

भिमाशंकर खेडचं की आंबेगावचं, यावरून दिलीप वळसे पाटील आणि दिलीप मोहिते पाटील यांच्यात राजकीय खडाजंगी रंगली होती. हद्दीच्या प्रश्नावरून वातावरण तापलेलं असतानाच आज भिमाशंकर मंदिरासमोर दिलीप वळसे पाटील, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, शिवाजी आढळराव पाटील आणि अतुल बेनके एकत्र बसून गप्पांमध्ये रमल्याचं दिसून आलं. हद्दीच्या वादावर बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी भिमाशंकर मंदिर खेड तालुक्यात असल्याचं मान्य केलं. मात्र अर्ध्या पायरीपुढील भाग आंबेगाव तालुक्यात येत असल्याचा दावा कायम ठेवला. लोकांच्या भावना लक्षात घेऊन काही विषयांवर भूमिका घ्यावी लागते, पण पत्रकारच आमच्यात भांडणं लावण्याचं काम करतात, असा मिश्कील टोला त्यांनी लगावला. काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भिमाशंकर वादात आज मात्र संघर्षाऐवजी राजकीय सलोख्याचं चित्र पाहायला मिळालं.
सांगलीतील वेदांत बंडगर या 14 वर्षीय मुलाच्या खुनातील मुख्य संशयित आरोपी निलेश गडदे याला अटक करण्यात आली आहे. सांगली स्थानिक गुन्हे शाखेने निलेश गडदेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून बेड्या ठोकल्या. रेल्वे मालधक्क्यावरील ठेका व 10 लाखांच्या खंडणीच्या वादातून वेदांत बंडगर याने वेदांत बंडगरच्या डोक्यात गोळी झाडून केली होती. तर ही हत्या ठेकेदार लक्ष्मण खरात याला वेदांत याचे आजोबा बाळू बंडगर व वडील मारुती बंडगर यांनी मदत केल्याच्या रागातून करण्यात आली होती.
पश्चिम बंगाल येथून कुटुंबीयांसोबत शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या तरुणीचा साई संस्थानच्या भक्त निवासात विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून कंत्राटी सफाई कर्मचारी अमन पठाण याच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान आरोपी अमन पठाण याला निलंबित करण्यात आले असून हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. तर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पंढरपूर म्हसवड महामार्गावर झालेल्या अपघात स्थळी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली यावेळी त्यांनी या अपघाताच्या त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला जेवढ्या विहिरी आहेत त्या विहिरींचा सर्वे करून त्या विहिरींना संरक्षण कडे बसवण्याच्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
मुंबईत कबुतरखान्याच्या वादानंतर आता पांढऱ्या पट्टीच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून सामाजिक व धार्मिक भावना यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तर आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण प्रत्येक गोष्टीला वादामध्ये नेवून त्याच्यात राजकारण ओतण्याने कधीच फायदा होत नसल्याचे म्हटलं आहे.
पंढरपूर येथे गेल्या तीन दिवसापासून विनाअट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनास सुरवात केली आहे. आज पंढरपूर येथे या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भेट देवून पाठिंबा दिला.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यात अन्नातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) सुरू करण्यात आलेल्या कठोर कारवाईचा परिणाम आता जालना शहरासह ग्रामीण भागातही दिसून येऊ लागला आहे. परिसरातील अनेक ज्यूस सेंटर, आईस्क्रीम पार्लर, शीतपेय विक्री केंद्रे तसेच काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून आपली दुकाने तात्पुरती बंद ठेवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून बाजारपेठेत विविध चर्चांना उधाण आलं आहे.
अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे आता प्रकृती अस्वस्थतेमुळे थेट निवडणूक प्रचारात उतरणार नाहीत. त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांना किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास असल्याचे समोर आले असून, डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या आरामाचा सल्ला दिला आहे.
म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावालगत असलेल्या विहिरीत पीक अप कोसळला असून या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन ते चार जण जखमी झाले आहेत. पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील लोक म्हसवडमधील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी जात होते. त्या वेळी हा अपघात झाला आहे.
कोयना धरणात अवघा ९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने धरणातील प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू उघड्या झाल्या आहेत.
सरसकट कर्जमाफीसाठी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करणारे आमदा राेहित पवार यांच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन येणार आहेत, त्याबाबतची माहिती खुद्द आमदार पवार यांनी दिली आहे. त्यामुळे महाजन आल्यानंतर तरी रोहित पवार यांचे आंदोलन संपणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते आता ऑनलाईन प्रचार करणार आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अजूनही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे मी आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फोनवर बोलून मदतीचे आवाहन करणार आहे. दुसरीकडे पक्षाने वंचितच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याच्या हालाचाली सुरू केल्या हेात्या. मात्र, त्याबाबची अधिकृत घोषण अद्यापपर्यंत झालेली नाही.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी Bhimashankar Temple येथे भेट देत विकास आराखड्याची पाहणी केली. भीमाशंकर परिसरातील पर्यटन विकास, भाविकांसाठी सुविधा, रस्ते आणि पायाभूत सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. विकासकामांना गती देण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
संजय राऊत यांनी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांच्या बैठकीबाबत प्रतिक्रिया देताना हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांच्यासह पाच खासदार हे बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते, असे स्पष्ट केले. सगळे ९ खासदार बैठकीत सहभागी झाल्याचा दावा राऊत यांनी केला. जे खासदार प्रत्यक्ष उपस्थितीत राहू शकले नाही ते पुढच्या दोन दिवसांत मातोश्रीवर हजर राहतील असं राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा–भाईंदर कोस्टल रोडच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. मुंबई महापालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या वेगाने सुरू असून पश्चिम किनारपट्टीवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, वांद्रे–वर्सोवा टप्प्याचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (उत्तर)’ या कामांची पाहणी केली. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील जवळपास ६० टक्के वाहतूक वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जाते. या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नरीमन पॉईंट ते भाईंदर दरम्यान सिग्नल-फ्री रस्ता तयार केला जात आहे, असे फडणवीसांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या खासदारांच्या बैठकीला पाच जण उपस्थित असल्याचे समजते. अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि अरविंद सावंत हे प्रत्यक्ष मातोश्रीमध्ये असून संजय देशमुख आणि नागेश आष्टीकर यांनी ऑनलाईन हजेरी लावल्याचे समजते.
ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी आज सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर दुपारी १२ वाजता ही बैठक सुरू होणार होती. मात्र, अद्याप या बैठकीसाठी केवळ अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे दोनच खासदार दाखल झाल्याचे समजते. ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव हे बैठकीला येणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समधील ‘नीस’ शहरात दाखल झाले आहेत. 14 जून रोजी ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि 'इंडिया इनोव्हेट्स' या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. मोदी आणि मॅक्रॉन यांच्यातील चर्चेत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक मुद्द्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान 13 ते 18 जून या कालावधीत फ्रान्स आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून मोदींची ही फ्रान्सची सातवी भेट आहे.
राज्यातील शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देत शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेसाठी 19 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याबाबत सूचना जारी केली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
‘‘आज देशाची आर्थिक परिस्थिती पाहता राजकारण करण्याची नव्हे, तर देश वाचवण्याची वेळ आली आहे,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूर इथं केलं.
सातारा-सांगली-सोलापूर विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी प्रामाणिकपणे मतदान करावे. परंतु सध्या ईव्हीएम मशीन आणि पैशाचा मोठा चमत्कार होण्याची शक्यता आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. शशिकांत शिंदे आज आमदार रोहित पवार यांच्या अन्न त्याग आंदोलनाला भेट देण्यासाठी आले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांची बैठक घेणार आहेत. सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचा आदेश आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. पक्ष प्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीसाठी वाकचौरे उपस्थित राहणार की नाही? याकडे लक्ष लागलं आहे.
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सांगलीच्या कामेरी बाजारपेठेत सायंकाळी सहा वाजता शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी सुमारे चार ते पाच हजार शेतकरी व नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, परिसरात आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
लातूरच्या तरुणाने लंडनमध्ये आत्महत्या केली. अहमदपूर तालुक्यातील बोडका इथले तरुण हनुमंत पाटील हे लंडन इथं नोकरीसाठी वास्तव्यास होते. आठ वर्षांपूर्वी हनुमंत पाटील याचा विवाह झाला होता. मात्र काही वर्षांपासून पती-पत्नीमध्ये वाद असल्याने दोघे वेगळे राहत होते. पत्नीने हनुमंत पाटील यांच्या कुटुंबाविरुद्ध दोन कोटी रुपयांचा दावा टाकल्याचं सांगितले जात आहे, आणि याच तणावातून लातूरच्या तरुणाने लंडनमध्ये आत्महत्या केली आहे.
समृद्धी महामार्गावरून प्रतिबंधित मांगूर माशाचं तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. सरकारने हा मासा प्रतिबंधित केला आहे. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पोहा गावाजवळ ट्रक पलटी झाल्याने ट्रकमधील सुमारे तीन टन मांगुर माशांच्या खच रस्त्यावर पडला होता.
रस्त्यावर उतरा मंत्र्यांना फिरू देऊ नका, आता मंत्रालयातच जनावरे घेऊन जाऊन आंदोलन करणाऱ्यांवर टीका करताना लाजा वाटत नाहीत का? अशा शब्दात खासदार निलेश लंके यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.
आसामच्या जोरहाट एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला. एअरबेसवर लँडिंग करत असताना हवाई दलाचं AN-32 कार्गो विमान क्रॅश झालं. या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाच्या 5 जवानांना वीरमरण आलं तर विमानातील को पायलट बचावले आहेत.
मुंबईतील हार्बर मार्गिकेवरील ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या 'मातोश्री' या निवास्थानी पक्षाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चा सुरू असातना ही बैठक बोलावल्या मुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.