काटोल विधानसभा मतदारसंघात मोठी धक्कादायक घटना घडली. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सायंकाळी प्रचार आटोपून येत असताना जलालाखेडा रोडवर त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यातील एक दगड देशमुखांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यामुळे या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. अनमोल याच्या विरोधात मागील महिन्यात भारत सरकारने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. या प्रकरणी केंद्रीय गृह विभाग किंवा एनआयए अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.यावेळी त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघांतील जनतेला भावनिक साद घालत आपली कन्या रोहिणी खडसे यांना निवडून द्यावे, अशी भावनिक साद घातली आहे. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही हे ईश्वरच ठरवेल, असंही खडसे यावेळी म्हणाले.
सांगलीच्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजवर बोचरी टीका केली. भाजप हा विषारी सापासारखा आहे. त्यामुळे त्याला मारून टाका, असे खर्गे म्हणाले. महाराष्ट्रातील सरकार हे चोरांनी मिळून बनवले आहे, असा टोलाही खर्गे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचारात एक है तो सेफ है, हा नवा नारा दिला आहे. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर टीका केली. त्याला आता भाजपने उत्तर दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है असे सांगत तावडे यांनी काँग्रेसच्या भष्ट्राचाराची यादी वाचून दाखवली.
प्रचार संपायला काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हडपसर विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी अजित पवार यांच्या गटात सहभागी होणे पसंत केले. तुपे यांची लढत आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्याशी होत आहे. आज शरद पवारांनी सोशल मीडियावरुन चेतन तुपे यांना निष्ठा काय असते? हे सांगितले आहे. "प्रशांत जगताप यांनी अडचणीच्या वेळी पक्ष निष्ठा सोडली नाही . चेतन तुपेंने मात्र फुटीरांना साथ दिली. वडील विठ्ठल तुपे यांच्याकडून ‘निष्ठा काय असते ?’ हे त्यांनी शिकायला हवे होते," अशा शब्दांत एक्सवरुन पवारांनी तुपेंनी सुनावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. भोर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारासाठी सुळे जात असताना मांजरी आणि सासवड कापूरहोळ रस्त्यावर त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यांचे हेलिकॉप्टर आणि गाड्या देखील तपासल्या.
"गद्दारी करणारा आपला आमदार कसा होतो. माझ्याकडे निष्ठेला किमंत आहे. त्यांची दादागिरी माझ्यावर सोपवा," असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला. कर्जत येथे नितीन सावंत यांच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. माझ्याकडे गद्दारीला स्थान नाही, असे ठाकरे यांनी खडसावून सांगितले.
नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये कोट्यवधीचं घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. महायुतीच्या एका उमेदवारांसाठी ही रक्कम आणली होती, असे पोलिसांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाई करीत ही रक्कम जप्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात ही रक्कम कुठून आली होती, कुणाकडे जाणार होती, याचा तपास पोलिस करीत आहे.
आरक्षणाची मर्यादा हटवायची आहे. २५ लाख युवकांना रोजगार देणार, असे सांगत काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. 'एक है तौ सेफ है' या नरेंद्र मोदी यांच्या नाऱ्याची त्यांनी तिजोरी दाखवत खिल्ली उडवली. तिजोरीतून त्यांनी मोदी-अदानी, धारावी झोपडपट्टी पूनवर्सन प्रकल्पांचे फोटो काढले.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात ज्याप्रमाणे मनोज जरांगे फॅक्टर हा महत्वाचा ठरला होता, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे फॅक्टर निकालासाठी निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. यांचा प्रत्यय रविवारी रात्री नांदेडमध्ये आला. मराठा आरक्षणासाठी योगदान नसल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी भाजप आमदाराची सभा उधळून लावली. नायगाव मतदारसंघातील भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्या प्रचारार्थ सभा होती, सभेला आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पुनम पवार उपस्थित होत्या. आमदार राजेश पवार सभेकडे रवाना होत असतानाच गावकऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत सभेला विरोध केला. त्यामुळे ही सभा झाली नाही.
कोल्हापूरजवळ रविवारी रात्री जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावरही अज्ञात हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला असल्याची घटना ताजी असतानाच जळगावातही असाच प्रकार झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी अहमद हुसेन शेख यांच्या घरावर केलेल्या गोळीबारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगावातील मेहरूण परिसरात हा प्रकार घडला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एक टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'महाराष्ट्रीयन की महायुतीये' या शब्दात टिझरमध्ये प्रश्न विचारण्यातच आले आहेत. ठाकरे गटाने टिझरमध्ये महायुतीचा उल्लेख 'महायुतीये'असा केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दुसरीकडे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या तुळजापूर येथे दौरा आहे. ते आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची सुरुवात केली होती आता प्रचार संपल्यानंतर उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाकडे राज्याचे लागले आहे. प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी बारामती 'काका-पुतण्या'ची सभा होत आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्य अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शड्डू ठोकला आहे. ही लढत सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारांची सांगती आज दुपारी बारामतीत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा होत आहे. तर अजित पवार यांचीही देखील आज बारामतीत सभा आहेत. दोन्ही पवारांच्या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
कोल्हापुरमध्ये सात-ते आठ जणांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला केला. घोरपडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मतदानाला काही तास शिल्लक असताना करवीर विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. करवीर मतदार संघातील जनसुराज्य शक्तीचे उमेदवार व्हिजन चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे. रविवारी प्रचार संपून ते घरी जात असताना रात्री 11:00 च्या दरम्यान त्यांच्यावर मानवाड जवळ हा हल्ल्या करण्यात आला. आल्यानंतर अज्ञात व्यक्ती अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार झाले.
राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता होत आहे. येत्या बुधवारी (ता. 20) मतदान आहे. आज ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राज्यात विविध ठिकाणी सभा होत आहे. आज सांयकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत छुप्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु आहे. आज अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचार सांगता सभा देखील होणार आहे. 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.