Maharashtra Political Live Update: 'एकनाथ शिंदेंच्या घरापासून आमचं घर हे 20 मिनिटांच्या अंतरावर...'; राम पूर्णेकरांचा संताप

Political Breaking Live Headlines Updates : गोकुळ निवडणुकीचा आज निकाल, यासह आज दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया. टायगर श्राॅफ याच्यावर गोळीबार, बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी, यासह आज दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

'एकनाथ शिंदेंच्या घरापासून आमचं घर हे 20 मिनिटांच्या अंतरावर...';  राम पूर्णेकरांचा संताप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोळीबारानंतर अवघ्या 20 मिनिटांत अभिनेता टायगर श्रॉफच्या तब्येतीची विचारपूस केल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा राम पूर्णेकरने संताप व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या घरापासून आमचं घर हे 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. तरीदेखील त्यांनी आम्हाला घरी येऊन न्यायासाठी आश्वस्त केलं नाही. आम्हाला न्याय हवा आहे, असं म्हणत राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.

'दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना...':मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगली येथे सोमवारी(ता.१९) झालेल्या शिक्षक आणि पदवीधरांच्या मेळाव्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतांच्य़ा बाद होण्यावरुन टोला लगावला. ते म्हणाले, “दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल असं त्यांनी म्हटलं.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल अनपेक्षित अन् धक्कादायक - धनंजय महाडिक

गोकुळच्या निवडणुकीचा निकाल अंतिम टप्प्यात असताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, "गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. मात्र सभासदांनी दिलेला कौल मान्य असून, महायुती म्हणून आम्ही या निकालाचं परीक्षण करू आणि आत्मचिंतन करू. दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापुढेही चांगला दर मिळावा आणि संघाची प्रगती व्हावी, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. त्यामुळे योग्य कारभाराला सहकार्य असेल मात्र चुकीच्या धोरणांना नक्कीच विरोध असेल. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला न्याय देण्यासाठी यापुढेही महायुती म्हणून आम्ही नेहमीच सकारात्मक असणार आहोत."

सर्वसाधारण गटात मतमोजणीवर पुन्हा दोन हरकती; महायुतीचे युवराज पाटील यांनी केली फेरमोजणीची मागणी

सर्वसाधारण गटात मतमोजणीवर पुन्हा दोन हरकती

महायुतीचे युवराज पाटील यांनी फेरमतमोजणी घेण्याची केली मागणी

महायुतीचे पराभूत उमेदवार आबाजी विश्वास पाटील यांच्या मतमोजणीवर आक्षेप

पुन्हा मतमोजणीची केली मागणी

आलेल्या अर्जाची विश्लेषण करणार, पाहणी करणार

मगच फेरमतमोजणी करणार - निवडणूक अधिकारी

आशुतोष रांका, सौरभ दास यांच्या न्यायालयीन कोठडी दोन दिवसांनी वाढवली

कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना दिल्लीच्या कोर्टानं ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मुख्य मागणीसाठी दिल्लीत पुन्हा एकदा सीजेपीनं आंदोलनाची हाक दिली होती. पण या आंदोलनासाठी दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना विमानातच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं होतं. तेव्हा कोर्टानं त्यांना वर्षभर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं आंदोलन करु नये या अटीसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडलं होतं. पण तरीही दुसऱ्याच दिवशी या दोघांनी पुन्हा जंतर-मंतरवर जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी दोघांना कोर्टानं ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपली, त्यानिमित्त झालेल्या सुनावणीत दिल्ली पोलिसांच्या मागणीनुसार, कोर्टानं आणखी दोन दिवस कोठडी वाढवली आहे.

अरविंद निलंगेकरांचा दोषमुक्तीचाअर्ज खंडपीठाने फेटाळला!

Chhatrapati Sambhaji Nagar : 'बँकेचे कर्ज एकरकमी तडजोडीतून फेडले असले, तरी कर्ज मिळवताना कथित बनावट कागदपत्रांचा वापर,फसवणूक किंवा गुन्हेगारी कट केल्याचे आरोप संपुष्टात येत नाहीत', असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुशील एम. घोडेस्वार यांनी युनियन बँक ऑफ इंडियाशी संबंधित कर्जप्रकरणात अरविंद दिलीप पाटील निलंगेकर आणि आशिष विनीत मारवाह या दोघांचे दोषमुक्तीचे अर्ज फेटाळले. मारवाह आणि पाटील यांनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या स्वतंत्र फौजदारी पुनरीक्षण अर्जांवर न्यायालयाने एकत्रित निर्णय दिला.

मिथेनॉल कंपन्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप आमदाराची शिफारसपत्रे

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात १९ जणांचा बळी गेला होता. त्या प्रकरणी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तब्बल ६९ मिथेनॉल कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द केले होते. त्याविरोधात २२ कंपन्यांनी अन्न व प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे अपिल केले होते. कंपन्यांचे निलंबन रद्द करावं, यासाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, मुंबईतील भाजप आणि एका अपक्ष आमदाराने शिफारस पत्र दिले होते. संभाजीनगरमधील एका शिवसेना नेत्याचा त्यात समावेश होता.

शौमिका महाडिक यांची फेरमतमोजणीची मागणी

भाजप नेत्या शौमिका महाडिक यांनी गोकुळमधील पराभवानंतर फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील तातडीने मतमोजणी केंद्रात दाखल झाले आहेत. आता निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे कोल्हापूरचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अचानक दिल्ली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. त्या एनडीएमधील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर त्या केंद्रातील महत्वाच्या नेत्यांसंदर्भात भेटीगाठी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

मत बाद होत असेल, तर पदव्या कोणी दिल्या शोधावे लागेल.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टोलेबाजी.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील मत बाद होण्याच्या प्रकारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदवीधर आणि शिक्षकांना चांगलाच टोला लगावला आहे. पदवीधर व शिक्षक निवडणुकीमध्ये मतदान लिहताना वेगवेगळी कलाकारी होते. त्यामुळे दहा हजार मत बाद होणार असतील तर मग पदवी कोणी दिली, हे शोधावे लागेल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सांगली मध्ये पार पडलेल्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार मेळाव्यामध्ये बोलताना मतदान बाद प्रकारावरून देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल शब्दात पदवीधर आणि शिक्षकांना हे खडेबोल सुनावले आहेत.

सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची १४ जागांवर विजयी आघाडी

गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत मोठा ट्वीस्ट आला असून महायुतीला मोठा धक्का बसला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने विजयी मुसंडी मारत १४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महायुतीचे उमेदवार ८ जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्यासह गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील हेही पिछाडीवर असल्याने महायुतीच्या हातून गोकुळची सत्ता गेली आहे. तर या विजयी आघाडीनंतर सतेज पाटलांच्या अंजिक्यतारा येथे जोरदार जल्लोष केला जात आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं!आम्ही कधीही काँग्रेससोबत गेलो नाही, मात्र तुम्ही गेलात!

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकीत महायुतीची भूमिका स्पष्ट करत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केल्या काँग्रेससोबतच्या राजकीय समीकरणांवरून सवाल केलाय. "आम्ही कधीही काँग्रेससोबत गेलेलो नाही, मात्र तुम्ही काँग्रेससोबत गेलात, असा थेट आरोप त्यांनी केलाय.

लातूर जिल्हा बँके शेतकऱ्यांचा नाही, तर देशमुख कुटुंबाचा आत्मा; संभाजी पाटील निलंगेकरांची टीका

लातूर जिल्हा बँकेवरून भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलीपराव देशमुख यांना पुन्हा लक्ष केलं असून सध्या चर्चेत असलेल्या दृश्यम चित्रपटाचे डायरेक्टर ते आहेत का? हे मी त्यांना विचारणार आहे, असा टोला लगावला आहे. तसेच लातूर जिल्हा बँक हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे, असं ते नेहमी सांगतात. पण ही बँक शेतकऱ्यांचा आत्मा नाही तर देशमुख कुटुंबाचा आत्मा बनली आहे, अशा शब्दात निलंगेकर यांनी टीका केली आहे.

गोकुळमध्ये पुन्हा ट्विस्ट! तीनही माजी अध्यक्ष पिछाडीवर; सतेज पाटलांचे महायुतीसमोर तगडे आव्हान

गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत पुन्हा ट्विस्ट आला असून संघाचे तीन माजी अध्यक्ष पिछाडीवर असून नविद मुश्रीफ यांच्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान सतेज पाटील यांच्या पॅनेलने महायुतीला तगडे आव्हान दिले असून सर्वसाधारण गटात महायुतीचे १४ उमेदवार आघाडीवर असून, समविचारी आघाडीचे 8 उमेदवार आघाडीवर आहेत.

सतेज पाटलांच्या आघाडीची महायुतीविरोधात कडवी झुंज, 8 उमेदवार आघाडीवर; 'महायुती'चा आकडा घसरला

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत ट्वीस्ट येताना दिसत असून क्रॉस व्होटिंग आणि बाद मतांचे वाढलेले प्रमाण यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान पहिल्या फेरीपासून आघाडीवर असणाऱ्या महायुतीचा घसरला असून चौथ्या फेरीअखेर 14 उमेदवार आघाडी आहेत. तर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे 8 उमेदवार आघाडीवर असून गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे मोठ्या मतांनी पिछाडीवर आहेत.

CJP प्रकरणात आज कोर्टात काय घडणार? रत्ना सिंह यांनी दिली महत्त्वाची माहिती

CJP प्रकरणातील सौरव दास आणि आशुतोष यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत आहे. त्यामुळे दोघांना दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. CJPच्या कायदेशीर सल्लागार रत्ना सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. याच पोस्टमधून त्यांनी प्रशासनावरही निशाणा साधला आहे.

मोठी बातमी: आणखी एका साखर कारखान्याची निवडणूक घोषित

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला. या निवडणुकीसाठी २२ नोव्हेंबरला मतदान होणार असून, २४ नोव्हेंबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या सत्तेची सूत्रे राष्ट्रवादी भाजप की इतर कोणाच्या हाती जाणार, याकडे आता सभासदांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूरात गोळीबाराची थरारक घटना; सराईत गुन्हेगार महेश दळवी यांची हत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरजवळ असलेल्या दानोळी गावात गोळीबाराची घटना घडली आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास महेश दळवी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. महेश दळवी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: राजस्थानच्या कोट्यातून आरोपी ताब्यात,

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राजस्थानातील कोटामधून 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवत आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा आज कोल्हापूर आणि सांगली दौरा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, (१९ ऑक्टोबर) रोजी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

टॉयगर श्रॅाफ यांच्यावर हल्ला; तीन संशयीत सुरतमधून ताब्यात

अभिनेता टॉयगर श्रॅाफ यांच्यावर हल्ला करणाऱ्या तीन संशतीयांना सुरत येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक जण हा महाराष्ट्रातील असून दोघे हे हरियाणातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

माजी मंत्री दिलीप वळसे-पाटलांचा एसटीने २० किलोमीटर प्रवास

माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या प्रवासाचा अनुभव घेतला. मंचर एसटी आगारात दाखल झालेल्या पाच नवीन बसचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालं आणि त्यानंतर त्यांनी मंचर ते पारगाव असा २० किलोमीटरचा प्रवास केला.

गोकुळ दूध संघ निवडणूक: राखीव गटातील निकाल महायुतीसाठी धक्कादायक


गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या मतमोजणीत दुसऱ्या फेरीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आतापर्यंत सर्वसाधारण गटातील १६५० मते मोजली असून, क्रॉस व्होटिंगचा धसका असतानाही महायुतीचे सर्व उमेदवार किरकोळ मतांनी आघाडीवर आहेत. आमदार विनय कोरे यांच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटील यांच्या आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. शिरोळ, करवीर, भुदरगड आणि चंदगड तालुक्यांत महायुतीचे उमेदवार तारून जात असून, गगनबावडा, पन्हाळा आणि हातकणंगलेत समविचारी आघाडीने एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. दुसऱ्या फेरीत महायुतीचे सर्वसाधारण उमेदवार ४० ते ५० मतांच्या फरकाने पुढे आहेत. मात्र, राखीव गटातील आगामी निकाल महायुतीसाठी धक्कादायक ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी मुंबईतून टॅक्सीने सुरतच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आरोपींचा माग काढण्यासाठी आणि गोळीबारामागील कारणांचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

काँग्रेस शिष्टमंडळ घेणार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट

फॉर्म 6 मधील कथित गोंधळ आणि पात्र मतदारांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ आज दुपारी १२ वाजता मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. यावेळी फॉर्म 6 मधील त्रुटी, मतदार यादीतील गोंधळ आणि संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी शिष्टमंडळाकडून केली जाणार आहे.

गोकुळ निवडणुकीतील मतमोजणीमध्ये क्रॉस वोटिंगचा धुमाकुळ

गोकुळ निवडणुकीतील मतमोजणीमध्ये क्रॉस वोटिंगचा धुमाकुळ

पहिल्या पंचवीस मतपत्रिकांपैकी नऊ मतपत्रिकांमध्ये पॅनल टू पॅनल मतदान

राधानगरी तालुक्यात 16 मतपत्रिकांमध्ये क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात

राधानगरी तालुक्यात सर्वाधिक क्रॉस वोटिंग

शिक्षकांवर कामाचा भार वाढला

शाळा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ‘माझी शाळा माझी जबाबदारी’ ही विशेष मोहीम जाहीर केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कामाचा व्याप आणखी वाढणार असून, विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी आणि अतिरिक्त कामे करायची कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा शाही स्नानाच्या ऐतिहासिक मार्गात बदलाला संमती!

कुंभमेळा पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाच्या तयारीची बैठक त्रंबकेश्वर येथे झाली. यावेळी शहरातील सद्यस्थिती व विकास कामांमुळे झालेल्या अडचणी याचा आढावा घेण्यात आला. यावेळी शाही स्थानाच्या मिरवणुकीसाठी पर्याय मार्गाला मान्यता देण्यात तयारी दर्शविण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथील षडदर्शन आखाडा परिषदेचे महंत शंकरानंद सरस्वती आणि महंत दुर्गादास यांनी स्थानिक नागरिकांची सोय विचारात घेतली जाईल. स्थानिकांना त्रास होत असल्यास कुंभमेळा शाही स्नानाचा पर्यायी मार्ग स्वीकारण्याची तयारी त्यांनी दाखवली.

गोकुळच्या निवडणुकीत क्राॅस व्होटींग

गोकुळसाठी मतमोजणीला सुरवात झाली आहे. करवीर, भुदरगड, गगनबावडामध्ये क्रॉस व्होटींग मोठ्या प्रमाणात. नऊ नंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात होणार आहे.

पाच अधिकारी निलंबित

 नाशिकचे सहआयुक्त अविनाश दाभाडे, अमित रासकर आणि गोपाळ कासार, मुंबईचे सहआयुक्त योगेश देशमुख तसेच धुळे येथील सहाय्यक आयुक्त सुवर्ण महाजन या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनातील ही मोठी प्रशासकीय कारवाई मानली जात आहे.

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चिंताजनक - सुप्रिया सुळे

अभिनेते टायगर श्रॉफ यांच्यावर मुंबईत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. राज्यात सातत्याने गोळीबाराच्या घटना समोर येत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही अशी स्थिती आहे. सुदैवाने या घटनेत अभिनेत्यास इजा झालेली नसली तरी काही व्यक्तींना दुखापत झाल्याचे समजते. भरदिवसा, भररस्त्यात गुन्हेगार कोयते नाचवित आहेत, गोळीबार करीत आहेत. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीचे हे चित्र अतिशय चिंताजनक आहे. यामुळे नागरीक धास्तावले असून आपल्या सुरक्षेबाबत साशंक आहेत. माझी गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की , कृपया आपण तातडीने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेऊन जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे खासदार सुप्रीय सुळे यांनी म्हटले आहे.

'गोकुळ'च्या निवडणुकीची आज मतमोजणी

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची आज सकाळी आठ वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरवात झाली आहे. रमणमळा परिसरात मतमोजणी होत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्ट्राँग रूम ओपन करण्यात आला आहे. काल झालेल्या मतदान प्रक्रियेत 5418 पैकी 5416 ठरावधारकांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, निकालानंतर मिरवणूक काढण्यास बंदी असून निकालासाठी मतमोजणी परिसरात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची गर्दी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.