
एसटी महामंडळासह त्यातील कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागावेत, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी सरकार कायम त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे मत उपमुख्यमंत्री तथा, पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
गेल्या काही काळापासून सतत वादग्रस्त ठरत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अखेर एमआयडीसी पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केली आहे. एका बांधकाम प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून तब्बल पन्नास लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यात दोन दादा आहेत. एक दादा म्हणजे अजितदादा आणि दुसरे म्हणजे चंद्रकांतदादा. पुण्यातील दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत. काही लोक दादागिरी करत नाहीत, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसते’ असं म्हटलं. यानंतर चंद्रकांतदादा दादागिरी करत नाहीत. म्हणजे मी करतो का? असा सवाल अजितदादांनी केला. त्यांनी चंद्रकांत पाटलांना लोक अजूनही पुणेकर मानत नाही, असा टोलाही लगावला.
मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना आठ दिवसांत अटक करा, अशी मागणी केली आहे. तसेच आठ दिवसात आरोपींना न पकडल्यास बीड बंद करणार असा थेट इशाराच दिला आहे. महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
मागील अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ मागणीला पहिले यश मिळाले आहे. येत्या 18 ऑगस्टपासून कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरु होणार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने नोटिफिकेशन जारी केले आहे.
आठ दिवसांमध्ये महादेव मुंडे यांचे मारेकरी न पकडल्यास बीड बंद करू असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ते आज परळीमधून बोलत होते.
दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटांत राडा झाल्याप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यवतमधाील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
पण त्याचबरोबर फडणवीस यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना क्लिनचीट दिली आहे. पडळकर आणि जगताप यांच्या सभेनंतर हा राडा झाल्याचे आरोप केले जात आहे. सभा झाल्यानंतर वादग्रस्त स्टेटस ठेवण्याची मुभा आहे का? असा सवाल फडणवीस यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात महादेवी हत्तिणीबाबत पार पडलेल्या बैठकीतून कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत माहिती दिली. हत्तिणीला परत करण्यासाठी 'वनतारा' प्रशासनाने सहमती दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र महादेवीला वनताराला पाठविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे परत आणण्यासाठीही सर्वोच्च न्यायालयाचीच परवानगी गरजेची आहे. त्यासाठी आता शासन सर्वोच्च न्यायालयात अपिल करणार आहे, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
हत्तिणीला परत आणण्यासाठी शासन प्रतिज्ञापत्र देणार आहे. सर्व ताकतीनिशी उतरणार आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालय निर्णय घेते तेव्हा लोक भावना महत्वाची राहत नाही. ती एक कायदेशीर प्रक्रिया होऊन जाते. त्यामुळे हत्ती परत आणण्यासाठी एका प्रक्रियेतून जावे लागेल.
ही प्रक्रिया पूर्ण होताच वनतारा प्रशासन महादेवीला परत देण्यास तयार असल्याचेही आबिटकर यांनी सांगितले. स्वामीजीही नाराज नाहीत, समाजाशी बोलून निर्णय घेतो अशा पद्धतीची बोलणी करून ते निघून गेले, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महादेवी हत्तिणीबाबत सुरु असलेल्या बैठकीतून नांदणी मठाचे मठाधिपती तडकाफडकी निघाले बाहेर निघाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यमांशी बोलायला स्वामीजींनी नकार दिला. बैठकीतून का बाहेर पडले यामागचे कारण अस्पष्ट आहे. अद्यापही वनताराचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नांदणीकरांची जोरदार घोषणाबाजी देत आहेत.
यवत गावात वाढत्या तणावामुळे स्थानिक प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चौकशी सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात फेसबुकवरील एका पोस्टवरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पोस्टवरून वाद वाढत गेल्याने दोन्ही गट आमनेसामने आले. या वेळी एका दुचाकीला आग लावण्यात आली असून, पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेकही करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नांदणी मठाच जिनसेन स्वस्तिश्री जैन मठाचे मठाधिपती जिनसेन स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी दाखल. वनताराचे सीईओ आणि महाराज या दोघांमध्येच बैठक होईल. या बैठकीनंतर महाराज आणि सीईओ हे माध्यमांशी संवाद साधतील. यात कोणताही राजकीय व्यक्ती असणार नाही. खासदार धैर्यशील माने यांची माहिती
उपराष्ट्रपतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 7 ते 21 ऑगस्ट दरम्यान अर्ज दाखल करता येतील. 22 ऑगस्टला छाननी होईल आणि 25 ऑगस्टपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात.
बीडमध्ये परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. आंदोलनाचे नेतृत्व मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. या बैठकीला खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर आणि विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. महादेव मुंडे यांचे कुटुंबीयही या बैठकीला उपस्थित आहेत. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या उद्देशाने ही बैठक सुरु आहे.
वनताराचे पथक नांदणीला जाण्याची शक्यता कमी आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांकडून वन तारा पथकाशी चर्चा केली जात आहे. नांदणीमध्ये समाज बांधव एकवटल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून गेल्या काही वेळापासून हे पथक कोल्हापूर विमानतळावरच थांबले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आणि वन ताराचे पथक यांची एकत्र चर्चा सुरू आहे. नांदणीतील महाराजांना चर्चेसाठी कोल्हापुरातच आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी सरकारला घेरलं आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, सुनील जोशी हा संघाचा प्रचारक होता. त्याची हत्या झाली. रामचंद्र कलसांगरा, संदिप डांगे हे दोघे अजून फरार आहेत. सुनील जोशींच्या हत्येमागे चाललेल्या खटल्यात मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील बहुसंख्य आरोपी समान होते. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मृतकांना मोदी सरकार न्याय देऊ शकले नाही किमान सुनील जोशी ची हत्या कोणी केली? हे तरी शोधले असते. त्या केसमधील आरोपी असेच सुटले मग खरे आरोपी शोधायची जबाबदारी सरकारची नव्हती का? त्याच्या हत्येचे कारण काय हे कळायला नको? तो तर संघाचा म्हणजे तुमचाच होता, असे सावंतांनी म्हटले आहे.
कोल्हापूर विमानतळावर गुजरात मधील वनतारा पथक दाखल झाले आहे. नांदणी मधील माधुरी हत्ती नेल्यानंतर जैन समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या विरोधाची वनतारा संग्रहालयाकडून दखल घेण्यात आली आहे. नांदणी मठातील महाराजांची आज वनताराचे पथक भेट घेणार आहे. खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्याकडून शिष्टाईचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेण्याची मागणी आमदार अनिल परब यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे सर्व पुरावे दिले आहेत. डान्सबार सुरू होता हे सिध्द झालं आहे. परवाना परत केला तरी सुटका होणार नाही, असे परब यांनी म्हटले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ९ सप्टेंबरला मतदान होणार आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. सावली बार मधला ऑर्केस्ट्रा परवाना योगेश कदम यांनी परत करणे हा निव्वळ सारवासारव करण्यासाठी घेतलेला बचावात्मक पवित्रा आहे. आईच्या नावे डान्सबार चालवणाऱ्या व्यक्तीला राज्याच्या गृहराज्यमंत्री पदावर ठेवणे कितपत योग्य आहे?, असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या खाते बदलानंतर आता कुठल्याही खाते बदलाचा निर्णय होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी सांगितले, ते नागपुरात पत्रकारांसाठी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेतले आहे. त्यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोकोटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे सुळे म्हणाल्या.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं डान्सबार सुरु असल्याचा मुद्या विधिमंडळ सभागृहात गाजला. त्यानंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं होते. त्यानंतर आता कदम यांच्या 'सावली'हॉटेलचा ऑकेस्ट्राचा परवाना त्यांनी रद्द केला आहे. रेस्टारेंट आणि हॉटेलचा परवाना कायम ठेवला
बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने महादेव मुंडे हत्या प्रकरणातील चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. यातील आरोपी गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक रात्रीच झाले होते . चौकशी करण्यात आलेल्या व्यक्तींची ओळख गोपनीय ठेवली आहे.
बोरिवलीमध्ये मनसेचं आज एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर होत आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहे. मुंबई मनपा निवडणुका आणि अन्य भाषिक मतदार यावर या शिबिरात चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि मनसेचे प्रमुख उद्या पनवेल येथे एकत्र येणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.
अमेरिकेने भारतावर आजपासून 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या निर्णयाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. 7 ऑगस्टपर्यंत 25 टक्के टॅरिफचा निर्णय थांबवण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 2 वाजता ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार-2025 वितरण सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. तर पावणे चार वाजता साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य खंडांचे प्रकाशन, लेडी रमाबाई सभागृह, सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे येथे त्यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. तर संध्याकाळी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे पुणे महानगर प्रदेश ग्रोथहब शुभारंभासाठी ते उपस्थित राहतील.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात हे प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. अशातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी खरात यांच्यावर विश्वास ठेवत शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मनोज जरांगे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह विविध पक्ष संघटना या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहीती आहे.
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या पत्रकानुसार नवीन टॅरिफ दर 1 ऑगस्टपासून लागू केला जाणार आहे. त्यानुसार आता भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 25% तर पाकिस्तानवर 19 टक्के आणि जपानवर 15 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. तसंच इस्रायल 15 टक्के, इराक 35 टक्के, दक्षिण आफ्रिका 30 टक्के, दक्षिण कोरियावर 15 टक्के आणि श्रीलंकेवर 20 टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. यासह, इराक 35%, इस्राइल 15%, जपान 15%, जॉर्डन 15% अल्जेरिया - 30%, अंगोला -15%, बांगलादेश - 20%, बोलिव्हिया - 15%, बोस्निया आणि हर्जेगोविना - 30%, बोस्निया आणि हर्जेगोविना - 15%, बोत्स्वाना - 15%, ब्राझील - 10%, ब्रुनेई - 25%, कंबोडिया -19%, कॅमेरून - 15% इक्वेडोर 15%. इक्वेटोरियल गिनी 15%, घाना - 15%,दक्षिण कोरिया - 15%, श्रीलंका - 20%, स्वित्झर्लंड - 39%, सीरिया 41%, तैवान 20%, थायलंड 19%,तुर्की 15%, व्हिएतनाम - 20%, झिम्बाब्वे - 15%, गयाना 15%, आइसलँड 15%, भारत 25%, इंडोनेशिया 19%, कझाकस्तान - 25% लाओस 40%, लेसोथो 15%, लिबिया 30%, लिक्टेंस्टाइन - 15%,म्यानमार 40%, नामिबिया 15%, नौरू 15%, न्यूझीलंड 15%, निकाराग्वा 18%, नायजेरिया 15%, मादागास्कर - 15%, मलावी 15%, मलेशिया 19 टक्के असा कर लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात आज पुन्हा एकदा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर लादण्याच्या आदेशावर सही केली आहे. त्यानुसार आता त्यांनी विविध देशांवर 10 ते 41 टक्क्यांपर्यंतच्या कर लादण्याचा आदेश जारी केला आहे. नवीन टॅरिफनूसार भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 25% कर लादण्यात आला आहे. तर श्रीलंकेवर 20 टक्के टॅरिफ लादला आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या तथ्य पत्रकानुसार नवे टॅरिफ दर 1 ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.