उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बार्टी, सारथीच्या प्रवेशावर बंधनं येणार असल्याची माहिती दिली आहे. 42 -45 हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच -पाच जण पीएचडी करतात. ठराविक विद्यार्थ्यांकरिताच कित्येक शे कोटी रुपये खर्च होत आहेत, आणि त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांवर अतिशय कमी रक्कम खर्च होत आहे असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, काँग्रेसनं कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. हे त्यांचं राजकारण आहे. आणि भाजपनं कितीही प्रयत्न केला तरीही मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणा्पासून अलिप्त आहे. त्यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी भुजबळ यांची भेट घेतली आहे. भुजबळांचा शस्त्रक्रियेनंतरचा एक फोटो नांदगावकर यांनी सोशल मीडियावर शेअर करत भावनिक पोस्ट केली आहे.
विहिरीत पडलेला बिबट्या शेतकऱ्यांना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली
माहीती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले
बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे
अनेक दिवसांपासून शिरपूर भागात बिबट्याचा वावर होता, वेळोवेळी माहिती वनविभागाला देऊन देखील वनविभागाचे दुर्लक्ष केल्याचा परिसरातील नागरिकांनी आरोप केला आहे
बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी त्याठीकाणी धाव घेतली
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, यांच्या विद्यमाने परिवर्त बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या वतीने आयोजित 13 वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आज (ता. 13) नाशिक जिल्ह्यातील येवल्यात सुरू झाले असून यावेळी मुक्तीभूमी येथून संविधान सन्मान रॅली व ग्रंथदिंडी काढण्यात आली. या रॅलीमध्ये सामाजिक कार्येकर्ते, विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Mumbai News : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पा संदर्भातील महत्वाच्या घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानपरिषदेत केल्या आहेत. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी 17 ठिकाणी एसआरए समुह पुनर्विकास प्रकल्पाच्या घोषणेसोबतच ‘एसआरए अभय योजने’ला डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच तक्रारींच्या जलद निपटाऱ्यासाठी ‘एपेक्स ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटींची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या ओसीसाठीच्या अभय योजनेला वर्षांची मुदतवाढ आणि मुंबई महापालिकेच्या लिज प्लॉटवरील महापालिका कर्मचाऱ्यांनी बांधलेल्या घरांकरीता नवीन योजना करण्याची घोषणा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली आहे.
परिवहन विभागामध्ये अतिरिक्त आयुक्त असलेल्या भरत कळसकर यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडला. त्याने 331 अधिकाऱ्यांकडे बदल्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपये मागितले, त्यापैकी 245 अधिकाऱ्यांनी त्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. भरत कळसकर याने शेल कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असल्याचा आरोपही अनिल परब यांनी केला. तसेच या भ्रष्ट अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार असा प्रश्नही विचारला.
राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन संपत आले तरी सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्ष्यवेधी सूचनांची उत्तर अद्याप प्रलंबित आहेत. त्यावरुनच भाजपचे आमदार सुधीम मुनगंटीवारांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही त्याला प्रतिसाद देत कारवाईचा इशारा दिला. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत जर लक्ष्यवेधींची प्रलंबित उत्तरं दिली नाहीत तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल असा इशारा राहुल नार्वेकरांनी दिला.
नागपुरात चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्य पदाधिकाऱ्यांनी चार दिवसापूर्वी नागपूर चॉकलेट आंदोलन केलं होतं. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक तरुणांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणानंतर नोकरी व अशा पद्धतीचा आश्वासन देण्यात आलं होतं मात्र 11 महिन्यानंतर अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आज पुन्हा दुसऱ्यांदा आंदोलन करत टेकडी रोड कडे जाण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी ती परवानगी नाकारली आणि यशवंत स्टेडियमच्या बाहेर पडून दिल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. लोटांगण आंदोलन करत प्रशिक्षणार्थी ते बाहेर जात होते त्यामुळे पोलिसांनी त्यांना इथेच थांबून धरल आणि सगळे आंदोलन आक्रमक झाले.
नागपूरमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला असून हा मोर्चा अधिवेशन सुरु असलेल्या विधीमंडळाकडं कूच करु लागल्यानं पोलिसांनी या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
एसआरएचा नागपूर मॉडेल आम्ही तयार केला आहे. त्याच्या जीआर आम्ही आता पूर्ण महाराष्ट्राला लागू केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्रात जिथे-जिथे झोपडपट्टी लोक आहेत तिथे एमएमआरडीएमध्ये एसआरए करतो म्हणून त्यांनाही लागू नाही. कोणाचे कच्चे घर असेल तर कोणालाही पक्क घर बांधण्यास अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. 50 हजार लाभार्थी होतील, आतापर्यंत 25 हजार झाले आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
एका विद्यार्थ्याला किती वेळा शिष्यवृत्ती द्यायची? तसंच एकाच घरात किती लोकांना पीएचडीसाठी शिष्यवृत्ती द्यायची याबाबत सरकारचं विचारमंथन सुरु आहे. विधानसभेत बोलताना अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला.
चऱ्होली इथं व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी माजी नगरसेवक किसन तापकीर यांच्यासह सहा जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक वादातून नितीन गिलबिले या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली. सहावा साथीदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचा माजी नगरसेवक किसन ऊर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर हा फरार आहे. तोच या गुन्ह्याचा मास्टर माईंड असल्याचे सांगितले जात आहे.
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्यावतीने आज नागपूर इथं हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातील शेकडो प्रकल्पग्रस्त या मोर्चात सहभागी झाले होते. प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत मिळणारे आरक्षण सध्याच्या 5 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी मांडून आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला आहे. काँग्रेस नेते बंटी शेळके या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. मुंढे यांच्यावर करण्यात आलेले आरोप अन्यायकारक असल्याचा दावा करत काँग्रेसने प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनाद्वारे सत्य बाहेर आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जालना जिल्ह्यात मागील 11 महिन्यात तब्बल 109 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहे. यापैकी 83 मुलींचा शोध लावण्यास जालना पोलिसांना यश आला असून, 26 मुली अजूनही बेपत्ता आहे. जालना जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यात 109 मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले. तसंच जालना जिल्ह्यात 28 अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले असून 22 मुलांना शोधण्यास पोलिसांना यश आले आहे, तर 8 मुले अद्यापही बेपत्ता आहे.
ऊस दराच्या मागणीसाठी पंढरपुरात ऊस संघर्ष समितीचे उपोषण सुरू आहे. ऊस दर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रविकांत तुपकर दाखल झाले आहेत. मागील सहा दिवसांपासून शेतकरी संघटनेचे नेते समाधान फाटे यांचे वाखरी इथं बेमुदत उपोषण सुरू आहे. आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढू लागला आहे.
नागपूर इथं कोळी समाजाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मध्यस्थी केली. पोलिसांना विनंती केली की, आंदोलकांना सोडून द्या, आंदोलकांना घेऊन मी आदिवासी मंत्री यांच्यासोबत चर्चा करेल आणि यातून मार्ग काढू, असे यावेळी सुषमा अंधारे यांनी सांगितले.
कोळी समाजाला आदिवासी (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळावे, तसेच जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रक्रियेत होणारा अन्याय दूर करावा, या मागणीसाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित समितीच्यावतीने नागपूर इथं अर्धनग्न आंदोलन व बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जळगावच्या जामनेर इथं एकनाथ शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून स्ट्राँग रूमबाहेर पहारा दिला जात आहे. इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त असली, तरी एसआरपीएफचे सशस्त्र जवान देखील तैनात करण्यात आलेले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला देखील त्यांच्या सत्ताधारी मित्रपक्ष भाजपवर विश्वास नसल्याची यामुळे चर्चा रंगली आहे.
ऊसाला पहिली उचल साडेतीन हजार रूपये मिळावी या मागणीसाठी अकलूज इथल्या सहकार महर्षी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश केला. कारखान्यांमध्ये स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सुमारे तासभर हे आंदोलन केलं.
सहकारी बँकेत दहा वर्ष संचालक पदावर राहण्याची कालमर्यादा रिझर्व बँकेकडून निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्याला आव्हान देणारी याचिका बॅक्स असोसिएशन कोल्हापूर सर्किट बेंचेकडे दाखल केली होती. रिझर्व बँकेच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. मात्र सर्किट बेंचने ही याचिका फेटाळली असून त्याचा अंतिम निकाल 15 जानेवारीला लागणार आहे. पूर्वलक्षी प्रभावाने हा निकाल लागण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील आमदार खासदारांचा सहकारी बँकेतील थेट हस्तक्षेप टळणार आहे. शिवाय गेले अनेक वर्ष तळ ठोकून बसणाऱ्या आमदार खासदारांना देखील याचा फटका बसणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे याच्यात महत्वाची बैठक होत आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षशिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी दाखल करणाऱ्या १६ बंडखोरांवर भाजपने कठोर कारवाई केली आहे. भाजप वाशिम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी या सर्वांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकोला महानगरप्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते राजेश मिश्रा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. राजेश मिश्रा यांच्यासह चार नगरसेवकांनी नागपूर येथे एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश केला.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाची शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरकारी पक्षाने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे पुरावे न्यायाधीशांसमोर सादर केले. यावेळी संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ न्यायालयात दाखवण्यात आला. ही सुनावणी सुरु असताना संतोष देशमुख यांची पत्नी आणि भाऊ देखील न्यायालयात होते. न्यायालयात लावलेला व्हिडीओ पाहून या दोघांना अश्रू अनावर झाले.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर काल मांजरसुंबा घाटात एका भीषण अपघाताची घटना घडली. सोलापूरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या डिझेल टँकरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे डिझेलचा टँकर तात्काळ उलटला. त्यामुळे हा टँकर आगीत जळून खाक झाला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं काल निधन झालं. आज यांच्या पार्थिवावर आज लातूरच्या वरवंटी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवराज पाटील चाकूरकर यांचे अंतदर्शनसाठी आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ, राज्यसभाचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरदचंद्रजी पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.