पुणे पदवीधरमध्ये हर्षदा जाधव देशमुख तर मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन उमेदवार जिंकले आहेत. यानंतर विजयानंतर माजी मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मोठं विधान केलं आहे. त्यांनी बेरोजगारी, महागाई आणि स्पर्धा परीक्षेत सुरू असलेला त्रास आणि ती चीड पदवीधरांनी मतदानातून व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.
काँग्रेस पक्ष मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. येत्या 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसकडून दिल्लीत आंदोलन पुकारले आहे. या काँग्रेसच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीनं आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतची माहिती अभिजीत दिपकेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासावर नाराजी व्यक्त करत त्यांच्या समर्थकांनी ठाण्यात आंदोलन केले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. घटनेला २५ दिवस उलटूनही तपासात ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
शिवसेना पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज झालेली सुनावणी संपली आहे. उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाच्या वतीने वकील मनिंदर सिंग आणि ध्रुव मेहता यांनी बाजू मांडली. शिवसेनेत अंतर्गत निवडणुका घेण्यात अपयश आल्याचा मुद्दाही शिंदे गटाने उपस्थित केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या दुपारी ३ वाजता होणार आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी १६ हजार १३४ वैध मतांचा कोटा पूर्ण करत विजयावर शिक्कामोर्तब केले. काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. सरनाईक यांनी या मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला असून, बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या सहभागामुळे ही निवडणूक चर्चेत राहिली.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी पक्षातील अंतर्गत लोकशाहीचा अभाव आणि विधिमंडळातील बहुमताचा मुद्दा उपस्थित केला. ५१ पैकी ४४ आमदार आणि १८ पैकी १३ खासदार शिंदे गटासोबत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी कायदेशीर तरतुदींचाही दाखला दिला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आज मोर्चा काढणार आहे. CSMT परिसरातून हा मोर्चा निघणार असून, मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. प्रकाश आबिटकर यांच्यासह महायुतीचे नेते संचालकांच्या भेटीनंतर गोव्यातून कोल्हापुरात परतले. उद्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष निवडीबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
दिवाळीपूर्वी मुंबई महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे. बीएमसी कर्मचाऱ्यांना 33 हजार रुपयांचा बोनस मिळणार असून, दिवाळीपूर्वी ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. याआधी नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक महापालिकांनीही कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या अंत्यसंस्कारालाही कोणी जाऊ नये, असं वक्तव्य गायकवाड यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि शेतकरी वर्गातून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे लक्ष लागलं आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. यंदा कमी पाऊस आणि अति उष्णतेमुळे सुमारे 30 टक्के द्राक्षबागांमध्ये फळधारणेवर परिणाम झाला. द्राक्षबागा वाचवण्यासाठी शासनाने पिण्याच्या पाण्यानंतर फळबागांना प्राधान्य द्यावे.कालव्याच्या खालील द्राक्षबागांसाठी पाण्याची आवर्तने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर खाजगी फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथे दत्तात्रय कुंभार या 28 वर्षीय युवकाने खाजगी फायनान्सच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या कुटुंबाची शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत शेतकरी आणि सामान्य नागरिकांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या फायनान्स तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
राज्यात झालेल्या पाच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचे चित्र आज दुपारी स्पष्ट झाले. महाविकास आघाडीने दोन, तर महायुतीच्या तीन जागांवर विजय निश्चित झाला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात आणि पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेना आघाडीवर आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आघाडीवर आहे.
बेकायदा ऑनलाईन बेटिंग आणि अवैध आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चित्रदुर्गचे आमदार के. सी. वीरेंद्र, गुलशन खट्टर आणि नेहा टंडन यांच्याशी संबंधित 23.35 कोटींच्या स्थावर व जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये 13.76 कोटींच्या जंगम मालमत्ता आणि 9.58 कोटींच्या स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे एकूण मूल्य 343 कोटींवर पोहोचले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बँका, पतसंस्था, फायनान्स कंपनीकडून होणाऱ्या जाचक वसुली स्थगित करावी तसेच हॉस्पिटलच्या कामगारांच्या विविध प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यासमोर छावा संघटनेच्या वतीने प्रशासनाला जाग यावी यासाठी जागरण गोंधळ घालत निषेध करण्यात आला.
मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्धच्या निदर्शनात सहभाग घेऊन परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता इम्रान खानला उच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम दिलासा दिला. परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने (फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) बजावलेल्या नोटिशीला पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली.
नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आणि धरणे आंदोलन पुकारले आहे.जिल्ह्यातील सुमारे 450 ते 500 कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला असून, शासनाने मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
अनेकांची इच्छा होती की, नीतेश कराळे मास्तर निवडून आला पाहिजे. माझ्यामागे कोणतीही संघटना नाही. दोन राष्ट्रीय पक्षांची नाका-तोंडात पाणी जाईपर्यंत, मी जेरीस आणलं आणि त्यांना चांगलं घाम फोडला. मला 25000 मत मिळाली, या सर्व लोकांचे मी आभार मानतो. ज्या लोकांनी मला मत दिले त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांना सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. मला मिळालेले पंचवीस हजार मतदान आहेत ते बिना पैशाचे मतदान आहे. मला मिळालेले पंचवीस हजार मतदान हे निर्णायक ठरणार आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा जाधव यांच्या विजयानंतर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाली असून, विजयासाठी ८८,५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
कोणत्याही उमेदवाराने आवश्यक कोटा पूर्ण न केल्याने सर्वांत कमी २३ मते मिळालेले विशाल छाया उद्धव नांदरकर यांना प्रथम वगळण्यात आले. त्यांच्या मतांपैकी १३ मते पुढील पसंतीक्रमानुसार हस्तांतरित झाली, तर १० मते हस्तांतरणास अपात्र ठरली.
त्यानंतर ३० मते असलेले अशोक दत्ता हेमके यांची दुसऱ्या टप्प्यात वगळणी करण्यात आली. त्यांच्या मतांपैकी १६ मते हस्तांतरित झाली, तर १४ मते हस्तांतरणास अपात्र ठरली.
उर्वरित उमेदवारांच्या मतांची पसंतीक्रमानुसार पुढील मोजणी सुरू असून, अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्ष) यांना १ लाख ११ हजार २७९ मते मिळाली आहेत, तर डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १ लाख २ हजार ४२७ मते मिळाली आहेत. त्यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्यावर ८ हजार ८५२ मतांची आघाडी घेतली आहे. विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी १ हजार ८१६ मतांची गरज आहे.
इतर उमेदवार :
- सुनिल जबरचंद मोदी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) – ३ हजार ६६ मते
- सोमनाथ जनार्धन साळुंखे – २ हजार ६३८ मते
- नामदेवराव जाधव – १ हजार ९५५ मते
- लक्ष्मण साहेबराव हरणावळ – १ हजार ४७२ मते
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजमी सुरू असतानाच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात होऊ घातलेल्या पुणे जिल्हा सहकारी बँक, कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेसह राज्यातील इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अभिजीत बिचुकलेंना पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत फक्त 19 मतं मिळाल्यामुळे ते बाद झाले आहेत. निवडणुकीला उभं राहिल्यानंतर अभिजीत बिचुकलेंनी पदवीधरांना मोठी आश्वासनं दिलेली. पण, त्यांना केवळ नऊ मतांवरच समाधान मानावं लागल्यामुळे ते बाद झाले आहेत.
गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी आज महायुतीच्या नेत्यांची गोव्यामध्ये बैठक पार पडणार आहे. महायुतीचे संचालक हे गोव्याच्या सहलीवर आहे. आज दुपारी १ वाजता बैठक होणार आहे. अध्यक्ष निवडीच्या सभेमध्ये सहभागी होण्याबाबत आज संध्याकाळ अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या मोजणीच्या कलात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीत दुसऱ्या पसंतीचा कोटा निश्चित झाला आहे.
कोटा 88 हजार 558 ठरवला आहे.
एकुण वैध मते - 177115
अवैध मते - 16540
प्रतापसिंह पाटील - 73931
सतीश चव्हाण - 60768
रविराज साबळे - 19835
प्रतापसिंह पाटील 13163 मताने आघाडीवर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे साय डोंगर परिसरात दाखल झाले असून ते या परिसरातील वृक्षतोडीची पाहणी करणार आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी आघाडी कायम राखली आहे. मात्र, विजयासाठी आवश्यक असलेला २५ हजार ७५६ मतांचा कोटा अद्याप कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे आमदारकीचा फैसला आता दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून असून, अंतिम निकालासाठी आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
पुणे पदवीधरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख पहिल्या पसंतीच्या मतांत आघाडीवर आहेत. तर भाजपच्या स्मिता जाधव दुसऱ्या स्थानी आहेत. पुणे पदवीधर निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी २ लाख २६ हजार २२४ मते वैध ठरली आहेत. विजयासाठी १ लाख १३११३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेसह राज्यातील सहकारी बँकांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून पुढील आदेश येईपर्यंत राज्यातील हजार वर संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.