Maharashtra Live Update : ललिता तारख यांना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या जरांगेंच्या दहा ते अकरा समर्थकांवर गुन्हा दाखल

Political Breaking Live Headlines Updates : उल्हासनगरमध्ये आज ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड, यासह आज दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

ललिता तारख यांना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या जरांगेंच्या दहा ते अकरा समर्थकांवर गुन्हा दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर ललिता तारख यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर महिला आंदोलक ललिता तारख यांना सोशल मीडियावर भयानक पद्धतीनं ट्रोल करण्यात आलं होतं. त्यांनी या प्रकरणी दोनवेळा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. पण आता या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांच्या तारख यांना ट्रोल करणाऱ्या जरांगेंच्या दहा ते अकरा समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांना दिवेआगारमधील समुद्राच्या खोल पाण्यात का जाऊ दिलं...?';गिरीश महाजन

भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी रायगडमधील दिवेआगार येथे आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेवर कठोर शब्दांत भाष्य केलं आहे. ते म्हणाले,सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी अकॅडमीची होती. मुलांना समुद्राच्या खोल पाण्यात का जाऊ दिलं, असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.

दुष्काळी पाहणीसाठी राहुल गांधी लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार : नाना पटोले

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्याचा दौरा करावा, अशी विनंती आमदार नाना पटोले यांनी केली आहे. पटोले यांच्या विनंतीला राहुल गांधी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे राहुल गांधी लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणाची सीबीआय चौकशीची मुलाची मागणी

ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांचा मुलगा राम पुर्णेकर यांनी केली आहे. मी माझ्या पप्पांचं अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणार आहे, असेही राम पुर्णेकर यांनी सांगितले.

आळंदीतील आठ मुलं दिवेआगार येथील समुद्रात बुडाले

पुण्यातील ८ मुलं दिवेआगार येथील समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले आहेत. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांची सहल ही दिवे आगार येथे गेली होती. या सर्वांना बोर्लीतील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पायलट स्मित मच्छारच्या धाडसाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; मच्छारच्या काका-काकूंनी घेतली भेट

प्लाय दुबाई विमान कंपनीचे पायलट स्मित मच्छार यांच्या काका आणि काकूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत मच्छार यांच्या शौर्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले आहे. दुबईहून इस्त्राईलमधील ‘तेल अविव’कडे निघालेले विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, मच्छार यांनी हल्ला होऊनही विमानाचे सुरक्षितपणे लॅडिंग केले, त्यामुळे विमानातील १७८ प्रवासी बचावले आहे, त्या धाडसाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीत कौतुक केले.

ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी एसआयटीची स्थापना

ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकात २३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

पूर्णेकर हत्या प्रकरणाने ठाणे हादरले असतानाच  पाचपाखाडी परिसरात कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला

पूर्णेकर हत्या प्रकरणाने ठाणे हादरले असतानाच शहरातील पाचपाखाडी परिसरातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. पगार मागण्यासाठी दुकानात गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर दुकानातील मॅनेजरने धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन्ही तरुण जखमी झाले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची लिपिकाला धक्काबुक्की, जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या दादागिरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून किनवट बाजार समितीच्या सभापतींनी लिपिकाला शिवीगाळ करत धक्काबुकी करून हात पाय तोडण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणात आता सभापती गजानन मुंडे याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पडळकर यांना दुष्काळाचे गांभीर्य नाही, याला बालिश पणा म्हणावा लागेल : राष्ट्रवादी आमदारची टीका

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि मिरज हे तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर देखील केले आहे. अशावेळी आमदार गोपीचंद पडळकर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलेला डामडौल, गाड्यांचा ताफा,फटाक्यांची प्रचंड आतषबाजी आणि शक्तीप्रदर्शनावरून टीकेची झोड उठली आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी पडळकर यांना दुष्काळाचे गांभीर्य नाही. याला बालिश पणा म्हणावा लागेल,अशी टीका केली आहे.

फडणवीसांनी केलेलं आवाहन पडळकर विसरले; सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना केलेल्यावरून जल्लोष टीका सुरू

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. मात्र अर्ज भरताना गोपीचंद पडळकरांनी केलेला जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि काढलेली रॅली यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. दुष्काळी आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेले आवाहनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अर्ज भरण्याच्या निमित्ताने केलेल्या डामडौलामुळे पडळकर आता टीकेचे धनी बनत आहेत.

'एकाही आमदार, खासदार किंवा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही'; ठाकरेंच्या शिवसेनेचा सज्जड इशारा

नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी केली आहे. तसेच शासनाने तातडीने मदत जाहीर केली नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडू आणि एकाही आमदार, खासदार किंवा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.

मुश्रीफ पालकमंत्री असल्याचा जिल्ह्याला फायदा काय? ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाची गोकुळ निवडणुकीवरून सवाल

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत व्यस्त असल्याची घणाघाती टीका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी केली आहे. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेच नसल्याचा आरोप करत, त्यांच्या असण्याचा जिल्ह्याला नेमका फायदा काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पूर्णेकर कुटुंबियाचंं ठाकरेंनी केलं सांत्वन,न्याय मिळवून देण्याचं आश्वासन

उद्धव ठाकरेंनी आज पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. यावेळी पूर्णेकर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंकडे न्यायाची मागणी केली. आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी केली. यावेळी मिनाक्षी शिंदे आणि पतीचे आरोपीसोबतचे फोटो उद्धव ठाकरेंना दाखवले. उद्धव ठाकरेंनीही पूर्णेकरांना न्याय मिळवून देऊ, तुमच्यासोबत आहोत असं आश्वासन दिलं.

शिंदे शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडेंकडून अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीममध्ये बंडाचं निशान फडकलये. महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसतानाच, शिंदे सेनेचे नेते, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले आहे.

"मी १९९२ पासून शिवसेनेत कार्यरत आहे आणि पहिल्या दिवसापासून शिंदे सेनेत आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकिटावर माझाच पहिला अधिकार आहे...म्हणूनच मी पहिला अर्ज पक्षाकडून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला असल्याचं देशपांडे यांनी म्हटले आहे. जर पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही मी निवडणुकीतून माघार घेणार नाही...उमेदवारी मिळणे हा माझा हक्क आहे. ती मिळाली नाही तर शिक्षक आघाडी' या संघटनेच्या बॅनरखाली निवडणूक लढवेन, असं श्रीकांत देशपांडे म्हणाले..

प्रतिभा धानोरकर यांच्या बरोबरचे मतभेद संपले : विजय वडेट्टीवर

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी मोठी घोषणा केली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या बरोबरचे मतभेद संपले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षात मतभेद, भांडण संपवून काम केले पाहिजे अशी भूमिका मांडत चंद्रपूर पासून सुरुवात करतो, मतभेद संपवून पुढे जाऊ असे त्यांनी म्हटले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव पुकारून त्यांनी मतभेद संपल्याचे जाहीर केले.

आमदार प्रकाश सोळंकेंच्या सिंदफना वसतिगृहातून तीन विद्यार्थी बेपत्ता; परिसरात खळबळ

बीडच्या माजलगाव शहराजवळील फुले पिंपळगाव येथील आमदार प्रकाश सोळंके यांच्या सिंदफणा पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातून तीन विद्यार्थी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर उपस्थिती तपासली असता दहावीतील तेजस चव्हाण, दिनेश चव्हाण आणि अभिजीत राठोड हे तिघेही वसतिगृहात आढळून आले नाहीत. विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात येताच व्यवस्थापनाने परिसरासह आसपासच्या भागात शोध सुरू केला.

हे विद्यार्थी अनुक्रमे पाथरी, नित्रुड आणि आष्टी येथील असल्याची माहिती आहे. मात्र हे विद्यार्थी वसतिगृहातून नेमके कधी आणि कोणत्या मार्गाने बाहेर पडले, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

नंदुरबारमध्ये दुष्काळाचे सावट मात्र पालकमंत्री मुश्रीफ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गोकुळच्या निवडणुकीत व्यस्त

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत व्यस्त असल्याची घणाघाती टीका ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी केली आहे.

पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेच नसल्याचा आरोप करत, त्यांच्या असण्याचा जिल्ह्याला नेमका फायदा काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माळी यांनी केली आहे. जर शासनाने तातडीने मदत जाहीर केली नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडू आणि एकाही आमदार, खासदार किंवा पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.

कॅ. स्मित माच्छर यांच्या घाटकोपर येथील घराबाहेर जल्लोष

कॅ. स्मित माच्छर यांच्या घाटकोपर येथील घराबाहेर जल्लोष केला जात आहे. त्यांनी फ्लाय दुबई विमानात दाखविलेल्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी स्थानिक रहिवाशी यांच्या घराबाहेर जमा झाले आहेत.

राहुल गांधी बालाघाटमध्ये जाणार

काँग्रेस नेते राहुल गांधी आज मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये जाणार आहे. कुपोषण व इतर समस्यांमध्ये तेथील अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेही बालाघाटमध्ये गेले होते.

शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती

राज्य सरकारने २०२६ च्या खरीप हंगामामध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या २६५ तालुक्यांमध्ये पिक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत सहकार विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

शिवाजी पार्क परिसरात पोलिसांकडून बॅरिकेडिंग

कॉक्रोच जनता पार्टीच्या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात बॅरिकेडिंग सुरू केली आहे. सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी दोनवेळा याठिकाणाची पाहणी केली आहे. यादरम्यान बाचाबाची झाली होती. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. सीजेपीचे शुक्रवारी आंदोलन आहे.

MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय!

MPSC परीक्षांबाबत विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबरला पुकारलेलं आंदोलन स्थगित केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली. मागण्या मान्य करण्याचं आश्वासन मिळाल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. MPSC परीक्षा ऑफलाइनच होणार असून, मोठ्या प्रमाणात पदभरती केली जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

महायुतीची महत्त्वाची बैठक; विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांच्या  नावाची चर्चा

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. विधान परिषदेच्या आगामी जागांवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुती म्हणून पुढील निवडणुका एकत्र लढण्यावरही विचार झाला. पुणे आणि नागपूर पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांसाठी विविध पक्षांतील इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे हत्याकांडावरून राजकारण तापलं! मीनाक्षी शिंदेंचं नाव पूरक FIRमध्ये; संजय राऊतांचा गंभीर आरोप

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संजय राऊत यांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्याबाबत मृताच्या मुलाने केलेल्या दाव्यांचा उल्लेख केला. हल्लेखोरांना निळकंठ टॉवरमध्ये पाहिल्याचा दावा करण्यात आला असून, पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! गव्हासह 6 रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ

रब्बी हंगामापूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गव्हासह 6 प्रमुख रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. उत्पादन खर्चावर किमान 50 टक्के नफा मिळावा, यानुसार नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत.

इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांचे इस्रायलचे पंतप्रधान बेंज्यामिन नेत्यानाहू यांनी कौतुक केले आहे. भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो. त्यांनी इस्रायलच्या नागरिकांसह 174 प्रवाशांचा जीव वाचवला. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होवो. ते खरे नायक आहेत, अशा शब्दांत बेंज्यामिन नेत्यानाहू यांनी त्यांचे कौतुक केले.

नागपूर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत नाराजी

नागपूर शहर काँग्रेसच्या नवीन कार्यकारणीतील नियुक्तीयांवरून पक्षांतर्गत धुसफूस समोर आली आहे. नागपूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी विलास भालेकर यांची नियुक्ती केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार केली आहे.

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीसाठी २ लाख २२ हजार १४९ मतदार नोंदणी

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीसाठी २ लाख २२ हजार १४९ मतदार नोंदणी झाली आहे. सर्वाधिक १ लाख १७ हजार १७३ मतदार नागपूर जिल्ह्यात नोंदणी करण्यात आली आहे.

अशोक पवारांना घेरण्यासाठी माऊली कटकेंची फिल्डिंग

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरूर तालुक्यात राजकीय घमासान सुरू झाले आहे. सध्या माजी आमदार अशोक पवार हे जिल्हा बँकेवर तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत असून, त्यांना घेरण्यासाठी आमदार माऊली कटके व समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांना रणांगणात उतरवून बार उडवून देण्याचे नियोजन पक्के झाले असतानाच पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांनीही रणांगणात उडी घेतल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.

जिल्हा बँकेसाठी अतुलबाबांचा अर्ज

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या वतीने भाजपचे आमदार अतुलबाबा भोसले यांनी कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतरही आपली अंतिम उमेदवारी अद्याप निश्चित नसल्याचं अतुलबाबांनी स्पष्ट केलं आहे.

जेष्ठ नेते शरद पवार 3 तारखेला पुणे जिल्ह्यात दुष्काळ दौरा करणार

जेष्ठ नेते शरद पवार ३ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यात दुष्काळ दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर आणि दौंड या तीन तालुक्यांना भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उल्हासनगरमध्ये आज ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

उल्हासनगर महापालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांची निवड आज विशेष महासभेत पार पडणार आहे. सात जागांसाठी तब्बल ४२ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ACB कडून मुंबई महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

एसीबीने (ACB) मुंबई महापालिकेच्या गोवंडीतील एम-पूर्व विभागातील BMC च्या दोन अधिकाऱ्यांवर 3 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता गणेश हनमंतराव चांदोलकर आणि उपअभियंता अविनाश दत्तात्रय दुधभाते यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com