Maharashtra Political Live Update : 'ज्ञानेश कुमार यांना पद्म भूषण कशाला, भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा...':संजय राऊत यांचा खोचक टोला

Political Breaking Live Headlines Updates : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हा आज दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. तर, उद्धव ठाकरे हे देखील दुष्काळ पाहणी दौरा आज करणार आहेत. पुणे, मुंबईत आज दुसऱ्या दिवशीही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन सुरू आहे. या सह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

'राज ठाकरे यांचा 4 ऑक्टोबरचा मोर्चा यशस्वी होणार नाही..': गुणरत्न सदावर्ते 

ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 4 ऑक्टोबरचा मोर्चा यशस्वी होणार नसल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी मोर्चामुळे मुंबई बंद, रस्ते बंद केल्यास नागरिकांना त्याचा त्रास होईल. राज ठाकरेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यांना घाबरणार नाही, राज ठाकरेंचं पितळ उघडं पाडणार, असं सदावर्तेंनी म्हटलं आहे.

'ज्ञानेश कुमार यांना पद्म भूषण कशाला, भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा...':संजय राऊत यांचा खोचक टोला 

भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्म भूषण पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. त्यांनी बंगालच्या निवडणुका निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडल्या.त्यांच्यामुळेच हे शक्य झालं. म्हणूनच त्यांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्याची मागणी भाजप नेते समिक भट्टाचार्य यांनी केली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांना पद्म भूषण कशाला, भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,असा खोचक टोला लगावला आहे.

'येत्या निवडणुकीमध्ये मंगेश चिवटे आमदार झाल्याशिवाय राहणार नाही...': बच्चू कडू यांचं विधान 

एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी रुग्णसेवेमध्ये जो चिवटपणा दाखवला, त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये ते आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. चिवटेंना पाठिंबा दिला नाही आणि जर बंडखोरी करण्याचं काम पडलं तर आम्ही बंडखोरीचे बादशाह आहोत, असा इशारा विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

'सरकारने शब्द गोल गोल न फिरवता 259 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील किती शेतकऱ्यांना ...'; रोहिणी खडसेंचा सवाल 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारने शब्द गोल गोल न फिरवता 259 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती आर्थिक मदत मिळणार, हे स्पष्ट करावे असं म्हटलं आहे.

Jaykumar gore : महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न

Summary

सातारा जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात आमदार जयकुमार गोरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्यास भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विजय मिळवेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर आणि आचारसंहिता काळात बँकेत झालेल्या भरती व बढत्या बेकायदेशीर असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

Election Commision : मतदार यादी अद्ययावत करण्यासह 9 मोठे निर्णय जाहीर

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील वादानंतर निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यात 'फॉर्म 6' योग्य असल्याचे मान्य करत मतदार यादी अद्ययावत करण्यासह 9 मोठे निर्णय जाहीर केले. गरीब आणि बेघरांसाठी हेल्प डेस्क, तसेच मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे ठरवले. कॅबिनेट सचिवांच्या पत्राशी आयोगाचा संबंध नसल्याचेही स्पष्ट केले. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वादात सापडलेले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. काँग्रेसने दिल्लीसह देशाच्या इतर राज्यात काल आंदोलन केलं. तर मनसे, शिवसेना आणि कॉकरोच जनता पार्टीचंही मुंबईत आंदोलन होणार आहे.

मतभेदानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची पहिलीच बैठक; संधू, जोशींसह ज्ञानेशकुमारांचीही उपस्थिती

केंद्रीय निवडणूक आयोगामधील मतभेदानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पहिल्यांदाच बैठक घेतली आहे. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यासह आरोप करणारे निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच एसआयआरसंदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येताच आरएसएसच्या शाखांची संख्या झाली दुप्पट

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांची संख्या दुप्पट झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आरएसएसच्या शाखांची संख्या पाच हजार होती, ती विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजेच राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर आरएसएसच्या शाखांची संख्या दहा हजारांवर गेली आहे.

अमरावतीमध्ये सरकारच्या दुष्काळाच्या जीआरची होळी

अमरावतीमधील गुरुकुंज मोझरीमधील बसस्थनकासमोर राज्य सरकारच्या दुष्काळाच्या जीआरची होळी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना थेट मदतीची अपेक्षा होती, पण त्यात कोणत्याही मदतीची घोषण करण्यात आलेली नाही, त्यामुळे आम्ही वाळलेल्या सोयाबीनसह सरकारच्या दुष्काळाच्या जीआरची होळी केली आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

पुण्यात 29 तासांनंतरही गणेश विजर्सनाच्या मिरवणुका सुरू

पुण्यात अजूनही गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. तब्बल 29 तासांनंतर पुण्यात मिरवणुका सुरू आहेत. शहरातील अलका टॉकिज चौकात डीजेचा दणदणाटात मिरवणुकांचा आवाज सुरू आहे.

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर ; माण-खटावसह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश

पावसातील मोठ्या खंडामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या सर्व ११ तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थेट खात्यात मदत देणार: मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार दिवाळीपूर्वी डीबीटीद्वारे आर्थिक मदत थेट खात्यावर जमा करेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत निधी पोहोचवण्याचे शासनाचे नियोजन असून नुकसानभरपाईचा आकडा पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

नांदेड जिल्ह्यातील हे दोन तालुके वगळले? अशोक चव्हाण नाराज

भाजपाचे राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यातील हे दोन तालुके असल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नांदेड जिल्ह्यातील इतर चौदा तालुक्यांप्रमाणेच मुखेड आणि मुदखेड या वगळण्यात आल्याने स्वतः अशोक चव्हाण हे देखील यामुळे नाराज आहेत. तसेच त्यांनी तातडीने प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून पाठपुरावा सुरू केला आहे.

पुन्हा एकदा मुंबईत ठाकरे बंधु जनमोर्चा काढणार

एसआयआर'च्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये होत असलेल्या बदलांवर आयोगातील दोन आयुक्तांनी आक्षेप घेतले होते. परंतु मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करत विरोधकांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात रान पेटवलं असून देशभरातील राजकीय वातावर तापले आहे. अशातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत एक जनमोर्चा काढण्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

ओमराजे निंबाळकरांच्या चॅलेंजवर आदित्य ठाकरेंचा पलटवार; म्हणाले, 'फालतू गोष्टी...'

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अंबादास दानवे यांना दिलेल्या आव्हानावरून आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दानवेंना दिले होते. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधत, “फालतू गोष्टी बाजूला ठेवा आणि आमच्यासारखं शेतकऱ्यांच्या बांधावर जा,” असा टोला लगावला. आम्ही सध्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी फिरत आहोत, असेही त्यांनी सांगितलं. तर पळफुटे कसली चॅलेंज देत आहेत, अशा लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही असे म्हणत या वादाला फारसं महत्त्व देत नसल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

कुंभमेळा अन् इतर प्रकल्पांचा खर्च कमी करा, शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : अमोल मिटकरी 

दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसांत भरीव आर्थिक मदत जमा करावी. हेक्टरी मदतीची मर्यादा व अटी शिथिल करून किंवा काढून सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली आहे. कुंभमेळा अन् इतर प्रकल्पांचा खर्च कमी करा, शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या असही त्यांनी म्हटलय.

'इंडिया आघाडीची बैठक बोलवा : ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी INDIA आघाडीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षांच्या पुढील समन्वयाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

DCM सुनेत्रा पवार आज नांदेड दौऱ्यावर असून दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या आहेत. लोहा तालुक्यातील बारूळ फाटा आणि सोनखेड येथे त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पिकांची परिस्थिती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

दुष्काळाबाबत सरकारच्या निर्णयाचं स्वागत : सुप्रिया सुळे 

सुप्रिया सुळे यांनी राज्यातील दुष्काळाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळेल, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.

नितेश राणे सोमवारी छत्रपती संभाजीनगर-जालना दौऱ्यावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे सोमवारी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांची भेट घेऊन बाधित तलावांची पाहणी करणार आहेत.

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण,  उत्साह कायम

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला २४ तास पूर्ण झाले असूनही उत्साह कायम आहे. चार प्रमुख लक्ष्मी, कुमठेकर, टिळक आणि केळकर रस्त्यांवर मिरवणुका सुरू आहेत. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांसह काही मंडळांकडून डीजे साउंड सिस्टिमचा वापर करत गणेशभक्त मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे नांदेड जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले आहे. ते लोहाकडे रवाना झाले आहेत.लोहा येथे पीक परिस्थितीची करणार पाहणी करणार आहेत. पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी साधणार संवाद.

पनवेल विधानसभा मतदारसंघात दुबार मतदारांचा घोळ

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेदरम्यान पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे नेते प्रीतम म्हात्रे यांचे पनवेल आणि उरण या दोन्ही मतदारसंघांच्या मतदार यादीत नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित दुबार नोंदीची निवडणूक आयोगाने चौकशी करावी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमाणे नियमित होणार, राज्य सरकारचा निर्णय

पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय जमिनींवर १ जानेवारी २०११ पर्यंत झालेली निवासी अतिक्रमाणे नियमानुकूल करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्वंकष धोरण ठरवून पुढील ३ महिन्यांत स्पष्ट शिफारशींसह अहवाल सादर करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांच्या विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणूक: पहिल्याच दिवशी खासदार उदयनराजेंसह सहा अर्ज दाखल;

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठीच्या निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, सुरभी भोसले यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या अर्जांचा समावेश आहे. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सहकार क्षेत्रातील राजकारणावर रोखठोक भाष्य केले.

पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणी मुदत २६ सप्टेंबरपर्यंत

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी दि. २६ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे, नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरू असून पात्र मतदारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी मुदतीपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

राज्यातील दुष्काळाची भीषणता लक्षात घेता उपमुख्मयंत्री सुनेत्रा पवार हे नांदेडमध्ये आज दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव,सोलापूरमध्ये पाहणी केली होती. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाहणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com