Maharashtra Politics: अस्वस्थ नेत्यांची राजकीय धुळवड; ऐन दिवाळीत महाशिमगा

Maharashtra Politics Update Mahayuti Strategy: सांप्रतकाळी महाराष्ट्रदेशी तीन पक्षांचे नेते परस्परांवर कुरघोड्या करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत राजकीय महाशिमगा पाहण्याची वेळ महाराष्ट्राच्या भाळी आली आहे. हे नेते परस्परांवर राजकीय चिखलफेक करून धुळवड रंगवत आहेत. त्यामुळे अस्वस्थ नेत्यांनी परस्परांना केलेला हा पत्रव्यवहार...
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

अभय नरहर जोशी

प्रति, 

रा. रा. उपकारभारी,

राहणार - बारामती, हल्ली मुक्काम - मुंबई

ती. दादा, सप्रेम नमस्कार. पत्रास कारण, की तुमच्या ‘घड्याळा’त बारा कधीपासून वाजायला लागलेत? अहो माझ्या नागपूरहून खबर आली की तुमच्या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात ‘आता वाजले की बारा...’ या लावणीवर नाचून तसं सांगण्यात आलंय म्हणे...अहो तुमच्या ‘घड्याळा’त कायम दहा वाजून दहा मिनिटे वाजलेले असतात. हे बारा वाजल्याची माहिती नवीनच आहे. त्यांनी वाजवलेल्या बाराने मती गुंग व्हायची पाळी आणली बुवा. एकूणच बारामतीपासून तुमचा बारावर फार भर बुवा. बारा गावचं पाणी तुम्ही पिलंय, हे मान्य. पण त्या विदर्भात तुमच्या पक्षाचा जीव बारा तोळ्यांचाही नाही. अन् तिथं तुमचे पदाधिकारी थेट पक्ष कार्यालयातच ‘वाजले की बारा’वर नाच करतात. ‘स्थानिक स्वराज्य’ तोंडावर असताना असे बारा वाजवू नका बुवा. आधीच मतचोरी, पुण्याचे होस्टेल, फलटण प्रकरण अंगावर आलंय. पुरानं तोंडचं पाणी पळवलंय. असे सगळे बारा वाजले असताना तुमचे लोक नागपुरात चक्क दिवाळीत असले बारा वाजवतात दादा. तुम्ही लक्ष घालावे ही विनंती.

आपलाच, 

राज्याचा  कारभारी

प्रति, 

रा. रा. उपकारभारी,

राहणार - ठाणे, अधून मधून दरे गाव (जि. सातारा), हल्ली मुक्काम - मुंबई

भाई, सप्रेम नमस्कार! काय भाई तुम्ही आजकाल माझ्याकडे पाहून स्मितहास्य करतानाही तुम्हाला फार कष्ट पडतात बुवा. पूर्वीप्रमाणे टाळ्या देणं तर दूर हास्य-विनोदही तुम्ही करत नाहीत. एक तर तुमच्या दरे गावी तरी निघून जाता किंवा थेट दिल्लीच गाठता बुवा. तुम्ही दिल्लीत गेला की इकडच्या गल्लीत मला चैन पडत नाही. त्यात पुण्यातील तुमचा खंदा कार्यकर्ता आम्हाला कामाला लावतोय. दंगल करतोय. राजकीय कुस्तीची दंगल हो. आमच्या माणसावर आरोपांचं आग्या‘मोहोळ’च तुमच्या माणसानं सोडून दिलं. हल्ली माझा अर्धा वेळ आमच्या माणसांना क्लीन चिट देण्यातच चाललाय. तुमच्या माणसाला जरा आवरा. आपण एकाच नावेतून चाललो असताना तुमचा माणूस रोज आपल्याच नावेत छेद करतोय. ‘स्थानिक स्वराज्य’ निवडणुका जवळ आल्यात. यानं आम्हाला तोंडावर आपटवण्याचा  विडाच  जणू उचललाय. तुम्ही त्याला समज दिली तरी हा ‘दंगे कर’तच सुटलाय. परवा मोटाभाई मुंबईत आले असताना त्यांच्या कानावर घातलंय मी. तेव्हा तेवढं बघा...

आपलाच,

राज्याचा कारभारी

Maharashtra Politics
Ajit Pawar News: हे वागणं बरं नव्हे...!अजितदादांनी मुरलीअण्णांचे आरोप फेटाळले

प्रति,

रा. रा. कारभारी, 

राहणार - नागपूर, हल्ली मुक्काम - मुंबई

ती. पंत, सप्रेम नमस्कार! एक मिनिट... एक मिनिट... एक मिनिट मला आता बोलू द्या. नव्हे लिहू द्या. (या मीडियामुळे मला असं एक मिनिट, मिनिट म्हणायची सवय लागली. असो.) तर नागपूरला उत्साहाच्या भरात पदाधिकाऱ्यांनी आमच्या महिला पदाधिकाऱ्याला त्या लावणीवर अदाकारी करायची फर्माईश केली. कारण माझ्या म्हाराष्ट्राला ठाऊकाय, की आमचा पक्ष सर्व घटकांना बरोबर घेऊन वाटचाल करतोय. आमची ही पदाधिकारी कला क्षेत्रातील आहे. चांगली नृत्यांनगा आहे. त्यांच्या कलागुणांना थोडा वाव दिला. तेव्हा दिवाळीच्या अनौपचारिक मेळाव्यात विविध गुणदर्शनांतर्गत तिला आग्रह झाला. त्यामुळे चांगल्या हेतूनं हे नृत्य केलं गेलं. ती महिला भगिनी नृत्य करताना मागे आमच्या ‘घड्याळा’त मात्र दहा वाजून दहा मिन्टंच दिसत होती. पण ती ‘वाजले की बारा’ म्हणून बजावून सांगत होती. ही  थोडी दिशाभूलच आहे अन् त्यात प्रसारमाध्यमांनी आणखीन भरच घातली. त्यांनी ही ‘क्लिप’ तेही दिवसभर ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखवली. तो आक्षेपार्ह प्रकार होता तर तो का दाखवला? त्यामुळे हे नृत्य राज्यभर पाहिलं गेलं. तरीही मी खुलासा मागवलाच आहे.

आपलाच, 

राज्याचा उपकारभारी

ता. क. : त्या बीडवाल्या, सिन्नरवाल्या अन् नंतर अहिल्यानगरवाल्यानं दिलेला मनःस्ताप निस्तरला तर हे झेंगट उभं राहिलं. माझे बाराच वाजवायचं ठरवलंय राव यांनी...

Maharashtra Politics
Ajit Pawar News: हे वागणं बरं नव्हे...!अजितदादांनी मुरलीअण्णांचे आरोप फेटाळले

प्रति,

रा. रा. कारभारी,

राहणार - नागपूर, हल्ली मुक्काम - मुंबई

पंत, सप्रेम नमस्कार! तुम्ही पुण्यातला वाद एवढा मनावर घेऊ नका. तो स्थानिक वाद आहे. आमचा तो चांगला कार्यकर्ता आहे. त्याला दंगा (आतापुरता) थांबवायला सांगितलाय. तशी आपली तीन पायांची शर्यत आहे. थोडं फार अडखळायला व्हायचंच. आमच्या नेत्याला रायगडचा पालक होण्यात अडथळे येत आहेत. तिकडे सिंधुदुर्गात भावा-भावांचाच संघर्ष सुरू आहे. नवी मुंबईतले तुमचे ‘नायक’ आमच्या अंगावर येतच असतात. ठाण्यात ते आम्हाला घाम फोडताहेत. मला आठवण करून देण्याआधी जरा तिकडंही लक्ष घाला. त्यामुळेच सध्या हास्य हरपलंय. दरे गावी जाऊन शेतीकामात मन गुंतवतो. मध्ये दिल्लीलाही जाऊन आलो. मोटाभाईंच्या कानावर तुमच्याआधीच माझी बाजू घातलीये मी. त्यामुळे चिंता नसावी..

आपलाच,

राज्याचा उपकारभारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com