Sarkarnama Headlines : लोकल अपघातानंतर राज ठाकरे राज्यकर्त्यांवर बरसले; म्हणाले, बोजवारा उडाला...

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray news : रेल्वेचा बोजवारा उडाला आहे...

मनसे अध्यक्ष यांनी ठाण्यातील लोकल अपघातानंतर राज्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला आहे. सर्व शहरांचा विचका झालाय. शहरांचे नियोजन नाही. रेल्वे चालतेच कशी, हे आश्चर्य आहे. बाहेरच्या लोंढ्यामुळे हा बोजा निर्माण झाला आहे. कोण येतंय कोण, जातंय हे काही कळत नाही. अपघात होत नाही, असा एकही दिवस नाही. रेल्वेचा ट्रॅफिकचा बोजवारा उडाला आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली आहे. आपल्या देशात माणसाची किंमतच नाही. परदेशात जाणारे मंत्री काय घेऊन येतात? किमान तिथले विचार तरी घेऊन यावेत, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

Sharad Pawar News : लोकलमधून पडून मृत्यूची आकडेवारी चिंताजनक!

मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. महत्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली आहे.

Jitendra Awhad News : रेल्वेला पैसेही द्यायचे आणि रेल्वेने जीवही घ्यायचा

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे अपघातानंतर टीका केली आहे. गेल्या दशकात दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातील लोकसंख्या हजार पटीने वाढली आहे. मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या हजार पटीने वाढली आहे. लोकल ट्रेनच्या फेऱ्या प्रवाशीसंख्येच्या तुलनेत वाढल्यात का? तर त्याचे उत्तर 'नाही' असेच आहे. भारतातील सर्वात जास्त महसूल हा मुंबई लोकलमधून मिळतो. रेल्वेला पैसेही द्यायचे आणि रेल्वेने जीवही घ्यायचा, हे ऐकायलाही योग्य वाटत नाही. रेल्वेने काहीतरी उपाययोजना कराव्यात, एवढीच सर्व प्रवाशांची मागणी आहे. दिवा टर्मिनेटींग लोकल ट्रेन हा त्यावरील एक छोटासा उपाय आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis News : सोलापूर दौरा रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. सोलापूर-गोवा विमानसेवेची सुरूवात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार होती. मात्र, ठाण्यातील रेल्वे अपघातामुळे सोलापूर दौरा रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

Railway Accident live update : हे अपघाती नाही, सरकारने घेतलेले बळी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे अपघाती नाही, सरकारने घेतलेले बळी असल्याची टीका केली आहे. आज सकाळी मुंब्रा स्थानकाजवळ दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना घासल्याने लटकलेले आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत 6 प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर हेणार या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली आहे.

Railway Accident Update : रेल्वे अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचाही मृत्यू

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ठाणे रेल्वे पोलिस दलातील कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्याद हेही मृत्यूमुखी पडले आहेत. धावत्या लोकलमधून १० ते १२ जण खाली पडल्याने सकाळी हा दुर्दैवी अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Thane Railway Accident News : प्रवाशांच्या सुरक्षितेकडे लक्ष देण्याची गरज 

रेल्वे अपघातावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मध्य रेल्वेमार्गावरील कोपरी ते दिवा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी आणि क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरीय रेल्वे मार्गावरील गर्दी व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केली.

Rohit Pawar news : हिंजवडीत बोटिंग सेवेची पर्यायी व्यवस्था करा...

हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये मागील आठवड्यात पावसामुळे नदीचे स्वरूप आले होते. त्यावरून आमदार रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे एखादं वॉटर पार्क नाही तर पुण्यातील हिंजवडी IT पार्क आहे. अर्ध्या तासाच्या पावसात हिंजवडी IT पार्क जलमय झालं. यंदाचा हवामान खात्याचा समाधानकारक पावसाचा अंदाज बघता हिंजवडीत बोटिंग सर्विसची पर्यायी व्यवस्था उभारण्यास midc ला अडचण नसावी. चार-चार तास लाईट नसते, संध्याकाळची ट्रॅफिक तीन-चार तास खाते, राज्यातल्या सर्वांत मोठ्या IT पार्कचा हा विकसित चेहरा बघून गुंतवणूकदार येतील का? आहेत त्या कंपन्या इथे थांबतील का? असे प्रश्न पडतात. लाखो लोकांना रोजगार, शिक्षण देणाऱ्या आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावं, ही विनंती रोहित पवारांनी केली आहे.

Thane Rail Accident update : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com