
माननीय राजमान्य राजश्री दादा,
आपल्याला सर्वप्रथम धन्यवाद देतो. आपण माझ्या मनीची तगमग (काही महिने उशिरा का होईना) समजून घेतलीत. प्रभावी जनसेवेसाठी मला मंत्रिपदाचीच नितांत आवश्यकता आहे हे आपल्याला अखेर उमगलेच. गेले काही महिने मला अन्न-पाणी गोड लागत नव्हते. तरीही मी कसेबसे दिवस कंठत होतो. मंत्रिपदासाठीचा माझा संघर्ष माझ्या समर्थक-कार्यकर्त्यांनीच हातात घेतला होता. मीही मेळाव्यात बंडखोरीचा बिगूल फुंकल्याचा अवघ्या महाराष्ट्राचा गैरसमज झाला. खरे तर मी या मेळाव्यातून संतप्त कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. असो.
मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने कुणी तरी गळ्यातील मफलरच जणू आवळली की काय, याची स्वप्ने पडून मी झोपेतून खडबडून जागा होत असे. तर मफलर अश्रूंनी चिंब भरलेला असे. दिवसभर रोखलेला बांध झोपेत फुटत असावा. असो. माझ्या रक्तातच जनसेवा भिनलेली आहे, हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेच.
मुंबईच्या महापौरपदापासून मी त्यासाठी झटत आहे. ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ असा नारा मी त्यावेळी दिला होता. (नंतर अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने मुंबईची ‘तुंबई’ होत आहे, असो) संघर्ष माझ्या रक्तातच असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संघर्षापासून मी सदैव संघर्ष केला. त्यासाठी अन् नंतरही मी कारावास भोगले. पदाने हुलकावणी दिली की बंडखोरी करण्याचा माझा स्वभाव नाहीच. थोडी अस्वस्थता अन् मी संघर्षरत होतो एवढेच.
आपल्या वेगळ्या होण्याच्या संघर्षातही मी आपल्याला अन् आपल्या पक्षाला साथ दिली. त्यावेळी आपली भूमिका काय आहे, हे फक्त समजावून घेण्यासाठी मी आपल्याकडे जात आहे, असे मोठ्या साहेबांना सांगून मी आपल्याकडे आलो. तेव्हा आपली भूमिका मला एवढी पटली की मी आपल्याबरोबरच राहण्याचा निर्णय (मनावर दगड ठेवून) घेतला. मात्र, या त्यागाचे मला काय फळ मिळाले, तर मलाच मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. अशी तगमग मी सेनेत असतानाही अनुभवली नव्हती. परंतु आता तो भूतकाळ झाला.
आता माझ्यापेक्षाही माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला आहे. माझ्या येवल्यातील कोटमगावची जगदंबाच पावली म्हणायची. आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला न्याय मिळाला, असं म्हणता येईल. असो. अखेर ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं....
ता. क. : मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं, मुझे फेक ना देना, हो सकता हैं तुम्हारे बुरे दिन में, यहीं सिक्का चल जाएगा...
आपला विश्वासू,
आपले शतशः आभार. मी आपला ऋणी आहे. दादांचा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असताना तुम्ही ती बदलली. हा जुगाड आपल्यालाच जमू शकतो. तुम्ही कशी काय जादूची कांडी फिरवता समजत नाही. मीही पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षात गेलो होतो. पण तुम्ही अवघा पक्षच फोडून नवा पक्ष स्थापन करण्यास हातभार लावला, हे पाहून चकित झालो. अहो तुम्ही रात्री हुडी घालून वेशांतर करून ठाणेकर भाईसाहेबांकडे जायचा. ते पाहून मला सीमा प्रश्नाच्या आंदोलनात मी केलेल्या धाडसाचीच आठवण झाली. तेव्हा मी बेळगावात वेशांतर करून गेलो होतो. तुम्ही तर वेशांतर करून चक्क सत्तांतर घडवलेत. असो.
तसा नेता होण्याआधी मी अभिनेताही होतो अन् चित्रपटांतही काम केले आहे हे अनेकांना ठाऊकच नाही. (नेतेपद निभावताना माझ्यातील या अभिनेत्याचे गुणही उपयोगी पडतात, असो.) खरं तर मला न्याय मिळेल असं वाटत नव्हतं. मी पुन्हा एकदा संघर्षाच्या तयारीत होतो. तर तुम्ही मला शब्द दिला. त्यामुळे मी (कसाबसा) शांत बसलो.
तुम्ही दिलेला शब्द खरा करताना खरे तर काही महिने लावले, ते मी कसे कंठले माझे मलाच ठाऊकाय. खरं तर एके काळी उपमुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपदे मी भूषविली होती. पण आता त्या तुलनेने दुय्यम खाते मिळाले आहे. असो. (जिथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचाव्या लागत आहेत) कालाय तस्मै नमः
(पद मिळाले, हे काय कमी आहे का...‘इस्लामपूर’करांना आमच्या पक्षात घेऊन त्यांनाच मंत्रिपद दिले जाते की काय, याची खरं तर मला भीती वाटत होती.) खरं तर मला माझ्या पक्षातूनच खूप विरोधक आहेत. सिन्नरचे ‘माणिक’ गळ्याला शोभण्याऐवजी भलताच त्रास देते. नांदगावमधून विरोध होतो. नाशिकचे कांदे प्रसिद्ध असले तरी काही ‘कांदे’ मला चांगलेच झोंबतात. त्यात आमचे श्रेष्ठीही आमच्याशी दुजाभावाने वागत होते. (त्याची कारणे ‘लाखात एक’ होती) त्यांच्याशी दोन हात करताना माझ्या ‘भुजां’मधील ‘बळ’ वाया जात होते. पण आपण माझ्याकडे (पूर्वीचा विरोध सोयीस्कररीत्या विसरून) ज्या आपुलकीने पाहिले अन् मला सामावून घेतलेत. याबद्दल मी आपल्या अन् ‘नमों’च्या ऋणात राहू इच्छितो. महापालिकांसाठी मदत करणारच.
ता. क. : मी नाशिकचा 'पालक' नव्हे 'बालक' आहे, असे गमतीने म्हंटलोय. पण मला नाशिकचा 'पालक' करावेच, ही नम्र विनंती. अर्थात महापालिकांना माझी मदत होईलच नव्हे बालक
आपला विश्वासू,
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.