंतिम निकालावेळी उद्धव ठाकरे VCद्वारे उपस्थित राहणार असल्याचे त्यांचे वकील जयेश वाणी यांनी सांगितले. इतर आरोपीही प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे शरद पवारांचे स्वागत रोबोटने केले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील सेंट्रल बिल्डिंगमध्ये शरद पवार बैठकीसाठी आले होते. शरद पवार विद्या प्रतिष्ठानमध्ये आले, त्यावेळेस रोबोट त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. शरद पवार चला म्हणताच, रोबोट बाजूला सरकले आणि शरद पवार बैठकीसाठी मार्गस्थ झाले. गेल्या काही वर्षापासून शरद पवार आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये काम करत आहेत. या संदर्भात बैठक आयोजित केली असताना शरद पवारांचे स्वागत रोबोटच्या माध्यमातून करण्यात आले.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना, एकनाथ शिंदे शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट फुलांवरून चालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून पुन्हा राज्यातील राजकारण पेटले आहे. यातच शिंदे शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड यांनी, यावर प्रतिक्रिया देताना, शेतकरी अडचणीत असताना अशा पद्धतीचे फुलावर चालणे, बैठकीमध्ये झोपा काढणे, काजू बदाम खाऊन मस्ती दाखवणे हे योग्य नाही. हे संवेदनशील लोकप्रतिनिधींनी टाळलं पाहिजे, असे म्हटले आहे.
कॉक्रोज जनता पार्टी उपहासात्मक आंदोलनाचे अध्यक्ष अभिजीत दीपके नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आश्रम शाळांच्या भेटी देणार आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा आणि धडगाव येथील आदिवासी आश्रम शाळांना भेट देत पाहणी करणार आहे. आदिवासी आंदोलन राहुल पावरा, सागर पावरा यांच्यासोबत अभिजित दीपके जिल्हा परिषद शाळेंची पाहणी करणार आहे.
केंद्रीत निवडणूक आयोगात फूट पडल्याची चर्चा आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी विश्वासात न घेता निर्णय घेतले, एसआयआर, मतदारयादी नाव वगळणे आणि पुन्हा जोडणे याबाबत देखील नोंदवलेल्या आक्षेपांची दखल घेतली गेली नाही, अशी लेखी तक्रारच केंद्रीय निवडणूक आयोगातील सूखबीर सिंग संधू, विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे केली होती. या विषयी वृत्त 'इंडिय एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नवीन १०८ रुग्णवाहिका लवकरच शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. या रुग्णवाहिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून त्या लवकरात लवकर सेवेत दाखल करण्याचे निश्चित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत एकूण १७५६ रुग्णवाहिका दाखल होणार असून त्यातील २५६ रुग्णवाहिका या अँडव्हान्स लाइफ सपोर्ट उपलब्ध करून देऊ शकणार आहेत तर उर्वरित १२०० या सर्वसाधारण रुग्णवाहिका असतील.
उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी राज्यातील दुष्काळ आणि पावसाने दिलेली ओढ या पार्श्वभूमीवर वेगळ्या निर्णय घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांशी या संदर्भात करत पक्षाचे नाशिकमध्ये होणार अधिवेशन त्यांनी स्थगित केले आहे.
विसर्जन मार्गावर स्वागत मंडप उभारण्यासाठी सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांना मंडप घालण्यासाठी कोल्हापूर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने मनाई केली आहे. एका राजकीय पक्षाकडून मंगळवारी स्वागत मंडप उभारण्याचे काम सुरू असताना महापालिकेकडून त्याला विरोध करण्यात आला त्यामुळे राजकीय नेते विरुद्ध पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील काही भागातील दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाययोजनांसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस हे आजपासून लातूर, सोलापूर, धारशीवमध्ये जात दुष्काळाची पाहणी करत आढावा घेणार आहेत. मंत्री आणि लोकप्रतिनिधींनाही बांधावर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.