Mumbai News : मुंबईतील शिवाजी पार्कवर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप रविवारी सायंकाळी होणार आहे. या मुळे मुंबईतील वातावरण काँग्रेसमय झाले आहे. या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडी मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन करीत आहे. या सभेला सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. जागा वाटपासंदर्भातील अधिकृत घोषणा या सभेनंतर होण्याची शक्यता आहे.
रविवारी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा समारोप या सभेच्या माध्यमातून होईल. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सुद्धा या सभेला उपस्थिती असणार आहे. या सभेनंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या सभेनंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांची एकत्रित लोकसभा जागा वाटपाची पत्रकार परिषद घेण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळू शकतात. शिवसेना ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि शरद पवार गटाला 10 जागा सुटण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वंचित आघाडीला यापैकी 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
वंचित आघाडीने हा चार जागांचा प्रस्ताव स्वीकारला तर या मधील तीन पक्षाच्या जागा कमी होऊ शकतात. तर रासप आणि स्वाभिमानीला प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी आहे. हातकणंगले जागेवर ठाकरे गट राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. शिवसेनेचे ते पुरस्कृत उमेदवार असतील, अशी माहिती समोर येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे येत्या काळात वंचित आघाडीच्या अटी शर्तीने आणि भूमिकेने हैराण झालेल्या महाविकास आघाडी वंचितशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा जॊरात आहे. त्यामुळे आघाडीने वंचितशिवाय जागावाटप तयार ठेवले असल्याची चर्चा आहे.
मुंबईमध्ये सभेच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपांवर चर्चा केली असून रविवारी रात्री सभेनंतर या जागावाटपाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.