Maharashtra Politics Live Update : पुणे महापालिकेचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय, १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Political Breaking Live Headlines Updates : इंडिया आघाडीचा आज मोर्चा, सोमेश्वर कारखाना निवडणुकीचा निकाल, विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघात निवडणूक यासह राज्य आणि देशभरातील राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

पुणे महापालिकेचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय, १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे महापालिकेने राज्यात विविध जिल्ह्यांवर दुष्काळाचं संकट घोंघावत असताना शहरातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे शहराचा १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. शहरासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं वर्षभराकरिता योग्य नियोजन आणि पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेता याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

एमपीएससी पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत 12 आरोपींना अटक

एमपीएससी पेपर फुटीप्रकरणी आज आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मयूर ठाकरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ठाकरे याला १७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

उसाला पाच हजार रुपये उचल....तुमच्या काकांनी ठेवलंय का? कुठून देणार पाच हजार? : दिलीप वळसे पाटील

दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या उसाला पाच हजार टन उचल देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. शेतकरी संघटना त्यासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र, अडचणीत असलेल्या साखर कारखानदारीकडे बोट दाखवत कारखानदार पाच हजारांची उचल देण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यावरून वाद रंगलेला असतानाच माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाच हजारांची उचल मागणाऱ्यांना कठोर शब्दांत फटकारले आहे. तुमच्या काकांनी ठेवलंय का? कुठून देणार पाच हजार? असा सवाल केला आहे.

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेकडून पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेने आगामी पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांत आमचे १० हजार ५०० नोंदणीकृत सभासद आहेत. या सर्वांनी हा निर्णय घेतला आहे. मंगेश चिवटे उमेदवारीचे दावेदार असूनही आम्हाला डावलण्यात आल्याने एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेने हा निर्णय घेतला आहे, असे संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांकडून सांगण्यात आले.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा निकाल सोमवारी (ता. 12) जसजसा समोर येत गेला, तसतसा राष्ट्रवादीच्या गोटात जल्लोष होत गेला. संध्याकाळी सहा पर्यंत जाहीर झालेल्या सातही जागांवर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनेलने विजय मिळविला होता. माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा पराभव झाला.

इंडिया आघाडीकडून सुप्रीम कोर्टात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रिट याचिका दाखल

इंडिया आघाडीकडून सुप्रीम कोर्टात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून एसआयआर प्रक्रियेला विरोध करण्यात आला आहे. याचिका दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चाही काढला.

‘बारामतीच्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही’; सुनेत्रा पवारांची ग्वाही

माळेगाव : एकीकडे दुष्काळसदृश परिस्थिती, दुसरीकडे पाण्याअभावी कोमेजणारी उभी पिके आणि हाताशी आलेला ऊस वाळण्याची भीती, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा डाव्या कालव्याच्या पाणीवाटपाचा प्रश्न आज माळेगावात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमोर मांडला.

इंदापूर तालुक्यातील शेटफळ तलाव नीरा डावा कालव्याच्या माध्यमातून भरण्यासाठी सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे बारामतीच्या वाट्याच्या पाण्यावर परिणाम होत असल्याची चिंता बारामतीच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर, ‘पाणीवाटपात बारामतीवर अन्याय होऊ देणार नाही. सध्या सुरू असलेल्या आवर्तनाची सखोल माहिती घेऊन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संबंधित मंत्र्यांची बैठक घेणार आहे,’ अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.

Devendra fadnavis : राहुल गांधी यांच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चावर केली टीका

काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चानंतर केला आहे. देशभरातील वातावरण निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून चांगलेच तापले आहे. विरोधकांचे गेल्या आठवडाभरापासून आंदोलन सुरु आहे.

इंडिया आघाडीच्या खासदाराने सुप्रीम कोर्टावर मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. इंडिया आघाडीच्या खासदाराने सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा वळवला आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात वक्तव्य केले. “संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा पुढे निघालो आहोत. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने जात आहोत,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

shivsena : शिवसैनिकांकडून मुंबईतील कारवाईचा निषेध

Summary

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ संभाजीनगरमधील निराळा बाजार परिसरात ठाकरे शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन सुरू करण्यात आले आहे. निराळा बाजार ते शिवसेना भवन या मार्गावर आंदोलन करत शिवसैनिकांकडून मुंबईतील कारवाईचा निषेध नोंदवण्यात येत आहे. या आंदोलनात ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी हातात तिरंगा झेंडे घेऊन आणि हाताला काळ्या पट्ट्या बांधून सहभागी झाले आहेत. तसेच, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

congress News : महाराष्ट्र सदनातून काँग्रेसचे नेते रवाना

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. सोमवारी दुपारी नवी दिल्लीतील सुप्रीम कोर्टावर इंडिया आघाडीचा मोर्चा निघाला आहे. महाराष्ट्र सदनातून काँग्रेसचे नेते मोर्चासाठी रवाना झाले आहेत.

अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं ठिय्या आंदोलन; देवस्थान समितीविरोधात नाराजी

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पुजाऱ्यांमधील वाद चिघळला आहे. धार्मिक कार्यात देवस्थान समितीकडून अडथळे आणले जात असल्याचा गंभीर आरोप पुजाऱ्यांनी केला आहे. या निषेधार्थ पुजाऱ्यांनी थेट अंबाबाई मंदिरातच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने मंदिर परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

दिल्लीतील 6 मेट्रो स्टेशन बंद; सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत प्रवेश बंद

इंडिया आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील 6 मेट्रो स्टेशन सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, प्रवाशांसाठी इंटरचेंज सुविधा सुरू राहणार आहे. सुरक्षा यंत्रणा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करणार आहेत. कोणती स्टेशन बंद आहेत, ते पाहा.

सोमेश्वर कारखान्याचा 'दादा कोण?' मतमोजणीकडे लक्ष

बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी माळेगावात सुरू झाली आहे. 21 संचालक पदांसाठी 83 उमेदवार रिंगणात असून, निवडणुकीत 84.25 टक्के मतदान झाले. अजित पवार गटाची सत्ता कायम राहणार की सुनेत्रा पवार यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन; महाराष्ट्रातील 100 नेते दिल्लीत दाखल

इंडिया आघाडीच्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे जवळपास 100 प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात होणाऱ्या या आंदोलनातून काँग्रेस शक्तिप्रदर्शन करणार आहे.

Delhi Police : दिल्ली पोलिसांना कॉकरोच जनता पार्टीचा आंदोलनाच्या परवानगीसाठी अल्टिमेटम

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी, पोलिस सर्वांना आंदोलनासाठी 10 दिवस आधी संपर्क साधण्यास सांगतात. आता आम्हीच त्यांना जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठीची तारीख आणि वेळ निश्चित करण्याचा पर्याय देत आहोत. यासाठी आम्ही पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे, असे सांगितले.

Shaktipeeth Expressway : माढ्यात शक्तिपीठ महामार्ग मोजणीचे शेतकऱ्यांकडून स्वागत

शक्तिपीठ महामार्गाची मोजणीचे काम सध्या सुरू असून, आज मोजणीचे अधिकारी माढा तालुक्यातील तुळशी गावात गेले असतात, तेथील बाधित शेतकऱ्यांनी या महामार्गाला समर्थन देत अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध आता कमी होऊ लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Mumbai News : आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई शिवाजी पार्क येथे मैदानातील विद्यार्थी आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिसांना रोखल्यावरून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, मनसेचे अमित ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे बंधू मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या सुटकेसाठी आडवे पडले होते.

Hingoli News : हिंगोलीच्या फटाका अग्निकांडामध्ये पालिकेच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

हिंगोलीच्या फटाका अग्निकांडामध्ये पालिकेच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत आगीच्या घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेत 16 नागरिक आगीत भाजले होते.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके यांचा दिल्ली पोलिसांच्या व्हिडिओवर मोठा खुलासा

अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांच्या व्हिडिओवर मोठा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिस म्हणाले, तुम्हाला आई-वडिलांना फोन लावायचा आहे का? आई-वडिलांची प्रकृती बरी नसल्यामुळे मी म्हटलो गावाकडच्या भावाला फोन लावू द्या. दिल्ली पोलिसांनी व्हिडिओ मोडतोड करून दाखवला. दिल्ली पोलिस म्हणाले तुम्हाला मोबाईल नंबर पाठ आहे का? मोबाईल नंबर पाठ नसल्यामुळे मोबाईलची मागणी केली. मात्र मोबाईल उपलब्ध करून दिल नाही. वकिलांना बोलू द्या, म्हटलं ते पण करू दिलं नाही, असा दावा अभिजीत दिपके यांनी केला आहे.

Konkan News : रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू, नियमित पाणी पुरवठ्यात 15 मिनिटांची कपात

दुष्काळी परिस्थितीमुळे आणि भविष्यातील पाणी टंचाईचं गांभीर्य लक्षात घेता, रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू करण्यात आली आहे. दर सोमवारी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नियमित पाणी पुरवठ्यात आगामी काळात 15 मिनिटांची कपात करण्याचा प्रस्ताव आहे. रत्नागिरी शहराला दररोज 20 एमएलडी पाणी लागते. शीळ धरणात 99.73 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. रत्नागिरी शहरात 12 हजाराहून अधिक नळ कनेक्शन धारक आहे. आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यामुळे महिन्याला 80 एमएलडी पाण्याची बचत होणार आहे.

Delhi BIG Update : राहुल गांधी यांची दिल्लीत आज तातडीची साडे अकरा वाजता पत्रकार परिषद...

'इंडिया आघाडी'चा दिल्लीत आज मोर्चा होत असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत साडे अकरा वाजता तातडीची पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेट नाकारली आहे. यावर राहुल गांधी पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडणार, याकडे लक्ष लागले आहे.

Baramati Politics : सोमेश्वर कारखान्याची मतमोजणी सुरू, निकालाचे चित्र दुपारी चार वाजेपर्यंत स्पष्ट होणार

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झाली असून 93 टेबलावरती ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली.

अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल

दिल्लीतील बंगला साहिब गुरुद्वारात झालेल्या आंदोलनासंदर्भात आणि धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचा कथित भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, पक्षाचे आमदार, कार्यकर्ते आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल केली होती, त्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीचा मोर्चा, महाराष्ट्रातील 100 नेते दिल्लीत

महाराष्ट्रातून काँग्रेसचे जवळपास 100 मोठे नेते दिल्लीत दाखल झालेय. यामध्ये हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात काढण्यात येणाऱ्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते मोठ्या संख्येने दिल्ली दाखल झाले आहेत.

इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटायला मुख्य न्यायाधीश सूर्य कांत यांचा नकार,

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी आणि इंडिया ब्लॉक नेत्यांना भेटण्यास नकार दिला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एसआयआर संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला होता, तो प्रस्ताव त्यांनी फेटाळला.

सूर्य कांत यांनी ईमेलद्वारे प्रतिसाद देत राहुल गांधींचा प्रस्ताव नाकारला. त्यांनी स्पष्ट केले की, विरोधी पक्षनेते ज्या मुद्द्यांवर चर्चा करू इच्छित आहेत, ते मुद्दे आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला असून, पुरंदर तालुक्यातील आडाचिवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील २७६ ग्रामपंचायतींच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची या अभियानांतर्गत दखल घेण्यात आली.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, विवेक भीमनवार रजेवर

MPSC आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी रविवारी (११ ऑक्टोबर) रात्री राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आंदोलनस्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगितले. त्यानंतर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपण रजेवर जात असल्याचे जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.