

MLC Election 2026 : राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये महायुतीत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नेत्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केल्याने हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील बारा जागांवर भाजपने ठामपणे दावा केला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला दोन जागा असे सध्याचे चित्र आहे.
जागा वाटपाच्या या सूत्राबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असमाधानी आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक मंत्र्यांना आपले प्रस्थ वाढविण्यासाठी ही संधी वाटते आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पक्षाने अधिक जागांचा आग्रह धरला आहे. त्यातून भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण रंगले आहे.
राज्यात सध्या महायुती सत्तेत आहे. सत्तेचा पुरेपूर लाभ प्रत्येक निवडणुकीत महायुतीकडून घेतला जातो. त्या दृष्टीने मंत्री आणि अन्य नेते सरकारमधील विविध माध्यमांचा जोरदार वापर करताना दिसले आहेत. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत काही मंत्र्यांना आपल्या दुसऱ्या पिढीचे राजकीय पुनर्वसन करण्याची संधी वाटते आहे.
मुलांना उमेदवारीसाठी त्यांनी पक्षाकडे जोरदार लॉबिंग केली आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. जळगावच्या जागेवर गुलाबराव पाटील यांनी आपले चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. आमदार किशोर पाटील यांनाही असेच वाटत होते. मात्र मुलाचे वय कमी असल्याचे सांगत त्यांनी दावा मागे घेतला.
हिंगोली-परभणी मतदारसंघात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना मुलगा अभिमन्यू खोतकर यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे. संभाजीनगरची जागा अब्दुल सत्तार यांना आपल्या मुलासाठी हवी असल्याचे लपून राहिलेले नाही. नाशिक मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. येथे उद्धव ठाकरेंच्या पक्षातून नरेंद्र दराडे यांनी शिंदे पक्षात प्रवेश केला. त्यांचे बंधू किशोर दराडे सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. येथे देखील नरेंद्र दराडे यांना विद्यमान आमदार म्हणून संधी हवी आहे.
प्रस्थापित भाजप पक्षातही वेगळी स्थिती नाही. धनंजय महाडिक आणि मंत्री शिवेंद्रराजे यांना देखील आप्तस्वकीयांना उमेदवारी हवी आहे. तर एरव्ही कार्यकर्त्यांचा पक्ष असा दावा उपमुख्यमंत्री शिंदे करतात. मात्र सध्या त्यांच्या पक्षात सर्वच नेत्यांना आपल्या मुलांचे राजकीय पुनर्वसन करण्याची संधी चालून आल्याचे वाटते आहे.
विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडे हुकमी संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांना ही निवडणूक सोपी वाटत असली तरी पार्टी विथ डिफरन्स म्हणून भाजप किती कार्यकर्त्यांना आणि निष्ठावंत्यांना संधी देते हा वादाचा विषय आहे. विधान परिषदेसाठी कोण किती सक्षम हाच विचार सुरू असल्याने येरे माझ्या मागल्या हीच रीत सुरू आहे. कार्यकर्त्यांसाठी तोशीस कोण सोसणार? हा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.