माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर संतोष देशमुख हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा फोटो झळकला आहे. या बॅनरबाजीमुळे परिसरात आणि राजकीय वातावरण तापलं आहे.
एलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरू झालं आहे. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील हिंदीसक्तीवरुन वाद सुरू असतानाच टेस्ला कंपनीनं मात्र, शोरुमच्या बाहेर ठळक अक्षरात मराठीत 'टेस्ला' असं लिहिलं आहे.
शिवसेना मंत्री शंभुराज देसाई, मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई, आमदार आदित्य ठाकरे यांच्यात चांगलाच संघर्ष झाला. विधिमंडळातून बाहेर येताच, वरुण सरदेसाईंनी माध्यमांशी संवाद साधला. "वांद्रेमधील 42 एकर डिफेन्सच्या जमिनीच्या प्रश्नावर उत्तर अपेक्षित असताना, ती मिळाली नाहीत. मतदारसंघातले प्रश्न सोडवायला विधानसभेत येतो, हे हक्काचं विधिमंडळ आहे, जिथं जनतेचे प्रश्न सोडवले जातील. पण इथं 2019 ला काय झालं, 2022 ला काय झालं, हे सुरू आहे. हे धंदे आता बंद करा, जनतेची प्रश्न सोडवा", अशा शब्दात वरुण सरदेसाई महायुती सरकारवर बरसले.
मुंबई वांद्रे परिसरात 42 एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाच्या मालकीची असल्यामुळे 9 हजार 483 झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. ही लक्षवेधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी विधानसभेत मांडली. यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या उत्तरावर शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या चर्चेवेळी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले.
राज्याच्या प्रशासनात खळबळ उडवून देणारी घटना समोर येत आहे. राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा एका राजकीय नेत्यानं केला आहे. हा राजकीय नेता सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहे. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.
संभाजी ब्रिगडने या महाराष्ट्रात जे पेरले तेच उगवले आहे, अशा शब्दांत ओबीसी (OBC) नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. वैचारिक लढाई संविधाच्याच चौकटीत झाली पाहिजे. परंतु तिच चौकट मोडून रस्त्यावर दहशत माजवण्याच्या अनेक घटना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घडल्या आहेत, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची 2020 साली गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय नजीब मुल्ला यांच्यावर हत्येची सुपारी दिल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर जमील शेख यांच्या कुटुंबाबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत नजीब मुल्ला यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
शेतकरी (Farmers) आणि कांदाप्रकरणी आंदोलन करणारा नाशिकमधील कृष्णा डोंगरे याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून अडकवण्यात आल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याप्रकरणी स्थानिक मंत्री आणि पोलिसांच्या रचलेल्या कांडप्रकरणी खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
गावातील ग्रामस्थांनी अपमान करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने मीच आत्महत्या करतो, असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत ग्रामसेवक तीन दिवसापासून गायब आहे. केशव गव्हाणे, असं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत गायब झालेल्या ग्रामसेवकाच नावं आहे. केशव गव्हाणे 13 जुलैपासून गायब आहे. केशव गव्हाणे यांच्याकडे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील डिकसळ व आथर्डी गावातील ग्रामसेवक पदाचा पदभार आहे. नातेवाईकांची कळंब पोलिसात (Police) तक्रार दिली असून, ग्रामसेवक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन आहे.
म्हाडाची लॅाटरी निघाली आहे पण आमदारांना नऊ लाखांत घर मिळणार असं काही नाही. कोकण विभागाची लॅाटरी निघाली आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची योजना असो जे निकष बाकी लोकांना लागू होतील तेच आमदारांना लागू होतील असं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच सध्या अधिवेशन असल्याने अनेक लोक येतात त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी कॅन्टीन सुरु ठेवण्यात आलं आहे. परंतु त्याच्यावर कारवाई निश्चित केली जाईल असंही त्यांनी सभागृहात सांगितलं.
मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मनसे नेते सुदाम कोंबडे यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. दुबेंनी सोशल मीडियावर व्हायरल केलेले सगळे व्हिडिओ तत्काळ डिलीट करण्याची मागणी या नोटीसमधून करण्यात आली आहे. तर 7 दिवसांत नोटीसला उत्तर न दिल्यास पोलीस तक्रार आणि दावा दाखल होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन करण्यात आले आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे टेस्ला कंपनीचं भव्य शोरुम उभारण्यात आलं आहे. यावेळी फडणवीसांनी टेस्ला कंपनीचं महाराष्ट्रात आणि मुंबईत स्वागत असल्याचं म्हटलं.
#WATCH | Mumbai | Maharashtra CM Devendra Fadnavis "welcomes" Tesla to India
— ANI (@ANI) July 15, 2025
The CM says, "This is not just the inauguration of an experience centre but a statement that Tesla has arrived, a statement that it has arrived in the right city and state, that is Mumbai,… pic.twitter.com/bcNIbYzgMU
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोप दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनतर आता या आरोपींना अक्कलकोट कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यात दीपक काटे आणि त्यांच्या 7 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळच्या महागांव पोलीस स्टेशनमध्ये माजी मंत्री बच्चूकडूंस बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सातबारा कोरा पदयात्रेची समारोप सभा घेतल्यामुळे तब्बल तीन तास दोन्ही बाजूची वाहतुक कोंडी झाली होती. या प्रकरणी आता कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात धर्मांतर विरोधात कायद्या करण्यासाची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. अशातच आता राज्यात धर्मांतर विरोधात कायद्याच्या अभ्यासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली असून या समितीच्या अहवालातील सूचनांचा विचार करून पुढील अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा मान्यतेसाठी विधी मंडळात सादर केला जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे.
नुकतंच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. मात्र, या कायद्याला आता काँग्रेसने विरोध केला आहे. शहरी नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी हा कायदा आणल्याचा सरकारचा दावा हास्यास्पद असून हा कायदा सामान्यांची गळचेपी करणारा आहे. सभागृहात सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये मनसेसोबतच्या युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपण या युतीसाठी सकारात्मक असल्याचं या गप्पांमध्ये म्हटल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर युतीसाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न सुरू असून निवडणुका जाहीर झाल्यावर युतीबाबत निर्णय होईल असंही त्यांनी म्हटल्याचं सुत्रांची माहिती आहे. मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असून ते यानंतरही सुरू राहतील. मेळाव्यानंतर फक्त आपल्यावर टीका केली गेली, असंही ते या गप्पांमध्ये म्हटल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.