Maharashtra Live Politics Update : भुसावळच्या फुलगाव उड्डाणपुलाखाली गोळीबार; हल्लेखोर दुचाकीवरून पसार; २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी

Political Breaking Live Headlines Updates : ज्ञानेश कुमार आणि SIR प्रक्रियेविरोधात आज इंडिया आघाडीकडून रामलीला मैदानावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासह देश आणि राज्यभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

भुसावळच्या फुलगाव उड्डाणपुलाखाली गोळीबार; हल्लेखोर दुचाकीवरून पसार; २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी

भुसावळ तालुक्यातील फुलगाव उड्डाणपुलाखाली आज रात्री आठ च्या सुमारास २५ वर्षीय तरुणावर गोळीबार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली असून मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले असून जखमी तरूणाचे नाव सरफराज असे आहे. त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दिवाळीपूर्वी तुकाराम मुंढेंचा व्यापाऱ्यांना इशारा; म्हणाले, ‘अब होगा असली खेल शुरू...’

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई, खाद्यतेल, मसाले आणि ड्रायफ्रूटमध्ये भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणणार आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापाऱ्यांना थेट पुण्यातून इशारा दिला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी राज्यभर तपासणी आणि कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदान

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत सहा जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले असून ९४% मतदानाची नोंद झाली आहे. सहा जागांसाठी तेरा उमेदवार रिंगणात होते. तर २ हजार ४४६ मतदार होते. जिल्ह्यामध्ये यासाठी १२ मतदान केंद्रांवर अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे. जतमध्ये सोसायटी गटासाठी मतदानावेळी झालेला गोंधळ वगळता जिल्ह्यामध्ये शांततेत मतदान पार पडले आहे. जत सोसायटी गटासाठी आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध काँग्रेसचे विनोद पवार यांच्यात काट्याची लढत असून तासगाव सोसायटी गटामध्ये खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार सुमनताई पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळाली आहे. ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडेल.

उद्घाटनापूर्वीच मान मेट्रो स्टेशनमध्ये गळती

येत्या तीन नोव्हेंबरला बहुप्रतिक्षित शिवाजीनगर हिंजवडी मान मेट्रोचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मात्र लोकार्पणापूर्वीच मेट्रो स्टेशनमध्ये पावसाचे पाणी गळू लागल्याने मेट्रोच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तसेच मेट्रोचे निकृष्ट काम करणाऱ्या पीएमआरडीए आणि टाटा कंपनीवर केंद्र आणि राज्य सरकार कारवाई करणार का? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

शरद पवारांकडून सोलापूर जिल्हा दुष्काळ निवारणासाठी 50 लाखांची मदत

शरद पवार यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे दिला. सदर धनादेश जिल्हाधिकाऱ्याकडे देण्याची सूचना त्यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी 16 तारखेला बारामती मध्ये येणार असून त्यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे हे आमच्या पक्षाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडतील असेही आश्वासन त्यांनी दिले आहे.

आपापासांतील सर्व मतभेद गाडून टाकून एकत्र यावा : एकनाथ शिंदेंचा महायुतीतील वादावर सल्ला

आपापासांतील सर्व मतभेद बाजूला ठेवा. मतभेद गाडून टाकून एकत्र यावा. मनात देशभक्ती जागृत ठेवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील मतभेदावर दिल्याचे मानले जात आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार; सरकार कुठेही हात आखडता घेणार नाही : एकनाथ शिंदे

राज्यातील दुष्काळग्रस्तांना १२ प्रकारचे लाभ मिळणार आहे. पण शेतकऱ्यांची दिवाळी काळी जाऊ नये म्हणून दिवाळीपूर्वी तातडीने पाच हजार रुपये वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. ही तातडीची मदत आहे, शेतकऱ्यांना मदत करताना सरकार कुठेही हात आखडता घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

नागपूरमधील 8 सराफा व्यापाऱ्यांना खंडणीसाठी लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने नागपूरमधील आठ सराफा व्यापाऱ्यांना धमकी देत खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी मागणारे धमकीचे पत्र आले असून त्यात प्रत्येकी १० लाख रुपयांची द्यावेत, असा उल्लेख करण्यात आलेला आहे. पैसे दिले नाही तर टायगर श्रॉफ याच्याप्रमाणे हल्ला करण्याची धमकी देण्यात आलेली आहे.

सोलापूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी शरद पवारांकडून 50 लाखांची मदत

ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पाहणी दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश पवार यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे सुपुर्द केला आहे. बारामतीत पंतप्रधान दौऱ्यावेळी खासदार मोहिते पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांना दुष्काळग्रस्तांच्या व्यथा मांडण्यासाठी वेळ देणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. तसेच, मराठवाड्याचा दुष्काळी दौरा संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

शरद पवारांचा दुष्काळग्रस्त दौऱ्याची सोलापूरातून आज सुरुवात

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तीन दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावातून या दौऱ्याचा प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी शेतकरी सखाराम चव्हाण यांच्या शेतातील नुकसान झालेल्या ऊस पिकाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या दौऱ्यात ते सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

"युपीने दिल्लीत बसवलं, युपीतूनच जाणार" अखिलेश यादव यांचा हल्लाबोल

इंडिया आघाडीच्या आंदोलनात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या ‘डबल इंजिन सरकार’च्या दाव्याची खिल्ली उडवत काशीच्या जनतेने सरकारला ‘डबल झिरो’ दिल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशनेच भाजपला दिल्लीत पाठवले असून, आता त्याच राज्यातील जनता त्यांना सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवेल, असा दावा त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत त्याची सुरुवात झाली असून, २०२७ मध्ये भाजप आणि मित्रपक्षांना सत्तेतून हटवले जाईल, असेही यादव म्हणाले.

‘मोदी-शहांना मतचोरीचा जाब विचारणार’; राहुल गांधींचा रामलीला मैदानातून इशारा

दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या महामोर्चात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करत, कथित मतचोरीप्रकरणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही गांधी यांनी दिला.

"भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही" अखिलेश यादव यांचा दावा

इंडिया आघाडीच्या आंदोलनात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशातील १.२७ कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचे सांगत भाजपवर मतचोरीचा आरोप केला. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

ऊस दरावरून शेतकरी संघटना आणि कारखानदार आमनेसामने

ऊस दरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमधील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. शेतकरी संघटनेचं विठ्ठल साखर कारखान्यावर आंदोलन सुरू असताना, आमदार अभिजीत पाटील यांच्या समर्थकांनी पंढरपूर-टेंभुर्णी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोन्ही बाजू आमनेसामने आल्याने वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

नवनिर्वाचित शिक्षक मतदारसंघातील आमदाराचा भाजपात प्रवेश

बिहार विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झालेले बंशीधर ब्रजवासी आणि राहुल राज यांनी आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भाजपाचं संख्याबळ वाढलं असून, विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे.

राज ठाकरेंच्या नातीच्या नावाची जोरदार चर्चा 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या घरात काही महिन्यांपूर्वी चिमुकलीचं आगमन झालं. नातीच्या आगमनामुळे ठाकरेंच्या घरांत आनंदी वातावरण आहे. आता दिवाळीच्या तोंडावर अमित ठाकरे यांच्या कन्येचं बारसं झालं. राज ठाकरेंनी लाडक्या नातीचं नाव अहिल्या असं ठेवले आहे. 

लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी लोक एकत्र -प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदे म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यातून इंडिया आघाडीतील पक्षांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक आणि सिव्हिल सोसायटीचे सदस्य मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले आहेत. लोकशाही, देश आणि संविधान वाचवण्यासाठी तसेच सत्तेच्या जोरावर लोकशाहीवर वर्चस्व गाजवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी नागरिक एकत्र आल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे - देवेंद्र फडणवीस

जोपर्यंत मतदारयादीतील शेवटच्या बांगलादेशी घुसखोराचे नाव हटवले जात नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील; मतदानाचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या लढ्यामागे आंतरराष्ट्रीय ताकदी, सोशल मीडियाचे अल्गोरिथम आणि पैशांचा मोठा वापर सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून ही अराजकता मुळासकट उपटून फेकून, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 'विकसित भारत' घडवेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे मेट्रो लाईन-३ चे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाईन-३ (माण–हिंजवडी ते शिवाजीनगर) या मार्गिकेचे लोकार्पण दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे सकाळी १०.३० वाजता हा सोहळा पार पडणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण यांनी शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मार्गिकेवरील प्रत्यक्ष प्रवासी सेवा दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे.

Delhi Congress Morcha : निषेध करा, मोर्चा काढा, रॅली काढा आणि थोडी खरेदीही करा; राहुल गांधी यांचे आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी रात्री उशिरा 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून, दिल्लीला भेट देणाऱ्या लोकांना रॅली आणि मोर्चात सहभागी होण्याचे, तसेच स्थानिक दुकानांमध्ये खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. सध्या दिवाळी, छठ आणि भाऊबीजचा सण आहे आणि बाहेरून दिल्लीत येणाऱ्या लाखो लोकांनी स्थानिक व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी छोट्या दुकानांमधून वस्तू खरेदी केल्यास त्यांना फायदा होईल. "निषेध करा, मोर्चा काढा, रॅली काढा आणि थोडी खरेदीही करा, व्यापाऱ्यांना फायदाच होईल, असेही राहुल गांधी म्हणाले.

Delhi Congress : दिल्लीतील काँग्रेस रॅलीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; 4000 पोलिस कर्मचारी तैनात

रामलीला मैदानावर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. 'इंडिया' आघाडीने या रॅलीला 10 लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा केला असला, तरी दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर अहवालानुसार सुमारे 70 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दिल्ली पोलिसांनी मैदानाचे 14 झोनमध्ये विभाजन केले आहे. सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी सुमारे 4000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रामलीला मैदानाच्या प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले असून, सुरक्षा तपासणीनंतरच नागरिकांना मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय, रॅलीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त 150वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

Maharashtra Rain News : पंजाबराव डख यांचा अंदाज; महाराष्ट्रात 1 ते 4 नोव्हेंबरला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 1 ते 4 नोव्हेंबर 2026 दरम्यान काही भागात अवकाळी किंवा स्थानिक वातावरणाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात 1, 2, 3 आणि 4 नोव्हेंबर दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात किंवा स्थानिक वातावरणाने वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रीत अनेक ठिकाणी पाऊस पडेल, असं पंजाबराव डख म्हणाले.

Solapur Politics : शेतकरी संघटनेच्या विरोधात आमदार अभिजीत पाटील समर्थकांचा रास्ता रोको

ऊस दर संघर्ष समितीच्यावतीने पंढरपूर जवळच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनाच्या विरोधात मीटिंग करताना आमदार अभिजीत पाटील समर्थकांनी आज पंढरपूर टेंभुर्णी महामार्गावर रास्ता रोको करून आंदोलन केले.

Pradeep Purnekar Murder Case : मुख्यमंत्री फडणवीसांची राम पूर्णेकरांनी घेतली ठाण्यात भेट; न्यायाची केली मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी त्यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली. ही भेट आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झाली. यावेळी राम पुणेकरांनी देवेंद्र फडणवीसांनी घटनाक्रम सांगून न्याय मिळावा, अशी मागणी केल्याचे समोर येत आहे.

Satara DCC Bank Voting : जिल्हा बँकेच्या मतदान केंद्रावर कट्टर विरोधक रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजीत नाईक निंबाळकर एकत्र

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतदान प्रक्रिया पार पडत असून हाय व्होल्टेज लढतीमध्ये फलटण मधील संजीव राजे नाईक निंबाळकरविरुद्ध समशेर सिंह नाईक निंबाळकर, अशी लढत पाहायला मिळत आहे. यावेळी फलटण येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी चक्क रणजीत नाईक निंबाळकर यांच्या खांद्यावर हात ठेवत समोरासमोर येऊन संवाद साधला. यादरम्यान संजीव राजे नाईक निंबाळकर हे देखील उपस्थित होते. या भेटी मुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी आगरी समाज आक्रमक; राजेंद्र शिंदे यांना अटक न झाल्यास मोठं जनआंदोलन उभारण्याचा इशारा

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी आता आगरी समाज आक्रमक होताना पहायला मिळत आहे. कोपरखैरणे येथे आगरी समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत भूमिपुत्रांनी पूर्णेकर कुटुंबियांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेण्यात येणार असून राजेंद्र शिंदे यांच्या तात्काळ अटकेची मागणी करण्यात येणार आहे. हत्येला महिना उलटला तरी अद्याप राजेंद्र शिंदे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली नसून जर लवकरात लवकर अटक करण्यात आली नाही, तर मोठं जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी आगरी समाजाच्यावतीने देण्यात आला.

पत्रकार दिलीप पाटील यांची गाडी फोडली

वाडा तालुक्यातील घोणसई येथील रहिवासी असलेले 'सकाळ'चे पत्रकार दिलीप पाटील यांची शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी थार गाडी फोडली.या घटनेने खळबळ उडाली असून गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पत्रकार दिलीप पाटील हे तालुक्यातील घोणसई या गावात राहतात.काल रात्री जेवण करून ते झोपले.पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते उठले असताना त्यांना घराच्या अंगणात त्यांची उभी असलेली एम एच 48 डी एक्स 3060 या क्रमांकाची थार जीप फोडलेली दिसली.अज्ञात इसमांनी सदरची कार फोडली असून गावातील राजकारण व बांधकामाचा ठेका या कारणावरून जीप फोडली असल्याचा संशय पाटील यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी वाडा तालुका पत्रकार संघाने केली आहे.

जालन्यात तुपाच्या साठ्यावर FDA चा छापा; 11 हजार 394 किलो तूप जप्त

जालना शहरातील नवीन मार्केट यार्ड परिसरातील एका व्यापाऱ्याच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकलाय. या कारवाईत कृष्णा ब्रँडचे तब्बल 11 हजार 394 किलो तूप जप्त करण्यात आलं आहे. जप्त केलेल्या या तुपाची किंमत 16 लाख 68 हजार 880 रुपये आहे. हे तूप निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त असल्याचा संशय अन्न व औषध प्रशासनाला आहे.

खासदार संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' या पुस्तकाचे प्रकाशन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. ३१) झाले. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.

जामीनावरील पोलीस अधिकाऱ्याचा स्टेट बँकेवर दरोडा

जळगावात जामीनावरील पोलीस अधिकाऱ्याचा स्टेट बँकेवर दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या भोकर (जळगाव) शाखेवर शनिवारी सायंकाळी चारला दरोडा पडला. पाच सशस्त्र संशयितांनी बँकेत फिरून शस्त्रांचा धाक दाखवला. व्यवस्थापक आणि रोखपालाला खुर्चीत बांधले. यावेळी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून रोकड आणि बँकेत ठेवलेले सोने अशा पाच बॅगा घेऊन सायंकाळी ते पाच या वेळेत हा दरोडा टाकण्यात आला. बॅगा आणि सोने घेऊन दुचाकीवरून दरोडेखोर पसार झाले.

ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा आज रामलीला मैदानावर मोर्चा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीकडून आज रामलीला मैदानावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली देखील होणार आहे. रॅलीनंतर रामलीला मैदानात मोठी सभा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.