Maharashtra Politics Live Update : रायगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर, तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर नदीच्या पाण्यात वाहून गेले

Marathi Breaking Live Headlines Updates : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज देखील सुट्टी जाहीर, शरद पवार आज विधीमंडळातील बैठकीला उपस्थित राहणार, यासह महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

रायगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर, तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर नदीच्या पाण्यात वाहून गेले

रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. हे सिलेंडर एमआयडीसी आणि चावणे परिसरातील गोदाम आणि साठवण केंद्रांमध्ये होते. वाहून गेलेल्या सिलेंडरमध्ये काही भरलेले व काही रिकामे सिलेंडरचा समावेश होता.

Devendra Fadnavis : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या संदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या संदर्भात उच्चाधिकार समितीची बुधवारी बैठक पार पाडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, खासदार नारायण राणे आणि सीमा भागातील सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या बैठकीसाठी शरद पवार आवर्जुन उपस्थित राहणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार त्यांच्या स्वागताला होते. तसेच, संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील हेही शरद पवारांचे वेलकम करण्यासाठी आल्याचं दिसून आलं. या बैठकीत सीमाप्रश्नी न्यायालायीन लढाई अधिक ताकदीने लढण्याचा निर्णय झाला.

Vidhan Parishad : विधान परिषदेत महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणाऱ्या सुधारणा विधेयकावर चर्चा

Mumbai News : महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे, मद्यपान कक्ष, बारमधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालताना पहिल्यांदा गोकुळाष्टमी सारख्या पवित्र सणासुदीला होणाऱ्या जाहीर अश्लील नृत्यावर बंदी घाला. आम्हाला अशा कार्यक्रमांना जाण्यास लाज वाटते अशी कबुली विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी सभागृहात दिली. त्या विधान परिषदेत महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चेप्रसंगी बोलत होत्या.

ख्रिश्चन मिशनरी संस्थांच्या मालमत्तांची राज्यव्यापी तपासणी

इंग्रजकालीन ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी राज्यात मागे सोडलेल्या मालमत्तांची राज्यव्यापी तपासणी करून त्यांच्या मालकी हक्क, अभिलेख व त्यानंतर झालेल्या व्यवहारांचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतचा अहवाल तीन महिन्यांत तयार करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Ramesh Mhatre news : नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक

कल्याण डोंबिवली येथील महिला डॉक्टर मारहाणप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक आहे. महिला डॉक्टरांसह महापालिका रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाली होती.

Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसचे ऑफिशीयल अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र काँग्रेसचे ऑफिशीयल अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला, तसेच आयटी सेलच्या माध्यमातून झुंडीने रिपोर्ट करून रोज अकाऊंट बंद पाडण्याचे प्रयत्न ही होत आहेत. वेगवेगळी बिनबुडाची कारणे देत 'मेटा'कडून (फेसबुक, इंस्टाग्राम) आपल्या अनेक पोस्ट डिलीट केल्या जात आहेत. पण एवढंच लक्षात असुद्या, आम्ही घाबरणारे नाही, आम्ही बोलत राहू आणि सत्य मांडत राहू, अशी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसने केली आहे.

राज्यात पावसाचा जोर कायम; पुढील 6 दिवस हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असतानाही महाराष्ट्रात गेल्या 5 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक धरणांतील पाणीसाठा वाढला असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही भागांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. 1 ते 6 जुलैदरम्यान जून महिन्याएवढा पाऊस झाला असून पुढील 6 दिवसही महत्त्वाचे ठरणार आहेत.

माळीणमध्ये पुन्हा दरड कोसळली, वाहतूक ठप्प

आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मुसळधार पावसामुळे आज पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडली आहे. माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळल्याने आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

अलिबागमध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू

अलिबागमध्ये रस्त्यावरील पावसामुळे भगदाड पडले आहे. यात एकाला पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. चांगू कमळू घरत असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Rain Update: उद्यापासून पुढील चार ते पाच दिवस पावसाची विश्रांती

राज्यात उद्यापासून पुढील चार ते पाच दिवस पावसाची विश्रांती राहणार आहे. विदर्भासह मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणा आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ प्रवीण कुमार यांनी दिली.

Nashik Flood School Holiday: नशिकमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीची पाणीपातळी वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नाशिकमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Nashik News: सिंहस्थचे तात्पुरते ऑफिस वाहून गेले

सिंहस्थसाठी नाशिकमध्ये महापालिकेने उभारलेले तात्पुरते ऑफिस पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले आहे. तपोवन परिसरात ही ऑफिस होते.

मंत्रालयातील वीजगायब, कर्मचारी अंधारात

जेथून राज्याचा कारभार चालवला जातो त्या मंत्रालयचा मंत्रालयातील वीजपुरवठा सकाळी सातपासून खंडित झाला आहे. कर्मचारी कामासाठी दाखल झाले, मात्र वीज नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. संगणक आणि इतर यंत्रणा बंद असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला. दरम्यान, वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले.

डॉक्टर मारहाण प्रकरण नगरसेवकाला भोवणार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेने शिंदे गटाची मोठी राजकीय कोंडी केली आहे. या प्रकरणात शिंदे गटाच्या नगरसेवकाचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढे येत दोषींना कोणतेही राजकीय संरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भीमाशंकरचा मार्ग बंद!

मुसळधार पावसामुळे राजगुरुनगर इथून ज्योतिर्लिंग क्षेत्र भीमाशंकरकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. गुंडाळवाडी इथल्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

विजेच्या धक्काने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील खामगावात येथे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. घरासमोरील विद्युत केबलच्या तारेला स्पर्श होऊन सर्वांचा मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे.

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात विशेष वाहतूक व्यवस्था; दर्शनासाठी १० ठिकाणी वाहनतळाची सुविधा

संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा दिनांक ९ ते १० जुलै २०२६ या कालावधीत पुणे शहरात संयुक्त मुक्काम असल्याने दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. दर्शनासाठी विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. ते पुढील प्रमाणे-

टिळक आयुर्वेद महाविद्यालय रास्ता पेठ, ऑर्नेलास हायस्कूल कॉटर गेट चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य, कला महाविद्यालय नाना पेठ, लक्ष्मी मार्केट, नाना पेठ (नेहरू रोड), स. गो. बर्वे प्राथमिक विद्यालय रास्ता पेठ, रफी अहमद किडवाई हायस्कूल भवानी पेठ, शांताबाई लडकत प्राथमिक विद्यालय नाना पेठ, स. गो. बर्वे शाळा रास्ता पेठ, मार्कंडेय विद्यालय नाना पेठ, सावित्रीबाई फुले शाळा भवानी पेठ.

विधीमंडळातील बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार, बेळगाव सीमा प्रश्नावर होणार चर्चा

ज्येष्ठ नेते शरद पवार हे बेळगाव सीमा प्रश्नाबाबत आयोजित विधीमंडळातील महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद, पुढील भूमिका आणि मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com