पावसाळी अधिवेशनात झालेली हाणामारी आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. कोकाटे यांचा तर राजीनामा घेण्याची मागणी केली जातेय. यादरम्यान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर जोरदार निशाना साधत टीका केली आहे. त्यांनी, विधिमंडळाला एक दर्जा असून लोकशाहीच्या मंदिरात जे चालू आहे ते लज्जास्पद असल्याचे म्हटलं आहे. तसेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर त्यांनी, रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना दोष द्यायचा की ऑनलाईन रमी सुरु करणाऱ्या मोदी सरकारला दोष द्यायचा ? असा सवाल केला आहे.
कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये आरसीबीच्या विजयी परेड दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला होता, तर 15 पेक्षा जास्त जखमी झाले होते. या घटनेची अद्याप चौकशी सुरू आहे. दरम्यान आता आणखी एक धक्कादायक घटना उघटकीस आली असून चेंगराचेंगरीत मृत झालेल्या एका पीडितेच्या शवविच्छेदनादरम्यान सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.
शिर्डीतील साईबाबा मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली असून यामुळे पोलीस आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. मंदिरातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवून उडवून देऊ अशा आशयाचा मेल साईबाबा संस्थानला पुन्हा प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. यानंतर मंदिर प्रशासनाने पोलीसांत माहिती दिली असून भगवंत मान नावाच्या व्यक्तीने तो मेल पाठवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
राज्यातील काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा गौफ्यस्फोट अधिवेशनात काँग्रेस नेत्यांनी केला होता. यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. तर हनी ट्रॅपच्या प्रकरणातील प्रफुल्ल लोढा यांच्यावर सरकारवर सतत आरोप केले जात आहेत. यावरून आता भाजपचे संकंट मोचक अशी ओळख असलेले कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी थेट मविआला घेरतं पलटवार केला आहे. त्यांनी, हनी ट्रॅपच्या प्रकरणातील प्रफुल्ल लोढा याचे शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो दाखवत 'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?' असा सवाल केला आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांनी अंतरवाली सराटीत आरक्षणाचा लढा सुरू केला. तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी आता पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला असून मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी डिवचले असून मी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला थोडी देखील किंमत देत नाही, जरांगे पाटील यांच्यामध्ये काही दम राहिलेला नाही, त्यांची सगळी हवा गेलेलीय अशी खोचक टीका केलीय.
गेल्या काही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी साहित्याची खरेदी व वितरणाचे निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहेत .या निर्णयाला विरोध करणाऱ्या दोन्हीही याचिका न्यायालयाने फेटाळल्यात. या खरेदी वितरणाच्या निर्णयांवर खोटी याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्ते तुषार पडगिलवारवर एक लाखाचा दंड ठोठावलाय.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि प्रफुल्ल लोढाचा फोटो ट्वीटवर पोस्ट करत एकनाथ खडसेंना डिवचले होते. यानंतर एकनाथ खडसे यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री गिरीश महाजन हे देवेंद्र फडणीस यांचे पाय चाटतात, त्यांच्या मागे पुढे फिरतात, आपण त्यांच्या सारखे केले नाही. त्यांच्यामुळेच मला भाजपबाहेर जावे लागल्याचे स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचे गुरुवारी लोकापर्ण करण्यात आले. यावेळी JNU मध्ये सीएम फडणवीसांविरोधात घोषणाबाजी करीत 'एफएसआय'ने आंदोलन केले.
हर्षल पाटील प्रकरणावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील व सांगली जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी हर्षल पाटील हे आमच्याकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाहीत, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. मात्र तांदूळवाडी या गावातील जलजीवन मिशनचं काम पूर्ण केलेल्या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या फलकावर स्पष्टपणे ठेकेदार म्हणून हर्षल अशोक पाटील व अक्षय अशोक पाटील यांची नावं नमूद आहेत. या प्रोजेक्टचे उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील, मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे सर्व मान्यवर या प्रोजेक्टचे आणि हर्षल पाटील ठेकेदार असल्याचे साक्षीदारी असल्याचं बोललं जात आहे.
जलजीवन योजनेत केलेल्या कामांचे बिल न मिळाल्यामुळे सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील युवा ठेकेदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली आहे, असे आरोप होत आहे. त्या प्रकरणी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलंच काम नाही. त्या योजनेवर कुठलंच बिल पेडिंग नाही. एखादे वेळी त्यांनी सबलिट काम घेतलं असावं. पण जिल्हा परिषदेकडे त्याची नोंद नाही. जिल्हा परिषदेच्या सीईओंशी माझा संपर्क झालेला आहे, कार्यकारी अभियंत्याशी मी स्वतः बोललो आहे, त्यामुळे या घटनेचा या योजनेशी कोणताही संबंध नाही.
इंदापूरच्या विश्रामृहातील सत्कारावेळी अचानकपणे वीजपुरवठा खंडीत झाल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगलेच संतापले. उपस्थित असणारे सर्व कार्यकर्तेही गोंधळून गेले. या प्रकारामुळे भुजबळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळांनी बांधकाम विभागाच्या व्यवस्थेबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
माजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरात प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन सुरू असताना शववाहिनीने अचानक पेट घेतला. आंदोलनावेळी पोलिस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यावेळी अचानकपणे शववाहिनीने पेट घेतला.
मराठी माणसाला पटके पटके मारेंगे असे विधान करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांना जाब विचारणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतीभा धानोरकर या तीन खासदारांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात येईल, असे अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दौंड तालुक्यातील वाखरी येथील कला केंद्रातील गोळीबार प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका. गोळीबार करणाऱ्यावर प्रसंगी मकोका लावण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे पोलिसांना सांगण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले.
कृषिमंंत्री माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ विधानसभेतील आहेत. विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्याबाबतची चौकशी लावल्याची माझी माहिती आहे. माझी आणि कोकाटे यांची अजून भेट झालेली नाही, आमची सोमवारी भेट होणार आहे. आपल्यावर राज्याची जबाबदारी आहे, त्यामुळे प्रत्येकाने भान ठेवून बोललं पाहिजे, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिलेल्या आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोग त्यांचे काम करत नाही. कर्नाटकातील एका मतदारसंघातील चोरीचे आमच्याकडे पुरावे आहेत. निवडणूक आयोगाच्या चोरीचे आमच्याकडे शंभर टक्के पुरावे आहेत. आम्ही आता या प्रकरणात मागे हटणार नाही. प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे आम्ही आता यात मागे हटणार नाही, असेही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले.
रशियात अंगारा एअरलाईन्सचं एक प्रवासी विमान बेपत्ता झालं आहे. या विमानात सुमारे ५० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण विभागाशी संपर्क तुटल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या शोधमोहीम सुरू आहे.
Yuvraj Maharaj on Sai Baba : साईबाबांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या युवराज महाराजांविरुद्ध अखेर शिर्डी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरातील मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवा असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. शिर्डी साईसंस्थान आणि विविध श्रद्धाळूंनी जोरदार निषेध करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित ठाण्यात युवराज महाराजांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे नाशिकमध्ये भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत. भाजप कार्यालयात कोर कमिटीच्या बैठकीला बागुल आणि राजवाडे देखील उपस्थित झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोर कमिटीच्या बैठकीत आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार आणि माजी आमदार बाळासाहेब सानप देखील उपस्थित आहे. रविवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बागुल व राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्याविषयावर बैठकीत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. भाजप प्रवेशाची जागा निश्चित आणि नियोजनासाठी बैठक सुरू आहे.
बीड जिल्हा कारागृहातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची गँग ज्या तुरुंगात आहे, त्याच कारागृहात एका न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याकडे मोबाईल सापडला आहे. संशयास्पद हालचालीमुळे तपास करताना कैद्याच्या अंतर्वस्त्रात मोबाईल लपवून ठेवल्याचं उघड झालं. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबई हायकोर्टाने 2006 सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 दोषींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने हायकोर्टाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत यांच्या कुटुंबियांनी शेतकऱ्यांचे तब्बल ८ कोटी १६ लाख रुपयांचे ऊस बिल थकवल्याचा आरोप ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी केला आहे. तेरणा, शिवशक्ती आणि सोनारी या तिन्ही कारखान्यांचा कारभार तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत करत असल्याचं बोललं जातं आहे. शेतकऱ्यांचे पैसे तत्काळ द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा ठाकरे सेनेने दिला आहे.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी नाशिकच्या चांदवडला प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा निषेध केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन हनी ट्रॅप प्रकरणावरून एकमेकांवर तुटून पडले आहेत. एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या प्रकरणावरून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणातील प्रफुल्ल ओझा हा एकेकाळी जलसंपदा मंत्री महाजन यांचा विश्वासू सहकारी असल्यामुळे या वादाला तोंड फुटले आहे. अशातच आता महाजन यांनी थेट खडले आणि ओझा यांचा फोटो ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, "एकनाथ खडसे... तुमच्या या "गुलाबी गप्पा" कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय."
एकनाथ खडसे... तुमच्या या "गुलाबी गप्पा" कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय…
— Girish Mahajan (@girishdmahajan) July 24, 2025
हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात ?
हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे...
२०१९ ते… pic.twitter.com/kEVXjsOYcq
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी फुले वाडा स्मारक बाबत आढावा घेणार असल्याचं सांगितलं. तर या कामाला पुण्यातील पाऊस आणि रस्ता अरुंद असल्यामुळे कामाला वेळ लागत असल्याचं सांगितलं. या वाड्याचं एक महिन्याभरात स्ट्रक्चर पूर्ण होईल. फुले वाडा स्मारक बाबत आढावा घेणार असून फुले आणि भिडे वाडा स्मारक ही दोन्ही कामे लवकरात लवकर करू असं आश्वासनही भुजबळ यांनी दिलं आहे.
शिर्डीतील साई मंदिरात आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आला आहे. भगवंत मन नावाने साई संस्थानला धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साई संस्थानकडून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सांगलीत जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हर्षल पाटील असं या कंत्राटदराचं नाव आहे. राज्य सरकारकडे 1 कोटी 40 लाख रुपयांची थकबाकी होती. वेळेत बिलं मिळत नसल्यानं नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज मुस्लिम धर्मगुरूंसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. ही बैठक दिल्लीतील हरियाणा भवन येथे होणार आहे. या बैठकीला संघाचे सर कार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल, रामलाल आणि इंद्रेश कुमार तर ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर इलियासी यांच्यासह अनेक प्रमुख मुस्लिम धर्मगुरूही उपस्थित राहणार आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे जवळपास 8 कोटी 16 लाख थकवल्याची माहिती समोर आली आहे. थकीत ऊस बिलाचा प्रश्न घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजीत पाटील साखर आयुक्तांकडे गेल आहेत. सात दिवसांत ऊसाची थकीत बिले मिळाली नाही तर साखर आयुक्तलयात आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं आहे. तर पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेतला. त्यामध्ये 55 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची ही माहिती जाणून घेतली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भयपणे पार पडावी, यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांनी नागपुराततील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेत सूचना दिल्या आहेत.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या पथकात एकूण 9 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानिमित्ताने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलनाला सुरूवात केली आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज धुळेकडे रवाना होऊन धुळे शहरात मुक्काम करणार आहेत. शुक्रवारी ते धुळे, जळगाव मधील विविध कार्यक्रमांना हजेरी लावून नंदुरबार दौऱ्यावर जाणार आहेत. बुधवारी मुबंई दौरा रद्द झाल्यामुळे कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट टळली आहे.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर जरांगे यांनी आम्ही कायम महादेव मुंडे यांच्या कुटुंबासोबत राहणार आहोत आणि न्याय भेटल्याशिवाय मागे हटणार नाही. हत्या किती क्रूरपणे झाली हे कुणाला माहीत नव्हते, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना माहीत झाले. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर आरोपी आठ दिवस मांस घेऊन फिरत होते. मुख्यमंत्री यांना मान खाली घालयला लावणारी बाब आहे. कारण तुमच्या राज्यात महादेव मुंडेचा खून होतो आणि ते आरोपी दोन वर्षे सापडत नाहीत. असे मुडदे पडत असतील तर बीड जिल्ह्यातील लोकांनी आता जागे झाले पाहिजे. आता बीडच्या जनतेने रस्त्यावर उतरायचे ठरवले किंवा आंदोलन करायचे ठरवले तर मुख्यमंत्र्यांना अवघड जाईल. देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांना विनंती आहे की, दोघांनीही आठ दिवसाच्या आत आरोपी अटक करावी अन्यथा अठरा पगड जातीचे लोक तुम्हाला बीड मध्ये एकत्र आलेले दिसतील, आणि कसा मोर्चा असतो हे तुम्हाला दिसेल असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी थांबवली असून आता उर्वरित छाननी या निवडणुका पार पडलण्यानंतर केली जाणार आहे.
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर गृह मंत्रालयाने 22 जुलै 2025 च्या राजपत्र अधिसूचनेद्वारे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आयोगाकडून प्रारंभिक प्रक्रियेस अधिकृत मान्यता दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या अनुच्छेद 324 अंतर्गत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निवडणुकीचे आयोजन ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, 1952’ व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक नियमावली, 1974 च्या अधीन राहून केले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.