

गोकुळ दूध संघाने 40 टक्के डिबेंचर कपात सुरू केलेली आहे. ही कपात गोकुळला दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांसाठी आर्थिक अडचणीची ठरत आहे. या विरोधात दूध उत्पादक आक्रमक झालेले आहेत. गोकुळ दूध संघाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील याकडे गोकुळ दूध संघाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. या विरोधात आता दूध उत्पादक आक्रमक झालेले आहेत. दूध उत्पादकांच्या वतीने कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयावर 16 ऑक्टोबर रोजी जनावरांसह मोर्चा काढण्यात येणार आहे. गायी-म्हशी घेऊन दूध उत्पादक रस्त्यावर उतरणार आहेत. गोकुळच्या प्रशासनावर दूध उत्पादक शेतकरी नाराज असून दूध संघ प्रशासनाने दूध उत्पादकांचा सुद्धा विचार करून ही कपात रद्द करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
ठाकरे बंधू सतत एकत्र येत असून आता मनसेच्या दीपोत्सवाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यामुळे ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी, ते एकत्र येण्याने महायुतीला काही फरक पडणार नाही. हा काय महाराष्ट्राचा विषय नाहीये. तर दोन भाऊ एकत्र येण्याचा आहे. पण त्यांच्या एकत्र येण्याने असं चित्र काय बदलणार नाही. त्याचा महायुती आणि भाजपावर काही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे येथील वारकरी शिक्षण देणाऱ्या शाळेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना उघडकीस येताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर ज्या नेत्यांनी गोशाळेत येऊन भाषणे ठोकली त्यांना आता आसमान दाखवू असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे येथील वारकरी शिक्षण देणाऱ्या शाळेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी संस्थेचे संस्थापक भगवान कोकरे यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभापतींचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यापाठोपाठ गट आणि गण सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे आता राज्यात रणधुमाळी सुरू होणार आहे. तर आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेतील 5 आणि पंचायत समितीमधील 02 सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक होणार आहे. याबाबत अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सूरांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैथिली ठाकुरने भाजपमध्ये प्रवेश करत राजकारणात प्रवेश केला आहे. ती आता बिहारची विधानसभा निवडणूकही लढवणार असून तीचा मतदारसंघही फिक्स झाल्याचे आता समोर येत आहे. मैथिली अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
नागपूर विभागीय पदवीधरच्या मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेला पराभव भाजपचा अद्यापही खुपत आहे. मागल्या निवडणुकीत झालेली चूक यावेळी होऊ द्यायची नाही असे भाजपने ठरवले आहे. सोमवारी नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या इच्छुक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला. महिनाभराच्या आत घरोघरी जा आणि प्रत्येकी हजार मतदारांचे फॉर्म भरून आणा अशी सूचना केली. केवळ खानापूर्ती करून चालणार, प्रत्येकाच्या कामाची दखल घेतली जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
राज्यातील सर्व तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या व्यग्रतेमुळे तलाठ्यांवर प्रभावीपणे पर्यवेक्षण करणे शक्य होत नव्हते. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असूनही समन्वयाअभावी दैनंदिन कामकाज परिणामकारक होत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून, महसूल विभागाचे सहसचिव ज्ञानदेव सूळ यांनी आदेश काढला आहे.
अतिवृष्टी पंचानाम्यांच्या प्रश्नावरून अकोले तहसील कार्यालयात जोरदार वाद झाला. माजी आमदार वैभव पिचड व त्यांच्या समवेत असणारे कार्यकर्ते आणि अकोल्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. तहसीलदारांवर गुर्मीत वागत असल्याचा तसेच हेकेखोरपणाचा आरोप करून त्यांचा निषेध करण्यात आला.
मराठा समाजाला सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. बीडमध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी (ता. 17) महाएल्गार मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमी बीडमध्ये बॅनरबाजी सुरू झाली आहे. या बॅनरबाजीत ओबीसी नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
ऐन दिवाळी सणाच्या काळात अहिल्यानगर शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. बाजारपेठेत व्यापारांना, सर्वसामान्य नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. महावितरण या कारभारामुळं शहरातील व्यापाराचं नुकसान करत आहे. पूर्ण दाबाने पुरवठा राहील याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करावी. ऑक्टोबर अखेरपर्यंत भारनियमन करू नका. अन्यथा महावितरण कार्यालयास शिवसेना स्टाईल टाळे ठोकू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने दिला.
धनगर आणि बंजारा समाजाकडून आदिवासींमध्ये आरक्षणाची केल्या जाणाऱ्या मागणीच्या निषेधार्थ पालघरमध्ये आदिवासींनी एल्गार मोर्चा काढला. पालघरमध्ये सर्वपक्षीय आदिवासी समाज बांधव एकवटले असून, आदिवासी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. आदिवासी समाज पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार विलास तरे पालघर आदिवासी आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष आहेत.
जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्याच्या दराने विक्रमी उसळी घेतली, असून जीएसटीसह दर प्रतितोळा तब्बल 1 लाख 31 हजार वर पोहोचला आहे. केवळ एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांची झेप पाहायला मिळाली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदीचा दर आता 1 लाख 96 हजार प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.
दीर्घकाळ नक्षल चळवळीत सक्रिय राहून पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीपर्यंत पोहोचलेल्या वरिष्ठ नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने अखेर आपल्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर विविध राज्यात मिळून 10 कोटीहून अधिक बक्षीस होते. 16 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो शस्त्र खाली ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांनी आमदार संग्राम जगताप यांना भेटून आगामी महापालिका निवडणुकीमध्ये माजी सैनिकांना एक जागा मिळावी, ही मागणी केली. आमदार जगताप यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी जयहिंद सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक शिवाजी पालवे, कार्याध्यक्ष शिवाजी गर्जे आदींसह माजी सैनिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सरसकट पंचनामे करावे, यासह मागणीसाठी सांगलीच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तातडीने कर्जमाफी करावी आणि सरसकट पंचनामे करत, शेतकऱ्यांची वसुली थांबवावी, या मागणीसाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा इशारा दिला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना ट्विट करून युतीची साथ घातली होती, यावर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी टीका केली आहे. 'रिपब्लिकन ऐक्य हे कधीच होणार नाही. कुणी कुणासोबत जायचं नाही, आधीच ठरलेल आहे,' असे दीपक केदार यांनी म्हटले आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडून खेड तालुक्यातील आरक्षण जाहीर होताच, भोसरीच्या आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील महिलांना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरवण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे.भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या कन्या विनया सुधीर मुंगसे आणि सध्याचे आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा महेश लांडगे या दोघीही खेड तालुक्यातील कुरुळी जिल्हा परिषद गटातून एकमेकांविरोधात लढणार असल्याचं चित्र आहे.
महाविकास आघाडीतील नेते निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी शिवालय येथे एकत्र जमा झाले आहेत. उद्धव ठाकरेंसह, जयंत पाटी, , अजित नवले आदी नेते निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्य निवडणूक आयोग चोक्कलिंगम यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप समजू शकले नाही. महाविकास आघाडी आणि मनसेचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. 26 प्रभाग निश्चित करण्यात आले आहे. एकूण 102 नगरसेवकांची निवडून येणार आहे. 24 प्रभागांमधून 4 नगरसेवक,इतर 2 प्रभागांमधून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रारूप रचनेवर आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी करण्यात आली आहे. 8 हरकती मान्य करण्यात आल्या असून 10 प्रभागांमध्ये फेरफार करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी येणार आहेत. शिंदे हे उद्या साताऱ्यातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक देखील होणार आहे. त्यानंतर ते पुन्हा संध्याकाळी त्याचा दरे गावी मुक्कामी जाणार आहेत.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे महापालिकेत 2012 आणि 2017 असे सलग दोनदा नगरसेवक असलेल्या बबलू जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विभागीय मेळाव्यात हा प्रवेश झाला.
कुख्यात गुंड निलेश घायवळ याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीच मविआच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला, असा खळबळजनक आरोप विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रालयाजवळ असलेल्या जीवन बिमा मार्ग येथे 909 चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेपैकी 200 चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून उर्वरीत जवळपास 700 चौरस फूटांटी जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आता ती जागा देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने रद्द केला आहे.
राज्यातील सर्व तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक आहे. नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत, तसेच सरकारच्या योजना पोहोचण्यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
समाजसेविका अंजली दमानिया यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिक्षणाबाबत केलेल्या पोस्टला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांना कृषीमंत्री होण्याचा सल्ला दिला आहे. अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे. अर्थ मंत्रालय, हा खूप महत्वाचा आणि अतिशय गंभीर आहे. ह्यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास / ज्ञान असणे आवश्यक आहे. स्वित्झर्लंड हा देश ४१२८५ चौ किमी आहे आणि महाराष्ट्र ३०७७१३ चौ किमी आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत ८ पट मोठे आहे. स्वित्झर्लंड ची GDP ८३,३३,००० कोटी आहे आणि महाराष्ट्राची ४२,६७,००० कोटी आहे, म्हणजे अर्ध्याने. महाराष्ट्रावर कर्ज आता ९,३२,००० कोटी आहे. ते कसे कमी होणार ? काही ब्लू प्रिंट आहे का? असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
कुख्यात गुंड नीलेश घायवळने जबरदस्तीने एका व्यक्तीच्या आधारकार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावावर मोबाईल सिमकार्ड घेतले. तसेच, वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिस ठाण्यात घायवळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.