Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा आज निकाल, मोदी सरकारकडून साखर निर्यादीला बंदी, केरळचा मुख्यमंत्रि‍पदाच्या नावाची आज होणार घोषणा यासह आज दिवसभरातील राजकीय आणि प्रशासकीय बातम्या जाणून घेऊया.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पूल कोसळला; चार ते पाच गावांचा संपर्क तुटला

रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यात असणारा अमनोली गावाजवळ असणार पुल कोसळला. हा पुल तुटल्याने जांभूळपाडा पासून आमणोली, दहिगाव, कोलतरे आणि आदिवासी वाड्यांकडे जाणारा हा प्रमुख मार्ग बंद झाला आहे. तर या पुलावरून अवजड वाहतूक सुरू असताना पुल तुटण्याची दुर्घटना घडली. यावेळी डंपर खाली कोसळला असून सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र आता पावसाळ्याच्या तोंडावर पुल तुटल्याने ग्रामस्थांसमोर रहदारीच प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे दर्शन घेतले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मागणी स्वामी चरणी केली. यावेळी श्री स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी गडकरी यांचा सन्मान केला.

नुकसान भरपाई व विविध मागण्यांसाठी रेल्वे बाधित शेतकऱ्यांचा येराळा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

रेल्वे प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी सांगलीच्या नांद्रे-वसगडे येथील येरळा नदी पात्रामध्ये आंदोलन केले. पुणे-मिरज- लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर थेट येरळा नदीच्या पात्रात पाण्यात बसून ठिय्या आंदोलन करत आंदोलनाची दखल न घेतल्यास रेल्वे प्रशासनाचे अतिक्रमण काढून टाकत, जलसामधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांचा हरताळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला जळगाव महापालिकेतील नगरसेवकांनी हरताळ फासल्याचे चित्र आहे. आज महापालिकेची महासभा होती, त्यावेळी महापौर, उप महापौर व सर्व नगरसेवक आपल्या वैयक्तिक चारचाकी वाहनाने महासभेला पोहोचले. एका वाहनातून एकच जण यावेळी महासभेला पोहोचले होते. पंतप्रधानाचे आवाहन पाळण्याची चांगली संधी महापालिका पदाधिकाऱ्यांनी दवडल्याची चर्चा रंगली आहे.

आनंद परांजपे यांची राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोडचिट्टी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा आली आहे. त्या, अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचं काम करत आहेत. अशातच त्यांना ठाण्यात मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे समन्वयक आनंद परांजपे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोने बाजारात मोठी उलथापालथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थिमुळे पुढील एक वर्ष सोने खरेदी न करण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे. यानंतर सोने बाजारात याचे परिणाम दिसू लागले असून सोने खरेदीवर याचा परिणाम झाला आहे. नागरिकांनी देखील सोने खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे सोने बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे.

Praniti Shinde : 7 दिवसांत माफी मागा अन्यथा...

खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. खासदार प्रणिती शिंदेनी अब्रूनुकसान केल्याचा आरोप करत गोरेंना ही नोटीस बजावली. 7 मे रोजी सोलापुरात माध्यमाशी संवाद साधताना पालकमंत्री गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदेवर टीका केली होती.

Shivsena News : शिवसेना स्टाइल कारवाई करण्याचा इशारा

मुंबईत मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी एक महिन्याच्या आत दुकानं, हॉटेल्स आणि अन्य प्रतिष्ठानांवरील नामफलक मराठीमध्ये करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यात फाइव्ह स्टार हॉटेलपासून प्रसिद्ध व्यक्तींच्या वेगवेगळ्या ब्रांडच्या दुकानांचा सुद्धा समावेश आहे. जे कोणी या सूचना गांभीर्याने घेणार नाहीत, त्यांच्याविरोधात शिवसेना स्टाइल कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी या संबंधी बुधवारी महापालिकेच्या दुकान आणि प्रतिष्ठान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

नीट पेपर फुटीवरून राज ठाकरेंचा केंद्राला सवाल : 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?

प्रत्येक विषयांत गोंधळ घालण्याची केंद्र सरकारची परंपरा सुरूच आहे. या पेपरफुटीची मुळं महाराष्ट्रात सापडली आहेत. देशातील 22 लाख मुलांचं आयुष्य टांगणीला लागलं आहे, त्याचं काय, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

नीट पेपर फुटीप्रकरणी पुण्यातील मनीषा वाघमारेची पाच तासांपासून सीबीआय चौकशी

नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणी पुण्यातील मनीषा वाघमारे हिची गेली पाच तासांपासून सीबीआय कार्यालयात चौकशी करण्यात येत आहे. धनंजय लोखंडसोबतच वाघमारे हिचे व्हॉटसअप आणि टेलिग्राम चॅट पुढे आलेले आहे. वेगवेगळ्या २१ बॅंक खात्यातून मनीषा वाघमारे हिच्या बॅंक खात्यात रक्कम ट्रान्सफर झाल्याने तिच्यावरील संशय बळावला आहे.

रुपाली चाकणकर ईडीच्या कार्यालयात दाखल; चौकशी सुरू

अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्या वरळी डोम दोन कार्यालयात पोचल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. खरात याच्या समता पतसंस्थेतून प्रतिभा चाकणकर यांच्या खात्यातील २६ लाखांचा व्यवहार प्रकरणी ईडीने त्यांची आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. त्याच मुद्यावरून रुपाली चाकणकर यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवून बोलावले होते.

पिंपरी चिंचवडच्या महापौरांची पुढचे वर्षभर परदेश दौरा न करण्याची घोषणा

पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःचा परदेश दौरा रद्द केला आहे. एवढाच नव्हे; तर पुढचे वर्षभर परदेश दौऱ्यावर न जाण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या वाहनांना इंधन भत्ता वाढवून द्यावा, असा प्रस्ताव आला होता. मात्र, आम्ही तो फेटाळून लावला असून उलट ज्या भागात महापालिकेचे अधिकारी राहतात, त्यांनी कार्यालयात येताना एकत्र एकाच गाडीतून यावेत, असे आवाहन केले आहे.

पश्चिम बंगालमधील सर्व शाळांत आता राष्ट्रगीत, राज्यगीतासह वंदे मातरमही बंधनकारक

पश्चिम बंगालमध्ये सर्व शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत, राज्यगीतासह आता वंदे मातरम बंधनकारक करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ही घोषणा केली आहे.

आठवड्यातून एकदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा : मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांना सूचना

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना काटकसरीच्या सूचना दिल्या आहेत. मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अर्ध्यावर आणण्याची सूचना करण्यात आली आहे. विदेश दौरे, खासगी दौरे, टाळावेत, तसेच विशेष विमान आणि हेलिकॉप्टरचा प्रवासही शक्यतो टाळण्यात यावा. आठवड्यातून एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सांगितले.

Eknath Shinde arrives at VidhanBhavan in an Electric Car एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक गाडीनं विधानभवनात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद देत, इलेक्ट्रिक गाडीनं प्रवास केलाय. एकनाथ शिंदे इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक गाडीनं विधानभवनात दाखल झालेय. तसेच ताफ्यातून गाडी कमी केल्या असून, पंतप्रधानांच्या आवाहनाला नागरिकांनी देखील प्रतिसाद द्यावा असंही ते म्हटलेय.

Pune News पुण्यात रात्री तलवारींचा नाच, 100 ते 150बुलेटस्वारांचा गोंधळ

पुण्यातील दिवे घाटाखाली रात्रीच्या वेळी टोळक्यानं प्रचंड दहशत माजवली. सुमारे 100 ते 150 बुलेटस्वारांनी सायलेन्सरचे फटाके वाजवत आणि हातात तलवारी-कोयते नाचवत भर रस्त्यात गोंधळ घातलाय. रात्री 12 च्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये तरुण तलवारींसह डान्स करताना दिसत आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Devendra Fadnavis  पेट्रोल - डिझेल वाचवण्याचा प्रयत्न करा, फडणवीसांचा बुलेटवरुन प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीआयपी संस्कृतीला फाटा देत आज थेट बुलेटवरून प्रवास करत विधानभवन गाठलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात इंधन आणि ऊर्जा बचतीसाठी केलेल्या विशेष आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. गाड्यांचा मोठा लवाजमा आणि सुरक्षा ताफा बाजूला सारत मुख्यमंत्र्यांनी स्वतः बुलेट चालवली. या माध्यमातून त्यांनी जनतेला इंधन बचतीचा मोठा संदेश दिलाय.

शरद पवारांची आज पत्रकार परिषद

आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची निर्घृण हत्या

आरपीआय (आठवले गट) कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; फडणवीस आणि शेलारांचा बुलेटवरून विधानभवन प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक प्रवासाचे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी कारचा ताफा बाजूला ठेवत बुलेटवरून विधानभवनात प्रवेश केला. त्यांच्या या साध्या आणि वेगळ्या प्रवासाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली.

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी; ईडी ऑफिसमध्ये दाखल 

बॉम्ब ठेवणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद

हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या संशयीत आरोपीचा सीसीटिव्हीसमोर आला आहे. . संशयीत आरोपी इलेक्ट्रिक स्कुटीवरून आला.. त्यानंतर त्यानं अतिदक्षता विभागाच्या बाजुला असणाऱ्या पुरुष स्वच्छता गृहात हा बॉम्ब ठेवला. दरम्यान सीसीटिव्हीमध्ये संशयिताचा चेहरा किंवा गाडीचा नंबर प्लेट स्पष्ट पणे दिसत नसल्यानेता पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचं मोठे आव्हान आहे.

झिशान अख्तर नेपाळमध्ये

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झीशान अख्तर नेपाळमध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांना अख्तरच्या ठिकाणाची माहिती मिळाली असून लवकरच त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतच होणार

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातील मुक्कामावरून वाद झाला होता. जागा अपुरी असल्याच्या विचाराने दुसरीकडे मुक्काम होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आळंदी देवस्थानने परंपरेनुसार भवानी पेठेतचं पालखीचा मुक्काम होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देवस्थानने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केलं आणि पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

तब्बल 20 वर्षांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे. पवनराजे आणि त्यांचे चालक समद काझी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात होणार आहे. या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जण आरोपी आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचं विविध वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. यंदा कुंभमेळ्यासाठी नवे बौध चिन्ह निश्चित करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीसंकट, जिल्हाधिकाऱ्यांकडून टंचाई आराखड्यास मंजुरी

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ३ हजार ५७४.९३ लक्ष रुपयाच्या पुरक टंचाई आराखड्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली आहे. पुणे जिल्हातील भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०२५, १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६, व १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीचा संभाव्य पाणी टंचाई त्रैमासिक कृती आराखडा १ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रान्वये सन २०२५-२६ साठी ३ हजार ५६४.४० लक्ष रुपयाचा मंजूर करण्यात आला होता, त्यानंतरच्या कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुक पार पाडल्या. नवनिर्वाचित सदस्यांनी पाणी टंचाई निवारणाच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या होत्या, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ७ मे २०२६रोजी पुरक टंचाई आराखड्यास मंजूरी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com