पाकिस्तानने आपल्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवावे, तसेच नको ते धाडस करू नये, अन्यथा त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असा कडक इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. भारताचा हा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या वक्तव्यांनंतर देण्यात आला. शरीफ यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते, की, भारत आमचं पाणी अडवणार असेल तर त्याला योग्य तो धडा शिकवला जाईल.
महापालिका सरकारची नसते हे आज आम्हाला कळलं. महापालिकेवर प्रशासक कोणाचा आहे? राज्यातल्या 27 महापालिका सध्या फडणवीसांच्या खाजगीरित्या ताब्यात आहेत. सरकारचा निर्णय नाही हे म्हणणं म्हणजे प्रशासनासंदर्भात कमी माहिती असणे आहे. ते दोनदा, तीनदा मुख्यमंत्री झालेत. त्यांनी अशी फुटकळ विधाने करू नये, असा हल्लाबोल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांंच्यावर केला. 15 ऑगस्टला मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा हा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला निर्णय नाही, तर 1988 रोजी तत्कालीन सरकारच्या काळात घेतलेला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.
भाजपच्या अमित मालवीय यांनी शेअर केलेले दस्तऐवज हे बोगस असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. भाजपने जे 1980 सालचे खोटं पत्र दाखवलं आहे त्यावर नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली असं लिहिलं आहे. पण त्यावेळी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अस्तित्वातच नव्हती, ती 1991 च्या कायद्याने 1992 साली अस्तित्वात आली. त्यामुळे भाजपचा खोटारडेपणा उघडकीस आल्याचं काँग्रेसने म्हटलं.
राज्यातील महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे, अन्य धर्मियांनी मतदान केलं नाही असं वक्तव्य राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं. मोहल्लात फिरलात पण तुम्हाला त्यांचे मतदान झाले नाही असंही ते म्हणाले. हिंदू समाजानेच आम्हाला सत्तेत बसवलं, त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणे, त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे असं नितेश राणे म्हणाले. रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांंच्यासह नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता, बांधकाम व्यावसायिक अरुण गुप्ता आणि निलंबित टॉऊनप्लॅनर वाय. एस. रेड्डी यांना या चौघांना वीस ऑगस्टपर्यंत पीएमएलए न्यायालयाने ईडीची कोठडी सुनावली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी मुंबईत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच ताकद आहे. या दोन पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षांची तेवढी ताकद मुंबईत नाही, असा दावा केला आहे. तसेच गट अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहनही राज ठाकरेंनी केला आहे.
मुंबईतील कोस्टल रोड उद्यापासून (ता. १५ ऑगस्ट) २४ तास खुला राहणार आहे, तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काहीजण आपल्या ड्रायव्हिंगचे प्रात्यक्षिकं दाखवतात, त्यातून ते स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका होईल, असे वर्तन करतात. पण तसे करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्टंटबाजांना केले आहे. या कोस्टल रोडवर पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत, त्यामुळे तशी प्रात्यक्षिके तुम्ही करू नका; अन्यथा पोलिसांची नोटीस तुमच्या घरी येईल, असा इशाराही फडणवीसांनी दिला.
वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पवार यांच्यासह नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक सीतराम गुप्ता, बांधकाम व्यावसायिक अरुण गुप्ता आणि निलंबित टॉऊनप्लॅनर वाय. एस. रेड्डी यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासाठी ईडीने या तिघांच्या दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे. त्याला संशयित आरोपींच्या वकिलांनी विरोध केला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले असून पावणे तीनच्या सुमारास त्यावर न्यायालय निकाल देणार आहे.
रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या टीकेला सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. ‘कोण काय बोलतंय, त्यावर प्रतिक्रिया देण्याइतपत मी काही छोटा नाही,’ असे म्हणून त्यांनी गोगावले यांना आपण मोठा नेता मानत नसल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले आहे.
संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात बुवाजी बाबा यात्रा निमीत्ताने संजय राऊत दर्शनाला पोहचले आहेत. संत बुवाजी बाबा हजारो भाविकांचे आराध्य दैवत असून आज गावात यात्रोत्सव असल्याने मोठा उत्साह आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणी कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे गावात आगमन झाले असून दोघांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.
नाशिक महापालिकेने देखील स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंदीचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्रींच्या आदेशानुसार हा आदेश काढला आहे.
Raj Thackeray : मुंबई हायकोर्टाने सांगितल्यावरही जर कबुतरांना खायला घालत असतील तर त्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचे आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. हायकोर्टाची बंदी जैन मुनींना समजली पाहीजे, कोर्टाचा मान राखायला पाहीजे असही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणासंदर्भात नवी अपडेट मिळाली आहे. अल्पवयीन कारचालकावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवण्याची मागणी पुणे बाल न्याय मंडळांने फेटाळल्यानंतर पुणे पोलीसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. बाल न्याय मंडळाच्या निर्णयात त्रुटी असल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. कारचालकाचा गुन्हा निर्घृण श्रेणीत मोडत नसल्याचा निकाल बाल न्यायालय मंडळाने दिला होता. या निकालात स्पष्टता नसल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अपील केलं आहे. प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवण्यात यावा असे पुणे पोलिसांनी अर्जात म्हटलं आहे.
कबुतरांमुळे काय आजार होत आहेत, ते डॅाक्टरांनी सांगितले आहे. मुंबईतील कबुतरखान्याबाबत न्यायालयाने दिलेला न्याय पाळला पाहिजे, असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणात जैन समाजात पडू नये, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. गेल्या महिन्यात असेच आंदोलन विद्यार्थ्यांनी केले होते. कँरी ऑन प्रकरणावरुन विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
कोल्हापूर: जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रारूप मतदारसंघ रचनेत कागल तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघाची संख्या पाच वरून सहा केली आहे. नव्याने बानगे जिल्हा परिषद मतदार संघ तयार केला होता. म्हाकवे ग्रामस्थांनी याला हरकत घेतल्याने जिल्हा परिषद बानगे मतदार संघाचे नाव बदलून ते आता म्हाकवे जिल्हा परिषद मतदार संघ करण्यात आले आहे. त्यामुळे बानगेतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. ते न्यायालय लढाई करण्याची तयारी आहेत.
शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याची सुनावणी 14 जुलै 2025 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या झाली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील तारीख निश्चित करत प्रकरण 20 ऑगस्ट 2025 रोजी यादीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आता ही सुनावणी 8 ऑक्टोबर पुन्हा होणार आहे.
पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने हॉटेल चालकाकडून कारवाईच्या धाकाने पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
राज्याचे कृषीमंत्री, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आजपासून दोन दिवस वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करतील.
महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामे होताना दिसत नाहीत. कारण सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे. त्यातून रोजच एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. कुणी श्रीनगरला जाऊन बसत आहे तर कुणी कोणाची ‘जनाची-मनाची’ काढत आहे. सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या-कुरबुरी अशी ‘कु’ची बाराखडी सुरू आहे. हे सरकार जनतेचे आहे, असे सत्ताधारी म्हणत असले तरी हे नाराजांचे सरकार आहे. सत्ताधारीही नाराज आणि जनतादेखील. सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी नाराजीच्या ‘छटा’ दाखवीत आहेत, तर कुणी नाराजीच्या ‘जटा’ आपटत आहेत, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून महायुती सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी, रायगडच्या पालकमंत्रिपदावरून नाराज असलेले आमदार भरत गोगावले आणि नुकतंच भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अजितदादांबाबत केलेलं वक्तव्य, या सर्वांचा समाचार या अग्रलेखातून घेण्यात आला आहे.
भटक्या कुत्र्यांची समस्या ही केवळ अस्वच्छतेची नव्हे, तर थेट जनतेच्या आरोग्य व सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तातडीने ठोस पावले उचलली गेली पाहिजेत, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
📢 भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महाराष्ट्रात त्वरित ‘दिल्ली पॅटर्न’ राबवावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रही मागणी! 🚨🐕🦺
— Mahesh Landge (@maheshklandge) August 13, 2025
भटक्या कुत्र्यांची समस्या ही केवळ अस्वच्छतेची नव्हे, तर थेट जनतेच्या आरोग्य व सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत… pic.twitter.com/5aNjykKjuO
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांना गिरगाव कोर्टाने दिला दिला आहे. फसवणूक प्रकरणात रविंद्र फाटक आणि त्यांच्या पत्नीसह 26 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपातून फाटक यांच्यासह 8 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ठाण्यातील एका भूखंडाच्या मालकी हक्कावरून फाटक यांच्या विरोधात व्यावसायिक भागीदाराने MRA मार्ग पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर कोर्टाने आता निर्णय दिला आहे.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केल्या प्रकरणी 21 जुलैला अजित पवारांनी सूरज चव्हाण यांचे निलंबन केले होते. मात्र, या निलंबनाला तीन आठवडे होण्याच्या आधीच सूरज चव्हाणचे यांचे थेट प्रमोशन करत त्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. सुनिल तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
मुंबईत आज ठाकरेंची शिवसेनेचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकत्रित मेळावा होणार आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. आज दुपारी 4 वाजता शिरोडकर हायस्कूलमध्ये हा मेळावा होणार आहे.
म्हाडाने बीडीडी चाळ अंतर्गत पुनर्विकसित केलेल्या 2 इमारतींच्या सदनिकांचं आज चावी वाटप होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री हजर राहणार आहेत. या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर दिसणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.