
भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समाजाचे पहिले पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा आज निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून विद्यमान सरकारने पूर्णपणे अपमान केला आहे, असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हटले आहेत. काँग्रेसकडून मागणी करण्यात आली होती की मनमोहन सिंग यांचे अशा ठिकाणी अंत्यसंस्कार करा जेथे त्यांचे स्मारक होऊ शकते.
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपने प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नव्या जबाबदारीमुळे ते राज्यातील पक्ष संघटनेच्या कार्यात अधिक सक्रिय भूमिका निभावतील. रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, त्यांनी २००२ साली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सुरेश धस यांनी परळी पॅटर्न म्हणत प्राजक्ता माळी यांच्यासह काही महिला कलाकारांचे नाव घेत टिपण्णी केली होती. त्या विरोधात प्राजक्ता माळी यांनी धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. धस यांनी माफी मागितली नाही तर मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना निवेदन देणार असल्याचेही प्राजक्ता माळी यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रूपयांची भरपाई द्यावी अशीही मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली.
अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये 11 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत खासदार प्रफुल पटेल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुक लढवण्याची केली होती घोषणा
बीडमधील मोर्च्यातून मराठा आरक्षण आंदोलक यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसंच त्यांना न्याय मिळाला नाही तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. शिवाय माझ्या जातीवर अन्याय केला तर त्याला मी सोडत नाही. तो किती मोठा जहागीरदार असला तरी मी त्याला सोडत नाही. जे आपल्या बाजुने आहेत त्यांच्या बाजुने आपल्या जातीच्या लोकांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.
302 च्या गुन्ह्यामध्ये त्या आकाला अटक करा, आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत 2 जानेवारीपर्यंत त्याला अटक केली नाही आणि फाशी दिली नाही तर बीड, महाराष्ट्र आणि दिल्लीत खासदार म्हणून उपोषणाला बसणार, अशी घोषणा यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.
बीड जिल्हा हा राजकीय बंडखोरी करणारा जिल्हा आहे. पण आता तो गप्प का आहे. तुम्ही सगळे इथल्या अन्याविरोधात आज एकत्र जमला पण त्यासाठी संतोषचा जीव जावा लागला. त्याआधी तुम्ही का गप्प राहिला? असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चाला उपस्थित नागरिकांना केला. तसंच आकाचा बाप कोण आहे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे त्याची आता मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या लवकरात लवकर अटक करावी यासाठी बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात बोलताना आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे संभाजीनगर तुम्ही एअरपोर्टला उतरला, गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला गेला पण वाट वाकडी करून तुम्ही आमच्या देशमुख कुटुंबियांच्या भेटीला का गेला नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ही टीका करत गंभीर आरोप केले. धनंजय मुंडेंच्या बगलबच्च्यांनी अनेकांची पैसे ढापल्याचा आरोप केला.
मी ओबीसी आहे पण मी ठामपणे सांगतो की वाल्मिक कराडला आत टाका. हा कोणत्या जातीपातीचा विषय नाही म्हणून आपल्याला सर्व लोकांनी साथ दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांनी सागितलं जो कोणी दोषी असेल त्याला सोडणार नाही. आणखी सुरेश धस त्या सभागृहात बोलले असते तर सभागृह ढसाढसा रडलं असतं असही संदीप क्षिरसागर बीडमधील मोर्चात बोलले.
संतोष देशमुख यांचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावं. तसंच सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. तसंच हे प्रकरण बीड या ठिकाणी न चालवता मुंबई न्यायालायकडे वर्ग करावं, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. बीडमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो. त्यामुळे देशमुख कुटुंबाला न्याय मिळू शकत नाही, यामुळे ते मुंबई न्यायालयात चालवावं अशी मागणी करण्यात आली आहे.
वाल्मिक कराड हा आधुनिक वाल्या आहे. आतापर्यंत 20 जणांचे त्याने खून केलेत. आमची जात त्याच्यामुळे बदनाम होते आहे. मी पहिली मागणी केली धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, असा हल्लाबोल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधील मूक मोर्चातून केला.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अजून पकडण्यात आलेलं नाही. शिवाय या प्रकरणाचा सुत्रधार म्हणून विरोधक वाल्मिक कराड याच नाव घेत आहेत. तो देखील अद्याप फरार आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आरोपींना अटक न केल्याचा निषेध करण्यासाठी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला आता सुरूवात झाली आहे. आमचा संतोष आमचा न्याय! अशा पाट्या हातात घेत हजारो लोक या मोर्च्यात सहभागी झाले आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निगमबोध घाटावर अखरेचा निरोप देण्यात येत आहेत. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत असून यासाठी देशभरातील अनेक दिग्गज नेते घाटावर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झाले आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू निगम बोध घाटावर उपस्थित झाल्या आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित आहेत. यावेळी सिंग यांना तिन्ही दलांकडून अखेरची मानवंदना देण्यात आली.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा निघाली आहे. फुलांची सजावट केलेल्या वाहनातून त्यांचे पार्थिव आता पार्थिव निगम बोध घाटच्या दिशेने रवाना झाले आहे.
काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. सकाळपासून अनेक नेत्यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच आता राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील सिंग यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचं अंतिम दर्शन घेतलं.
दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव आणण्यात आले आहे. यावेळी त्यांची पत्नी गुरशन कौर आणि मुलगीदमन सिंग यांनी त्यांना आंदराजली वाहिली आणि अंतिम दर्शन घेतलं.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत. अशातच आता आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं वक्तव्य संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलं आहे. तर सर्वांनी एक होत बाबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मुलगी वैभवीने केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवाय आता शिर्डीला होणाऱ्या अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची एकमताने घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत 12 जानेवारीच्या भाजपच्या प्रदेश अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार आहे.
सलमान खानसोबतची जवळीकच बाबा सिद्दीकींनी भोवल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांची दिली आहे. तर गँगस्टर अनमोल बिश्नोईनेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे आदेश दिल्याची माहिती आता समोर आली आहे. तर आता गुन्हे शाखा लवकरच करणार 26 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे. झिशान सिद्दिकी यांनी SRA वादातून ही हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी खोडून काढला आहे. 12 ऑक्टोबरला वांद्रे पूर्वेकडील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील कुर्ला येथील बेस्ट बस अपघाताची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये एका टेम्पो चालकाने भाजी मार्केटमध्ये गाडी घुसवून पाच जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. तर या घटनेत प्रीती रितेश पटेल या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर आज सकाळी दहा वाजता निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आहे. याविषयी गृह मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काही माणसं जन्माला येतात आणि जातात. मात्र काही माणसं समाज आणि देशाचा विचार करतात त्यापैकी मनमोहन सिंग होते. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची आणि माझी अनेकदा भेट झाली. नेहमी देशाविषयी आणि समाजाविषयी आस्था असणाऱ्या माणसाचे दुःखद निधन झाल्याने दुःख वाटलं. ते खऱ्या अर्थाने सच्चा माणूस होते नेहमी देशाचा विचार करायचे निसर्गाच्या रूढीप्रमाणे माणसं येतात जातात. मात्र एक सच्चा माणूस गेल्याने दुःख वाटलं, अशा शब्दात अण्ण हजारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजगुरूनगर येथील लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवाय या प्रकरणाचा तपास पोलिस चांगल्या पद्धतीने करत असल्याचंही चाकणकर यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली ठराव पारित करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आजचा दिवस देशाच्या दृष्टीने अस्वस्थ करणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी दिलेलं योगदाना मुळे ही अस्वस्थता आहे. खरंतर त्यांचा पिंड राजकारणी नव्हता. ते विचारवंत होते. देशाच भवितव्य घडविण्याचा त्यांचा विचार होता. माझा त्यांचा परिचय मुंबईचा होता. मी मुख्यमंत्री असताना ते RBI चे गव्हर्नर होते. त्यामुळे आमचा संवाद होता.
नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थ खात्याचे मंत्री होते. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील काही कमिट्या होत्या त्यात आम्ही सोबत होतो. त्यावेळी त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. ते मितभाषी होते. देशाचे पंतप्रधान झाल्यावर ते अर्थ व्यवस्थेला दिशा देण्याच काम त्यांनी केलं. देशाची अर्थव्यवस्था सावरण्याची प्रक्रिया त्यांनी केली.
भरीव निर्णय घेऊन त्यांनी देशाला संकटातून बाहेर काढले. मी माझ्यावतीने जुना सहकारी म्हणून त्यांच्या कुटुंबियांना हा दुखाचा धक्का सहन करता यावा, यासाठी प्रार्थना करतो आणि श्रध्दांजली वाहतो.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं अत्यंदर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस खासदार प्रियांका वाद्रा, तसेच सोनिया गांधी आणि मल्लिकार्जून खरगे देखील उपस्थित होते.
डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झालं ही देशाचे हानी. आपले अर्थव्यवस्था दहा वर्षात इतके उपाध्यक्ष करून देखील टिकून आहे. सध्याच्या सरकारने एवढे सुरंग लावले तरी ती टिकून आहे याचा सर्व श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना जातं.
नोटबंदीमुळे देशाचा जीडीपी घसरेल असे अनेक इशारे त्यांनी दिले आणि ते खरे ठरले होते. तसंच आज नरेंद्र मोदी हे फुकट धान्य देत आहेत कोणीही उपाशी राहणार नाही प्रत्येकाच्या घरात चूल पेटते ही योजना मनमोहन सिंग यांची आहे.
अन्नसुरक्षा कायदा हे त्यांनी आणला. अशा अनेक योजना त्याने देशाच्या जनतेसाठी आणल्या. अत्यंत प्रामाणिक आणि त्यांचा बोलबाला शेवटपर्यंत टिकला, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान मननोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
आज मध्यरात्री 1 वाजता डॉ. मनमोहन सिंह यांची मुलगी अमेरिकेहून परतणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सुत्रांनी दिली आहे. मनमोहन सिंह यांचे पार्थिव उद्या सकाळी 8 ते 10 या वेळेत AICC येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सर्व बडे नेते माजी पंतप्रधानांना काँग्रेस मुख्यालयात श्रद्धांजली वाहतील. तर राजघाटाजवळ जिथे पंतप्रधानांचे अंतिम संस्कार केले जातात, तिथेच डॉ. मनमोहन सिंह यांच्यावरही अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेस मनमोहन सिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच जागा मागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 10 वाजता 3 मोतीलाल नेहरू मार्ग या निवासस्थानी ते अंत्यदर्शन घेणार असल्याची माहिती आहे.
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अशातच आता दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील (AICC) राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणारे. यासंदर्भात अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मनमोहन सिंग यांचं निधन हे देशाचे दुःखद नुकसान आहे. ते काँग्रेस आणि देशाचे खरे प्रतीक होते, अशा शब्दात त्यांनी वेणुगोपाल शोक व्यक्त केला.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. जागतिक धुरंधर नेता गमावला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटलं, "मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे.
डॉ. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॉ. मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो."
मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल. श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो.
मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील, अशा शब्दात राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धाजंली वाहिली आहे.
भारताने आज आपला एक सर्वांत प्रतिष्ठित नेता गमावला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवली. त्यांनी सरकारमध्ये अर्थमंत्रिपदासह विविध पदांची जबाबदारी सांभाळली आणि आपल्या आर्थिक धोरणांवर ठसा उमटवला. त्यांचा संसदेतील वावर आणि कामकाज अभ्यासपूर्ण होते. पंतप्रधानपदी असताना त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, असं म्हणत PM मोदींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भारतीय खेळाडूंनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिती आहे. ते खांद्याला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. ऑस्ट्रेलियासोबतच्या चौथ्या टेस्ट मॅचसाठी आज ते मैदानात उतरले आहेत.
भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.