शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आज छत्रपती संभाजी नगरमध्ये हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांसह महायतीवर आसूड ओढत टीका केली. ज्याला आता मंत्री संजय शिरसाट यांनी टीकेनं उत्तर दिलं आहे. त्यांनी, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता, असा दावा केला आहे. तसेच ‘आज ठाकरे मोर्चा काढून त्यांची केविलवाणी अवस्था दाखवत आहेत. आम्ही देखील 2022 साली हंबरडा फोडला होता, तेव्हापासून हे रडत आहेत. टीका करण्याशिवाय त्यांनी काही केलेलं नाही, असाही टोला लगावला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. तसेच महायुतीवर आसूड ओढला. या टीकेनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना कधी घराचा उंबरठा न ओलंडणारे आता हंबरडा फोडतायत असा टोला लगावला.
देशात कृषी मूल्य आयोग स्थापन करताना कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षासाठी एमएससी पी. एचडी ऍग्री ही अट होती. कर्नाटकमध्ये सुद्धा एमएससी पी एचडी ऍग्री ही अट होती आणि राज्यात सुद्धा कृषी मूल्य आयोगाची स्थापना करताना हिच अट कायम होती. मात्र, त्यावेळेस नियमाचे पुस्तक सोबत घेऊन आलो आणि या अटीच पान फाडून मी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचे पान जोडले. त्यानंतरच मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो असं वादग्रस्त विधान राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं. ते वाशिम येथे बांबू परिषदला आले असताना बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी राज्य सरकारनं मोजणीबाबत घेतलेल्या निर्णयासंदर्भात माहिती दिली. बावनकुळे म्हणाले, राज्यात खासगी भूमापक येणार आहेत. खासगी भूमापक आणल्यानं मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसात मोजणीचं प्रमाणपत्र मिळेल, खासगी भूमापक यांना शासनाच्या रोवर दिला जाईल. त्यानंतर सिटी सर्वेयर रोवर मॅच करुन प्रमाणपत्र देईल, असेही बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या हंबरडा मोर्चावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधा-बांधावर आम्ही जाऊन आलो. प्रत्यक्ष जाऊन तिथली परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहिले आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहायचं. म्हणून आम्ही एनडीआरएफचे निकष असतील, अटीशर्ती असतील त्या सर्व बाजूला ठेऊन मोठ्या प्रमाणात भरीव देण्याचं ठरवलं. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आम्ही केलं याच मला समाधान आहे.
मी आरश्यात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. ठाकरेंच्या संभाजीनगरातील हंबरडा मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी आरसा बघितल्यास असे मोर्चे काढणार नाहीत अशी टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.
काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी कल्याणमध्ये येऊन काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे यांना खांद्यावर उचलून त्यांचा गौरव केला. काही दिवसांपूर्वी प्रकाश पगारे यांना भाजपा जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्या प्रकरणी साडी नेसवून अपमानित केले होते.
सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत देण्यात येत आहे. यावरुन उद्धव ठाकरेंनी टीका केली. कोंबडी गेली तर एका कोंबडीला १०० रुपये दिले जात आहेत. आता बाजारात जा आणि चिकनचा भाव पाहा. मुंबईत दीडशे दोनशेवर हा भाव चालला असेल, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.
विद्येचे माहेरघर ही पुण्याची ओळख कधीच हरवली असून गुंडाचे, कोयता गँगचे, ड्रग्सचे पुणे अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. रवींद्र धंगेकर जर गुन्हेगारांना उघडे पाडत असतील तर त्याचं कौतुक करण्याऐवजी त्यांनी हे प्रकरण थांबवावे असे आदेश दिले जात असतील तर राजकारणाचा स्तर किती खाली गेला याचा विचार करणे गरजेचे आहे. टाकून टाकून किती पडदे टाकणार ? ज्याप्रमाणे सुलतान मिर्झाने मुंबई गुंडांमध्ये वाटली तसेच पुणे शहर तिन्ही पक्षांनी वाटून घेतले आहे. पुण्याचा मनपा आयुक्त नगरविकास मंत्री बसवतात, पुण्याचा CP गृहमंत्री बसवतात, पुण्याचा कलेक्टर पालकमंत्री बसवतात. वरिष्ठांच्या आशीर्वादाने, स्थानिक पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, गुंडाच्या मदतीने पुण्याची वाटलावली जातेय...राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करावे, अशी टीका रोहित पवार यांनी महायुती सरकारवर केली आहे.
कबुतरखाना बंदी वादाला नवं वळण लागले आहे. दादरमधील कबुतर खाना पुन्हा सुरु करण्याची मागणी करत जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. आगामी मुंबई महापालिका आपले उमेदवार लढणार असे देखील त्यांनी घोषित केले.
पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाने वोट चोरी विरोधात आज स्वाक्षरी मोहीम राबवली. काळेवाडी येथे काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष सायली नडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
ठाण्यात नागरिकांच्या समस्यांसंदर्भात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र मोर्चा काढणार आहेत. येत्या 13 तारखेला मासुंदा तलाव ते महापालिका भवन मार्ग असा हा मोर्चा निघणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीबाबत आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. निवडणुका युती म्हणून एकत्र लढवाव्यात का? यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या घरावर काल भारतीय जनता पक्षाच्या रॅली दरम्यान काही कार्यकर्त्यांनी दारूच्या बाटल्या फेकल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज सांगोल्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. सकाळी 11 वाजता बाबासाहेब देशमुखांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात निषेध मोर्चा केला जाणार आहे. त्यामुळे सांगोल्यातील सर्व बाजारपेठा दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
मीरा-भाईंदरमध्ये हनुमान मंदिरावरून पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाईंदर पूर्वेच्या श्याम भवन बिल्डिंगचे रीडेव्हलपमेंटचे काम होणार असून या बिल्डिंगला लागून असलेले हनुमान मंदिरावरून हा वाद सुरू झाल्याची माहिती आहे. तर सरनाईक हे नुसते धर्मावरून राजकारण करतात असा आरोप नरेंद्र मेहता यांनी केला आहे.
पहिल्या वर्गापासून हिंदी अयोग्य असून मातृभाषेलाच प्राधान्य देण्याची गरज असल्याचं मत नागपूरातील तज्ज्ञांची व्यक्त केलं आहे. त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॅा. नरेंद्र जाधव यांनी नागपुरातील तज्ज्ञांची मतं जाणून घेतली. यावेळी पाचवीनंतर तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश करावी अशी मते अनेकांनी नोंदवली. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईचे उपसंचालक संजय डोरलीकर, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ . माधुरी सावरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भाजप नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांनी ही भेट कशासाठी घेतली याबाबतची माहिती मिळालेली नाही. मात्र, या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे भंडारा-गोंदिया लोकसभा युवा सेनेचे प्रमख जॅकी रावलानी हे भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. रावलानी हे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून मागील काही वर्षांपासून त्यांनी तशी मोर्चेबांधणी केली आहे. आमदार भोंडेकर यांना निवडून आणण्यात रावलानी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे रावलानी भाजपमध्ये गेल्यास शिंदेंच्या शिवसेनेसाला मोठा धक्का बसू शकतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून त्यांनी नेहमीप्रमाणे पहाटेपासून पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची पाहणी केली. वारजेतील चौधरी चौकापासून पाहणीला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिनसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 'हंबरडा मोर्चा'चं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी द्या आणि पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याच्या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.