Maharashtra Election 2026: विधानपरिषदेचा सामना महाविकास आघाडीच्या खिशात : 3 विरुद्ध 2 ने महायुती चितपट

Maharashtra Legislative Council election : विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात पाचपैकी 3 जागा जिंकून महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.
Marathwada Graduate MLC Election 2026
Marathwada Graduate MLC Election 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra News: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात पाचपैकी 3 जागा जिंकून महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवला, तर पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी बाजी मारली. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात प्रतापसिंह पाटील यांनी विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा पराभव केला. अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे किरण सरनाईक यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर विजय मिळवला. शेवटी दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर नागपूर पदवीधरमधून अभिजीत वंजारी त्यांनीही गुलाल उधळला.

हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांचा पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत हर्षदा यांनी ९ हजार ७०० हून अधिक मतांनी विजय मिळवल्याचे वृत्त आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीने पुणे पदवीधर मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले.

कौस्तुभ गावडे विजयी

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला. या लढतीत काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप आणि इतर उमेदवारांमुळे या मतदारसंघातील लढत चुरशीची झाली होती. अखेर मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांनंतर गावडे यांनी विजय मिळवला.

Marathwada Graduate MLC Election 2026
Nagpur Election Results: ..अखेर भीती खरी ठरली; नागपूर पदवीधर भाजपनं गमावला; काँग्रेसनं खातं उघडलं; वंजारींनी बाजी पलटवली; कोहळेंना पराभवाचा धक्का

सतीश चव्हाण यांना धक्का

छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा पराभव केला. प्रतापसिंह पाटील यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. त्यांनी 17000 हून अधिक मताधिक्याने तीन टर्मचे आमदार सतीश चव्हाण यांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत महायुतीतील काही नेत्यांचा चव्हाण यांना विरोध असल्याची चर्चा होती. अब्दुल सत्तार यांनी उघडपणे विरोधाची भूमिका घेतली होती. त्यामुळे या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

अमरावतीत किरण सरनाईक विजयी

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार, विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करता आला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. वैध मतांनुसार विजयासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. सरनाईक यांनी हा कोटा पूर्ण करत विजय मिळवला.

Marathwada Graduate MLC Election 2026
Congress Vs Modi: ‘बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, काँग्रेसला किती जागा मिळाल्या?’ PM मोदींचा टोला; काँग्रेसचं जशास तसं प्रत्युत्तर

नागपूर पदवीधर मतदारसंघात शेवटपर्यंत चुरस

नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात चुरशीची लढत झाली. कोहळे यांनी पहिल्या फेरीपासून पहिल्या पसंतीच्या मतांवर आघाडी घेतली होती. या निवडणुकीत बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांनी 25 हजारांहून अधिक मतं घेत रंगत आणली. कराळे यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेल्या मतांमुळे वंजारी यांची धाकधूक वाढली होती. मात्र कराळे यांच्याच मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतांवर वंजारी यांनी दणदणीत विजय मिळवला.

या पाचही मतदारसंघांतील निकालांमुळे विधानपरिषदेतील पक्षीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुका या मर्यादित मतदारवर्गाच्या असल्या, तरी त्यातून सुशिक्षित मतदारांचा कल, पक्षांची संघटनात्मक ताकद, उमेदवार निवडीचे निर्णय आणि स्थानिक राजकीय समीकरणे यांचे संकेत मिळतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com